शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!
"विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले."

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे. निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.
भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने व निसर्ग बेभरवशाचा असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकताना आणि वाचताना इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे व डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.
शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.
मात नव्हे मैत्री
निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिमाण सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्या घटकांची व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.
हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही त्याने कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ भोजनाचा पाहूणचार दिला. शेतकर्याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला. पंचमहाभूतांचा आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.
कुटनितीचा खेळ
मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडला असण्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्या युगातही पडणार नाही, हे शेतकर्याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला. शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला.
विविधता आणि लहरीपणा हेच निसर्गाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याने शेतीच्या दुर्दशेसाठी निसर्गाला दोषी धरण्याचे काहीही कारण उरत नाही. शेतीच्या दुर्दशेची कारणे निसर्गाच्या लहरीपणात नसून अन्यत्र आहेत, हे न समजण्याइतपत कुणी दुधखुळा असू शकतो, अशी कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. तरीही तशी भाषा वापरली जात असेल तर त्यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आणि कुटनितीचे खेळ आहेत, असा ग्रह नाईलाजाने करून घेणे भाग आहे. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून बुद्धीचातुर्याच्या बळावर कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.
ग्राहकांची मानसिकता
कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा अथवा कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्हेतर्हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणारे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज झाली आहे.
- गंगाधर मुटे
(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~