Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



जगणे सुरात यावे - भाग १

लेखनप्रकार : 
आयुष्याच्या रेशीमवाटा
वाङ्मयशेती: 
आयुष्याच्या रेशीमवाटा
"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग १
जगणे सुरात यावे
 
"असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला" हे गीत कानावर पडलं की आपण सुरेल अशा तालासुरांमध्ये पद्याऐवजी गद्य तर ऐकत नाही ना, असे काहीसे वाटायला लागते. सुर आणि पद्य यांच्यामध्ये जे सुरेल नाते आहे ते नाते सुर आणि गद्य यांच्यात मेळ खात नाही असे जाणवत राहते. तालासुरात गाणे म्हणजेच संगीत नसते. अगदी वृत्तपत्रातला एखादा लेख सुद्धा चाल लावून संगीतबद्ध करता येईल पण त्यातून जो नाद निर्माण होईल तो खचित सुरमयी नसेलच. शब्दांना सुरात सजवले आणि लयीत गुंफले म्हणजे शब्दांना सुर येतोच असे नाही तर त्यासाठी शब्द सुद्धा सुरमयी व शब्दरचना ओघवती असणे अनिवार्य असते.
 
लय हा जसा संगीताचा आत्मा तद्वतच मानवी आयुष्याचाही आत्मा आहे. जीवनात लय नसेल तर आयुष्य बेसूर होऊन जाते. संगीतातच किंवा संगीतामध्येच नादमाधुर्य तयार होते, असेही नाही. मुळात स्वतः शब्दच गद्य किंवा पद्य असतात. तसेच एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह देखील स्वतः लयीची निर्मिती करत असतो. वाक्य सहज उच्चारताच आपोआप लयीत येऊन नादमय माधुर्य तयार होत असते. कोमल शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला मृदू, मृदुभाषी, सोज्वळ व सात्त्विक संवादाचे स्वरूप येते. याउलट कठोर, जहाल, भडक शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला भेसूर, बीभत्स, कर्कश व शिवराळ संवादाचे स्वरूप येते. त्यामुळे आयुष्याचा प्रवाह आनंदमयी व आल्हाददायी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपले उठणे, आपले चालणे, आपले बोलणे, आपले वागणे, सारे काही लयबद्धंच असायला हवे.
 
खरंतर मनुष्यच नव्हे तर साऱ्या सजीव सृष्टीचा स्वभाव निसर्गतः लयबद्धतेला प्राधान्य देणाराच असतो. वाघाची डरकाळी असो की गायीचे हंबरणे, पाखरांची किलबिल असो की कोकिळेची कुहूकुहू सारे कसे लयबद्धच असते. जंगलातील रातकिड्यांचा आवाज देखील नादब्रह्माची निसर्गतः निर्मिती करणाराच असतो. इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन बघितले तर आपल्याला सहजपणे दिसतेय की निर्जीवामध्येही लयबद्धतेला प्राधान्य असतेच. झऱ्यांचे झुळझुळ वाहणे व त्यातून उत्पन्न होणारा आवाज हा नादब्रह्माचा आविष्कारच असतो.
 
अणुरेणू सहित साऱ्या विश्वाचा पसारा जर लयबद्धतेशी, नादमाधुर्याशी जवळीक साधणारा असेल तर मग नेमका मनुष्यप्राण्यामध्येच गद्यप्रकार किंवा गद्यस्वभाव आला तरी कुठून? जन्माला येताना माणसाचे रडणे लयीमध्येच असते आणि नादमाधुर्य निर्माण करणारेच असते. याचाच दुसरा अर्थ असा की, मनुष्याची मूळ अभिव्यक्ती लयबद्धतेशी इमान राखणारीच असते; पण पुढे मनुष्य जसा वयाने मोठा होत जातो तसतसी त्याची जडणघडण निसर्गदत्त अभिव्यक्तीशी फारकत घेत जाते. त्याच्यावर लादले जाणारे अनावश्यक कृत्रिम संस्कार, बेगड्या सभ्यतेच्या पायात लटकलेल्या बेड्या आणि संस्कारक्षम वर्तणुकीचे निकष यामुळे मनुष्य आपल्या मूळ स्वभावापासून दूर जातो व जन्मतः मिळालेली लय गमावून बसतो. लोक काय म्हणतील या भीतीने त्याचे गुणगुणणे बंद होते, लोक हसतील या भीतीने चालताना त्याचे पदलालित्य नाहीसे होते, आपण फार सभ्य आहोत असे इतरांना दाखविण्याच्या नादात त्याचे बोलणे पूर्णतः गद्य होऊन जाते. कालांतराने मनुष्य हळूहळू पूर्णतः बदलून जातो; इतका गद्य होऊन जातो की त्याला आपल्या इवल्याश्या बाळाशी पद्यमय गुंजारव करायला सुद्धा त्याची जीभ धजावत नाही, कारण आपल्याला आपले सभ्यत्व धोक्यात येण्याची भीती वाटत असते आणि इथेच मनुष्य आपल्या आयुष्याची लय हरवून बसतो. कर्तव्यनिष्ठ, समाजनिष्ठ जीवन जगताना आपण आपल्या आयुष्यातील आनंददायी जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगण्यापासून फार दूर गेलेलो आहोत, इतके सुद्धा मग स्वतःच्या लक्षात येत नाही.
 
समाजनिष्ठ जीवन जगणे आणि आनंदनिष्ठ जीवन जगणे यामध्ये फार तफावत आहे. आनंददायी, चैतन्यदायी जीवन जगण्यासाठी माणसाने स्वतःला लयीत आणलं पाहिजे.
 
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान व्हावे
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात यावे
 
आयुष्य लयीत आणण्यासाठी मनसोक्त हसलं पाहिजे, मनसोक्त रडलं पाहिजे, मनसोक्त खेळलं पाहिजे, मनसोक्त गायलं पाहिजे, मनसोक्त नाचलं पाहिजे, मनसोक्त उडलं-बागडलं पाहिजे; इतकेच नव्हे तर कधी कधी मनसोक्त कुदलंही पाहिजे. यातच आनंददायी उल्हसित जीवन जगण्याच्या प्रेरणा सामावलेल्या आहेत.
 
- गंगाधर मुटे
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १ - दि. २५ जानेवारी, २०२० - जगणं सुरात यावं
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
Share