नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बायको
थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥१॥
सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडीशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥२॥
सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्पा तीले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥३॥
सार्यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पेऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥४॥
गंगाधर मुटे
————————————————————————-
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
————————————————————————-