नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"लिलाव..."
चैत्र संपून नुकताच वैशाख चालू झाला होता.तरीपण सकाळचा गारवा हवाहवासा वाटतं होता. दुपारी 11.00 पासून वातावरणात चांगलाचं गरमाटपना जाणवत होता.क्वचितच कास्तकारांनी उन्हाळा उदिमाचे कामं सुरु केले होते. काही वावरात तुराट्या, पऱ्हाट्या, फणकट उभेच दिसतं होते.आमच्या घरच्या एक एकर वावरातले कामं तसेच पडले होते. दादाला आता काळजी लागली होती. त्याने वाहिनीजवळ विषय काढला,
"कावं, मीं काय म्हणतो सुमन. आता वावराकडे लक्ष द्या लागण ना.वावरात फणं,फणकट तसेच पडले हाय,ते आपणच वेचून घेऊ म्हटलं.मजूर सांगितल्यापेक्षा,सकाळी सकाळी जाऊनं आपण उन्हाच्या आधी अकरा वाजेलोक घरी येतो." वहिनी हो म्हणाल्या.
त्याचा तो आवाज मला ऐकू आला तसाच मीं घरातुन बाहेर म्हणजे ओसरीत आलो. आणि मीच स्वतः दादाला म्हणालो ,"दादा मीही येतो तुया सोबत फन पयाट्या वेचाले."
"तुई इच्छा...! "तो म्हणाला.
दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेही सकाळीच सहा वाजता वावरात पोहचलो.दहा -अकरा पर्यंत बरंच कामं झालं तिकडून येताना दादाने विषय काढला,
" कारे विशाल, यंदा पेरणीच कसं कराव. मागचंच अजून जुनं कर्ज फिटलं नाही. वरून पोट्ट्यायले शाळेत टाका लागते, तालुक्याच्या. "
मी फक्त होकारार्थी मान हलवली. पण एक दीर्घ विचार माझ्या मनाला रुतून गेला. कारण आमच्या अंगावर गावातीलचं सेवा सहकारी सोसायटीचं कर्ज होतं ते आधी मागचं फेडावं लागतं, नंतरच पुढचं कर्ज मिळते. पण ते भरायला आता तेवढे पैसे नव्हते. सोसायटीचा माणूस घरी वरचेवर चकरा मारत होता. तो पैशाचा तगादा लावत होता. ते पैसे जुन महिन्याच्या आधी जर भरले तरच दुसरं कर्ज पुढच्या पेरणीसाठी मिळणार आणि बी भरन, खत, पेरणी ची सोय लागणार होती. तसाच वाहिनीने आणखी एक विचार दादापुढे ठेवला, "आहो, मीं काय म्हणते पोटात पोट जर आपण दोनेक एकर वावर लागोन नें केलं तर" ते एकूण दादा हसला.
"अवं एक एकर वावराले लावाले पैसा नाही, अन तू म्हणतं दोन एकर वावर लागोनने करा, म्हणजे तूय डोक्स जाग्यावर आहे ना."
"हवं पूर्णच साबूत हाय, म्हणूनचं म्हणतो.आता एक एकर घरचं आणि दोन एकर बाहेरचं तुम्ही खरंच लागोननें करा. विशालभाऊंची साथ आहेच आपल्याले मदतीले. "
"अवं पण कसं!, पैसा कोठून येईल "
"कसं म्हणजे?"
"तुम्ही तुमच्या मालकाले हात उसने दहा हजार मांगा, अन मीं माझ्या भावाकडे गोष्ट काढून पायतो." शेवटी निर्णय झाला.
पण दुर्भाग्यचं म्हणावं, दोघेही खाली हातानेच वापस आले. शेवटी वाहिनीनें हिम्मत लावली आणि व्याजाने दहा हजार काढले आणि काही सोनं गहाण ठेवायला दिलं. दोन एकर वावर लागोन करीता केलं. पंधरा दोन्ही तीस हजार, फक्त लागोनचे दिले. बाकी खर्च वेगळा. काही उसने केले काही उधार ठेवले.त्यावेळी बियानाची सोयाबीन 11000 हजार रुपये क्विंटल होती.डी.ए.पी. खताचं पोतं हजार-बाराशेला एक, तसेच जोडीचा, पेरणीचा असा पूर्ण खर्च दहा हजार रुपये येणारं होता. अंगावर कर्ज झालं होतं पण यंदा आपल्याला चांगल पिकलं तर तेवढंच शिल्लक पडते पोरांच्या शिक्षणाच्या कामात तो पैसा येते. हा विचार घेऊन दादाने हिम्मत लावली. सर्वजण वावरात जाऊन मेहनतीने कामं करू लागले. पेरणी झाली, खत टाकणे झालं एक वही सुद्धा झाली. आता सोयाबीन बरी दिसतं होती, पण पावसाचा जोर वाढलेला दिसतं होता.
आता दोन दिवसा पासून सकाळचे बारा पर्यंत चांगलीच कडक ऊन तापत तर दोन-तीन वाजताच्या दरम्यान जोरात पाऊस पडला की, अर्धवटच मजुरी पाडून घरी जावं लागत होतं. असं तीन चार दिवस चाललं आणि पाचव्या दिवसापासून सतत धारा चालू झाल्या. एखाद्या भूतांसारखा पाऊस येऊ लागला. हवा, वीजाचा कडकडाटासह पाऊस एकसारखा चालू झाला. एक.....दोन.... तीन.... चार दिवस सतत पाऊस चालूच होता. घरातल्या मातीच्या भिंती ओलाव्याने खचू लागल्या. घरा- दारात, राना- वनात डबकेच्या डबके थांबू लागले. कौलात न मावणारं पाणी घरात गळू लागलं. टपटप गळनाऱ्या पाण्याखाली बकेट, गंज, कोपर ठेवल्या जाऊ लागले. घरादारात ओलंच ओल असल्यामुळे बसायलाही कुठं जागा राहत नव्हती.
शेजारी राहणाऱ्या संपत काळेचा तेवढ्या पाण्यातही मोठमोठ्याने आवाज येतच होता,
"काय? अवदशा पाऊस हाय रे हा... ये म्हणावं त येणार नाही, अन आता येऊन मरून राहिला इथं! अरे बस कर रे म्हणा बावाच्या नाना....!गरीबाची थोडी तरी कीव कर, फुकट शिव्या कायले खातं राज्या..... काही ठेवशीन का नाही वावरात?"
बाहेरच्या नालीतलं घरात येणारं पाणी काढत संपत काळे चिडल्या सारखा बोलत होता. पावसात ओला होतं होता पण त्याची बडबड थांबली नव्हती,तो निसर्गाले, पावसाले शिव्या देतच होता
"अरे का आमचा जीव घ्याले आला का राजा? आता वावरातल्या होत्या नव्हत्या सोयाबीनय पिवळ्या पडते रे देवा..... तुरीही जळल्या शिवाय राहत नाही रे... .पाणबसणवाले मेले रे..... मेले, सपाच मेले, डुबले रे.... वावर करणारे डुबले....... "
सहाव्या दिवशीही पावसाची भूरभुरी चालूच होती. तरी चिखल, गाटा तुडवत काहीजन वावरात जाऊन पाहत होते. पिकाची दशा महामारी आल्यागत झाली होती. तुर, सोयाबीन मोठया प्रमाणात मरणावस्थेत असल्या सारखे पार जमिनीवर आडवे झाले होते. तर काही माना मोडलेले स्वतःच स्वतःच्या आधारावर उभे होते. खरोखर वाईट दशा होती. डाबरीतल्या तुरा अख्याच जळल्या होत्या. पाण्यात तरंगनाऱ्या सोयाबीनचे पट्टेच्या पट्टे पिवळे दिसत होते.
