नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रानमेवा खाऊ चला....!
या झरझर या, जरा भरभर या,
चला रानोमाळी भटकू चला
कुणी अंजीर घ्या, कुणी जांभूळ घ्या,
थोडा रानमेवा खाऊ चला ....॥१॥
ते उंच-उंच दिसते ते, ते फ़ळ ताडाचे आहे
झाडांच्या डोक्यावरूनी, सूर्याचे किरण ते पाहे
कुणी कळवंद खा, कुणी चिक्कू-पेरू खा,
पाणी नारळाचे पिऊ या चला ....॥२॥
ते फ़ुगले डोळे दिसते, ते सीताफळाचे आहे
खोप्यांच्या खिंडीमधुनी, ते चोरुनी पाडस पाहे
कुणी अननस खा, कुणी बोरं-लिंबू खा,
पाड आंबे वेचू या चला ....॥३॥
ही झाडे आहे म्हणुनी, सरसर पाऊस येतो
धरणांचे पोट भरुनी, धरणीला न्हाऊन जातो
कुणी टरबूज खा, कुणी खरबूज खा,
झरा झुळझुळ पाहू चला ....॥४॥
ही झुडपे-झाडे-वल्ली, सजीवांना अभय ती देती
ती सोडती ऑक्सिजनला अन कार्बन शोषूनी घेती
कुणी कलमा घ्या, कुणी रोपटी घ्या
झाडे घरोघरी लावूया चला ......॥५॥
गंगाधर मुटे
..................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...................................................................