Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***भांडण, तंटा, हाणामारी, यादवी आणि आणीबाणी : करोना माहात्म्य ||९||

करोना माहात्म्य ||९||
भांडण, तंटा, हाणामारी, यादवी आणि आणीबाणी
 
            एकदा एका गावामध्ये वाघ घुसला. वाघ बघून सर्व लोक सैरावैरा पळायला लागले. ज्याला जिकडे रस्ता मिळाला तो तिकडे पळाला. या धांदलीमध्ये कोणी स्वतःच्या घरी पोचले तर कोणी जिथे जागा मिळेल त्या घरी आश्रय घेतला. गावभर धडाधड प्रत्येकाने आपापल्या घराचे दार लावून घेतले. अगदी पाच मिनिटात गावातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले.
 
            त्या काळामध्ये गावामध्ये फोन नव्हता आणि मोबाईलही नव्हता त्यामुळे कोणाचा संपर्क कोणाशी होत नव्हता. सर्व आपापल्या घरात बंदिस्त झाल्याने बाहेर काय चालले आहे किंवा वाघोबा नेमका कुठे आहे, याचाही काही अंदाज येत नव्हता. वाघाचा काहीच अंदाज येत नसल्याने कोणीच बाहेर पडायलाच तयार नव्हते. लोकांची दिनचर्या थांबली होती. त्याकाळात घरामध्ये शौचालय नसल्याने तर अडचणीमध्ये आणखीच भर पडली होती.
 
            अशा स्थितीत काय करावे याबद्दल कुणालाच काही सुचत नव्हतं. पण त्या गावामध्ये एक बुद्धिमान विद्वान मनुष्य होता. तो गुपचूप घरावर चढला. घराच्या छतावरून त्याने पाहिले की, गावाच्या पश्चिम दिशेस एका कोपऱ्यात वाघ शांतपणे बसलेला आहे पण नजर टवकारून सावजाचा शोध घेतो आहे. त्याने विचार केला की हा वाघ कधीही आपल्या घराजवळ येऊन आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला धोका उत्पन्न करू शकतो म्हणून आता काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे. जर आपण आता या क्षणी एखादी शक्कल लढवून लोकांना घराबाहेर निघण्यास बाध्य केले तर सध्या जिथे वाघ बसलेला आहे त्याच परिसरातला एखादा मनुष्य गिळंकृत करुन वाघ निघून जाईल. तसे झाले तरच मग आपण आपले जीवन निर्धोकपणे जगू शकतो.
 
            तो घराबाहेर पडला. शेजाऱ्यांना सांगू लागला की अरे आपण असे किती दिवस घरांमध्ये लपून बसणार आहोत? आता आपल्याला घराबाहेर निघावेच लागेल. वाघाला भिऊन घरात लपून बसने योग्य नाही. आता आपण वाघासोबत जगायला शिकलो पाहिजे कारण हा वाघ आपला परिसर सोडून केव्हाच जाणार नाही. पुढील आयुष्यभर आपल्याला वाघासोबत जगण्याची कला अवगत करावी लागेल. हा विचार हळूहळू काही लोकांना पटायला लागला. हळूहळू एकएक मनुष्य घराबाहेर निघायला लागला. वाघाने संधी साधली आणि जो जवळ दिसला त्या माणसाला अलगद तोंडात उचलले आणि रानाकडे निघून गेला. ज्याचे जीवन नैसर्गिक आपत्तीपासून जास्त सुरक्षित असते त्याच्या डोक्यातून नेहमीच सुपीक कल्पना जन्माला येत राहतात. बाकी जनता बऱ्यापैकी साधी भोळी आणि कूटनीतिचे डाव समजणारी नसल्याने सर्वसामान्य माणसे अशा अफलातून कल्पनांना भुलून बळी पडत राहतात. लॉकडाऊन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ज्या तऱ्हेने लोक लॉगडाऊनची गरज नाही, कोरोना सोबत जगण्याची जीवनशैली अंगीकारून मुक्तपणे निर्धोक जगण्याचे स्वप्नरंजन करून ज्या तऱ्हेने अनेक अफलातून कल्पना मांडल्या जात होत्या त्या काहीशा अशाच वर्गवारीत मोडणाऱ्या होत्या.
 
            भारतीय जीवनशैलीचे नानाविध प्रकार असले तरी ढोबळमानाने या जीवनशैलीचे दोन प्रकारात सहज विभाजन करता येते. एक व्हाईट कॉलर जीवनशैली आणि दुसरी ग्राम्य जीवनशैली. व्हाईट कॉलर जीवनशैली प्रकारातील माणसाचे वर्तन मुळातच विलगीकरणाशी साम्यता राखणारे असते. ह्या व्यक्ती सहसा एकमेकात मिसळत नाहीत, स्वतः बाजारात जात नाहीत, गेलेच तर गर्दीत मिसळत नाहीत, बसायला चांगले आसन मिळाल्याशिवाय बसत नाहीत. पानटपरीवर जात नाहीत, गाडीवरचा चहा पीत नाहीत, रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये खात नाहीत. त्यांच्या अंगावरील कपडे नेहमी स्वच्छ आणि पॉश असतात आणि यांच्याकडे स्वतःचे वाहन असल्याने प्रवासात सुद्धा इतरांशी थेट संबंध येत नाही. याउलट ग्राम्य जीवनशैली प्रकारातील लोक कायम एकमेकांच्या सहवासात असतात, सर्वांशी कायम मिसळत असतात, जिथे जातात किंवा ज्या भागात यांना जाण्याची गरज भासते तो सर्व भाग गजबजलेला असतो. यांना रिक्षा अथवा बसमध्ये बसल्याशिवाय गत्यंतर नसते. ही मंडळी कुठेही उभी राहतात आणि कुठेही बसतात. बसायला आसन मिळालं नाही तर खाली जमिनीवर धुळीत बसतात. या प्रकारातील मंडळी गर्दी टाळूच शकत नाही.
 
            करोना विषाणूची संक्रमण शैली मुख्यत्वे एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसरी व्यक्ती अशीच असल्याने संक्रमणाचा मार प्रामुख्याने ग्राम्य जीवनशैलीवाल्यांनाच जास्त पडेल हे अगदी उघड आहे. त्यांचेसाठी "कोरोनासोबत जगणे" म्हणजे "कोरोनासोबत मरणे" ठरणारे आहे. करोनाला मुक्त संचार करण्याची मुभा मिळाली तर करोना ग्राम्य जीवनशैलीत जगणाऱ्यांचा फडशा पाडल्याशिवाय सोडणार नाही, याच ग्राम्य जीवनात करोना तांडव करून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकेल, ही काळ्या दगडावरची रेघ समजावी. याउलट व्हाईटकॉलर जीवनशैलीत करोनाला सहजासहजी प्रवेशच मिळणे कठीण जाईल. प्रवेश मिळालाच तरी गुणाकाराच्या वेगाने संक्रमण वाढणार नाही. "करोना सोबत जगणे" म्हणजे त्यांचेसाठी एका अर्थाने "करोनामुक्त जगणे" यापातळीवरचे ठरणारे असल्याने लॉकडाऊन संपवून आम्हाला आमच्या मर्जीने जगू द्या, जे व्हायचे ते होईल, या विचारसरणीचा जन्म याच व्हाईट कॉलर जमातीतून का होतो, याचे रहस्य इथेच दडलेले आहे.
 
            आणखी एक बाब कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे की "करोना सोबत जगणे" ही काही सुरक्षित जीवनशैली नाही. प्रत्येकाच्या शरीरात करोना विषाणू प्रतिकारक शक्ती निर्माण होईपर्यंत मानवजातीला त्याची प्रचंड संख्येत मृतदेहांची किंमत अदा करावी लागेल. करोना सोबत जगताण्याच्या जीवनशैलीत करोना संक्रमणाचा वेग कायमच राहणार आहे. मुत्यूचे प्रमाणही कायमच राहणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात करोना विषाणू प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी एक विशिष्ट काळ लागणार आहे. कदाचित हा काळ बराच लांबलचक असू शकेल. अर्थात अशी जीवनशैली अंगीकारून प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी प्रत्येक मानवी जिवाला करोनाच्या स्वाधीन करावे लागेल. त्यासाठी "जे जगायचे ते जगतील, जे मरायचे मरतील" असा अमानुष सिद्धांत स्वीकारून मनाची तयारी करावी लागेल. प्रत्येक जीव महत्वाचा मानून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करण्याची शिकवण देणाऱ्या थोर संत-महात्म्यांच्या देशाला असा अमानूष सिद्धांत कितपत पेलवेल याबद्दल माझ्या मनात जबरदस्त शंका आहे.
 
            "करोना सोबत जगणे" या जीवनशैलीत आणखी एक मोठा धोका आहे तो यादवीचा. करोना विषाणूचे वाहन मनुष्य आहे. मनुष्यावर स्वार झालेला करोना मानवी नजरेत अदृश्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे चालता बोलता मनुष्यच मनुष्याच्या नजरेत एक करोना आहे. सुरुवातीला परदेशातून येणाऱ्या माणसाकडे करोनाचे प्रतिरूप म्हणून पहिले गेले. त्यानंतर परप्रांतातून, त्यांनतर मुंबई-पुण्यातून, त्यानंतर परजिल्ह्यातून  येणाऱ्या माणसाकडे करोनाचे प्रतिरूप म्हणून पहिले गेले. आता या सीमा आकुंचन पावत परगाव, परमोहल्ला इथपासून शेजाऱ्याच्या घरापर्यंत खाली घसरत जातील. एक मनुष्यच जर दुसऱ्या मनुष्याकडे करोनाचे प्रतिरूप म्हणून बघत असेल तर छोट्या-मोठ्या मुद्यावरून बाचाबाची-भांडणतंटा-हाणामारी सुरु होणारच. एकदा कलह सुरु झाला तर देशभर यादवी माजायला फार काळ लागणार नाही. भारतीय माणूस आपल्या सद्सदविवेकाला स्मरून विचार करण्याऐवजी आपापल्या राजकीय बांधिलकीच्या पक्षाच्या सोयीने विचार करत असल्याने या यादवीचे स्वरूपही भीषणच असेल, कदाचित हीच स्थिती आणीबाणीला आमंत्रण देणारी असू शकेल, हे वेगळे सांगणे न लगे!
 
            लॉकडाऊनचा चवथा टप्पा सुरु झालेला आहे. या टप्प्यात शिथिलता आणून जनजीवन हळूहळू पूर्ववत करण्याचे प्रयत्न होतील. शासनाने १० टक्के शिथिलता दिली तर लोक त्याचे स्वरूप १०० टक्के शिथिलता असे करून टाकतील. एकंदरीत समाजमनाचा कानोसा लक्षात घेता यापलीकडे लॉकडाऊन लांबवणे जवळजवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे "करोना सोबत जगणे" हा पर्याय आज ना उद्या स्वीकारावाच लागेल असे दिसत आहे पण हा केवळ नाईलाज आहे, हे सुद्धा कायम ध्यानात ठेवले पाहिजे. अन्य सर्व पर्याय संपल्यावर "मरता क्या नही करता" अशा धर्तीवर नाईलाजाने स्वीकारावा लागणारा हा पर्याय आहे. राजीखुशीने किंवा सहज आनंदाने स्वीकारण्यासारखा हा पर्याय खचितच नाही. लॉकडाऊनच्या काळातही पुरेशा गांभीर्याने पालन न केल्याने व संचार सुरूच राहिल्याने करोनाचा प्रसारही होत राहिला. देशभरातील करोना संक्रमित रुग्णसंख्या लाखावर पोचली आहे. करोनाचा मृत्यूदर १ ते २ दोन टक्केच असून अन्य रोगाच्या तुलनेत मृत्युदर फारच कमी असल्याचे यापूर्वी जोरदारपणे मांडल्या गेले पण आज रोजी भारतात दुरुस्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेने मृतांचे प्रमाण चक्क ८ टक्के आहे. आता करोनाची भीती बाळगावी की बाळगू नये या मुद्याला काहीही अर्थ उरलेला नाही कारण संक्रमणाची गती व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता एकूणच स्थिती नक्कीच भयावह व चिंताजनक आहे. लॉकडाऊन जसजसे शिथिल होत जाईल तसतसी संक्रमणाची गती गुणाकाराच्या गतीने वेग घेईल. संक्रमणाचा सामना करायला आता धाडसाची गरज नसून संवेदनशीलतेसोबतच पराकोटीच्या जबाबदारीची गरज भासणार आहे. बेजाबदारीने वागणारे स्वतःसोबतच त्याचे कुटुंब व समाजालाही धोक्यात घालणार आहेत, त्यामुळे जबाबदार लोकांनी बेजबाबदार लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न सुरु करण्याची आजच्या घडीला सक्त आवश्यकता आहे.
 
            करोनापासून मनुष्य जातीला एक तर निसर्ग वाचवू शकेल किंवा आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेली परिणामकारक लस. सध्या जागतिक स्तरावर लस किंवा औषध संशोधनासाठी विषयतज्ज्ञ अहोरात्र प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यासंबंधी उत्साहवर्धक बातम्या मिळत आहेत. अनेक देशात व्हॅक्सिन विकासाला जबरदस्त वेग आला असून काही व्हॅक्सिन मानवांमध्ये अँटीबॉडीज करण्यात १०० टक्के यशस्वी ठरत असल्याचे संकेत मिळत आहेत. एक व्हॅक्सिन तयार करायला साधारणतः चार पाच वर्षे लागत असले तरी ४-५ महिन्याच्या अवधीतच व्हॅक्सिन तयार करण्याच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही शुभसमाचार मिळत आहेत. आपण आशा करूयात की लवकरच लस उपलब्ध होईल आणि मानव जातीवरील संकट टळेल पण असा दिवस उजाडेपर्यंत प्रत्येकाने करोनापासून स्वतःला वाचवणे ही ज्याची त्याची जबाबदारी आहे, असे प्रत्येकाने स्वतःच स्वतःच्या मनाला बजावून सांगितले पाहिजे. असे होऊ नये की आपल्या घरी इकडे "राम नाम सत्य है" चा वाजा वाजत आहे आणि नेमकी तेव्हाच डॉक्टरांच्या हातात करोना प्रतिबंधक लस आली आहे.
 
केलीस व्यर्थ घाई, मरणेच व्यर्थ झाले
तू प्राण त्यागला अन अमृत पुढ्यात आले
 
असे झाले तर ज्याचा अपराधी तोच असणार आहे. अन्य कुणाची चूक अथवा दोष अजिबात नसणार आहे.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
दि. १९/०५/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
 
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.

 

करोना

Share