नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जीवनदाता आणि जीवघेणा रानातला पाऊस
पाऊस हा एक सृष्टी चक्रातील अतिशय महत्त्वपूर्ण असलेला घटक. निसर्ग देवतेचे वरदान! जलतत्त्व आणि जल म्हणजे जीवन. अवनीवरील प्रत्येकाचे पोषण होण्यास आवश्यक. धरेवरील सर्व जीव तर सोडाच पण प्रत्यक्षात धरती सुद्धा पावसाकरिता व्याकूळ असते. चातकच नाही तर इतर जल, स्थल, नभवासी पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत असते. धरतीची आणि धरतीवासियांची परिपूर्णता पावसाशिवाय होऊ शकत नाही. अशक्यच! मनुष्यप्राणी दरवर्षी आकाशात वर ढगांची गर्दी बघतो तो पावसाच्या अनन्यसाधारण महत्वामुळेच. शेतीचे आणि हिरव्यागार रानाचे जीवनचक्र पावसावरच अवलंबून असते. त्याचे सर्व हिशोब, नियोजन पाऊसच परीपूर्णत्वास जाण्यास व फलद्रुप होण्यास मदत करतो. शेतकरी नव्हे तर सर्व जनता त्याचे सुखद आगमन अनुभवत असते.
हे एक चक्र आहे नियमित चालणारे. पाऊस हा रानातला, गावातला व केवळ शहरातला नसून तो सर्वांसाठी समपयोगी. परंतु रानातल्या पावसाची मौज काही वेगळीच आहे. हा पाऊस माझा शेतकरी बांधव व कष्टकरी मजूर वर्ग दरवर्षी अनुभवतो. शेतकऱ्यांचे नियोजन मृगापासून सुरू होते. त्याची मान सारखी वर नभाकडे जात असते; तो आपल्या लावणी पेरणीच्या कामात मशगुल असतो. त्याला काम पूर्णत्वास नेण्याची ओढ असते. ही ओढ क्षमली की तो वर नजर भरुन बघतो अंदाज बांधतो; मनी पाऊस येण्याची वेळ धरतो आणि अशा वेळेस पाऊस सुरु झाला तर त्याच्या आनंदाला पारावार नसतो. तो आणि शेतावर असलेले मजूर चिंब ओले होऊन आनंद व्यक्त करतात. सरीवर-सरी सोबत थोडा विजांचा-चमचमाट, ढगांचा-गडगडाट. तसे काहीसे वातावरण भीतीदायक निर्माण होत असते तरी तो त्या त्रासदायक, भीतीदायक वातावरणाचेही आनंदाने स्वागत करतो कारण पावसाने त्याच्या बऱ्याच गोष्टी साध्य केल्याचा आनंद व पुढील चित्र त्याच्या डोळ्यापुढे तो स्पष्ट बघतो आणि हिरवेगार स्वप्न त्याला पडायला लागणे सुरु होते.
इकडे बांधबंधारे, नाले, ओढे भरून खळखळाट सुरू करतात. त्या सुमधुर ध्वनीवर मोरही ताल धरून नृत्य सुरू करतो. रानातल्या पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात,
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी नीज बाळासह बागडती
अशा नयनरम्य वातावरणात प्राणिमात्रांनाही स्वतःचा विसर पडून पावसाची उपयोगीताच जास्त महत्त्वाची होऊन जाते. रान चिंबचिंब होऊन धरतीचा उष्मा काही प्रमाणात कमी होऊन सुखद अल्हाददायक भावना मनोमनी निर्माण होते. खरंच रानातल्या पावसाची मौज काही वेगळीच असते. पाऊस तो पाऊसच. थोडा कमी वा अधिक झाला तर मानवी जीवन बाधित करते; शेती चक्र बाधित झाले तर संपूर्ण साखळी बाधित होऊन परिणामी अर्थचक्र बाधित करते. एकाचे काय किंवा देशाचे काय, निसर्गाने दिलेले हे वरदान अबाधित कसे राहील याचे भान ठेवूनच मानवाने स्वतःची व परिणामी देशाची प्रगती साधावी. पाऊस हा सर्वांसाठी सुजलाम-सुफलाम् आहे. रान, गाव, शहर या तर संकल्पना आहेत. शहरी सुद्धा त्याच आतुरतेने पावसाची वाट बघतो कारण जल आणि जल म्हणजे जीवन. शहरवासी नकळत गावाशी जुडला असतो. त्याला पावसाचे नफे-तोटे अवगत असतातच.
कधीकाळी पावसाने घेतलेली दिर्घ-विश्रांती शेतकऱ्याला चिंतातुर करते त्याची पिक कोमेजायला लागतात. 'पाणी-पाणी' असा स्वर पिकाच्या श्वासातून बाहेर नाद करत असतो; मन दुःखी होते. पावसाचे पाणी म्हणजे अमृत असते, त्याची सर अन्य कोणत्याच प्रकारचे पाणी करू शकत नाही. प्रश्न एका- दोघांचा नाही तर संपूर्ण सृष्टी आणि सृष्टिचक्राचा आहे. व्याकुळ धरणीची हाक ऐकून पाऊस तिला जेव्हा न्हाऊ घालतो तेव्हा माझ्या बळीराजाचा चेहरा प्रफुल्लित व कांतीवाण दिसतो. तो एकदम नवचैतन्याने भरून जातो. आल्हादीत होतो; "पिक टवटवीत तर शेतकरी टवटवीत" असे समीकरण बनते. दुसरी बाब सुकलेले नाले, ओढे पुन्हा खळखळाट सुरू करतात.पशु पक्षी हर्षित, तरू हर्षित, वेली हर्षमान म्हणजेच काय तर धरा हर्षित. हर्षित मनाने आणि पुन्हा जोमाने सर्व आपापल्या कामाला नव्या हुरूपाने सुरुवात करतात. एका पावसाने बळीराजाला दुप्पट-तिप्पट बळ प्राप्त होते. शेतकरी जेव्हा पिकावर दृष्टी टाकतो तेव्हा कष्ट, झालेला त्रास सर्व काही गौन होऊन मनी निसर्ग देवतेचे आभार मानतो.
एखादे वेळी त्याला शेतात राबताना पावसाचा सामना करावा लागतो. पावसाबरोबर जेव्हा विजा होतात तेव्हा तो निवारा म्हणून नाईलाजाने एखाद्या झाडाचा आसरा घेतो. तोच योगायोगाने त्याच झाडावर विज कोसळते आणि त्याचा दुर्दैवी अंत होतो. त्याचे स्वप्न भंगून जाते. तो एकटा जरी गेला असला तरी संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. घराचा कर्ता मालक गेल्यावर त्या कुटुंबाची काय दुर्गती होते हे ज्याने भोगले त्यालाच ज्ञात असते. हसता खेळता संसार उध्वस्त होतो. जो पाऊस त्याला वरदान असतो तोच कधीकधी त्याला एकदम शाप ठरतो. ना त्याला कोणती पेन्शन, ना कुठली भविष्य निर्वाह निधी, ना जीवनाविमा. रानातला पाऊस म्हणजे वरदान असे असले तरी हाच रानातला पाऊस त्याच्यासाठी विनाशाचे कारण सुद्धा कधी कधी ठरत असते. अन्नधान्य पिकविता-पिकविता अन्नदाता स्वतःचा जीव सुद्धा कधी कधी गमावत असतो, अन्नधान्य पिकवण्याचे मार्ग केवळ मातीतून, शेतकऱ्याच्या घामातूनच नव्हे तर कधी शेतकऱ्याचा चितेतूनही जातो. ज्यादिवशी सामान्य जनतेला इतके कळेल त्यादिवशी अन्नदात्या शेतकरी बापासमोर सारेच नतमस्तक होतील, इतके नक्की!
- सतीश मानकर
आर्वी छोटी जि. वर्धा
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने