शेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन
८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.
कापसाला ६०४० रू, सोयाबिनला ५०००रू. आणि धानाला ३२०० रू आधारभूत किंमत जाहिर करावी, या प्रमुख मागणीसह प्रस्तावित सिलींग , भुसंपादन कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े वायगाव चौरस्ता, आर्वी, सेलडोह आणि जांब चौरस्ता येथे आज दि. २३ नोव्हेंबर रोजी ५ तासाचे पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. खरीप हंगामाने शेतकर्यांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा शेतकरी रबी हंगामाच्या उदिमाला लागलेला आहे परंतू जिल्ह्यात १८ तास शेतीसाठी वीज भारनियमन असल्याने आणि ६ तास मिळणारी वीज कमी दाबाची आणि खंडीत असल्याने शेतकर्यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामत: पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांनी उचल खाल्ली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
सरकार मात्र नेहमीप्रमाणेच शेतीच्या मदतीसाठी उदासिन असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाल सुरू झालेली नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेती विषयावर अवाक्षरही बोलायला तयार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हीच भुमिका शासनाची असल्याने आज राज्यभर पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रवाशी वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांचे पान-फ़ूल देवून स्वागत करण्यात आले. सध्याची शेतकर्यांची हलाखीची परिस्थिती आणि त्याबातची सरकारची शेतकरीविरोधी भूमिका याबद्दलची कैफ़ियत प्रवाशांसमोर मांडण्यात आली. सामान्य जनतेनेच आता शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना हात जोडून विनंती करण्यात आली. प्रवाशांनी सुद्धा शेतकर्यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीशी सहमती दर्शवत सरकारने जगाच्या पोशिंद्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
* * *
वायगाव चौरस्ता (वर्धा) - वायगाव येथिल पानफ़ूल आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर मुटे, नंदूभाऊ काळे, प्रा. पांडुरंग भालशंकर, सतिश दाणी, दत्ता राऊत, महेश वल्लभवार, सौ. शारदा प्रभाकर झाडे, बापू ठाकरे, गोविंद भगत, बाबा साटोणे, महादेव गोहो, अरविंद राऊत, माणिक उघडे, शोभा कोरेकार, ज्योती भगत, तानू ठाकरे, मधूकर नेजेकार, देवराव हुडे, राजू इखार, नारायण होले यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सेलडोह (वर्धा) - सेलडोह येथील पानफ़ूल आंदोलनात माजी आमदार सौ. सरोज काशीकर, सुनंदा तुपकर, निळकंठ घवघवे, रविंद्र खोडे, शकिल खोडे, चेतराम मेहुणे, धोंडबा गावंडे, शांताराम सोनटक्के, अरविंद बोरकर, रंजना सोनटक्के यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
* * *
जांब चौरस्ता (वर्धा) - जाम चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख मधुसूदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटिंग, वसंतराव दोंदल, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, अजाबराव राऊत, साहेबराव येडे, जि.प. सदस्य चंद्रमणि भगत, जि.प. सदस्य विणा राऊत, पं.स. सदस्य सुनिल बुरबुरे, दमडु मडावी, कैलास नवघरे, अनिल धोटे, केशव भोले, शंकर घुमडे, हरि जामुनकर, गणेश माथनकर, सुधाकर भगडे यांच्या नेतृत्वात पान, फुल आंदोलन करण्यात आले.
* * *
आर्वी (वर्धा) - आर्वी-तळेगाव मार्गावर शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा शैलजा देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
* * *
बुलडाणा - शेतकरी संघटनेतर्फे आज, शनिवारी वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पान-फुल आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. बुलडाणा तालुक्यातर्फे धाड नाक्यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला थांबवून प्रवाशांना पान-फुल देत त्यांचे स्वागत केले. संघटनेच्या मागण्यांचे पत्रकही त्यांना देण्यात आले.
यावेळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत डॉ. हसनराव देशमुख, नामदेवराव जाधव यांनी वेगळ्या विदर्भाचे फायदे सविस्तर समजावून सांगितले. वेगळा विदर्भ झाला, तर विदर्भात होणारी वीज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नागरिकांना 24 तास मिळू शकते व उर्वरित वीज टिकून मोठा महसूल मिळू शकतो. 24 तास वीज मिळाल्यामुळे शेतीचे व कारखानदारीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना आत्महत्येला आळा बसू शकतो. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
* * *
वणी (जि. यवतमाळ) - येथील शेतकरी संघटनेने वरोरा मार्गावरील वाहनांना थांबवून चालकांना पानफूल देऊन वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्यांसाठी शनिवारी दुपारी एकला आगळेवेगळे आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे बुडत चाललेला शेतीव्यवसाय व उत्पादन शेतकरी, पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कापसाला राज्य सरकारने शिफारस केल्याप्रमाणे 6040 रुपये प्रतिक्विंटल भाव केंद्राकडून जाहीर करावा, धान्याचा व खताचा वाढता खर्च लक्षात घेता सोयाबीनला पाच हजार रुपये केंद्राने जाहीर करावा, उसाला तीन हजार 200 रुपये भावाची पहिली उचल देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्यात यावे, तसेच वीजजोडणी थांबविण्यात यावी, विदर्भ राज्य तत्काळ घोषित करण्यात यावे, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, केंद्र सरकारने केलेल्या सीलिंगच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
* * *
 |
वायगाव चौरस्ता |
 |
वायगाव चौरस्ता. रापम च्या बस चालकाला पानफ़ूल देतांना |
 |
नांदेड |
 |
लोकमत |
 |
लोकशाही वार्ता |
 |
महाराष्ट्र टाईम्स |
 |
नवभारत |
 |
पुण्यनगरी |
 |
सकाळ |
 |
भास्कर |
 |
तरुण भारत |
 |
देशोन्नती |
 |
दिव्य मराठी |