Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत

अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :२८ फ़ेब्रुवारेी २०१५

       देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी विचार मांडले.

shetkari sahity sanmelan

गझलनवाज भिमराव पांचाळे व शेतकरी नमनगीताचे संगीतकार श्री सुधाकर आंबुसकर यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

shetkari sahity sanmelan

उद्घाटक डॉ. विट्ठल वाघ याचे स्वागत कैलास तवांर यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले साहित्य नगरीत शनिवारी पहिल्या अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. २८ फ़ेब्रुवारीला डॉ. विट्ठल वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी आपले भाषण छापील स्वरुपात पाठविले, त्याचे यावेळी वाचन करण्यात आले. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, विशेष अतिथी म्हणून भीमराव पांचाळे, प्रमुख पाहुणे संजय पानसे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शेषराव मोहिते, कैलास पवार, स्मिता गुरव, संजय इंगळे तिगावकर, माया पुसदेकर विराजमान होते.

shetkari sahity sanmelan


डॉ. वाघ पुढे म्हणाले, महात्मा फुलेंनंतर साहित्यात शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व संवेदनाच्या जाणिवांचा अभाव दिसून येतो. इतर वर्गापेक्षा शेतकऱ्यांची जाणीव वेगळी आहे. पावसामुळे शेती वाहून गेली, शेतकरी रडतो आहे. हे जाणून घेऊन लिहिलेले साहित्यच खरे शेतकरी साहित्य असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

shetkari sahity sanmelan

          प्रास्ताविक भाषणातून गंगाधर मुटे यांनी शेती साहित्यात वास्तववादी लेखनाचा अभाव असून जे लिहिले ते खोटे आहे. लेखणी हाती घेताना पहिले गावाचे चित्र बघावे. त्याचबरोबर प्रस्थापित साहित्यिकांकडून वास्तववादी साहित्यनिर्मिती होत नसेल तर शेतकर्‍यांनीच आता एका हातात नांगर व दुसर्‍या हाती लेखणी धरून लेखणासाठी पुढे सरसावले पाहिजे असेही मुटे म्हणाले. सरोज काशीकर म्हणाल्या, शेतकरी जोपर्यंत स्वबळावर उभा राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा आर्थिक विकास होणे शक्य नाही. जे साहित्य शेतकऱ्यांसाठी लिहिले ते वास्तववादी नाही. ते केवळ मृगजळ आहे. डोळ्यांवरील हिरवी पट्टी काढण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे, यापुढे लेखणी हे हत्यार म्हणून वापरले पाहिजे, तरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला धार येईल. यावेळी भीमराव पांचाळे व मान्यवरांची भाषणे झालीत. या संमेलनातील विचारमंथनातून शेतीचे विदारकदृष्य बदलून त्याऐवजी शेतीस नवसंजीवणी देणारे नवलेखक निर्माण व्हावेत असा आशावाद वक्त्यांनी व्यक्त केला.

shetkari sahity sanmelan

संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे छापील अध्यक्षीय भाषणाचे संमेलनात कैलास तवांर यांनी वाचन केले. या भाषणातून त्यांनी उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शरद जोशी आपल्या लेखी भाषणात म्हणाले की, दरवर्षी पावसाळा यायच्या आधी बी-बियाण्यांची जमवाजमव, खर्चासाठी सावकाराची मिनतवारी, सोसायटीतली कारस्थाने, भानगडी, पाऊस येतो की नाही याची चिंता, आल्याचा आनंद, येत नसला तर पोटात उठणारा भीतीचा गोळा, पिकावर येणाऱ्या तणांच्या आणि रोगांच्या धाडी, पीक उभे राहिल्यावर होणारा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, आग लागल्यावर घरातून निसटतांना व्हावी तशी गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वत:पुरती धडपड या किड्यांसारख्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामुग्री, पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही, अशी खंत संमलेनाध्यक्ष शरद जोशी यांनी आपल्या छापील अध्यक्षीय भाषणातून मांडली आहे. गाव सोडून गेलेली शेतकऱ्यांची मुले शहरात रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी गावाविषयी लिहिले खरे पण, शहराला काय पटेल, काय आवडेल याचाच विचार त्यात केला. याउलट ग्रामीण भागातील जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी, असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी राहिली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्य क्षेत्रात स्थानाचा जोगवा ही मंडळी मागू लागली त्यामुळे हे संमेलन मात्र एकमेकांची दु:खे सांगण्यापुरते मर्यादित न राहता संघटनेने फुलविलेल्या निखाऱ्यांवरील राख उडवून ते परत प्रज्वलित करण्याची हिंमत शेतकरी समाजात निर्माण करणारी ठरो, असा त्यांनी लिहून पाठविलेल्या अध्यक्षीय भाषणातून संदेश दिला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तर संचालन प्रा. मनीषा रिठे यांनी केले. संमेलनाला शेतकरी वर्गाची लक्षणीय उपस्थित होती. तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.

shetkari sahity sanmelan

उद्घाटन समारंभानंतर जेष्ट शेतीसाहित्यिक डॉ शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी चळवळीच्या उदयापूर्वीचे आणि नंतरचे मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद होऊन त्यात डॉ. दिलीप बिरुटे, प्रा. ज्ञानदेव राऊत, प्रा. शेख हासम यांनी सहभाग घेतला.

shetkari sahity sanmelan

आत्महत्त्येपूर्वी जळगाव जिल्ह्यातील दिनकर नारायण वराडे  या शेतकर्‍याने लिहून ठेवलेल्या पत्राचे त्याचा मुलगा रवी वराडे यांनी केलेले वाचन हा या संमेलनाचा वैषिष्ट्यपूर्ण भाग ठरला. आत्महत्त्येपूर्वी लिहून ठेवलेल्या त्या पत्रात वराडे म्हणतात की, खर्चा करिता गावातून कर्ज उचलले गेले. कांदा भावामुळे गावातील जास्त व्याजाचे पैसे द्यावे लागले. सोसायटीचे व्याज सुद्धा आजपर्यंत भरू शकलो नाही. घर खर्च व मुलाचे शिक्षण सुटू शकले नाही. या वर्षी तर कांदे पिका मुळे कर्जबाजारी झालो. मुलीला स्वतःच्या अंगावरील दागिने माझ्या घरी येऊन मोडावे लागले. ते पण पैसे मी तिला परत करू शकलो नाही, कारण तिच्या लहान मुलास कपडे घेण्यास सुद्धा माझ्या जवळ पैसे नव्हते. कर्जाचा बोजा डोक्यावर, जमीन पडलेली, पेरणीचे दिवस जवळ आलेले. घरखर्च आणि घरातील व्यक्तींच्या मूलभूत गरजा जर घरचालक पूर्ण करू शकला नाही तर, तो दिशाहीन बनतो आणि त्याला कोणताच मार्ग दिसत नाही आणि मरणच त्याला सर्व दु:खापासून मुक्त करू शकते. म्हणूनच तो आत्महत्या हा मार्ग पत्करतो. म्हणून मी सुद्धा आत्महत्या करीत आहे. मेल्या नंतर सर्व दु:खा पासून तर मला मुक्ती मिळेल परंतू माझ्या मरणोप्रांत शासनाने जरी माझे वरील कर्ज माफ केले तरी मी किंवा माझ्यासारखे मेलेले शेतकरी राजे, बळी राजे परत येणार नाहीत. शेतीविषयी शासकीय उदासिनता अशीच कायम राहिली तर एक दिवस शेतकरी आतंकवादी बनतील व शेतकर्‍याचे नांगर दाबणारे ताकदवार हात मंत्र्यांचे गळे दाबतील. त्यामुळे राज्यकर्त्यांनी वेळीच सावध होऊन शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. पत्र वाचन होत असताना सभागृह सुन्न होऊन अनेकांचे डोळे पानावले होते.
पत्र वाचनानंतर त्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेत अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड सुभाष खंडागळे, अनिल घनवट, कडुआप्पा पाटील, मधुसुदन हरणे यांनी भाग घेतला.

shetkari sahity sanmelan

देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे ८०० प्रतिनिधी हजर होते.

shetkari sahity sanmelan

सायंकाळी ६ वाजता शैलजा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ’शेतकरी स्त्री आणि साहित्यविश्व’ या परिसंवादात प्रज्ञा बापट, स्मिता गुरव व गीता खांडेभराड यांनी भाग घेतला.

shetkari sahity sanmelan

          रात्री ७.३० वाजता गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अध्यक्षतेखाली ’शेतकरी गझल मुशायरा’ संपन्न झाला. त्यात मारोती पांडूरंग मानेमोड (नांदेड), निलेश कवडे (अकोला), राज पठाण (अंबाजोगाई), कमलाकर देसले (नाशिक) नजीम खान, प्रमोद चोबितकर (बुलडाणा), मसुद पटेल, गजानन वाघमारे, विजय पाटील (धुळे), नितीन देशमुख, लक्ष्मण जेवणे, गिरिश खारकर, पवन नालट (अमरावती), सुमती वानखेडे, विजय राऊत, विनोद मोरांडे (नागपूर), रवी धारणे (चंद्रपूर), अनंत नांदुरकर, ललित सोनोने, दिलीप गायकवाड, गंगाधर मुटे (वर्धा), प्रवीण हटकर (अकोला) या गझलकारांनी भाग घेऊन शेत्यकर्‍यांच्या कथा व व्यथेला वाचा फ़ोडणार्‍या गझला सादर केल्याने मुशायरा वेगळाच बाज व बहुरंगी कैफ़ चढवणारा ठरला. सुत्र संचालन विद्यानंद हाडके व प्रफ़ुल्ल भुजाडे यांनी केले.

shetkari sahity sanmelan

रात्री नवनाथ पवार लिखित ’उगवला नारायण’ ही एकांकिका सादर करण्यात आली. त्यात संतोष गडवे, वैशाली कुळकर्णी, किशोरी नाईक यांनी समर्थपणे भूमिका सादर केल्या तर नेपथ्य नागनाथ काजळे यांचे होते.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी सतिश दाणी, दत्ता राऊत, धोंडबा गावंडे, गणेश मुटे, किसना वरघणे, अरविंद बोरकर, संतोष लाखे, निलेश फ़ुलकर, प्रविण पोहाणे, पंकज गावंडे, सौरभ मुटे, विजय मुजबैले, रवी दांडेकर, सचिन वंजारी, चेतन डुकरे, गौरव चंदणखेडे, अक्षय मुटे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्या सर्वांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले तेव्हा उपस्थितांनी उत्स्फ़ूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला, ही उल्लेखनीय बाब ठरली.

shetkari sahity sanmelan

------------------------------------------------------------------------
Share

प्रतिक्रिया