नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मातीतून येणारा शब्दरूपी दरवळ - काळी आई
काषाय प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेला 'काळी आई' हा कवी चंद्रकांत वानखेडे यांचा कवितासंग्रह मुळातच चैतन्याचे रसरशीत गीत आहे. लालकाळ्या मातीचे रुबाबदार, प्रसन्न, आकर्षक, टवटवीत, हिरवेगार मुखपृष्ट धारण केलेला हा संग्रह वाचकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.अष्टाक्षरी लेखनप्रकार याबरोबरच चार चरणात कविता अवतरत जाते. ही या संग्रहाची वैशिष्ट्ये वा खासियत म्हणावी लागेल. चार भागात विभागली गेलेली कविता माय, बाप आणि मातीची अफाट थोरवी गायला विसरत नाही.
बापानं वर्णिलेली काळ्या आईची थोरवी शब्दांत अभिव्यक्त करताना कवीच्या जाणिवा-नेणिवांची प्रचिती येते. मातीवर प्रेम, माया, श्रद्धा, निष्ठा ठेवावी, असा कविचा बाप कवीला सांगायचा, हे विशद करताना मातीची सेवा सदोदित आपल्या हातून घडावी हे सांगायला कवी मुखरत नाहीत.
भुई कन्हते. मातीतून कोंब अंकुरतो. वाऱ्यावर झुलतो. डोलतो. थरथरतो. शहारतो. अंकुरण्याचा हा सोहळा मातीशी एकनिष्ठ राहून कवी साजरा करायला सांगतो. मातीचे माणसांवर असणारे ऋण बापाच्या मुखातून कवी वदवतो.
शेतीमाती हे केवळ पेरणे आणि उगवणे यापुरतेच मर्यादित नसते, तर मातीला ईश्वर मानून तिची सेवा करण्याचा भाव कवीच्या बापाच्या मनात दिसतो. म्हणूनच तो मातीच्या कायम ऋणातच राहू इच्छितो.
बापाला मातीच्या सहवासात तुकाराम भेटतो. मातीच्या कणाकणातुन उगवून आलेला एकेक अभंग आयुष्यभर कवी चाळत राहतो. स्मरत राहतो. ऊनपाऊस, वादळवाऱ्याला न जुमानता बापाने केलेला मातीचा अविष्कार प्रत्येक शब्दांशब्दांतून जाणवत राहतो.
काळ्या आईला पंढरी मानून तिची अखंड वारी करणारा कष्टकरी शेतकरी बाप कवितेत पदोपदी भेटतो. हे वाचून वाचक सुखावतो. काळ्या आईवर अपार श्रद्धा ठेवून कष्टकरी बाप आणि आसवांचा पूर थोपवून धरणारी काळी माय हा या संग्रहाचा मूळ गाभा आहे.हे विसरता कामा नये.
शिकून-सवरून माणूस मोठा होतो, किंबहुना स्वतःची हवी तशी प्रगती साधण्याचे माध्यम म्हणून शिक्षणाकडे पाहण्याचा कल समाजात रूढ झालाय. शिक्षणाने माणसांच्या वागण्यात, बोलण्यात तथापि वर्तनात बदल व्हायला लागतो. तो पांढरपेशी लोकांसारखा वागत जातो. इच्छित स्थळं प्राप्त झाल्याने त्याचे पाय मातीशी इमान राखत नाहीत. तो आकाशात विहरतो. बापाच्या उपदेशवाणीतुन कवी मातीवर जिवापाड प्रेम करण्यास सांगायला विसरत नाही, हे सांगताना एके ठिकाणी कवी म्हणतो,
बाप सांगायचा मला
पोरा इतकं शिकावं
झेप आकाशी घेताना
नातं मातीशी जपावं.
माणसाच्या काळजात मानवतेचा झरा सदोदित जिवंत ठेवायला कवी सांगतात, म्हणून ही कविता माणुसकीचा धागा विणत जाणारी दुवा बनते. त्याचबरोबर भावाभावातील नात्यांचा अनुबंध या कवितेतून प्रकटतो. नात्यांची वीण घट्ट बनवत जाणारी कविता आणि भाऊबंदकीच्या कचाटयात सापडुन काळ्याआईची होणारी घुसमट या दोन्ही टोकांचा पूल सांधण्याचे काम ही कविता करते.
सावकाराच्या नादाला
कधी लागायचं नाही
येते व्याजानं चक्कर
कधी उठायचा नाही
सावकाराने दाखवलेल्या आमिषाकडे आकर्षित न होता आणि काळ्या आईला सावकाराच्या हवाली न करता सजग व सतर्क राहायचा उपदेश करणारा बाप कवितेत दिसतो.
संकटाची वावटळ शेतकऱ्याला गरगर फिरवते.सावरू आणि स्थिरावू देत नाही. जितके मिळवलं, मातीनं ओंजळ भरून दान दिलं, तितके वाहून न्यायलाही मागे पुढे पाहत नाही, हे सांगताना कवी म्हणतात,
बाप सांगायचं मला
अशी वावटळ येते
आयुष्याची ही शिदोरी
संगे घेउनिया जाते.