पावसाचा जोर हळूहळू कमी झाला. लोकांची काम पूर्वीसारखी चालू झाली. निंदन, खुरपन लोक करू लागले. कोणी तननाशक मारू लागले. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. उथळ माथ्यावरची जिवंत राहिलेली तूर, सोयाबीन हळूहळू वाढू लागली. अखाडी, जीवती, नागपंचमीचे सण भराभर निघून गेले. पुढे पोळा आला, बैलाच्या अंघोळी झाल्या, घरात गोड धोड झालं. सुमन वाहिनीने कुरड्या, पापळ, भजी, काढली, पुरणपोळी केली. कार्तिक व पायल खुष होते; पण पुन्हा वाहिनीच्या पोटात अचानक गोळा उठला. तिला पुढची काळजी लागली. लोकांचे डवऱ्याचे दोन दोन फेर झाले. आपला अजून एकही नाही. तनकट पिकाच्या वर गेलं होतं. डवरे मारले की, तेवढीचं माती कूस बदलते, पीक खेळत राहते. आठ-दहा दिवसापासून हाताला मजुरी नव्हती. काय करावं काही कळत नव्हतं, तरी पण दादाने भय्या कडूला सांगून तेवढी वही मारून घेतली. पैसे नंतर देतो म्हणून सांगितलं. निंदन-खुरपन दोघांनी घरीच चालू केलं. शनिवार, रविवार पायल अन कार्तिक म्हणजे दादाचे मुलंही मदत करू लागत. आठ-दहा दिवसात तेही झालं. डोक्यावरचा ताण जरा कमी झाला.
शेतातून घरी जाताना मधातचं आम्हाला विस्वासराव दिवटे भेटला. तसाच वाहिनीने डोक्यावर पदर घेतला,तो अमरावतीवून गावात दररोज ये-जा करायचा. तसं त्याचं गावातही मोठं घर, पण असे गावातले भरपूर लोक अमरावती किंवा चांदुर बाजारहुंन ये-जा करत होते. गावातले वाडे फक्त ढोर - वासरं बांधायसाठी अन शेतमाल ठेवायसाठीच होते. रस्त्याने जाता जाता त्याने दादा दिसताच गाडी थांबवली, अन विचारू लागला, "अरे काय एकनाथ!, काय म्हणते यंदा पीक पाणी?"
"बरं हाय मालक...!" जास्त न बोलता दादा समोर निघाला. विश्वासरावाना काहीतरी खोचट बोलायचं म्हणून त्याने आणखी गाडीतून तोंड बाहेर काढलं आणि बोलू लागला.
"मी काय म्हणतो एकनाथ,वावर केलं वाटते यावर्षी, लागोननं"
" हो मालक .... !"
"काय, जमन काही ताल....?"
"आता सर्व निसर्गाच्या भरोस्यावर हाय मालक, पाहू पुढच्या पुढं....!" असं बोलताच विस्वासराव आणखी टोचून बोलू लागला.
"लय कठीण काम हाय लागोनवाल्याचं राजा, लावलं तेवढंही निघते का नाही तं .... . त्यापेक्षा मजुरी पुरली. दोयपारगी काम करा अन बिनधास्त झोपा. येलाले दुःख ना वायकाले दुःख. ही माती होय एकनाथराव..... माती. जोपर्यंत ती माणसाले मातीत घालत नाही ना..... तोपर्यंत ती शांत होत नाही. बरं जाऊ दे, ही घरची मंडळी वाटते! अरे फुलासारख्या लेकरायले वावरात नको घालू रे आतापासून, त्यापेक्षा आपली सदानिबी पुरली रे बाबा... "
तो बोलत होता पण दादा फक्त हो ला हो लावत होता. त्यावर प्रतिउत्तर देत नव्हता. त्यामुळे विस्वासरावने गाडी सुरु केली,आणि तसाच निघून गेला.
मीं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो आणि दादा वाहिनी दोघेही जण एखाद्या जुपलेल्या बैलासारखे दिवसरात्रं काम करू लागले. वाहिनी वावरात काम करता करतांच पिकाचा अंदाज बांधू लागल्या. आजूबाजूच्या बायांना त्यांचे मत विचारू लागली. त्याही तिच्या हो ला हो मिसळत होत्या.
पाहता, पाहता दोन-अडीच महिने निघून गेले.वापस्याचा महिना चालू झाला. या महिन्यात हरीणीच्या पाटा काळ्या पडते तिथं माणसाची काय गत.... दुपारच्या उन्हानं अंगाची लाही-लाही व्हायला लागली. अंगातून घाम फोडू लागली. पोटऱ्या, मांड्यापर्यंत आलेली सोयाबीन फुलापात्यानं गजबजुन गेली.पण काही दिवसातंच सोयाबीनवर एकेरी हिरवी अळी दिसू लागली. तर काही भागात मावा रोग आल्याप्रमाणे सोयाबीन आपोआपच सुकू लागलं. हाता तोंडाशी आलेला घास जाते की काय असं वाटू लागलं. लोक वेगवेगळ्या प्रकारचे फवारे मारू लागले. हिरव्या अळीवर तरी उपाय होता; पण करपनाऱ्या सोयाबीनवर काहीच इलाज नव्हता. काही भागात अमरवेलने वेटोळी घालून सोयाबीनच निकामी केली होती. आता त्या सोयाबीनला उपटून फेकल्याशिवाय पर्याय नव्हता. हा निसर्गही माणसाच्या भावनेशी खेळत होता.
म्हणून वाहिनी दादाला म्हणाल्या, "आता सोयाबीनय पिवळी पडून राहयली, आठ दहा दिवसात येतेचं सोंगाले.आता मजूराचा मेळ लावा लागण ना, मग एकच गळबळ होते सर्वांयची. गावात इतके गोंड, कोरकु लोक येतात पण ते सगळे मोठे कास्तकारचं आणते ना. आपल्याले त्यायचं झाल्याशिवाय मजूरही भेटत नाही. वाटच पहा लागते." तसेच दोघेही विचारात पडले.
आठ दहा दिवसातच सर्वांचे शेत एकसाथ सोंगनीला आले. लोक मजूर शोधू लागले. मोठ-मोठे कास्तकार आणलेल्या मजुराकडून सोयाबीन सोंगु लागले. गावातला मजूर जास्त मजुरी घेऊन उधळयानं सोंगु लागला. दादाला तीन दिवसापासून मजुरचं मिळत नव्हता. आता सोयाबीना कडक वाळल्या होत्या. जसंजशी ऊन तापत होती तसतशा त्या ताडताड फुटत होत्या. वावरभर दाना पसरत होता. वावरातला तो फुटन्याचा आवाज एकूण आमचे हृदय धडधड, धडधड करीत होतं. वहिनी आता जास्तच काकूळतीला आली होती.आजूबाजूच्या वावरातले मजुर पाहून ती झुरत होती. याला त्याला मजुरा विषयी विचारत होती, पण कोणीच तिच्या बोलण्याला साद घालीत नव्हते. गावातील मजुरांना विचारलं ते सरळ म्हणायचे
"बाई सध्या मजुर नाही, आणि आम्हाला आठ दहा दिवस तरी वेळ नाही.थांबाचं असणं तर थांबा नाही तर सोंगुन घ्या "
शेवटी नाईलाजाणे वहिनीनें दादासोबत घेऊन वावर सोंगायला सुरुवात केली.
"मजुर भेटेपर्यंत जेवढं होते तेवढं सोंगुन टाकू" असं म्हणून मीं आणि कार्तिकलाही सोबत घेतलं. आम्ही तिघेही सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम करू लागलो. कार्तिक लहान असल्यामुळे उन्हामुळे धापा टाकत होता; तर कधी बाभूळीखाली जाऊन बसत होता.दादा अन वहिनी अन् मीं दिवसभर मशीनसारखे काम करू लागलो . सोंगता, सोंगता सोयाबीन फुटू नये म्हणून दादा बजावून सांगत होता. दुपारी कसाबसा भाकर तुकडा चटणीसोबत खाऊन कामाला लागत होतो. कधी कधी एकसारखी कडक ऊन तर कधी अचानकचं एखादं काळ ढग सूर्याच्या आडवं येऊन पडणारी सावली गोड वाटतं होती. अंगाखांद्यावरून चालणाऱ्या घामाच्या धारेला ती सावली अन वाऱ्याची थंड झुळूक गोड वाटत होती; पण या सुखाच्या वाटणाऱ्या काळ्या ढगाच्या पोटात काय आहे हे त्यावेळी कोणाच्याचं लक्षात येत नव्हतं.
चार पाच दिवसातच आम्ही तिघांनी दोन एकर वावर सोंगुण टाकलं. पूर्ण वावरात आता सोयाबीनचे गंजच्या गंज पडले होते. पण आता तेवढी चिंता राहिली नव्हती. आभाळासारखं वाटणारं काम आम्ही जिद्धीने पूर्ण केलं होतं. ढग जोर धरत होते पण अचानकच निघून जात होते. पण तरी वहिनीला काळजी वाटत होती.म्हणून त्या दादाला म्हणाली.
"अहो, आता एका ठिकाणी पूर्ण गंजी लावून देऊ करण पावसाचा काही नेम नाही, कधीही येऊ शकते. त्याचा काय भरोसा "
"नाही येणार! पाहू, उद्याच गंजी लावून टाकू. आज लय थकलो मी, अन दिवसय बुडत चालला,आजच येऊन पडते काय तो... !" म्हणून दादाने आजचं काम उद्यावर नेलं; पण रात्रीपासूनच आभाळाने गुरगुरायला सुरुवात केली. आणि अचानकच सकाळी पाच वाजल्यापासून विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तशीच वहिनी झोपेतून खळबळून उठली.
" अहो उठा.... अहो उठा.... " म्हणून त्यांनी मला आणि दादाला उठवलं. आणि डोक्याला हात लावत एकटीच ढोरासारखी रडू लागली. एकसारख्या पडणाऱ्या पावसाकडे एकटक पाहत वेड्यासारखं करू लागली.पावसाच्या धारा चालू होत्या. झोपेतले डोळे चोळत कार्तिक, पायल वहिनीला समजाऊ लागले. दादा स्वतः पच्छाताप करू लागला पण त्याला रडता येत नव्हतं.
वहिनी रडतच "तोंडापर्यंत येणारा घास ह्या पाण्यानं हिसकावून नेला व.... होत्याचं नव्हतं केलं व....." तीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. एकसारखा येणारा पाऊस तासभऱ्यानंतर बंद झाला. पण वहिनीच्या डोळ्यातल्या धारा चालूच होत्या.
सकाळी-सकाळी पाणी पूर्णच बंद झालं. दोघेही उठून तसेच वावराच्या दिशेने धावत निघाले. वावरात जाऊन पाहते तर, सर्वीकडे पाणीच पाणी झालं होतं. काही सोयाबीनचे गंज हवा,पाण्याने उडून सर्व वावरात पसरले होते. तर काही पाण्यात तरंगत होते. काही सोयाबीन खालून फुगू लागली. हे पाहताच वहिनी म्हणाली, "अहो, आता या गंजीले दोन-चार दिवसाची ऊन देणं आवश्यक हाय. पलटी मारण आवश्यक हाय. खालून सोयाबीन हूपीजुन येईन पण आता त्याले पर्याय नाही. जे आलं ते आता आपलं ".
त्यावरून आठ दिवस निघून गेले.पण तरी आभाळाची गुरगुरी थांबली नव्हती. ऊन सावलीच्या पाठशिवनीच्या खेळाने सर्व हैराण झाले होते. तरी चार दिवसाने चौघानी ती गंजी फोडून तळवावर पसरवली होती. आम्ही तिघेही घामाने लथपथ झाले होतो. कार्तिक आपल्या चिमण्या आवाजाने मायसी बोलला, "आई पुढंच्या वर्षी मी चांदुरच्या शाळेत शिकणार आहो....आपल्याले चांगलं पीक झालं की." तसच वहिनीच्या डोळ्यात गरगर पाणीच आलं. आता तिच्या मनात भीती अन शंका दोन्ही घर करून बसल्या होत्या. लावलेला दिवा वाऱ्याने फळफळ करत होता.
