पहिली भेट हीच शेवटची भेट-भावपूर्ण अभिवादन
माई गेल्याची बातमी आज कळली तेव्हा विश्वासच बसेना पण सत्य काही नाकारता येत नाही. शेतकरी संघटनेत दोनच माई. एक माई बोरावके आणि दुसऱ्या माई घनवट-साळुंके.

१९८० च्या दशकात आंबेठाणला नियमित प्रशिक्षण शिबिरे व्हायचीत. एका शिबिराला एकाच घरची दोन भावंडे त्यातही बहीण आणि भाऊ येणार आहेत हे माहित झाल्यावर आपोआपच केवळ एवढ्या कारणासाठी कुतूहल तयार झाले होते. अगदी सुरवातीच्या काळापासून शेतकरी संघटनेच्या कामात कुटुंबेच्या कुटुंबेच सामील झाली होती. पण प्रशिक्षण घेण्यासाठी सात दिवशीय शिबिरात सामील होणे याचा अर्थ होता कि, शेतकरी संघटनेसाठी तन-मन-धनाने झोकून देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याची तयारी करून पूर्ण वेळ काम करण्याची मानसिकता तयार होणे. त्यामुळे दोन बहीण-भावंडे शिबिरात येत आहे, इतके माहित झाल्यावर मी आकर्षित झालो होतो.
सात दिवसाच्या शिबिरात माईचा वावर अत्यंत प्रेरणादायी होता. विशेषतः शिबिरात शिलकी वेळात त्यांनी गायलेली गीते प्रशिक्षणार्थी मध्ये उत्साह संचारून जायची. त्यामुळे माई माझ्या कायम स्मरणात राहिल्या पण पुन्हा मात्र कधीच भेट झाली नाही. अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र आलो असेल पण प्रत्यक्ष संवाद कधी झालाच नाही. दोन-तीनदा श्रीगोंद्याला जाण्याचा योग आला. एकदा तर मुक्कामी होतो पण माई तेथे नसल्याने भेट झालीच नाही.
आज त्या युगात्मा शरद जोशींच्या भेटीला निघून गेल्याने माझ्यासाठी माईंची पहिली भेट हीच शेवटची भेट ठरली आहे.
माई घनवट-साळुंके यांना विनम्र अभिवादन!
गंगाधर मुटे
प्रदेशाध्यक्ष
माहिती तंत्रज्ञान आघाडी, शेतकरी संघटना
===========
०७/०५/२०२१