![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अष्टाक्षरी
शीर्षक - शेती आमच्या हक्काची
काळी माय माझी आई
पिकविते दाणे मोती ,
तिच्यावर पोट भरे
माझी नका विकू शेती.....१
आहे वडिलोपार्जित
लाख मोलाची जमीन ,
तिच्या मशागतीसाठी
कष्ट झेलितो कठीण........२
शेतकरी दादा मी हो
आहे पोशिंदा जगाचा ,
पाणी करून रक्ताचे
मळा फुलवी पिकाचा.....३
सर्जा राजा संगतीने
औत हाकतो हाकतो ,
दिनरात माळरानी
मोत्या राखणी करतो......४
जिरायती, बागायती
असो कसलीही शेती ,
कष्टेविण कसे येई
पीकपाणी ,दाणे मोती?....५
लेकरांच्या मायेपोटी
फासदोर केला दूर ,
माझ्याविना कसा निघे
चुलीतून मग धूर ?.......६
पीक काढणीला ढग
एकाएकी होई गोळा ,
पुरामध्ये वाहे पीक
होई स्वप्नांचा पाचोळा.....७
जाणा आमच्या कष्टाला
आम्हां द्या हो पीक हमी ,
हात मदतीचा द्यावा
होई पिकाची बेगमी......८
शेती आमच्या हक्काची
द्यावे आम्हा पाठबळ,
अन्नधान्य उत्पादन
नाही होणार आबाळ.....९
शेती आमच्या हक्काची
नका करू तिचे मोल ,
नका विकू माझी शेती
पाचू रत्न अनमोल......१०
सौ रझिया इस्माईल जमादार अक्कलकोट जिल्हा-सोलापूर
संपर्क क्रमांक - 8208648526
ई - मेल raziyajamadar75@gmail.com
प्लॉट नं 3 आदर्श नगर, मार्केट यार्ड पाठीमागे, बॅगेहळ्ळी रोड अक्कलकोट जिल्हा-सोलापूर