Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




!! कोरडे नक्षत्र ‌, दुखरा पाऊस !!

लेखनविभाग :: 
कथा
लेखनाचा विषय: 
शेती आणि शेतकरी

!! कोरडे नक्षत्र ‌, दुखरा पाऊस !!

रायबाला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. मृग वेळेवर बरसला. पावसाचे आगमन थोडक्यात झाले. शेतकऱ्याच्या मनामनात अंकुर फुटले. उसणवार करत ,महागडे बी बियाणे आणून पेर झाली .बाजरी,कपाशी ,तूर, उडीद ,मका ,प्रत्येक राना रानात चार बोटे उगवली गेली. रायबाचं मन उल्लसित झाले. काहीतरी दाणापाणी हाती लागेल .कारभारणीचे ठिगळाचे पातळ बघवत नाही.साडी, पातळ घेता येईल. मुलींना सणासुदीच्या निमित्ताने बोलवता येईल. असे मनसुबे त्याच्या मनात तयार होत होते. नंतरचे आर्दा, पुनर्वसू ,मघा ,पूर्वा पावसाची ही नक्षत्र कोरडी गेली . दावणीला दुभत्या गाई ,बैल जोडी, वासरे ,होती. विहिरीला पाणी होतं तोपर्यंत घास, कडवळ, मका, गवत, त्यांना टाकले जायचे. पण आता खायला काय घालायचं ?हा यक्ष प्रश्न बनला.वैरणीचे भाव आकाशाला भिडले. कधीतरी सातारला नोकरीला असलेल्या हनुमंताची पाचशे रुपयाची मनीऑर्डर यायची. त्या पैशाची वैरण विकत घ्यावी तर,फार तर दोन दिवस टाकता येईल. बाकी साऱ्या हंगामात काय करायचे? हे त्याला सुधरत नव्हते. घरातील कोणताही माणूस गोठ्याच्या समोरून चालला की सारी जनावरे उठून उभे राहायची. कोणी काय खायला टाकतो की काय? असे त्यांना वाटत राहायचे. पारू मात्र घरातील कोणत्याही गोष्टीचं भांडवल न करता आणि अडचणीला तोंड देत होती. जवळ येताच ती रायबाला म्हणाली 'कारभारी, थोडा.. भाकर तुकडा.. खाऊन घ्या बरं '...
आपल्या घरात मीठ मिरचीची वाणवा, धान्य, कडधान्य शिल्लक नाही .तरी कारभारीन हे सारे दिव्य विना तक्रार पार पाडत असते. या साऱ्या परिस्थितीत तिला काय वाटत असेल? असा विचार रायबाच्या मनात आला. तसा रायबा म्हणाला 'पारू, अगं पाऊस काही बरसेना. देवाला आपली किव येईना. पहिली पेर वायला गेली. जनावरांची पोटं पाठीला चिकटली. मनाची उलघाल होते गं.अशाही परिस्थितीत, तू विनातर्कार संसार रेटत असते. काय म्हणावं तुझ्या शहाणपणाला?'....
'बरं, बरं ते जाऊ द्या. पाऊस हा फक्त आपल्या शेतात नाही. आणि सर्वत्र आहे? असं नव्हे. साऱ्या समाजाचे दुःख आहे. पुढची सारी नक्षत्र बरसतील.आपण आशा सोडायची नाही .गुमानपणे भाकरी खावा.'.. डोळ्यातील अश्रू दिसू न देता ती म्हणाली. तिने फडक्यातील भाकरी, थाळीत कुस्करल्या .त्यावर गुळाचा खडा , दूध टाकले.हा काला तिने रायबाला खायला दिला .तोंडी लावण्यासाठी लोणच्याची फोड दिली. पडत्या दिवसातील तिचा शहाणपणा पाहून तो भारवला होता.
रायबाचं जेवण संपत आले. तशी पारू त्याला म्हणाली ' उद्या राखी पौर्णिमा आहे. माझा भाऊ अकोल्याहून येणार आहे.' त्यावर रायबा म्हणाला 'शेजारी पाजारी पैशाची उसणवार पाहतो. थोडे तांदूळ, गहू, साखर, तुला आणून देतो.'
'लई जीवाची ओढाताण करून घेऊ नका. कर्ज काढून पाहुणचार घ्यायला तो काय मोठा पाहूणा आहे व्हय?'.. 'पाहुण्याला उपाशी पाठवायचं होय?' रायबा रागात म्हणाला.
' मी सांभाळून घेईल' पारू म्हणाली.
राखी पौर्णिमेच्या दिवशी पारूचा भाऊ लक्ष्मण आला. हातपाय धुऊन ओसरीवर बसला.चहापान झाले. माहेराकडील सारे हालहवाल तिने लक्ष्मण कडून विचारून घेतले. 'दुष्काळी परिस्थितीमुळे, लोक गांव सोडून, शहराकडे चालली आहेत.' हे ऐकून तिच्या तर काळजात धस्सझाले.
परातीत ज्वारी, बाजरी, बेसन पीठ प्रमाणात घेऊन, त्यात तिखट, मीठ ओवा ,टाकून पीठ मळले. तव्यावर गरमागरम थालपीठ टाकून, लक्ष्मणाला आणि रायबाला तिने जिऊ घातले. जेवणानंतर तिने लक्ष्मणला राखी बांधली. लक्ष्मणने, पाचशे रुपयाची नोट तिच्या तबकात टाकली. आणि उतरणीला लक्ष्मण अकोल्याला जाण्यासाठी निघाला. ओवाळणीत मिळालेली पाचशे रुपयाची नोट, पारूने रायबाच्या हातात देत म्हणाली 'या पैशात, येतील तेवढे ,उसाचे वाढे किंवा वैरण घेऊन यावा. उपाशी जनावरांचे हाल मला बघवत नाहीत.'
रायबा, पारूच्या बोलण्याकडे,तिच्या शहाणपणाकडे, अंतर्मुखपणे पाहत राहिला. भरून आलेले डोळे तिला दिसणार नाहीत, याची काळजी घेत राहिला. 'धनी काय विचार केला आहे तुम्ही जनावरांचा?' पारूच्या प्रश्नांने तो गांगरला. सावरत म्हणाला 'गाई, बाजारात विकायच्या नाहीत. गावातील शेटजी छगनलाल गांधीकडे गाय सोडून येतो. लई उदार माणूस आहे तो.शेतात चारा, वैरण आहे. महागडा चारा, वैरण ते जनावरांना खाऊ घालू शकतात. गाई दुभती असल्यामुळे ते पण ठेवून घेऊ शकतात. गाई उपाशी राहण्यापेक्षा त्यांनाच देऊन टाकू. म्हणजे गाईची उपासमार होणार नाही.'
नवऱ्याचे विचार तिला पटले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाय,वासरे ,छगन गांधीच्या गोठ्यात सोडून आले. पारु दररोज सवयीप्रमाणे गोग्रास घेऊन गोठ्यात गेली, तर तिथे गाय दिसली नाही. डोळे भरून आले. हुंदका दाटून आला.रात्री झोप देखील लागली नाही. पहाटे पाच वाजता उठली. सडारांगोळी करून ,आंघोळ केली. तुळशीला पाणी घालायला गेली. आणि आश्चर्यचकित झाली .काल छगन गांधीच्या शेतात सोडलेली बांडी गाय,कासरे, दावे तोडून आपल्या मूळ मालकाकडे परत आली होती. पारू तुळशीला पाणी घालत होती, तर दावे तोडून आलेली बांडी गाय, तिला चाटत होती. तिच्या मागे चालत आलेले तिचे वासरू, गाईच्या पायात घोटाळ्यात होते. पारुने गाईला घट्ट मिठी मारली. ओक्साबोक्सी रडली. जनावरांचे देखील आपल्या मूळ मालकावर कसे प्रेम असते? हे ती आज डोळे भरून पाहत होती. गाय परत आलेली पाहून, रायबा देखील चकित झाला.
उत्तरा, हस्त, चित्रा, नक्षत्र पावसाचं देणं घेऊन आले. उत्तरार्धात पावसाने चांगलाच जोम धरला. एक हंगाम गेला. पुढच्या हंगामासाठी रायबा, सारे दुःख विसरून, पावसाच्या स्वागताला पुढे सरसावला....
** ‌. ** **
श्री बाळासाहेब गोपाळराव देशमुख
१०, साहित्य लक्ष्मी, न्यू मॉडर्न कॉलिनी, गुलमोहर रोड, श्री स्वामी समर्थ मंदिर जवळ, सावेडी. अहिल्यानगर...४१४००३.
संपर्क नंबर..९४२३७९२१००.