
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
14 वे शेतकरी साहित्य संमेलन आणि स्ट्रॉबेरी शेती प्लॉट पाहणी :
14 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन यावर्षी महाबळेश्वरजवळील जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलातील दाभेमोहन या गावी अतिशय अप्रतिम रीतीने पार पडले. या संमेलनाने आम्हाला खरा कोकण पहावयास मिळाला. 3 दिवस मोबाईलचा संपर्क तुटला पण डोंगर दऱ्या व निसर्गाचा आनंद मनमुराद लुटावयास मिळाल्याने मोबाईलची आठवण ही आली नाही. हे अतिशय महत्वाचे आहे. शिवाय दोन रात्रीच्या तिसऱ्या प्रहरापर्यंत चाललेली डोंगररांगामधील उघड्यावरील संगीत महफील मनाला आनंद देऊन गेली. संमेलनात महाराष्ट्रातील शेतीमातीवर भरपूर चर्चा झाली. शिवाय कोकणच्या शेतीतील पिकात प्रत्यक्ष भेट देण्याचाही योग आला.
झाले असे की संमेलनाचे सूप वाजल्यानंतर आम्ही जावळी फाट्यावर पुढील प्रवासाला जाण्यासाठी आलो. गाडीला दोन तास अवकाश होता. जवळच जावळीचे चंद्रराव मोरे यांची मोडकळीस आलेली गढी आहे असे त्याचे वारसदारांनी सांगितले. इतिहासाच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आमचे पाय तिकडे आपोआप धावले. चंद्रराव मोरे यांचे घराण्याची देवता कमळजाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. व पुजाऱ्याकडून मोरे घराण्याचा इतिहास समजून घेतला आणि समोर डोंगरावरील गढीची जागा दुरून पाहिली.
वाटेत आम्हाला नदीच्या कडेकडेने अनेक स्ट्रॉबेरीची शेती प्लॉट पहावयास मिळाले. आणि आमचे पाय आपोआप मंदिराजवळील सुमित स्ट्रॉबेरी फॉर्म्सच्या शेतीप्लॉटवर वळले. मनाला मोहून घेणारे ते स्ट्रॉबेरीची ताजी फळे झाडांना असतांना पाहण्याची मजा काही वेगळीच होती. त्या स्ट्रॉबेरी फळांचे कच्चे, पक्के फळांचे कलर अगदी मन मोहून घेत होते. शेती प्लॉटचे मालक पूर्ण कुटुंबानिशी शेतात राबत होते. त्यांच्याशी चर्चा केली असता ही पिक पोटच्या पोराप्रमाणे जपावे लागते. हवामान, निसर्गाचा लहरीपणा जपावा लागतो. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे रानगवे यांचे शेतीवरील हल्ले रोखण्यासाठी चोहोबाजूने तारेत सोलर वीजप्रवाह सोडून झटका दिल्याशिवाय पर्याय नसतो. रात्रभर शेतीच्या कडेने रामगवे यांचा कळप उभा असतो. एक जरी रानगवा पिकात शिरला तरी सर्व पिक भुईसपाट होते. त्यामुळे रात्रभर पहारा करावा लागतो. तेही एकट्या दुकट्याचे काम नाही. शिवाय उंच मचाणावर बसावे लागते. पिक पिकायच्या आत बाजारात न्यावे लागते. त्यामुळे सतत तोडणी आवश्यक असते. यावेळी शेतीत भोपळा, मिरची, कोबी हे आंतरपीक घेतलेले दिसून आले. कोबीची पाने याचा उपयोग स्ट्रॉबेरी बॉक्सपॅकिंगसाठी उपयोगात येतात. या परिसरातील वन्यप्राण्यामुळे तळकोकणात या पट्ट्यात शेती करणे म्हणजे जुगार आहे. साधली तर पैसा नाहीतर काही नाही. वन्यप्राण्यामुळे शेतीचे नुकसान होते म्हणून शेती न करता मुंबई येथे जाऊन चाकरमानी करणे हा या लोकांचा व्यवसाय बनला आहे.
या शेतीचे मालक आमची स्ट्रॉबेरीची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी माल तोडत होते व आम्हाला ताजी स्ट्रॉबेरी तुमच्या हाताने तोडून पाहिजे तेव्हढी खा म्हणून आग्रह करत होते.आम्ही यात नांदेडचे साहित्यिक श्री. साईनाथ रहाटकर, अहिल्यानगरचे कथाकथानकार श्री. बाळासाहेब देशमुख, वर्धा येथील कवी श्री. नारायण निखाते व मी राहाता येथील साहित्यिक श्री. राजेंद्र फंड यांनी मनमुराद ताजी स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घेतला. यावेळी त्या शेतकऱ्यांची घेतलेली मुलाखत आम्ही अनेक भटकंती ग्रूपवर पाठवली. व प्रतापगड परिसरात आल्यावर निश्चित सर्वांनी या शेतीला भेट देण्याचे आवाहन केले.
एकंदरीत या शेतकरी संमेलनामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात प्रत्यक्ष फिरताना असे लक्षात आले की महाराष्ट्रातील कुठल्याही प्रांतातील शेतकरी सुखी नाही. दहापाच शेतकरी कलेक्टरसारखे जीवन जगत असेल तर असेल. थोडेफार शेतकरी वर्ग 3 कर्मचाऱ्याप्रमाणे जीवन जगत असतील. मात्र बहुतांश शेतकरी मात्र खूप हालअपेष्टांचे जीवन जगत आहे.
श्री. राजेंद्र फंड,राहाता
मो. 9881085671.