एकाहून एक सरस कवितांचा नजराणा : शेतकरी कवी संमेलन
११वे शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक येथे अगदी अलीकडेच पार पडले. मा. गंगाधर मुटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी संघटनेचे प्रणेते श्रद्धेय शरद जोशी यांच्या कल्पनांना व शेतकऱ्यांविषयीच्या आस्थांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न म्हणजे हे संमेलन...
आतापर्यंत झालेल्या दहा संमेलनासारखेच, किंबहुना त्याहूनही अधिक सरस असे हे अकरावे साहित्य संमेलन नाशिक येथील मा. विलास शिंदे या कर्मयोग्याच्या कर्मभूमीत सह्याद्री फार्म्स येथे पार पडले.
अतिशय सुंदर रमणीय वातावरण, सुसज्जित व्यवस्था व संमेलन स्थळी तत्परतेने मदतीला असणारे सहकारी हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले ...
११वे शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे होते, तर उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. यामध्ये परिसंवाद, कवी संमेलन, गझल संमेलन, दिव्यांग व्यक्तींचा सुमधुर संगीत कार्यक्रम असे एकाहून एक सरस कार्यक्रम ऐकता आलेत, अनुभवता आलेत.
त्यापैकीच एक असणारे शेतकरी कवीसंमेलन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे होती. माझ्या सोबतच साथ देणारे दुसरे सूत्रसंचालक होते अमरावती येथील कवी खुशाल गुल्हाने. या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते मा. श्री रावसाहेब जाधव... त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माननीय गंगाधर मुटे सर पूर्णवेळ आमच्या सोबत कार्यक्रमांमध्ये हजर होते
या कवी संमेलनामध्ये एकूण 27 कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. पुणे, नाशिक, बीड, हिंगणघाट, अकोला, अकोट, पालघर, अहमदनगर, मुंबई, कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कवींनी यात दर्जेदार कविता सादर केल्यात.
शेतकरी व शेती माती हा मध्यवर्ती विषय घेऊन प्रत्येक कविता गुंफली गेलेली होती. काहींनी पोटतिडकीने शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना मांडल्या, तर काहींनी त्याच्या घरची गरिबीची परिस्थिती, सरकार करत असलेला भेदभाव, एकूणच विस्कळीत समाजरचना यावर बोट ठेवले.
अमरावती येथून आलेले सुधाकर थेटे यांनी ' पोरगी' ही कविता सादर केली, तर नागपूर येथून आलेल्या नीमा बोडखे यांनी 'खेळ तुझा न्यारा' ही कविता सादर केली.
निलेश देशमुख यांनी 'शेती अन माती' ही कविता तर अनंत मुंडे यांनी 'सोडू नको धीर' . संजय आघाव यांनी 'बाप' ही कविता सादर केली. नारायण निखाते यांनी ग्रामनाथा हा अभंग, तर संभाजीनगर येथून आलेले माणिक सोनवणे यांनी 'धूळपेरणी' ही कविता सादर केली.
प्राध्यापक शालिनी वाघ यांनी 'बाप' तर रजनी ताजने यांनी 'पोशिंदा', नितेश खरोळे यांनी 'वांझ होईल का?', तर अनिल देशपांडे यांनी 'सह्याद्रीची साथ' ही कविता सादर केली.
नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे सर्वेसर्वा मा. विलास शिंदे यांचे वर्गमित्र असलेले सुभाष कर्डक यांनी 'माझा विलास' ही कविता सादर केली.
अशा प्रकारे या रंगतदार कविसंमेलनात उत्तमोत्तम कविता सादर झाल्यात. शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना या प्रत्येक कवितेतून मांडल्या गेल्यात तर बळीराजाने भविष्यात कसे खंबीर व्हावे हे सुध्दा ऐकता आले.
या कवी संमेलनाचे महत्त्वाचे पर्व ठरले ते म्हणजे माननीय गंगाधर मुटे यांची कविता... जी सर्वत्र, सर्व दूर प्रसिद्ध आहे.. 'तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल'
भरभरून दाद देणारे रसिक प्रेक्षक, शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते व नाशिक शहरातील गणमान्य व्यक्ती सुद्धा या कवी संमेलनाचा भाग होत्या हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. रावसाहेब जाधव यांनी सुद्धा त्यांच्या शेतीमातीशी संबंधित असलेल्या दोन कविता शेती या विषयावर सादर केल्यात व एकूणच कविसंमेलनात रंगत आणली. खुशाल गुल्हाने यांनी 'गारपीट' ही कविता सादर केली. त्यासोबतच धनश्री पाटील यांनी 'ऋतुराज वसंत' ही कविता सादर करून सर्वांची दाद मिळवली..
एकूणच हे कवी संमेलन दर्जेदार, उत्तम व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. या संमेलनाची सूत्रसंचालकाची जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय मुटे सरांचे खूप खूप आभार. दरवर्षी त्यांनी अशा प्रकारचे संमेलन आयोजित करावे ही इच्छा.
धनश्री पाटील
नागपूर