आयुध. ..
रानी सुगीचा नासवा
पिक पाखरा फसवा
नांदलेली ओली मेंदी
थोडी माहेरी पाठवा
किती रापली धुपली
रान रती ती थकली
वेळ भुकेची हिरवी
कळ देऊन पोसली
दर वेळच्या खेपेला
डाव पडतो रडीचा
किती वेळा वर्षातून
गर्भ उकलु मातीचा
साता दिसातून फेरा
बुरशी हटवण्या नवा
गेली पॊताची ती रया
हर हंगामाला दवा
कूस मातीची निझूर
वांझ माऊलीची दाई
तिला नाही दयामाया
हिर्व्या लेकराची खाई
वय होण्याआधी बये
झाली कशी तु वांझुटीं
बाप भुकेचा रडतो
डोळा आसवांची दाटी
तुझा रानपाला तुला
हर खेप जडीबुट्टी
हिर्वा फ्राय् खाऊनिया
नको करु नट्टीपट्टी
पिढ्या पिढ्याची ही ठेव
तिला जपावे सावध
बळीराजा तुझ्या हाती
नाही दुसरे आयुध.
कवी. यशवंत पुलाटे , दाढ ता. राहाता जि. अहमदनगर.
मो. 9657867499.
कवी यशवंत पुलाटे हे अतिशय संवेदनशील मनाचे कवी आहे. आज स्वतःच्या पायाने त्यांना चालता येत नसले तरी अर्थपूर्ण कवितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कवींना कवितेच्या प्रवासातून मागे टाकले आहे. कवी कुसुमाग्रज यांचे ते आवडते शिष्य आहेत. आज त्यांच्या कवितेच्या धूनने प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून दररोजची अहमदनगर जिल्ह्याची सकाळ उगवते.
त्यांची आयुध नावाची कविता वाचण्यात आली अन् शेती आणि शेतकरी व शेतकऱ्यांची लक्ष्मी यांचे यथार्थ चित्र त्यांनी माझ्या डोळ्यासमोर उभे केले. व या कवीतेवर रसग्रहण करण्याचा मला मोह झाला.
आपल्या कवितेच्या पहिल्या 2 ओळीत ते म्हणतात.
रानी सुगीचा नासवा
पिक पाखरा फसवा
नांदलेली ओली मेंदी
थोडी माहेरी पाठवा
शेतकरी मन लावून पेरणी करतो. निसर्ग ही त्याला चांगली साथ देतो. पीक डोलारून भुईवर येते. आता ते पोटऱ्यात येते . कणसात दाणे भरायला सुरुवात होते. साऱ्या पक्षाला सांगावा जातो की यंदाची सुगी चांगली बहरली आहे. ते ही इतर पक्ष्यांना सांगावा सांकेतिक भाषेत देतात की आमच्या परिसरात पिक चांगली बहरलीत. तुम्ही ही या. आपण सगळे मिळून या वर्षी तृप्तीचा ढेकर देवू. तर शेतकरी ही मनात इमले बांधतो. या वर्षी सुगी चांगली होते आहे. लेकीच लग्न करू. मुले , पाहुणे रावळे, घरधनीनीला चांगले कपडे, साड्या घेवू. लग्न या पिकावर केल्यावर पाहुण्यांना विनंती करू की नांदायला गेलेल्या नव्या नवरीला थोडे दिवस माहेरी पाठवा. तीला चांगल गोडधोड करू. चांगल माहेरपण करू. अशा स्वप्नांचे इमले तो दररोज घरात चर्चा करत बांधत असतो, रचत असतो. आणि अशातच अवकाळी पावसाला सुरूवात होते आणि होत्याचे नव्हते होते. बळीराजाच्या सप्नाचा चुराडा होतो. पाखरांनी ही सर्वांना दिलेले निरोप फसवे होतात.
किती रापली धुपली
रान रती ती थकली
वेळ भुकेची हिरवी
कळ देऊन पोसली
कवी भूमातेबद्दल या ओळीत लिहितात की बळीराजाने पुढील पिकासाठी मशागतीच्या वेळी रान नांगरतांना ती वेदनेने थकून जात आहे.तसेच उन्हामुळे किती रापते आहे. उन्हाच्या झळयामुळे धूपली जात आहे. पण बीज पेरल्यानंतर मात्र हिरवा शालू नेसण्यासाठी ती स्वतः कळा देवून पिकांना पोषित असते.