आता वातावरण जरा मावळलं होतं. लोक आपापल्या कामाला लागले होते. काही वावरात थ्रेशरचा आवाज ऐकू येत होता. प्रत्येकजण आपापल्या धावपळीत दिसत होता. सुकलेल्या गंज्या काढण्याची लोक लखलख करीत होते. हवामानाचा अंदाज दररोज काही प्रमाणात चुकत होता. दोन वावर चालून मीं आणि दादाने थ्रेशर वाल्याची भेट घेतली. तोही अडती घेत म्हणाला, "हे पहा भाऊ उद्या तुमची गंजी नक्की काढून देतो, पण चांबट नाही ना... नाही त लोचा होईन सारा." दुसरा दिवस उजाळला. त्या दिवशी सकाळ पासून उन्हाने आपला चांगलाच जोर धरला होता. अडीच-तीन वाजेपर्यंत कडक ऊन पडली पण, हळूहळू ढगं जमा होऊ लागले. निघून जाऊ लागले. गर्मी अंगातून घामाच्या धारा फोडू लागली.पाहता पाहता चार वाजता वावरात थ्रेसर आलं. पण तरी आमचा कोणाचाच जीव थाऱ्यावर नव्हता. मनातली धग शांत होऊ देत नव्हती. तेवढ्यात थ्रेसर वाल्याने मध्ये आवाज देल्ला, " घ्या बरं लवकर लवकर, चला रे पाणी प्या पोट्याहो अन लागा लवकर कामाले, पाण्याचा काही नेम नाही." तसाच त्याने गंजीले हात लावला, अन एक कवठा हाताने दाबून पाहिला,
"जरा चांबट आहे गंजी, अशा गंजीले थ्रेसर, डिझेल लय ओढते. काय करावं तुम्हीच सांगा.? पोत्यामागं पन्नास जास्त लागण, म्हणजे दोनशेचे अडीचशे, आताच सांगा नाही त चाललो दुसऱ्या गंजीवर... "
तसाच दादा बोलला, "नाई नाई , लावा थ्रेसर. तेच ते कामं कराले नाही पुरत.आधीच माणूस परेशान झाला या सोयाबीनले "
शेवटी थ्रेसर चालू झालं.कार्तिक, मीं इकडे -तिकडे धावपळ करू लागलो. वावरात सांडलेला सरवा वेचून गंजीवर टाकू लागलो. दोन पोते भराभर निघाले ;पण एकदमच सर्वीकडून अंधारून आलं.तसीच वहिनीच्या जीवाची घालमेल वाढली., "भाऊ निघन ना एवढी गंजी?" म्हणून ती विचारू लागली. एकटीच बळबळ करत "देवा पायजो रे बा.... गरीबाकडं लक्ष ठेवजो, आजच्या रोज पाणी नको येऊ म्हणा." अभयाकड हात जोडत विनंती करू लागली.तिसरं पोत भरत आलं पण काळे ढग चांगलेच जमू लागले. आता थ्रेशर वाल्याची पंढरी घाबरली. पण तरी माल काढणं चालूच होता. चौथ पोतं अर्ध्याच्या वर गेलं आणि टपोरे थेंब पडायला लागले. पाच वाजताच अंधार झाला. सर्वीकडे काळे ढग सैताना सारखे नाचू लागले. तसच थ्रेशर बंद झालं.आणि लगबग करीत त्याने आपला ट्रॅक्टर चालू करत थ्रेशर वावराच्या बाहेर काढलं. टपोऱ्या थेंबानी चांगलाच जोर धरला. इकडे सोयाबीन ओलं होऊ नये म्हणून दादा आणि वहिनी पोते झाकू लागले. त्यावर खालचाच तळव उलटा मारू लागले पण तो पाहिजे तेवढा पुरत नव्हता. काही भाग उघडा पडत होता, त्यामुळे पोते आजूबाजूने ओले होतं होते. हवेमुळे चारी बाजूने पाऊस विजे सहित कडकड्त होता. पाणी उताराच्या दिशेने खालून पोत्यात जाऊ लागलं. तशीच वहिनी चिल्लावली ,
"आहो, हे इकडून खालून पाणी धसुन राहिलं.दांड काढा तिकडे, माती लावा इकडे, येणारे पोट्याहो हातभार लावू लागणा जरा ". तसेच सर्वच जण माती ओढून पोत्याच्या अवती भवती लावू लागले.पण पावसाले इतका जोर आला होता की काही केल्या ते थांबायचं नावच घेत नव्हता. कार्तिक अन् पायल पोत्याच्या बाजून कुटार टाकू लागले.पण पोते ओले होतच होते. वहिनी त्या पोत्यात पाणी जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होती. त्या पोत्याना आपल्या पदराने झाकू की काय अशी करत होती. त्या पावसाले शिव्या शाप देतं होती. पाण्याच्या धारा नाका तोंडात जातं होत्या. अर्ध्या तासात पावसाने सर्वांची लाही लाही केली होती. काही वेळाने पाऊस थांबला सर्व शांत झालं. अंधाराने आपला मंडप चहुबाजूने टाकला होता. आम्हाला काय करावं काहीच कळतं नव्हतं. शेवटी पोत्याच्या भोवतीचा तळव मोकळा केला पण पोते बाहेरून ओले झाले होते. ते पाहताच वहिनीला रडू आवरले नाही आणि ती ढसाढसा रडू लागली., "सर्व संपलं व माय...काय विचार केला होता अन काय झालं. ह्या पावसानं पुऱ्या जिनगाणीचं वाळवंट करून टाकलं व माय.आमच्याच साठी आला होता काय रे तू मराले" ती आक्रोश करीत होती. शेवटी कार्तिक तिच्या जवळ आला आणि समजावू लागला. काही वेळ ती शांत झाली.
संपूर्ण वावरभर पाणीच पाणी झालं होतं, त्यात तेवढे पोते उभे होते एखाद्या समुद्रातल्या बेटा सारखे. शेवटी दादाने शक्कल काढली,
"ते सर्व पोते उचलून आपण कुटाराच्या खाली दाबून देऊ आणि वर सोयाबीनचं कुटार टाकू म्हणजे त्या पोत्याची तेवढी ओल कमी होइल." मींही तयार झालो. आम्ही चौघानी मिळून पोते ओढले पन आता ते डबल भारी झाले होते. ओढता ओढल्या जातं नव्हते. कसेतरी ते पोते कुटाराच्या खाली दाबून घराकडे निघायला लागलो.
सगळं भयाण वाटतं होतं. छाती धडधड करीत होती. कुणीच कुणासोबत बोलत नव्हतं. मुक्या तोंडाने हातात चपला घेऊन सर्वजण अंधार तुडवत जातं होते. हे सर्व स्वप्न असावं असं मला मनोमन वाटतं होतं.पण ते सर्व सत्य होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच बैलबंडीत भरून पोते आणले. पूर्ण सोयाबीन फुगली होती. वास सुटला होता. बंडीवाल्यानें बाहेरचं गल्लीत पोते काढले. आम्ही दोघा भावाने ते पोते तिथंच बाहेर सडकीवर सोडले आणि तडव टाकून उन्हात टाकले घराच्या समोर सडकभर अंथरून दिले. पिवळी जर्द सोयाबीन काळीनिळी पडली होती, काही सोयाबीनला कोंब आले होते.सर्व पुऱ्यात सोयाबीनचा वास सुटला होता. तिथून येणारे जाणारे नाकाला हात लावून जातं होते. काहीजन आमच्या मागे टोमणे मारत होते., "एकनाथ भाउले आधीच सांगितलं होतं. लागोननें वावर करू नका म्हणून पण पैशाची हाव, घेणा म्हणा टोले आता.काय भावातं पडलं "
दलाल घराभोवती चकरा मारू लागले. हजार बारासे रु क्विंटलनें सोयाबीनचा भाव करू लागले. वाहिनीच्या, दादाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. मीं कोमात गेल्या प्रमाणे ते सर्व दृश्य फक्त डोळ्यात भरून घेत होतो. उच्चारायला शब्दही फुटत नव्हते. सडकेवर निजलेल्या सोयाबीनचा जणू भाव होतं होता. लिलाव होतं होता. बेपारी येत आणि सोयाबीनला हाताने चाचपडून निघून जातं होता. कुणी आठशे, कुणी नऊसे तर कुणी म्हणतं होते. पाचशे रुपये क्विंटललाही परवडत नाही.... पेरणीच्या वेळेस 11000 रुपयाने विकत घेतलेली सोयाबीन 1100 रुपयात ही मागत नव्हते. याची सल मनात खूप खोल खोल रुतून जातं होती...!
विशाल भा. मोहोड
तळवेल, चांदुर बाजार, जि अमरावती
मो.नं.9011578771
मेल - vishal84mohod@gmail.Com
प्रतिक्रिया
अतिथी सदस्य या आय डी ने
अतिथी सदस्य या आय डी ने प्रकाशित झालेली प्रवेशिका पात्र ठरणार नाही
१ . ज्यांनी अजूनही बळीराजावर सदस्यत्व घेऊन आय डी तयार केलेली नाही त्यांनी सदस्यत्व घेऊन आय डी तयार करून मला कळवावे. त्यानंतरच पुढील प्रोसेस होईल.
२. ज्यांनी प्रवेशिका प्रकाशित केल्या आहे पण लेखक म्हणून अतिथी सदस्य (-) आले आहे त्यांनी मला प्रवेशिकेचे शीर्षक आणि आपला आय डी कळवावा.
- गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
पाने