नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दूर आभाळाच्या कडेला ढगाचा एक काळा ठिपका-जखमेवरच्या खपलीसारखा. तिथून लांबवर दिसणारी पांढरी फट्ट एकलकोंडी पायवाट, कुठल्यातरी शेेत्याच्या काळजात घूसून रूतून बसलेली. तिच्या बाजूबाजूनी ओशाळवाणी ढगांकडे मान करून उभी असलेली झाडे, चुकारीसारखीच, कुणाचा कुणाला मागमूस नसलेली. त्याच्या पायाजवळ रेंगाळणारी उदास सावली. फांद्याफांद्यावरचा उघडाबोडका संसार! अंगाला लपेटणारं बेफाम वारं! नांगरूण पडलेलं ढेकळातलं वावर, उगीच गबाळ्यागत वाटणारं. आशाळभूतासारख्या एकामागोमाग येणार्या झळा, फक्त ्रआभासापुरत्या. बैलाचं कातडं तापलंय. अंगाची थरथर वाढलेली.
हीरा बांधावर बसलाय. नजर लांबच लांब पण कुठं? काय सांगता येणार नाही. सरलेल्या मिरगाचा अंगभर उसळलेला जाळ अजून विझला नाही. थेंबातलं आभाळ गळलं नाही. ढेकूळ अजून फुटला नाही. त्याचं मनही न फुटलेल्या तापून राप बसलेल्या ढेकळागत झालंय. डोक्यावरचा भार उतरता उतरत नाही. मुठभर माती आणि हातभर आभाळाच्या सोबतीनं जगण्यातलं बळ सरत चाललंय. जगण्या मरण्याचं मनात सुरू झालंय. कासावीस वाढते आहे. उन्हाची लाही फुटते आहे आणि सावित्री शेताच्या बांधावर पावले टाकत धन्याकडे येते आहे. ती समोर येऊन उभी ठाकली तरी त्याची नजर लांबच लांब! चेहर्यावर पसरलेला एक मोठा शून्य! समोरची सावित्री दिसत नाही. कुठुनतरी आवाज कानावर आदळतोय.
‘‘कोण आहेस तू?’’
‘‘राजा, शेतकरी राजा.’’
‘‘तुला राजा आणि भिकार्यातला फरक माहीत नाही वाटतं?’’
‘‘माहीत आहे पण मी राजाच! या शिवाराचा राजा.’’
‘‘अस्सं... अस्सं... फाटलेली चप्पल बघ. डोळ्यात गोळा झालेला शून्य, अंगावरची कापडं हे सारं तुझी नेमकी अवस्था दाखवतात. कसला राजा तू? भिकार्याची ऐपत नाही आणि स्वत:ला राजा म्हणून घेतोस. तू फक्त नावाचा, बाकी तुला चाटून पुसून खाणारे चांगले गब्बर आहेत. बरं ठीक, मान्य आहे, तू राजा आहेस. पण राजा एक तरी वाण आहे तुझ्यात? बघ एकदा स्वत:लाच निरखून बघ.’’
‘‘निरखायचं काय त्यात? पिढ्यान् पिढ्या राजेच आहोत आम्ही.’’
कोणीतरी मोठमोठ्यानं हसल्याचा आवाज कानावर येतोय, असं हीराला वाटतंय. ते हसणं अंगभर टोचतंय असं भासून हीरा ओरडतोय.
‘‘बस्स, हसू नको. पुरे झालं आता.’’
कुठल्यातरी भयंकर स्वप्नातून जागा झाल्यासारखा हीरा भानावर आला. समोर सावित्री उभी आहे. भेदरून गेलेली, जाजावलेली, एकटक त्याच्याकडंच बघत उभी. तो जवळ असूनही ती अगदी एकटीच.
‘‘काय ओ, कुणासंगं बोलत व्हता?’’ कावरी-बावरी सावित्री.
‘‘ह्ये, नाही कुणासंगंच नाही.’’ साळसूदपणाचा आव आणून हीरा म्हणाला.
‘‘नाही कसं? मी कधीची इथं उभी हाय, पर तुमचं ध्यानच नाही माझ्याकडं. कुठं हरवला व्हता?’’ कपाळावरचा घाम पदरानं पुसत ती बोलली.
‘‘लांब, कुठंतरी लांब जावसं वाटतंय.’’ हीरा उगीच काहीतरी बडबडला.
‘‘काय तरंच काय? लांब कुठं जायचं?’’ तिच्या काळजात चर्रर्र केलं.
‘गेल्या काही दिवसापासून हा असाच काहीबाही बडबडतोय. बोलण्याचा काय पायपोसच राहिला नाही. ना घरात लक्ष, ना शेतात. लेकराबाळाचं तर काय देणंघेणंच न राहिल्यासारखं.’
‘कुणीतरी खोलखोल मधी शिरतंय. आपलं काळीज दोन्ही हातांनी ओढतंय, त्याच्यात कळ दाटलीय. रक्ताची जीवघेणी चिळकांडी उडतेय. समोरचं रान सारं लालभडक, रक्ताळून जातंय. डोळ्यासमोर अंधार दाटून येतोय. संपलं सारं!’ असं सावित्रीला वाटू लागलंय अलीकडं.
का कोण जाणे, पण या बांधावरल्या भल्या थोरल्या आंब्याची सावली अलीकडं तिला नकोसी वाटते आहे. असलं सावलीचं झाड तिला उगीच वैर्यासारखं वाटू लागलंय. ती आता ते झाड निरखतेय.
‘‘पर तुला का उशीर झाला रानात यायला?’’ हीराच्या प्रश्नानं ती दचकली.
‘‘सावकार आला व्हता घरी, कर्जाचं पैसं मागायला. मुद्दल नाही तर नाही व्याज तरी द्या म्हणत व्हता.’’ तिला हे सगळं त्याला सांगायचं नव्हतं पण करणार काय? सांगितल्याशिवाय तर भागच नव्हतं.
‘‘कशानं द्यावं व्याज त्याचं? गेलं साल दुष्काळाचं. यंदा अजून पावसाचा पत्ता नाही. पाऊस पडंल का नाही सांगता यायचं नाही.’’ त्याची अगतीकता वाढली.
‘‘खरं हाय, सालामागून साल असलं आलंय. करकरीत ऊन पडलंय. काय पाऊस येतोय अन् किती पिक येतंय, काय सांगावं?’’ तिने त्याच्या सुरात सुर मिसळला.
‘‘पर सावकाराचा तगादा चुकायचा नाही. कधी काय बोलल सांगता येत नाही. एका दिवशी भर चौकात, चार माणसात अब्रु काढंल आपली!’’ त्याचा सुर लागलेला.
ती आपली गुमान उभी. काहीतरी बोलायचं मनात घुटमळतंय पण बोलावं की नाही कळत नाही. नवर्याची ही जीवघेणी घालमेल तिला बघवत नाही. त्याच्या मनावरचा ओरखडा तिच्या काळजावर उमटतोय. त्याच्या वेदनेचा पाट तिच्या मनातून वाहतोय पण ती काही करू शकत नाही. लेकीच्या लग्नात झालेलं देणं तर फेडावंच लागंल. त्यातच गेल्या वर्षी बी-बियाण्याचा, खताचा झालेला खर्च, त्याच्यासाठी काढलेलं कर्ज, पावसानं दिलेला दगा. काळ्या मातीचा कोरडाठाक काठ. या सगळ्यामुळं खचलेला धनी. कसं सावरावं? काहीच उमगत नाही.
‘‘मी काय म्हणते. बैलं विकून टाकू आपुन’’ काळजावर भला मोठा दगड ठेवून ती बोलली.
या एका वाक्यानं त्याचं अंत:करण हाललं. ‘पोटच्या लेकराला कोण विकंल काय? विकणारे विकत असतील, ते उलट्या काळजाचे असतील, राक्षसाच्या जातीतले. पण आपण माणूस म्हणून जगलो आजपर्यंत. आता अचानक असलं अभद्र कसं वागता येईल.’ तो काहीच न कळून तिच्या तोंडाकडं पाहत राहिला.
तिला कळत होता त्याच्या आतला गलबला. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बरं वाटलं त्याला. तिच्या खांद्यावरल्या हातानं हिराला आईच्या उबदार मायेची आठवण झाली. ती अशीच हात ठेवायची खांद्यावर अन् मग पाठिवरून हात ठेवत धीर द्यायची. म्हणायची, ‘‘लेकरा, दिवस काय घर करून राहतेत का? इकडची सावली तिकडं जायचीच कधीतर. असा घोर करत बसू नकु! सगळं चांगलंच होईल! धीर सोडू नकू म्हणजी झालं!’’
आज सावित्रीच्या हाताच्या स्पर्शानं त्याच्या आईच्या आठवणी पुन्हा जागा झाल्या.
‘काय करू गं आई? आता धीर सुटत चाललाय!’ तो मनाशीच बोलत राहिला.
‘‘हे बघा! मनाला लावून नका घेऊ! बैल विकू! एखादं वर्ष पाळीपेरणी करून घेऊ! चांगलं साल लागलं की पुन्हा घेऊ बैलं!’’ ती बोलली.
‘‘अगं वेडबिड लागलं का तुला? बैलं विकल्यावर वेड लागल मला! तुला कळत कसं नाही म्हणतो मी?’’ त्याने नकाराची मान हलवली.
तिला का हे माहीत नव्हतं का? पण दुसरा इलाजच नव्हता काय! बैलं विकून निदान सावकाराचं निम्म तरी कर्ज फिटलं असतं. तिनं पुन्हा पुन्हा आर्जवं केली आणि बैलं विकायला हिराला राजी केलं.
हिराचा पाय घरून बाजारात जायला हालता हालेना. डोळ्यातल्या धारा कमी होईनात. धारांचा एक पडदा तयार झाला. त्यात त्याला सारं धुसर दिसू लागलं. घर, बायको, लेकरं सारंच अंधुक. तो निघाला. पाय ओढत-ओढत पोटच्या गोळ्यांना बाजार दाखवायला. नाही ते विचारांच वारूळ मनात दाटू लागलं. ‘काय राहिलं आपलं? गावात काय तोंड दाखवावं? उद्या सगळे बोलू लागतील, हिरानं बैलं विकली... लयी होतं बैलाचं कौतुक... तर मग कशी विकली बैलं! कसा दावला बाजार? काय आपलं जीवन? बैलाच्या रिकाम्या कासर्यासारखं! उद्यापासून फक्त कासराच. बैल कुठं आहेत? कशी राहिल माझी देशा-मनसुर्याची जोडी दुसर्याच्या घरात? काय मिळवलं जीवनात येऊन?’
विचारांची तंद्री तुटत नव्हती. त्या तिरीमिरीतच हिरा बाजारात आला. बाजार ह्यो जनावरानं भरलेला. दुष्काळातली जनावरं! खाटीक भाव पाडून मागत होते. दुपट्यात बांधलेल्या चपलांची भाकर म्हणून खोटी शपथ घेत होते. जनावरामागं जनावरं विकली जात होती अन् हिराची नजर तांबुस बांड्या देशा-मनसुर्यांवर स्थिरावली होती.
‘काही झालं तरी बैलं खाटकाला विकायची नाहीत. नाही विकली तर माघारी घेऊन जाऊ. पर खाटकाच्या दावणीला बांधायची नाहीत,’ त्याचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं.
एकामागं एक व्यापारी यायचे. लांबून बैलं बघायचे. नाकडोळे मोडल्यागत करायचे. निघून जायचे. तर कुणी जवळ यायचं, उगीच शेपटी पिरगाळायचं, हातातलं लाकूड बैलाला खोचून बघायचं, भाव पाडून मागायचं व निघून जायचं. हे सगळं बघून हिराला कसंसच व्हायचं, पण ईलाज नव्हता. बैलं विकायची होती. सावकाराचं देणं फेडायचं होतं. बराच वेळ हे असंच चाललं आणि बाजार सुटायच्या वेळंला दोघंजण हिराच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. एकानं बैलाच्या पाठीवरून हात फिरवला तर एकानं मन्सुर्याच्या पोळीला थोपटलं. या हलक्या हातांनी बैलं शहारली. या नवख्या माणसाकडं तोंड वळवून बघू लागली.
‘‘पाव्हणं, बोला कितीला देणार जोडी?’’ त्यातला एकजण म्हणाला.
हिरानं बघितलं न्याहाळून. दोघंही कुणबी दिसत होते. अस्सल शेतकरीच होते. सारा बाजार बघून गावाकडं निघाले होते. जाताजाता त्यांनी नजर या बैलांवर पडली. त्यांच्या पारख्या नजरेनं लगेच अस्सल वाण हेरला व काही झालं तरी ही जोडी विकत घ्यायच्या इराद्यानं त्यांनी बैलांचा भाव विचारला.
हिरा त्यांच्या प्रश्नानं सावरला व म्हणाला, ‘‘काळजाच्या तुकड्याचा कुठं भाव करतेत का? पाव्हणं जा घिऊन बैलं पर सांभाळा चांगलं म्हणजी झालं.’’
हिराचे डोळे भरून आले. झरझरू लागले. आतला गलबला डोळ्यातून वाहू लागला. त्या दोघांनी हिराला धिर दिला. हिरानं सांगितलेली रक्कम कोणताही भाव न करता त्याला देऊन टाकली. बैलांचा कासरा सोडला. हिराच्या हातात दिला. बैलाला नवीन कासरा बांधला व जाता-जाता त्यातला एकजण म्हणाला,
‘‘पाव्हणं, सावरी गावचा सुर्यभान पाटील हाय मी. पोटच्या लेकरासारखं जपन तुमच्या बैलाला. मनाला लावून नका घेऊ. जव्हा तुम्हाला वाटल, तव्हा या बैलांला बघायला. बैलं तुमचीच हायती. फकस्त संभाळायला मला दिली असं समजा हवं तर.’’
सुर्यभान पाटलानं हिराच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला थोपटलं व बैलं घेऊन वाटंला लागला. हिरा तिथंच जाग्यावर उभा. खुटा ठोकल्यासारखा. लांबवर बैलाकडं बघत. बैलं लांबलांब गात होते. हिराचा जीव हुंदक्यात दाटत होता. आता फक्त दोन तांबुस-बांडे ठिपके दिसू लागले. जरा वेळानं तेही दिसेनासे झाले. जाताना बैलं वळून वळून बघत होती. मोठ्यानं हंबरत होती. हिराची तगमग वाढवत होती.
रिकामा कासरा त्यानं खांद्यावर टाकला. उदास मनानं तो गावाकडं निघाला. आता हा रिकामा कासराच आपल्या आयुष्याचा सोबती. कशाला लागंल कासरा आता? अरे अरे भगवंता कसले दिवस आणलेस रे? त्याच्या मनाचा आक्रोश थांबता थांबत नव्हता. जीव पार घायकुतीला आला होता. पेटलेला वणवा विझत नव्हता अन् सुगीतला पाऊस दडी मारून बसला होता. आभाळाच्या कपारीतला एखादा ढग त्याला वाकडं दाखवून जात होता. जाता-जाता त्याला जणू म्हणत होता, ‘‘बघ रे कुणबटा, माझ्यात तुझा जीव लपलाय. मी नाही तर तुझ्या पदरात काय? तुझं जगणं-मरणं माझ्या थेंबात लपलंय. निराधार रे तू! अगदी निराधार.’’
हिरा आपलं निघालाय मान खाली घालून, गावाकडं-घराकडं. जडजड वाटतंय सारं. पाऊल उचलत नाही. ओझं पेलवत नाही. घरी जावसं वाटत नाही. ‘काय करू, कुठं जाऊ म्हणजी या जीवाला शांती लाभंल.’ घरी सावित्री वाट बघते आहे. एकुलत्या पोराचा जीव बापाच्या वाटेवर अडकलाय. सारं कळतंय त्याला पण काही वळायलाच तयार नाही. ‘घरी तर जावंच लागल. बैलं नाहीत म्हणून काय झालं? दुभती गाय हाय घरात. तिला सांभाळायचं. तिच्या वासराला मोठं करायचं. पुन्हा बैलजोडी तयार करायची.’ मनाची समजूत घालत तो घरी आला. आलेले पैसे सावित्रीच्या हातावर ठेवले. त्याला रहावलं नाही. त्याने पोराला जवळ घेतलं. सावित्रीला जवळ ओढलं आणि त्याचा बांध फुटला. तो धाय मोकलून रडू लागला. मोठमोठ्यानं. एवढं मोठ्यानं हिरा का रडतोय म्हणून शेजारची मंगा काकू पळतच आली. बघते तर काय? एवढा मोठा हिरा लहान लेकरासारखा हमसून हमसून रडत होता. सावित्री त्याची समजूत काढत होती. पोरगं बापाला पलीगत चिटकलं होतं.
काकूनं पोराला बाजूला सारलं. हिराला छातीशी धरलं. मायीच्या पदरानं त्याचे डोळे पुसत काकू म्हणाली, ‘‘हिरा, असं येड्यागत कसं करावं रं बाबा. रडू नकू गप बस. अरे बाबा. या लेकराकडं बघ.’’
‘‘काय बघू काकू? पोटच्या लेकरासारख्या देशा-मनसूर्याला आज बाजार दाखवला मी! काय राहिलं जगण्यात?’’ त्याचं रडं थांबंना.
काकूनं त्याला रडू दिलं. मनमोकळं रडू दिलं. बर्याच वेळानं हिरा शांत झाल्यावर काकू म्हणाली, ‘‘हिरा असं हातपाय गाळून कसं चालंल. धीर धर. जाईल ह्यो काळबी! चांगले दिवस येतील. तवं पातूर उभं रहावंच लागल तूला. तूच असा हातपाय गाळलंस तर या सावित्रीनं कुणाकडं बघावं सांग बरं! बघ समोर जरा. ते लेकरू किती भेदरलंय. असं नकू करू बाबा. तू हाईस तर सगळं हाय. नायतर काय? बैलं काय घेशील की अजून. पुन्हा होईल सगळं चांगलं. गप्प बस आता.’’
हिरा थोडा शांत झाला पण त्याच्या डोळ्यासमोरून ते तांबूस बांडे ठिपके हालता हलेनात. कसं अन् काय? याचं कोडं सुटता सुटंना. तो गप्पगार बसून राहिला. काही काहीच न बोलता. काकूनं त्याच्या पाठीवरून हात फिरवीला. चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या. काकू निघून गेली पण हिरा जागचा हालला नाही. थोड्या वेळानं सावित्री उठली. चूलीवर चार भाकरी थापल्या, वरण केलं व हिराला म्हणाली,
‘‘चला, चार घास खाऊन घ्या.’’
‘‘जे घास पुरवायचे तेच राहिले नाहीत अन् घासाचं काय घिऊन बसलीस. भूक नाही मला. पोटात जाळ पेटलाय माझ्या! तुम्ही जेवा.’’ हिरा जागचा हालत नव्हता.
सावित्रीनं पोराकडं पाहिलं. त्याला नजरेनं खुणावलं. पोरगा उठला. बापाजवळ जाऊन उभा राहिला. त्यानं बापाकडं बघितलं. बापाच्या नजरेतला कोरडेपणा त्याला जाणवला. तसा दचकलाच तो. पण धिर करून त्यानं बापाचा हात धरला.
‘‘दादा, चला की जेवायला. थोडं तर जेवा. मलाबी भूक लागल्याय.’’ पोराच्या आग्रहानं हिरा उठला. पाण्याच्या घोटाबरोबर चार घास पोटात ढकलले व पुन्हा बसून राहिला. बैलांचा कासरा तसाच जोत्यावर पडलेला होता. तो बसला एकटक रिकाम्या कासर्याकडं बघत. ह्या घडीला तर तो कुणाचाच राहिला नव्हता. ना घरादाराचा, ना बायकोपोराचा. तो फक्त श्वासापुरता अन् त्या कासर्यात अडकलेल्या जीवापूरता.
सावित्रीचा जीव खालीवर होता होता. आधीच खचलेला नवरा बैलं विकल्यावर जास्तच उदासला होता. त्याला सावरायला थोडा काळ लागंल. ती मनाची समजूत घालत होती.
हिरा उठायचा. खांद्यावर कासरा टाकयचा. गाय सोडायचा. शेताला निघून जायचा. तो कुणाचाच राहिला नव्हता. उदासी मनाला घेरून टाकत होती. कसले तरी विचार मनात कालवत होते. दिवसभर आंब्याखाली बसावं अन् कडूस पडलं की घराकडं यावं. गावात कुणाला तोंड दाखवू नये. कुणी आपल्याला बोलू नये. असं त्याला वाटायचं.
सावित्रीची तडफड वाढलीय. हा रिकामा कासरा कशाला बर नेत असेल? ती घरातलं काम पटपट आवरायची. त्याच्या मागं मागं शेतात जायची. यानं उगीच काय करता काय करून घेतलं तर? तिच्या अंगावर सर्रकन काटा यायचा. अन् त्या दिवशी ती घरचं आवरून शेतात आली. लांबून बघितलं झाडाखाली हिरा नाही. तिच्या काळजात धस्स झालं. जरा जवळ येऊन बघते तर काय! कासरा फांदीला बांधलाय. त्याचा फास तयार झालाय. ती पळतच झाडाकडे आली. बघते तर हिरा कासरा बांधून खाली येत होता. गळ्याला फास लावायला. तिने एकच बोंब ठोकली. तिने जाऊन त्याला मिठी मारली. त्याचं तोंड हातात घेतलं.
‘‘आवं, काय करताय हे? जरा मागच्याचा विचार करायचा की.’’ तिला पुढं बोलवेना. ती धुमसून धुमसून रडू लागली. रडता-रडता ती त्याच्या तोंडावरून, अंगावरून हात फिरवू लागली.
‘‘आवं, बघा की माझ्याकडं, कुठं बघताय तुम्ही?’’ ती ओरडली. हिराची नजर मात्र शुन्यात हरवलेली. तो आता कुणाचाच राहिला नव्हता. तो तिच्या एवढा जवळ असूनही ती मात्र एकटीच होती. कळपातून चुकलेल्या हरणीसारखी.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
अंगावर काटा आला
अंगावर काटा आला
विदारक सत्य आहे ही कथा
माधव गिर ह्यांची एकटी ही कथा म्हणजे आजच्या बळीराजाच्या आयुष्यातील एक विदारक सत्य आहे. ह्या कथेतून बळीराजाची आणि त्याच्या संसाराची होणारी होरपळ अतिशय प्रगल्भतेने मांडली आहे.
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
पाने