दर वेळच्या खेपेला
डाव पडतो रडीचा
किती वेळा वर्षातून
गर्भ उकलु मातीचा
आपल्या कवितेच्या पुढच्या ओळीत बळीराजाच्या दैन्यावस्थेस कारणीभूत ठरणाऱ्या विविध प्रसंगाबद्दल बोलतांना कवी म्हणतात की बळीराजाच्या इतका सोशिक माणूस कुणी नाही. उत्पन्ना पेक्षा जास्तीत जास्त वेळा घाटा सोसणारा कोण असेल तर तो म्हणजे फक्त बळीराजाच आहे. कधी पावसाच्या कमतरतेमुळे, कधी अतिरिक्त पावसामुळे, कधी रोगराईमुळे , कधी वाईट हवामानामुळे जमिनीच्या बाहेर आलेली पिके उमलायच्या आतच नाईलाजाने माना टाकायला लागतात. पिकांची ही स्थिती पाहून जसे घरातील प्रिय व्यक्ती गेल्याची वेदना होते तशी ही वेदना बळीराजाची होते. आणि शेवटी कितीक दुःख करत बसणार म्हणून पुढच्या पिकासाठी मातीच्या गर्भातून उकलू पाहणाऱ्या अर्धमेल्या गर्भावर स्वतच्या हाताने दुःखी अंतकरणाने नांगर फिरवतो.
साता दिसातून फेरा
बुरशी हटवण्या नवा
गेली पॊताची ती रया
हर हंगामाला दवा
आताच्या शेतीबद्दल भाष्य करतांना कवी म्हणतो आता शेती करणे म्हणजे जुगार झाला आहे. कधी हवामान बदलेल रोगराई येईल हे सांगता येत नाही. या वाईट हवामानामुळे पिकावर सतत बुरशीजन्य आजाराचा धोका वाढतोय. इतका की आठवड्यातून एकदा तरी सर्व पिकाला येढा द्यावा लागतो. याचा परिणाम असा झाला आहे की मातीची उपजावू क्षमताच कमी कमी होत गेली आहे. एखादी कुपोषित बाई पाहिल्यावर जशी तिच्या अंगातली रया गेल्यासारखी दिसते तद्वतच अवस्था धरणीमातेची झाली आहे. एके काळी एक दाणा पेरला तर आधोलीभर उत्पादन होत होते तेच आज या रोगराईमुळे पसाभर होणे दुरापास्त झाले आहे. आज असा एक ही हंगाम नाही की पिकाला फवारणी करावी लागली नाही.
कूस मातीची निझूर
वांझ माऊलीची दाई
तिला नाही दयामाया
हिर्व्या लेकराची खाई
पुढच्या ही ओळीत कवी म्हणतो स्वतः ला शेती तज्ञ म्हणवणारे की ज्यांनी कधी शेती ही केली नाही. असे "वांझ माऊलींच्या दाई" उदाहरणार्थ दाई म्हणजे जिला स्वतः ला कळा घ्यावयाच्या नसतात पण ती बाळंतिणीला अशा कळा घे, तशा कळा घे असा सल्ला देत असतात. तशाच पद्धतीचा सल्ला हे कीटकनाशक वापरा, हे रासायनिक खते वापरा हा सल्ला आताचे आधुनिक शेतीतज्ञ देतात.आणि बळीराजा ही त्यांचा सल्ला ऐकतो. पण हे शेतीतज्ञ जागतिक भांडवलदारांच्या सल्ल्याने जास्तीत जास्त कमिशन मिळवण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशके वापरण्याचा सल्ला बळीराजा यांना देतात. यांच्या सल्ल्या घेतल्याने तात्पुरते उत्पन्न वाढते. मात्र हळूहळू मातीची कुस निझुर होत राहते. शेतीला मारलेल्या कीटकनाशकाला काही दयामाया नसते. तणाबरोबर ते लहान लहान हिरव्या पिकांना ही मारून टाकते.
वय होण्याआधी बये
झाली कशी तु वांझुटीं
बाप भुकेचा रडतो
डोळा आसवांची दाटी
आता कवी धरणीमातेला उद्देशून म्हणतो हे माते या रासायनिक खते, तसेच आधुनिक बियाणामुळे पिकावरील विविध आजारांच्या साथीमुळे कीटकनाशके यांचा सतत वापर यामुळे पहिला परिणाम बळीराजावर सुध्धा होतो. त्यामध्ये मळमळ, चक्कर येणे , त्वचेवरील जळजळ, तीव्र डोकेदुखी व इतर ही अनेक लक्षणे सुरू होतात. कधी कधी बळीराजा यांच्या शरीरात हे कीटकनाशक अनावधानाने जावून मृत्यू ही ओढवतो. दुसरा परिणाम मातीतील सूक्ष्म अन्नघटक जे पिकांच्या वाढीसाठी , अधिक उत्पादनासाठी , प्रतिकारक्षमता वाढीसाठी उपयुक्त असतात ते यांच्या सततच्या वापरामुळे नष्ट होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे प्रमाण घटते आहे. काही ठिकाणी उत्पन्नच मिळत नाही. कवी याला हे धरणीमाता तू वय होण्याआधीच वांझोटी झाली आहेस. अशी उपमा देतात. व त्याचा परिणाम म्हणजे आज बिचारा बळीराजा भुकेने रडतो आहे. आसवांनी त्याच्या डोळ्यात दाटी केली आहे.
तुझा रानपाला तुला
हर खेप जडीबुट्टी
हिर्वा फ्राय् खाऊनिया
नको करु नट्टीपट्टी
येथे कवी बळीराजाच्या शब्दात म्हणतो.वनस्पतिजन्य कीटकनाशके किंवा नैसर्गिक कीटकनाशके ही सेंद्रिय आणि नैसर्गिक कीटकनाशके आहेत जी वनस्पती आणि खनिजांपासून बनविली जातात, ज्यात नैसर्गिकरित्या बचावात्मक गुणधर्म असतात . या प्रकारची कीटकनाशके वापरली गेली पाहिजे. कारण ते विघटित झाल्यामुळे विषारी पदार्थ सोडत नाही. उदा. शेताच्या बांधावर पूर्वी रुई वाऱ्याच्या बाजूने लावल्या जात. त्यातून आलेल्या वाऱ्याने पिकावरील माव्यासारखे रोग नष्ट होत असे. पुदिना या वनस्पतीच्या वाळलेल्या पानांची भुकटी भुंगेरे नियंत्रणासाठी वापरत.वनस्पतीजन्य औषधांमुळे मात्र मधमाशीवर चांगला परिणाम दिसून येतो, ही औषधे पर्यावरणपूरक असल्यामुळे जीवसृष्टीला याचा धोका नसतो व यामुळे या औषधाच्या फवारणीनंतर मधमाशी पिकांकडे आकर्षित होते परिणामी पिकांची फलधारणा वाढते. याबरोबरच शेवरी, एरंडी व इतरही अनेक बांधावरील वनस्पती ही रोगराई नष्ट करीत असते. पण आता शेतीचे विभाजन वाढल्याने कमी कमी जमीन वाट्याला येत असल्याने बांध ही कमी झाले आहेत. व बांधावरील ही किडीला, रोगांना पळवून लावणारी ही झाडी ही नष्ट होत चालली आहे. एव्हढे सगळे उपाय असतांना या कीटकनाशकांची मलमपट्टी करून स्वतःचा नट्टापट्टा नको आहे. अशा प्रकारची जनजागृती बळीराजामध्ये होत आहे.
पिढ्या पिढ्याची ही ठेव
तिला जपावे सावध
बळीराजा तुझ्या हाती
नाही दुसरे आयुध.
शेवटी कवी बळीराजाला म्हणतो की अनेक पिढ्यांपासून चालत आलेलं हे जैविक शेतीच तंत्रज्ञान वापर. त्याला जपून ठेव. वरील नैसर्गिक वनस्पती व खानिजापासून बनविलेले कीटकनाशक वापर. थोडे उत्पन्न कमी मिळेल. पण विषमुक्त अन्न तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही आम्ही सर्व निरोगी आयुष्य जगू. बळीराजाच्या हाती आता हेच जैविक शेती नावाचा आयुध शिल्लक आहे त्याचाच वापर नियमितपणे व्हावा.
शब्दांकन :- राजेंद्र फंड, मू. पो. ता. राहाता जि. अहमदनगर. मो. 9881085671.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने