नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
'ती, मी आणि दोन आरसे...'
-रावसाहेब जाधव
तापलेलं ऊन. झाडांच्या बुडाजवळ गोळा झालेल्या सावल्या. उन्हाच्या नजरेपासून वाचण्यासाठी घरातील साऱ्यांनीच नेहमीप्रमाणे घरामागच्या डेरेदार आंब्याची सावली गाठलेली. त्यांच्या सोबत बुडाशी बांधून ठेवलेल्या व रवंथ करून कंटाळलेल्या गाई-बैलांचे आळसावलेले डोळे. लहानग्यांचे बाभळीच्या काट्यांत रुतवलेल्या पानांच्या भिंगऱ्या फिरवण्याचे उद्योग. त्याच सावलीत. दर उन्हाळ्याप्रमाणे.
मी मात्र घरापुढल्या नुकतंच बाळसं सोडू पाहणाऱ्या झाडाच्या बुडाजवळ खाट टाकून मोबाईलच्या स्क्रीनवर बोट फिरवून जागतिक परिस्थितीचा आढावा घेत लोकांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देत आभासी जगात सावली शोधत होतो; झाडाच्या बुडाशी गोळा झालेल्या लहानग्या सावलीत; एकटेपणात एकांत शोधत.
तशातच स्क्रीनच्या गरमपणामुळे बोटाचं टोक आता स्क्रीनचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करू लागले होते आणि तरीही मी आणखी काही काळ बोटाने कळ काढावी म्हणून बोटाला गळ घालत, स्क्रीन पेटती ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर डोळेही थकले आणि घामेजल्या अंगाला तापलेली झुळूक गोंजारून गेली तसं खाटेवर अंग टाकावं असा विचार मनात आला. मांडी मोडून उठून उभा राहिलो. शेजारी अंगाचं मुटकुळं करून पडलेल्या वासराच्या अंगावरून हात फिरवला. त्यानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. अंथरलेलं बाडदान नीट सावरून खाट झाडाच्या बुडाला ओढली. हातातला मोबाईल उशाच्या बाजूला बाडदाना खाली सरकवला. अंग टाकण्याआधी झाडाच्या फांद्या न्याहाळू लागलो. ऊन झरू नये म्हणून काळजी घेणारी पाने एकमेकांत गुंतून वाऱ्याची झुळूक सोसत असल्याचे दिसले. फांदीच्या बेचक्यात कावळ्याचा खोपा. आजच दिसला. आधी असेलही तो तिथं कदाचित पण आपलं लक्ष तिकडं गेलं नसावं. तशी गरजही वाटली नसावी. पण आता लक्ष गेलंच आहे तर, उगाचच खोप्याच्या काड्क्यांच्या आकाराचे निरीक्षण करण्याची इच्छा मनात प्रबळ झाली आणि तितक्यात पाठीमागून आवाज आला.
“दादा, आरसा घ्याचा का? कंगवा फ्फीरी ये...”
उगाचंच स्वत:च्या टकलावर हात फिरवत मनात हसलो. मागं वळून पाहिलं. सुरकुतल्या काळसर साडीत एक स्री आपल्या नागड्या तान्हुल्याला कडेवर घेऊन उभी. डोक्यावर पाटी. पाटीच्या काठावरून लोंबकळणारे काही वस्तूंचे अवयव. डाव्या काखेत पकडून ठेवलेल्या तान्हुल्याचा चेहरा, नाक, डोळे उजव्या हातात आपलाच पदर धरून पुसत होती ती. हात न लावताही पाटी स्थिर होती तिच्या डोक्यावर. पाटी तोलणारं तिचं डोकेही स्थिर होतं न हलणाऱ्या उन्हासारखं. आरसे, बांगड्या, खेळणी यासारख्या नाजूक वस्तू असूनही ती पाटी हातांच्या आधाराशिवाय डोक्यावर स्थिर राहू शकण्याची खात्री ती स्वत:ला सहजच देत असावी; असं वाटलं.
“कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय.” मी स्वत:चं केस गमावलेलं डोकं खाजवू लागलो आणि अशा प्रकारच्या स्रिया दिसण्याची ठिकाण झरझर डोळ्यांपुढून सरकू लागली. अख्खा आठवडे बाजार डोक्यात भरू लागला. गर्दी, गोंगाट, दुकानं, भाजी पाल्यांच्या लाईनीतून विळे, खुरपे, पोळपाट, लाटणे विकणाऱ्या बाया बसत असलेल्या साथाला मन थांबलं. तिथंच कुठतरी आपलं दुकान मांडून बसलेली एक बाई दिसली. हीच ती असंल असं नाही; पण साम्य जाणवलं. क्षणात भानावर येत डोक्यावरली पाटी उतरवण्यास तिला सांगितलं तशी तिनं कडेवरील तान्हुल्याला खाली ठेवलं आणि पाटी उतरवत पाटी आणि ती सोबतच जमिनीवर टेकली. क्षणभर सावलीसुद्धा तिच्याकडं सरकल्यासारखी वाटली.
“केवढ्याला दिला?”
“पन्नासला”
“दोन दे.” क्षणाचाही विलंब न करता शब्द आपोआप बाहेर आले.
ज्या पदराने तान्हुल्याचा चेहरा पुसला त्याच पदराने ती डाव्या हातात आरसा धरून उजव्या हाताने त्यावरील धूळ पुसू लागली. पुसून झाल्यावर एक आरसा माझ्या हातात देत दुसरा आरसा पुसू लागली. तोवर मी उशाला गुंडाळून ठेवलेल्या शर्टाच्या खिशातून शंभर रुपयाची नोट काढून तिच्या पुढं धरली. दुसरा आरसा माझ्या हाती देत आपल्या छातीशी जपून ठेवलेलं पाकीट तिनं काढलं आणि हातातली नोट घेऊन पाकिटात ठेवत त्यातून एक दहाची नोट काढली. दोन कंगवे आणि ती नोट माझ्याकडं केली. मी कंगवे ताब्यात घेत दहाची ती नोट तिच्या तान्हुल्याच्या मुठीत कोंबू लागलो. त्याची पकड मात्र अजून फारशी घट्ट नसल्याचे जाणवले.
“दादा, लोकं पार धा रुपयापसून मांगाया लागात्या. तव्हा ज्यास्तीच सांगावा लाग्तं.”
“ऊन खूप आहे. शिराळ होऊ द्यायला पाहिजे होतं.”
“थोडं पानी देताव का?” अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने उन्हाच्या चटक्यांपेक्षा पाणी आवश्यक वाटत असणार तिला.
खाटाच्या माचव्याजवळ झाकून ठेवलेला पाण्याचा तांब्या तिच्या हाती देताच तिनं तो घटाघटा तोंडात रिकामा केला उरलेले दोन घोट तान्हुल्याच्या तोंडात ओतले आणि तांब्या खाली ठेवत म्हणाली.
“लई हाल व्हवून राह्यलेत दादा....हप्त्यातून चार बजार फिरायचो. पन दोन महिन्यापून एकच जागी बसूनय. पीट-मीट सरलंय. आता कसं जगावा? गावात कोन पाय ठिवू दीईना. पन आज म्हन्ल पाहावा जाऊन रानच्या वस्त्याईवर. गंज हिंडलो पन कोनच उभं करीनं. लांब व्हय म्हनत्यात. लाप्टासार्क जिनं जालंय. तुमी देवासार्खा हायेत. थोडी भाकर आसल तर देताव का?”
काहीही न बोलता मी घरात गेलो. टोपल्यात होती तेवढी भाकर आणि पातेल्यातलं कालवन एका ताटलीत घेऊन आलो. तिच्यापुढं ठेवून दिलं. तिनं तान्हुलं मांडीवर नीट सावरलं आणि अधाशासारखं मोठे मोठे घास करून गिळू लागली.
“हळूहळू खा.” मी तिच्या हातातला तोंडात जाणारा प्रत्येक घास बारकाईनं पाहत होतो.
“कधी सरंल हे लाकडावन?” तिचं लक्ष ना माझ्या बोलण्याकडं होतं, ना तोंडात शिरणाऱ्या घासाकडं. समोर असलेलं जेवण न खाता ती उद्याची चिंता घासागणिक गिळत असलेली दिसत होती.
“राहायला कुठंय..?”
“तिकडं गावाजवल.”
“नवरा काय करतो?”
“सुऱ्या-चाकुला धार लावतो. पन आता पालातच पडून ये. सार्क ढोसून येतो.”
“त्याला कुठून मिळते? आता तर सारंच बंदये.”
“काय मायत?” तिच्या दबकत बोलण्यात मनात तुंबलेल्या जागा अजून ती वाहती करू शकत नसल्याचं जाणवत होतं.
“लय कालजी लागून राह्यालीय दादा.”
“थोडीशी थांब.” असं म्हणून घरात गेलो. एका पिशवी शोधली. पिठाच्या डब्ब्यातून होतं तेव्हढं शेरेक पीठ तिच्यात ओतलं. पिशवी तिच्या हातात दिली. तिनं कोणतीच प्रतिक्रिया न देता ती पिशवी पाटीत मध्यभागी ठेवली. पाटी डोक्यावर ठेवत उठून उभी राहिली.
“ऊन उतरू दे. उगच पोरगं आजारी-बिजारी पडंल.”
“कोसभर जावस्तवर व्हवून जाईल शिराल. आजूक एक-दोन गिराइक सापडाय हावं. उन्हाचंच घरी आसतंय.” असं म्हणत खाली वाकत तान्हुल्याचा एक हात पकडून झटका देत थेट कडेवर ठेवत सरळ उभी राहिली आणि उन्हाच्या उरावर वजनदार पाय रूतवत निघून गेली. तिची पाठमोरी आकृती उन्हात विरून जाईपर्यंत मी एकटक पाहत राहिलो; सावलीत बसून.
आताशा मलाही बसून बसून थकवा जाणवू लागला होता. डोळ्यांवर पापण्या ओढत खाटवर कलांडलो. झोप लागली.
कसलासा गडबड गोंधळ कानावर पडला तशी जाग आली. एव्हाना सावली सरकून दूर गेली होती आणि मावळतीचे किरण अंगाशी लगट करू लागले होते.
“टोपल्यातल्या भाकरी कशाकाय गायप झाल्या? कोना खाल्ल्या? खायच्याच व्हत्या तां आधीच सांगायचं व्हतं. आता या पोरांना काय द्यायचं? पोरं काय दम मारत्यात का?” म्हातारी आई कलकल करत होती.
“माहाकं नका पाहू आत्या. मी कशाला खाऊ?” भाऊजय.
“खायला नही म्हन्ल का कोन्हि? थापून ठीवायचं पुना.”
“आत्या, डब्ब्यातलं पीट बी गायप झालंय.” सौ.
“आता काय पीट बी म्याच खाल्ल्यं?” भावजय.
“दार बी उघडंच व्हतं.” मुलगी.
“हा व्हता ना पुढं झोपेल. याच्या जवळून एकाधं घर बी धुवून नेईल, तरी याला जाग नय यायची.” आई.
“पयले दळण दळून आनावा लागल आत्या. संध्याकाळी लाईट बी जाईल.” सौ.
मी उठलो. तोंड, हात, पाय धुतले. कपडे बदलले. तोपर्यंत भावजयनं दळण घोळून गोणीत ओतून पडवीत ठेवलं. मी गोणी उचलली. गाडीवर ठेवली.
“दोन पायल्या ह्ये.” सौ.
गाडी चालू केली आणि गावाच्या दिशेने निघून गेलो, लाईट जायच्या आत गिरणीपर्यंत दळण पोहचवणं आवश्यक होतं म्हणून; पण मन मात्र मागंच राहून गेलं झाडाच्या बुडाशी ठेवलेल्या त्या दोन आरशांजवळ. त्यांच्याकडं कोणाचंच लक्ष गेलं नसावं. निदान अजून तरी...
...........
प्रतिक्रिया
खूपच छान सर.वास्तव परिस्थिती
खूपच छान सर.वास्तव परिस्थिती कथेत मांडली
धन्यवाद!
धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने