नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरिय लेखन स्पर्धेसाठी
बाई गं धीट हो !!
कवितेचे रसग्रहण
कवी प्रा. डॉ.भास्कर बडे
सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कवी, लेखक डॉ. प्रा. भास्कर बडे सर यांची कविता "बाई गं धीट हो" अन्याय अत्याचाराच्या विळख्यात अडकलेल्या स्त्री जीवनावर आधारित आहे. स्त्री म्हटलं की चूल मुल आणि संसार आणि कुठेही स्वतंत्र नसणे. झालेला अत्याचार मूकपणाने सहन करणे. संस्कृती, मर्यादा, शील, वंश सांभाळता सांभाळता आता ती बाहेर पडत आहे. सर्व क्षेत्रात तिने आपली मक्तेदारी निर्माण केली आहे. आता काळ बदलला परिवर्तन झाले पण ती एक दुय्यम स्थान असलेली उपभोगाची वस्तू म्हणूनच समाज पद्धती तिला गौण समजले जाते. आज वर्तमानपत्र उघडले, टीव्ही सुरू केला की स्त्री अत्याचार, बलात्काराच्या घटनांनीच सुरुवात होते. अनेक पीडिता त्यात बळी जात आहेत. अरुणा, आसिफा, निर्भया, मनीषा अशा कितीतरी कोमल कळ्या चिरडल्या गेलेल्या आहेत.
डोळ्यात पाणी
गुडघ्यात डोकं घालून
मुक आवाजात
रडायचे दिवस संपलेत
बाई गं धीट हो.....
कवीने आपल्या कवितेतून बाईने धीट व्हावे अशी सकारात्मक आशा व्यक्त केली आहे. कुणासही घाबरू नये. पुरुषी अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात आवाज दाबून मूकपणाने रडायचे दिवस संपले आहेत. झालेल्या अन्यायावर आवाज आवाज उठवायचा आहे.
घरासाठी उंबऱ्या बाहेर पाय टाक
चालता चालता बळ येईल
उगाच करंगळी
पकडण्याचे दिवस संपलेत
बाई गं धीट हो.........
घरासाठी अर्थार्जन, बाहेर पडताना कुणासही घाबरू नको स्वावलंबी बनून जगं. कुणाच्या आधाराच्या साह्याने चालवण्याची तुला गरज वाटू देऊ नको.
बचत कर हो धट
बदलून जाईल आयुष्याचा पट
सावकाराच्या नावानं
बोट मोडण्याचे दिवस संपलेत
बाई गं धीट हो........
इथे महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देताना कभी म्हणतात हातात पैसा असला की कुणालाही बोलण्याची संधी मिळत नाही. त्यासाठी तू पैसा जवळ ठेव. तुझे आयुष्य बदलून जाईल कर्ज पाण्यासाठी कुणाकडेही जाण्याची गरज भासणार नाही. दोष देण्याची गरज पडणार नाही. हिमतीने पुढे जा.
रानात जाताना ईळा घे
ऑफिसला जाताना सुरा घे
वाचवा वाचवा
म्हणायचे दिवस संपलेत
बाई गं धीट हो......
ते आजच्या महिलांना संदेश देतात की तुझ्या संरक्षणासाठी कुठेही जाताना शस्त्र हाती घे स्वतःचे रक्षण कर. तुला वाचवायला कोणी येणार नाही. तू सबल सक्षम बनून अत्याचार करणाऱ्या वर वार कर.
आठव जिजाऊ लक्ष्मीला
सावित्री अन मदर टेरेसा ला
महिला आंदोलन
चिरडण्याचे दिवस संपलेत
बाई गं धीट हो......
आपल्या कर्तबगार, पराक्रमी, शूरवीर महिलांचा संघर्ष आणि इतिहास आठवून वाटचाल कर. महिलांच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचे दिवस संपलेत.
आजच्या परिस्थितीत महिला अत्याचाराच्या बाबतीत किती बोलकी कविता आहे ही !! सरांच्या कवितेची शैली, साधी-सोपी, सरळ व चटकन अर्थ समजणारी "प्रासादिक" स्वरूपाची सुबोध काव्य रचना आहे. काव्याच्या ठिकाणी "ओज" ह्या काव्य गुणांचा समावेश आहे. भाषेतील आवेश मनाला उत्तेजना, जोश देणारा आहे. वर्तन बदल घडवून आणणारा आहे.
सौ. रजनी मदन ताजने डहाणू.
“ रजनीगंधा” लोणी पाडा, डहाणू रोड
तालुका - डहाणू जिल्हा - पालघर,
मोबाईल क्रमांक - 9423358295
प्रतिक्रिया
बाई गं धीट हो !! धीर देणारी
बाई गं धीट हो !! धीर देणारी कविता
सार्थ शब्दात रसग्रहण... अप्रतिम
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने