नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हुईल कायतरी !!
सकाळचे साडे पाच वाजले. दूर मंदिरावरच्या लाउडस्पीकर वरून उठी उठी गोपाळा चे सूर आसमंतामध्ये हळूहळू तरंगत होते. कोंबड्याची बांग आणि पक्षांचा किलबिलाट यांच्या साक्षीने पूर्व दिशेला तांबडे फुटायला सुरवात झाली होती. अंथरुणात उठून बसलेल्या श्रीपतीने हाताचा तळवा तोंडावरून फिरवला आणि तुळई वर लावलेल्या गणपतीच्या तसबीरीला हात जोडले अन तो उठला. चादरीची घडी घालून त्याने कोनाड्यात ठेवली आणि चटई कॉटखाली ढकलली आणि तो अंगणात आला. त्याची बायको रखमा अंगणात शेणकाल्याचा सडा घालत होती.
" रखमे च्या टाक वाईच तंवर म्या गोठ्यातल शानमुत काढतु. चल आटीप बिगि बिगी"
रखमाकडे बघत तो बोलला आणि कोपऱ्यातला खराटा उचलून गोठ्यात शिरला. रखमान शेणकाल्यातला हात अंगणातल्या हौदात धुतला आणि ती चहा टाकायला माजघर ओलांडून स्वयंपाकघराकडे गेली.
गोठ्यात इन मीन तीन जनावरं. पण शेणामूताचा नुसता राडा झालेला.
" आरं हाईके, रेडाक है हिच्या आईचं ढोपार हिच्या उचील की पाय, सर की तिकड"
श्रीपती जनावरांना ढकलून ढकलून खोऱ्याने त्यांच्या पायातलं शेण पाटीत भरत होता. भरलेली पाटी त्यानं उचलली आणि शेजारीच उकरड्यामध्ये रिकामी केली. हौदातून बादलीत पाणी काढल आणि त्यानं सगळा गोठा अगदी स्वच्छ धुवून काढला. तेवढ्यात स्वयंपाकघरातून हाक ऐकू आली म्हणून तो हात पाय स्वच्छ धुवून आत स्वयंपाकघरात गेला.
रखमा न चुलीतली लाकडं थोडी बाहेर ओढली आणि चुलीवरच चहाच आधण उकळलेल बघून सांडशीने पातेलं उचलले आणि ती चहा गाळायला लागली. श्रीपती आत आला त्यानं पायांनच शेजारचं गोणपाटाच पोतं पुढे ओढलं आणि तो चुलीच्या जवळच फतकल मारून बसला.
" आग झालाय का नाय च्या? अजून वैरण आणायला जायाचं हाय शेतात दे की लवकर "
असं म्हणून स्टीलच्या पेल्यात गाळलेला तो चहा त्यान स्वतःनच पुढे ओढला. रखमीन गाळण्यात हात दाबून स्वतासाठी अर्धा पेला चहा घेतला आणि ती श्रीपतीला म्हणाली,
व्हय व त्यो सोसायटीचा शिपाई आल्ल्ता न्हवं रातच्याला. आज काय सोसायटी ची तारीख हाय काय रीन फेडायची ? "
" व्हय गेल्या वरसाला नाय का आपण ते खताला आन पाइप्लाय्णीला घेतल्याल. तेच्या बद्दल आला हुता"
"मग व काय ठरीवलय आता कूटन आणायचं पैक? ? "
श्रीपती हातातला स्टीलचा ग्लास हातातच फिरवत राहिला. त्याच्या मौनातच रखमा काय समजायचे समजून गेली.
" बर हुईल कायतरी. उठा वैरण आनाया जाताय न्हवं. जित्राब वरडाय लागल्यात"
एक दिर्घ उसासा सोडून श्रीपती उठला. माजघरातला कासरा हातात घेतला अन पायात झिजलेली कोल्हापुरी सरकवून तो शेताच्या वाटेला लागला. रखमाने देवापुढे दिवा लावला. कर्जाबद्दल मौनातून नवऱ्याने दिलेले उत्तर आणि माजघरातून त्यानं उचललेला कासरा. तिच्या काळजात एकदम चर्र झालं. पळतच तिने माजघर पडवी अंगण ओलांडून बाहेर रस्त्यावर धाव घेतली. शांत पावलांनी श्रीपती शेताच्या वाटेवरती चालत होता. तिनं तिथूनच हाळी दिली
"कारभारीss अव कारभारी sss"
श्रीपतीन मागं वळून पाहिलं धापा टाकत रखमा उभी होती.
"का ग रखमे काय राहिल? '
" धनी अव त्यो कासरा घेवून कुटं चाल्लायसा? '
श्रीपती गोंधळून तिच्याकडे बघायला लागला आणि वैतागून बोलला,
"आगे तुला बोल्लू व्हतु नव्हं वैरण आणायला शेतात जातूय म्हणून. ध्यान कुटं असतंय हां "
तिच्या थोडा जिवात जीव आला. स्वताच्या नाही त्या विचारांचे तिला हसूच आलं तरी पण धीर एकवटून ती बोलली,
" बाकी त्या सोसायटीचा काय निस्ता इचार करत बसू नगासा. हुईल कायतरी येवस्था. वैरण घ्या अन लगोलगी या घरला "
श्रीपती ने एकदा तिच्या डोळ्यात बघितलं आणि जे समजले ते न दाखवता तो शेताच्या वाटेला लागला.
श्रीपती शेतात पोहोचला. दुष्काळामुळं शेताची पार रयाच गेलेली. अर्ध्या गुण्ठ्यात वैरणीपुरता मका उभा होता बाकी सगळं शेत माळरानासारख तण उगवून वाळून गेलेले. श्रीपतीने तिथेच पहिल्या सरीत मातीत घुसवून ठेवलेला कोयता काढला. आणि तो मक्याची वैरण कापायला लागला. वैरण कापता कापता त्याला काल रात्री आलेला सोसायटीचा शिपाईच डोळ्यासमोर दिसायला लागला.
" हे बघ शिरपा सोसायटी च्या मीटिंग मध्ये निर्णय झालाय. तुझं कर्ज थकीत कर्जात गेलय. सोसायटीन लई वाट बघितली तु व्याज पण भरलेले नाहीस. उद्या जर कर्ज नाही भरलेस तर वसुली पथक घरी पाठवणार आहेत बघ काय करायचे ते ठरव"
कापता कापता श्रीपती थांबला एकदा विळ्याकडे पाहिलं एका निश्चयाने त्याने विळा गळ्यापर्यंत नेला.
" उगाच निस्ता इचार करत बसू नगासा वैरण घ्या आन घरी या "
धापा टाकणारी बायको डोळ्यासमोर आली त्यानं गळ्यापर्यंत आणलेला विळा खाली सरीत टाकला. तोडलेल्या मक्याची ताटं गोळा केली. कासरा घेवून त्याचा घट्ट बिंडा बांधला. अन बांधालाच आंब्याच्या गर्द सावलीत तो बसून राहिला. काय करायच ? पैशाची व्यवस्था कशी करायची ? कर्जाच्या पैशात केलेली पाईपलाईन त्याच्या समोर कोरडी ठणठणीत पडली होती. शेत करपून गेलेलं विहिरीला पाणी नव्हतं पाणी फक्त त्याच्या डोळ्यातन वहात होतं. उद्या वसुली पथक जर घरी आलं तर ? विचारातच नकळत त्याने बिंडा बांधलेला कासरा सोडायला सुरवात केली. कासऱ्याच एक टोक त्याने झाडाच्या फांदीवर फेकलं. आणि हळू हळू तो आंब्याच्या फांदीवर चढला. खालून फेकलेल कासऱ्याच टोक त्यानं हातात घेतलं आणि फांदीभोवती घट्ट गाठ बांधली. कासऱ्याच दुसरं टोक हातात धरून तो बराच वेळ फांदीवर बसून राहिला.
"जनावरं वरडायला लागल्यात. निस्ता इचार करत बसू नगासा. वैरण घेवून लगोलग घराकडं या "
धापा टाकणारी बायको परत एकदा डोळ्यासमोर आली. कासऱ्याच टोक हातातून निसटलं. आणि फांदीवरती लोंबकळायला लागलं. "हुईल कायतरी" बायकोचे शब्द त्याच्या डोक्यात रुंजी घालायला लागले. काय हुईल व्याज धरून सव्वा लाखाचे कर्ज झालय. खिशात दहा रुपए नाहीत. शेतात पीक नाही कसं हुईल. घरात संध्याकाळच्या भाताला तांदूळ नाहीत. उद्याच्या चहाला चहापत्ती नाही. धापा टाकत मागे पळत आलेली बायको तिच्या नजरेतली ती भीती, डोळ्यातलं पाणी आणि तरीही धीराचे तिचे शब्द "हुईल कायतरी "
कसं होणार कुठलाच मार्ग दिसत नाही. त्यानं शेतातल्या मातीचा ढेकूळ हातात घेतला. डोळ्यातलं पाणी थांबेना हाताला थरथर जाणवायला लागली. घट्ट घट्ट हाताची मूठ ..हातामध्ये काळ्या मातीचा ढेकूळ माती माती झाला. तो ताडकन उठला आणि पाईपलाईन च्या कडेकडेने विहिरीवरती पोहोचला. विहिरीत पाण्याने तळ गाठलेला. कोरड्या ठाक विहीरीमध्ये त्याच्या डोळ्यातले दोन अश्रु टपकन ओघळले. तो विहिरीच्या कठड्यावरती उभा राहिला.
"नाय रखमे माफ कर बये मला. इचार करू नगासा इचार करू नगासा म्हणून नाय थांबत ह्यो इचार. हुईल कायतरी, हुईल कायतरी हे फकस्त आपल्या मनाचं समाधान. निस्तं आशा ठिवुण रीण फिटत नाय रखमे. उद्याच्याला त्ये वसुलीच पथक येईल दारात. कोणत्या तोंडान आणि काय सांगू त्यास्णी. रखमे हरलू ग मी या दुष्काळान हरीवल बघ मला. जातू म्या घे काळजी स्वताची "
श्रीपतीने कोरड्या ठाक विहिरीत उडी मारायला पाय उचलला आणि तो उडी मारणार तेवढ्यात त्याच्या कानांवर हाळी ऐकू आली
" धनी ssss ओ धनी sss माझी आण हाय तुमास्नी मागं सरा"
श्रीपतीन मागं वळून पाहिलं. धापा टाकणारी बायको परत एकदा त्याच्या डोळ्यासमोर आली. पण यावेळी मात्र ती प्रत्यक्षात उभी होती. श्रीपती मागं फिरला आणि जवळ जवळ तिच्या समोर ढेकळातच कोसळला. त्यानं ओक्साबोक्शी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. बराच वेळ रखमा त्याच्या केसात हात फिरवत त्याला सावरत राहिली. जरा वेळाने थोडा आवेग कमी झाला रखमा बोलायला लागली
"तुमास्नी सांगितलवत नव्हं इचार करू नगासा म्हणून ? इचार करून का कुटं प्रश्न सुटत्यात ? आणि ह्यात आपला काय दोष हाय का व ? दुसकाळ काय आपल्या हातात असतु थोडाच ? तुमी राब राब राबलासा आता नाय पदरात दान पडलं तर कुणाला सांगायच ? पण म्हणून काय सगळं सपवून टाकायच तुम्ही सुटशीला पण मागं मागं राहिलेल्या आमच काय ? आमचा इचार न करताच निघालायसा ? अव दुसकाळ ही एक परीस्तीती हाय आण परिस्थिती काय एकसारखी राहती का कवा ? दिस येत्याल दिस जात्याल पण आपण असल्याल्या दीसाबरुबर जगाय नको का ? हुईल कायतरी म्हणल्याबिगर काय व्हनाराय का ? "
बराचवेळ रखमा श्रीपतीला समजावत राहिली. श्रीपतीला आपली चूक कळायला लागली. तो हात जोडून रखमाची माफी मागायला लागला. रखमा उठली तिने अंगाला लागलेली माती झटकली. आणि म्हणाली.
"चला उठा आता बारा वाजाय आलं घरला चला, दोन घास खावून घ्या आज सोसायटीत जायाचं हाय नव्हं तुमास्नी"
"आग पण काय सांगू तिथं जावून"
रखमा ने गळ्यातले मंगळसूत्र काढले आणि त्याच्या हातात ठेवले.
"हे घ्या आण इका जव्हेरी बाजारात. पाच तोळ्यांच हाय दीड लाख तर सहज येतील काळा पोत हाय माझ्या गळ्यात तेव्हडा बास हाय. घ्या आन भरा ते सोसायटीच कर्ज'"
"आग पण हे मंगळसूत्र ? ? रखमे .."
" माझ्या धन्याच्या गळ्यात त्यो कर्जाचा फास असताना म्या काय ह्यो मंगळसूत्राचा फास गळ्यात घालून मिरवू व्हय. चला लवकर उशीर हूतूया""
श्रीपती हातातल्या त्या मंगळसुत्राकडे पहातच राहिला. रखमाचा हात हातात घेवून तो एका नव्या उमेदीने घराकडे चालू लागला वाटेमध्ये विहिरीचा कठडा, फांदीला बांधलेला कासरा, मक्याच्या सरीत पडलेला विळा आणि घट्ट हातात हात धरलेली रखमा त्याला एकच गोष्ट सांगत होते .." हुईल कायतरी'
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने