अनावश्यकरीत्या कुठलेही डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार न बाळगता सहज चालत राहणे ही माणसाच्या आयुष्याची सहजसुलभ सुखदायी रेशीमवाट आहे. पण प्रत्येक मनुष्य अनन्यसाधारण असल्याने आपली अनन्यसाधारणता प्रदर्शित करत राहण्याची प्रेरणा त्याला काहीतरी तुफानी आणि आगळेवेगळे करून दाखवण्याच्या मार्गावर नेऊन सोडते. त्यातूनच जितकी मते तितके मतप्रवाह निर्माण तयार होतात. परस्परभिन्न मतप्रवाहामध्ये मग संघर्षाची सुरुवात होते. जिंकण्याच्या इर्षेने त्यात डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा, मत्सर व अहंकार आदींचा शिरकाव होऊन सहजसुलभ असलेली रेशीमवाट मग क्लिष्ट होऊन जाते आणि यातच पहिला बळी विवेक व तारतम्याचा जातो.
रोग का होतो? असा जर प्रश्न टाकला तर निसर्गाच्या प्रकोपाने होतो असे उत्तर काही दशकापूर्वी दिले जात होते. कालांतराने विज्ञान प्रगत होत गेले, आधुनिक वैद्यकशास्त्राने क्रांतिकारी संशोधन केल्यामुळे अनेक गुपितं उघड व्हायला लागली. त्यामुळे कालचे उत्तर आज शिळे होऊन रोग जंतूमुळे होतो, या उत्तरावर आपण येऊन स्थिरावलो. स्थिरावत असताना विवेक व तारतम्याचा बळी गेल्याने यापेक्षा दुसरे उत्तर सुद्धा असू शकते, हे मान्य करणे म्हणजे जणू काही विज्ञानाचीच प्रतारणा करून विज्ञानद्रोह करणे, अशा टोकाच्या भूमिकेपर्यंत माणसाची मजल गेली. पण खरेच याला अन्य प्रकारची उत्तरे नसूच शकतात का? याचे उत्तर जर नाही असे एखादा विज्ञाननिष्ठ मनुष्य देत असेल तर ते सुद्धा चुकीचेच आणि विज्ञानाची प्रतारणा करणारे असते कारण विज्ञान केव्हाही, कोणतीही शक्यता कधीही नाकारत नाही.
एखाद्या रोगाची जबरदस्त साथ येते तेव्हा सर्वच लोक आजाराला बळी पडत नाहीत. अगदी कुटुंबात सुद्धा क्वचितच सर्वांना आजार जडतो. एरवी एक आजारी पडतो आणि उरलेले निरोगी असतात. अगदी जेव्हा आधुनिक वैद्यकीयशास्त्र अजिबात प्रगत नव्हते किंवा आज सर्वोत्तम असलेल्या ऍलोपॅथीचा शोध सुद्धा लागलेला नव्हता तेव्हाही प्लेग, कॉलरा सारख्या महामारीमध्येही शतप्रतिशत जनता मृत्युमुखी पडलेली नाही. एखाद्या रोगाची साथ कितीही भयंकर असू द्या पण ज्याचे लग्न होऊ घातले आहे असे नवरा-नवरी लग्नाच्या दिवशी, लग्न घटिकेच्या वेळी आजारी पडले आणि मग नजीकच्या इस्पितळातील आयसीयू वॉर्ड मध्ये जाऊन लग्न लावावे लागले, असे एकही उदाहरण माझ्या ऐकण्यात नाही. मग नवरा-नवरीला आजारातून सूट का देत असेल हे जंतू? मात्र समारंभ आटोपल्यानंतर साथीचा रोग नसेल तरीही वराकडील-वधूकडील मंडळी थकव्याने आजारी पडतात, हे अनुभवले आहे. ज्याचा अभ्यास चांगला झाला आहे आणि पेपर जर मनासारखे गेले तर असे विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी आजारी पडत नाहीत. अभ्यास जर समाधानकारक झाला नाही किंवा अभ्यास होऊनही जर पेपर मनासारखा सोडवला गेला नाही तर असा विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता मात्र खूपच जास्त असते. मग हे जंतू असा भेदभाव का बरे करत असतील?
करोनाने एक बरे केले की, विषाणूच्या मारक क्षमतेपेक्षा आणि औषधोपचाराच्या तारक क्षमतेपेक्षा माणसाची प्रतिकार शक्ती जास्त महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. ज्यांची प्रतिकारशक्ती मजबूत आहे त्यांना एकतर करोना संसर्ग होणार नाही. संक्रमण झालेच तर जाणवणार नाही आणि जाणवलेच तरी मनुष्य मरणार नाही, ही शक्यता खूपच जास्त आहे. पण अशी प्रतिकारशक्ती कृत्रिमरीत्या निर्माण करण्याइतपत आधुनिक विज्ञान या क्षणापर्यंत तरी हतबल आहे. याचाच अर्थ असा की आधुनिक विज्ञान सर्वोत्तम असले तरी सर्वस्व नाही. इतके भान येऊन वास्तवाची जाणीव झाली तर माणसाला विज्ञानाविषयीचा फाजील अहंकार सहज गाळून टाकता येतो. असा अनावश्यक अहंकार गळून पडला की नवनवीन रेशीमवाटा धुंडाळण्याच्या क्षमतेला चालना मिळून पर्यायी वाटा गवसण्याचे दरवाजे खुले होऊन जातात. त्यापैकीच एक सहज गावसण्याजोगा मार्ग म्हणजे आत्मबल. त्याविषयी उहापोह पुढील लेखात करू.
बक्कळ करून झाले, इतुके अता करूया
अपुलीच आत्मशक्ती, खंगाळुनी बघूया
प्रतिकारशक्तीचा संबंध जसा आहाराशी व व्यायामाशी असतो त्यापेक्षा जास्त संबंध आत्मबलाशी असतो. आत्मबलाचा पाया विश्वास व श्रद्धेवर आधारलेला असतो. आत्मबलाशिवाय शारीरिक बल चैतन्यहीन असते. आत्मशक्तीचा स्तर अत्युच्च्य पातळी गाठून असेल तर जंतूच काय जंतूचा बाप देखील अशा व्यक्तीला सहजासहजी खाटेवर लोळवू शकत नाही.
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग १३ - दि. १८ एप्रिल, २०२० - "केवळ जंतूमुळे रोग होतो?"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========