मातीपासून अलिप्त होऊ पाहणाऱ्या आणि तुटत जाणार्या माणसाला ही कविता परत परत मातीकडे परतायला विनवणी करते. मातीची आर्त हाक या कवितेतून स्पष्ट कानी पडते. घामातून, कष्टातून देव दिसतो. काळ्या आईची सेवा करून तिला नटवण्याचे स्वप्न कवी पाहतो. माणसे दगा देतील, विश्वासघाती बनतील. संहार करतील, मात्र माती कधीही कुणाचाच विनाश करणार नाही. अथवा दगाफटका देणार नाही. अशी कवितेत कवीच्या बापाची अधिकारवाणी मनोगतरूपातून व्यक्त होते.
राबणारा बाप थकतो, दमतो, भागतो, अनवाणी पायाने रानभर हिंडतो, अशावेळी कवीला बापाच्या पायथ्याशी पांडुरंग निजलेला दिसतो.
काळ्या आईचे देखणे रुपडे डोळ्यात भरभरून साठवताना कवी म्हणतो,
काळी आई तुझे रूप
माझ्या डोळ्यात बसते
देह मातीमय झाला
छबी तुझीच दिसते.
इतके मातीशी इमान राखणारे लेखन कवी करतो.
म्हणून काळी आई आपणाला भरभरून देते. रिती ओंजळ ओसंडेपर्यंत दान आपल्या पदरात टाकते. हीच अनुभूती 'काळी आई' हा संग्रह वाचताना येतो. नक्षत्राहून देखणी अशी माझी काळी आई आहे. तिचे लावण्या सदाहरित आणि टवटवीत आहे. असे कवीला वाटून राहते.मानव जातीला समृद्धता बहाल करण्याकरिता काळ्या आईने आपल्या छातीवर झेललेले वार आणि पीक अंकुरण्यापूर्वीचा अनोखा उत्सव सोहळा नेमका कवी शब्दात पकडताना जाणवतो.
आई नांगराचा फाळ
तुझ्या छातीवर चाले
तेव्हा हिरवा गालिचा
तुझ्या काळजात डोले.
नजरेला भावणाऱ्या अनेक सौंदर्यप्रकारापैकी कवीला काळ्या आईचं रूप आपल्या डोळ्यात साठवायला आवडते. असे म्हणताना कवीचे मन हरखून जाते.
तिच्या देखण्या रुपाचं
किती गाऊ गुणगान
पीक डोलते डोलते
सारे हरपती भान.
आपल्या कृषिप्रधान देशामध्ये शेतीची दुरावस्था अतिशय दयनीय झाली आहे.शेतीमालाच्या भावाबरोबरच शेतीचाही भाव ठरवणाऱ्या दलालांचा सुळसुळाट पावलोपावली वाढला. खिशात पैसा आहे म्हणून जमीनसुद्धा घशात घालायची ऐपत सावकार बाळगतो. हेच सांगताना कवी सुचवतात,
माझा पुढाऱ्याचा गाव
रोज साधताती डाव
काळ्या आईची खरेदी
तेच सांगतात भाव.
त्याचबरोबर शेती विकून तात्पुरता ऐशोआराम शोधणाऱ्या आणि पिढीजात कमाई सावकाराच्या घशात घालू इच्छिणाऱ्या वृत्तीवर कवी कडाडून प्रहार करताना लिहितात,
भुई विकूनिया झाली
आता करणार काय
उभे करण्या आयुष्य
कुठे शोधशील पाय ?
काळ्या आईला विकून गाव सोडणारे कमी नाहीत. आहे ती सारी जमीन विकून लोक भूमिहीन होतात. पर्यायानं शहराच्या वाटेला लागतात. दूरवर शहराच्या वळचणीला येतात. नातीगोती विसरून गावाकडं कायमची पाठ फिरवतात. शेती आपला उद्धार करणार नाहीच, या अनपढ विचाराने परगावी गेलेल्या विस्थापितांच्या लोकांच्या वृत्तीकडे कवी डोळसपणे पाहतात,
भरलेल्या पोटासवे
आज सोडतोस गाव
नको जाऊस वेगाने
जरा बेतानेच धाव.
एकूणच 'काळी आई' हा संग्रह मातीचा हिरवा अभंग आहे. मातीने केलेले संस्कार शब्दांच्या कणाकणातून प्रकट होतात. मातीमध्ये भगवंत शोधून, मातीलाच तीर्थक्षेत्र मानून, तिची पूजा करणारा कवी, मातीशी नाळ घट्ट पकडून ठेवतो. मातीचे ऋणानुबंध जपतो. अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करण्यासाठी मातीच आपल्याला प्रेरित करते. प्रसंगी धीर देते. अशी सूचक मांडणी कवी करताना दिसतो. अर्थातच हा संग्रह म्हणजे मातीतून उगवून येणारा शब्दरूपी दरवळच होय.
सचिन शिंदे
8421527542