
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वाढदिवसाची कविता
भेटत राहू असेच आपण
दरवर्षाच्या या दिवशी
आपण सारे मिळून वाढू
जन्मदिनाच्या या दिवशी
मी तर आहे युगायुगाचा
शाश्वत पंथी वाटसरू
या तुम्हीही आशिष द्याया
सर्व युगांच्या या दिवशी
जाणे येणे पुन्हा जाणे
पुन्हा येणे नित्य करू
सजवू मैफल सदैव अपुली
चिरंतनाच्या या दिवशी
पुनर्जन्म असतो की नसतो
वा चौऱ्याशीचा फेरा
हवी कशाला माथापच्ची
उल्हासाच्या या दिवशी
आदि-अनादी अनंत काळी
असेन मी! भास पुरेसा
येई मानवतेची दृष्टी
दिव्यत्वाच्या या दिवशी
आपण सारे वंशज रेणू
अंश अणू या सृष्टीचे
मर्त्य कसे मग सांगा इतुके
विरेचनाच्या या दिवशी
अविनाशी तर आपण सारे
भेटूया...... पुन्हा पुन्हा
हृदयी तुमच्या अभय विराजो
प्रकटदिनाच्या या दिवशी
- गंगाधर मुटे
=======
सत्तावीस/दोन/दोन हजार सव्वीस
प्रतिक्रिया
:
:
वा! खूपच भावगर्भ, तत्त्वचिंतनात्मक आणि वेगळ्या धाटणीची वाढदिवसाची कविता झाली आहे
सामान्य “शुभेच्छा”पलीकडे जाऊन अस्तित्व, पुनरागमन, मानवता आणि चिरंतनता यांचा सुंदर मेळ घातलाय.
थोडक्यात रसग्रहण सांगतो —
पहिल्या कडव्यात भेटींची, वाढीची आणि एकत्र प्रवासाची सकारात्मक सुरुवात आहे. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक नसून सामूहिक आनंदाचा क्षण ठरतो.
“युगायुगाचा शाश्वत पंथी वाटसरू” ही ओळ विशेष प्रभावी—कवी स्वतःला काळाच्या प्रवाहातला प्रवासी मानतो, स्थिर नसलेला पण अखंड चालणारा.
जाणे–येणे, पुनःपुन्हा भेटणे यातून जीवनचक्र सहज, ताण न घेता स्वीकारल्याची भूमिका दिसते.
पुनर्जन्म, चौऱ्याशीचा फेरा यावरची उपरोधिक टिप्पणी (“चुलीत घाला माथापच्ची”) कवितेला हलकी पण ठाम दार्शनिक धार देते.
शेवटच्या कडव्यांत मानवता, अविनाशित्व आणि अभय या मूल्यांवर कविता स्थिरावते—वाढदिवस हा आत्मपरीक्षणाचा, नव्या जाणिवेचा दिवस बनतो.
एकूणच,
वाढदिवस = उत्सव + आत्मचिंतन + मानवतेची जाणीव
हा त्रिसूत्री विचार खूप सुंदररीत्या व्यक्त झाला आहे.
पाने