वांझ साहित्य निर्माण होण्याऐवजी निर्माणच न होणे काय वाईट?
रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे
सहावे स्मृतिगंध काव्य संमेलन संपन्न झाले
या संमेलनात संमेलनाध्यक्ष गंगाधर मुटे
यांनी केलेले अध्यक्षीय भाषण.
सामाजिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भद्रावती नगरीत सहावे स्मृतिगंध साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजक महानुभवांचे मी स्वागत करतो आणि आनंद व्यक्त करतो. या संमेलनाच्या कविवर्य स्व. प्र. ग. तल्लारवार (प्रगत) स्मृती मंचावर उपस्थित संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभलेले नागपूर येथील सुप्रसिद्ध समीक्षक मा. डॉ. तीर्थराज कापगते, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक मा. आचार्य ना. गो. थुटे, प्रख्यात साहित्यिक डॉ. अनंता सूर, प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते मा. ऍड भूपेंद्र रायपुरे, स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संमेलनाचे संयोजक मा. प्रवीण आडेकर, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मा. बळवंतराव सुर्वे, सचिव मा. रसिका आडेकर आणि या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन करणारे मा. डॉ. ज्ञानेश हटवार, माझे सर्व आप्तस्वकीय, सहकारी आणि सहाव्या स्मृतिगंध साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व लेखक, कवी, गझलकार, वक्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ता मंडळी.
मित्र हो, आम्ही अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करत असतो. आयोजक, संयोजक मीच आहे, नियोजकही मीच आहे पण मीच आयोजित करत असलेल्या संमेलनात संमेलनाची भूमिका विस्तृतपणे मलाच मांडता येत नाही कारण संमेलनात माझ्या वाट्याला प्रास्ताविक येत असते आणि प्रास्ताविक म्हणजे केवळ प्रस्तावना करायची असते, लांबलचक विस्तृत भूमिका मांडायची नसते याची काळजी घ्यावी लागते. अध्यक्षांच्या भाषणापेक्षा प्रास्ताविक मोठे कसे असू शकते? शिंगे कितीही सुंदर असली तरी म्हशीपेक्षा शिंगे मोठी झाली तर तिथे सौंदर्य संपून विद्रुपता तयार होईल ना? आज आपण इथे संमेलनाध्यक्ष म्हणून मला निमंत्रित केले त्यामुळे निदान काही मुद्यांचा परामर्श घ्यायची मला संधी मिळत आहे, अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांचा शतशः ऋणी आहे.
शेतकऱ्यांना पाजले जाणारे “उपदेशाचे डोज” साहित्यिकांचे अभ्यासदारिद्र्य, कल्पनादारिद्र्य, अनुभवदारिद्र्य व विवेकदारिद्र्य प्रदर्शित करण्याइतके फालतू स्वरूपाचे असतात. कर्ज करून दिवाळी करू नका, कर्ज काढून मुलामुलींच्या लग्नात खर्च करू नका, तीर्थयात्रा करू नका, उत्पादनखर्च कमी करा वगैरे वगैरे सारखे इतके फालतू सल्ले सांगण्यासाठी साहित्यिकाची काय गरज आहे? ते तर कोणत्याही शेंबड्या पोरांनाही कळत असते ना? मग शेतकऱ्याला कळत नाही अशा अविर्भावात जणू काही आपण ब्रह्मज्ञान सांगत आहोत असे साहित्यिकांना का वाटावे?
मित्र हो, सांप्रत युगात साहित्य कसे असावे आणि कसे असू नये हा मोठा कळीचा मुद्दा झालेला आहे. पण; प्रथम एक जाण ठेवली पाहिजे की साहित्य कसे असावे? हा वादाचा, संवादाचा किंवा विसंवादाचा मुद्दाच होऊ शकत नाही. सृजन ही ज्याची त्याची अभिव्यक्ती असते. अभिव्यक्तीला कधीही कोणत्याही साच्यात जेरबंद केले जाऊ शकत नाही. "जसा सृजक तसे त्याचे सृजन" इतकेच यासंदर्भात म्हणता येईल. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरासारखी, एकनाथी भागवत एकनाथासारखे, तुकोबाची गाथा तुकोबासारखी, मुक्ताईच्या ओव्या मुक्ताईसारख्या, दोहे कबीरासारखे, तुतारी केशवसुतासारखी तर झेंडू आचार्य अत्र्यांसारखे. कुणी तरी उठावं, साहित्य कसे असावे असे प्रवचन ठोकावे आणि ते ऐकून सरस्वतांनी घोकमपट्टी करू साहित्य प्रसवावे, हे कदापिही शक्य नाही. जे यापूर्वी कधीही अस्तित्वात नव्हते ते निर्माण करणे म्हणजे अभिजात सृजन आणि तेच खरे अभिजात साहित्य. साहित्य कसे असावे, याची नियमावली तयार होऊ शकत नाही. करण्याचा प्रयत्न केला तर ते मर्यादेचे उल्लंघन ठरत असते. समीक्षकांनीही समीक्षा करावी पण 'कसे असावे' याचे धडे देण्याचा प्रयत्न करून सीमोल्लंघन करू नये. मर्यादेत राहूनच मर्यादा पुरुषोत्तम होता असते, इतकी तरी प्रत्येकाने जाणीव ठेवलीच पाहिजे.
पण; साहित्य कसे असू नये, याची मीमांसा हक्काने आणि ठोसपणाने करता येते. ज्या समाजात आपण जगतो त्यासमाजासाठी एखादे साहित्य पूरक नसले तरी चालेल पण मारक असता काम नये, मानवी सृष्टीच्या जीवनप्रवाहाला कुंठित करणारे आणि समाजमनाच्या उत्क्रांतीला विकृत दिशा देणारे साहित्य असेल तर त्यावर परखड टीका टीप्पणीच नव्हे तर त्याला कडाडून विरोध करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिक, वाचक, रसिक, सृजक आणि समीक्षकांनीही उचलली पाहिजे. सारस्वतांनीही चिंतन केले पाहिजे, आत्मचिंतन केले पाहिजे. 'खपेल ते पिकेल' असा व्यावहारिक बाजारूपणा साहित्यात येणे कदापिही समर्थनीय ठरू शकत नाही. सोशल मीडियाच्या युगात तात्काळ प्रतिसाद मिळत असल्याने "लोकांना रुचेल ते देण्याचा" मोह स्वाभाविक असला तरी त्यातून स्वतःची शक्य तेवढी सुटका करून घेण्याचा प्रयत्न सारस्वतांनी केला पाहिजे. स्वतःची अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी साहित्य असते, रसिकांच्या/प्रेक्षकांच्या फर्माइशीनुसार "ऍटम पेश करणे" असा साहित्याचा तमाशा होणे समाजाच्या आरोग्याला कधीही पूरक ठरणार नाही, याची सामाजिक जाणीव ठेऊन थोडी ना थोडी सामाजिक बांधिलकी स्वीकारण्याचा प्रत्येक सृजकाने प्रयत्न केला पाहिजे.
साहित्य म्हणजे काय असते, असा जर प्रश्न आपण सार्वजनिकरित्या विचारला तर तुमच्यासमोर हजारच काय, लाखो लोक जरी बसले असतील तर एका स्वरात सगळ्यांचे उत्तर मिळेल की, "साहित्य हा समाजाचा आरसा असतो." पण साहित्य जर डोळ्याखालून घातलं तर साहित्यामध्ये खरेच आरसा दिसतो का? जनजीवनाकडे बघितलं तर आजूबाजूची परिस्थिती, लोकांचे प्रश्न, आजूबाजूच्या समस्या, आजूबाजूच्या लोकांचं राहणीमान, त्यांची वैचारिक ठेवण, त्यांच्या आचार-विचार आणि त्यांची वर्तणूक यांची सांगड जर उपलब्ध साहित्यासोबत घातली तर काहीतरी साम्यता आढळते का? शेती साहित्याचा अभ्यास केला तर परिस्थिती आणखी बिकट होत जाते. शेतीच्या समस्या काय, शेतकऱ्यांच्या समोरचे प्रश्न काय आणि साहित्यामध्ये उमटणारे प्रतिबिंब काय याचा कुठेच ताळमेळ लागत नाही. कल्पनाविलासाचे मनोरे रचत कलाकृती निर्माण होणे चूक नाही पण त्याला वास्तवाचा थोडाफार तरी गंध असायला हवा कि नको?
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जाळतांना”
देशातील तारुण्याचा विचार केला तर असेच सार्वत्रिक चित्र आहे. भाकरीच्या शोधात निम्मे तारुण्य गारद होत आहे. ना भूतकाळ चांगला होता, ना भविष्यकाळात उज्वल आशेची किरणे दिसत आहेत. जन्माला आलोच आहोत तर मरण येत नाही म्हणून आला दिवस पुढे ढकलत जगत राहायचं, असे चित्र जर सभोवताली पावलोपावली ठळकपणे दिसत असेल आणि मात्र साहित्यात त्याचे प्रतिबिंब जाऊ द्या; साधा लवलेशही दिसत नसेल तर साहित्याला समाजाचा आरसा कसा म्हणता येईल? खरे तर ज्याची अनुभूती त्याने व्यक्त करायला हवी. कामगाराने कामगाराची, व्यापाऱ्याने व्यापाराची, शिक्षकाने शिक्षकाची, कष्टकऱ्याने कष्टकऱ्याची, ऐतखाऊंनी ऐतखाऊंची, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची अभिव्यक्ती साकार करायला हवी. तसे झाले तर साहित्य म्हणजे आरसा असे समीकरण आपोआपच प्रतिबिबित होईल, पण; शेतकऱ्यांच्या बाबतीत तेही शक्य होणे केवळ अशक्य आहे.
श्रद्धेला हृदय असते, डोळे नसतातच. जिला डोळेच नाही ती डोळस किंवा अंध कशी काय असू शकेल? याउलट विश्वासाचे आहे. आंधळेपणाने विश्वास ठेवायचा कि डोळसपणे विश्वास ठेवायचा हे सहज ठरवता येते. अंधविश्वास सारखा नेमका, तंतोतंत आणि अर्थपूर्ण शब्द उपलब्ध असताना अंधश्रद्धा हा निरर्थक शब्द साहित्यिकांनी एकतर टाळला पाहिजे किंवा त्याच्या अर्थाचा उलगडा तरी केला पाहिजे.
अभिव्यक्ती साकार करायला शेतकऱ्याला तर प्रतिभेची, अनुभूतीची आवश्यकताच नाही. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शेतकरी म्हणून जगणे हाच एक ग्रंथ असतो. या ”लाइव्ह" ग्रंथात निसर्गाशी जवळीक, प्राणिमात्रावर प्रेम, बीजांचे अंकुरणे, झाडांचे बहरणे, कळ्यांचे फ़ुलोरणे, फ़ळांचे लदबदणे, धरणीची माया, आभाळाची छाया...... सारं काही असते. त्यासोबतच वेदना, प्रतारणा, शल्य, उबग, उद्वेग, जोष, होश आणि क्षोभ... अगदी सारंच काही असते. फ़क्त एकच गोष्ट नसते आणि ती म्हणजे उसंत. ना जीवनाचा सर्वंकष उपभोग घेण्याची उसंत, ना आपल्या भावना व्यक्त करण्याची उसंत. ना कविता लिहिण्याची उसंत, ना क्षोभ व्यक्त करण्याची उसंत. फ़क्त कष्ट,कष्ट आणि केवळ कष्ट. मग त्या हाडाच्या शेतकर्याने साहित्यिक व्हावे तरी कसे? मग आमच्यासारखा थोडीशी संधी मिळताच शेती प्रत्यक्ष कसण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतलेला, शेतीतल्या कष्टापासून मुक्ती मिळविलेला पण शेतीशी थोडीफ़ार नाळ जुळवून ठेवून बर्यापैकी उसंत मिळविलेला शेतकरीपुत्र लेखना-वाचनाच्या, साहित्याच्या जगात संचार करत स्वतःला “हाडाचा शेतकरी” म्हणून स्थापित करायला लागतो आणि मग शेती कसण्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीपासून वंचित झालेला आमच्यातला शेतकरीपुत्र; आम्हाला दुरून दिसलेल्या, जाणवलेल्या, अनुभवलेल्या शेतकर्याला शब्दबद्ध करू लागतो. स्वाभाविकपणे मग शेतकर्याच्या वास्तविक मूळ वेदनांपेक्षा आमच्या कल्पनाविलासातला शेतकरी वरचढ ठरून जातो आणि अंतिमत: शेतकर्याचे मूळ प्रश्न पुरेशा वास्तविकतेने साहित्यात उतरायचे राहूनच जात असावे, असेही समजायला बराच वाव आहे.
मी जेव्हा कविता लिहायला लागलो आणि संकेतस्थळावर तसेच मुद्रित माध्यमात प्रकाशित व्हायला लागल्या तेव्हा “कवितेचा शेवट आशादायी असावा, होकारात्मक शेवट नसेल तर ते केवळ रुदन ठरते!” असा टीकावजा सल्ला मला अनेक समीक्षकांनी दिला. नभाने पुन्हा एकदा या भुईला दान द्यावे, वरूणदेव प्रसन्न होऊन धो-धो पाऊस पडावा, शिवार हिरवेकंच होऊन फ़ळाफ़ुलांनी मोहरून जावे, सोन्याच्या ताटाला मोत्याची कणसे लागावीत आणि मग असे झाले की शेतीची भरभराट होऊन शेतकरी आनंदाने नाचायला लागतील, असे काहीसे सकारात्मक चित्र उभे करणे म्हणजे आशादायी शेवट असे त्यांचे मत. पण शेतात सूर्य, चंद्र, तारे, हिरे, माणिक, मोती, सोने, तांबे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असतील तर.... तर शेतकर्याच्या आयुष्यात त्याचे नैराश्य संपून आशादायी चित्र उभे राहणार तरी कसे? मग याला होकारात्मक/आशादायी शेवट म्हणायचा की स्वप्नरंजन म्हणायचे? की होकारात्मक, आशादायी, सकारात्मक असल्या गोंडस शब्दाआडून शेतकरी जीवनाची डोळ्यात केलेली धूळफ़ेक म्हणायची? की असा शेवट करणे म्हणजे केवळ स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी ओढूनताणून केलेले स्वप्नरंजनच म्हणायचे? जर असे झाले किंवा असे केले तर "रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला" असा प्रकार ठरून रोग्याला आराम तरी कसा मिळेल? मग असे उपचार करण्यापेक्षा उपचार न करणे का वाईट आहे? रोग्याऐवजी पखालीला इंजेक्शन टोचून रोग्याचा आजार वाढवणारे वांझ साहित्य निर्माण होण्याऐवजी नाहीच झाले तर ते जास्त परिणामकारक नाही ठरणार का?
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी धारण केलेले विक्राळरूप, अतिवृष्टीने निर्माण झालेल्या ओला दुष्काळ सदृश्य संकटामुळे उत्पादनात येणारी प्रचंड घट, शेतमालाच्या पडत्या बाजारभावामुळे व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, कधी चक्रभुंगा तर कधी बोंडसड, कधी कपाशीवर बोंडअळी तर कधी तुरीवर मर रोग यामुळे शेतीतील उत्पन्नासोबतच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे, विजेचे बिल देखील भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत उरलेली नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी सक्तीने व बळाचा वापर करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या, कर्जवसुली करण्याच्या भीमगर्जना केल्या जात आहेत. अशा बिकट स्थितीतही “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे त्यामुळे प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. मराठी साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यवसायाचे फार मोठे शल्य आहे.
“असे गैर ती आत्महत्त्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी”
गेल्या २०-२२ वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले नाही. शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे. जे काही साहित्य निर्माण होते ते शेतकऱ्यांना “उपदेशाचे डोज” पाजणारे असतात. बरं उपदेशाचे डोज तरी प्रभावी आणि परिणामकारक असावेत कि नाही? तर ते सुद्धा साहित्यिकांचे अभ्यासदारिद्र्य, कल्पनादारिद्र्य, अनुभवदारिद्र्य व विवेकदारिद्र्य प्रदर्शित करण्याइतके फालतू स्वरूपाचे असतात. कर्ज करून दिवाळी करू नका, कर्ज काढून मुलामुलींच्या लग्नात खर्च करू नका, तीर्थयात्रा करू नका, उत्पादनखर्च कमी करा वगैरे वगैरे सारखे इतके फालतू सल्ले सांगण्यासाठी साहित्यिकाची काय गरज आहे? ते तर कोणत्याही शेंबड्या पोरांनाही कळत असते ना? मग शेतकऱ्याला कळत नाही अशा अविर्भावात जणू काही आपण ब्रह्मज्ञान सांगत आहोत असे साहित्यिकांना का वाटावे? सृजन आणि अभिव्यक्तीची पातळी काय इतकी हीन दर्जाची असावी? आपल्याला जितके कळते तितके किंवा त्यापेक्षा जास्त वाचकांना कळत असेल इतके समजण्याइतपत अक्कल म्हणा किंवा विवेक म्हणा, साहित्यिकांकडे का असू नये? तारतम्याच्या पातळीवर साहित्यिक इतका वैचारिक नादार कसा काय असू शकतो?
"तू पुरोगामी आहेस म्हणजे नेमका काय आहेस?" त्यांच्यात इतरांपेक्षा काय वेगळा गूण आहे, "इत्तरांपेक्षा तुझा दृष्टिकोन कसा वेगळा आहे" तर अशा प्रश्नाचे उत्तर कुणालाही देता येत नाही. जे इतरांना अज्ञानी समजून तर्क विचारतात, कारणमीमांसा मागतात अशा पुरोगाम्यांना तर अजिबातच उत्तरे देता येत नाहीत. स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी, स्वतःत नसलेले स्वतःचे वेगळेपण प्रदर्शित करण्यासाठी अशा शब्दांचा वापर केला जातो, यापलीकडे या शब्दांना काहीही अर्थ नाही.
मनुष्य म्हटलं कि मर्यादा आल्याच. साहित्यिक हा सुद्धा मनुष्यच असल्याने त्यालाही मर्यादा असणारच हे ओघाने आलेच. आपण आपल्या मर्यादा जाणल्या पाहिजेत. ज्या क्षेत्रात आपला अभ्यास, अनुभव, कर्तृत्व नसेल त्या क्षेत्रात मुशाफिरी करायची असेल तर त्या त्याक्षेत्राचा थोडेसे कष्ट घेऊन अभ्यास केला पाहिजे, त्याला शक्य तेवढी अनुभवाची जोड देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वैचारिक श्रीमंती आली तरच लेखनातही समृद्धी येईल आणि असे लेखन मानवजातीच्या उत्थानासाठी उपयोगी पडेल. वैचारिक दारिद्र्य घेऊन अभिव्यक्ती साकार होत राहिली तर ती अभिव्यक्ती "शोषकांना पोषक" ठरण्याचा फार मोठा धोका ठरण्याची शक्यता बळावते. त्याच बरोबर शब्दयोजना सुद्धा नीटनेटकी आणि नेमकी व्हायला हवी. शब्दयोजना, शब्दांची रचना, शब्दांची मांडणी आणि शब्दांची सजावट यातून भाषा सौंदर्य निर्माण होते. पण शब्द निरर्थक नसतात. “या हृदयीचे त्या हृदयी” पोचण्यासाठी शब्द अर्थपूर्ण असतात. शब्दांना नेमका व तंतोतंत अर्थ असतो. या हृदयाची भावना त्या हृदयापर्यंत पोचवायची असेल तर शब्दांची योजना नेमकेपणाने होणे अनिवार्य आहे, त्यासाठी निरर्थक शब्दांना बाजूला सारणे सुद्धा तितकेच अत्यंत महत्वपूर्ण ठरते. आपण सारस्वत आहोत, शब्दप्रभू आहोत पण अनेकदा साहित्यिकांच्या हातून असे शब्द योजिले जातात की ज्याचा अर्थ साहित्यिकालाही माहित नसतो आणि वाचकांनाही माहित नसतो. मात्र आपण अर्थार्थी अर्थ लागत नसूनही असे शब्द वापरत राहतो. त्यासाठी उदाहरणादाखल दोन शब्द आपल्यासमोर चर्चेसाठी ठेवतो. त्यापैकी पहिला शब्द अंधश्रद्धा आणि दुसरा शब्द पुरोगामी.
अंधश्रद्धा हा शब्द जवळजवळ सर्वच वापरतात. पण मी गेली अनेक वर्ष त्या शब्दाचा अर्थ विचारतो आहे. त्या शब्दाचा अर्थ कुणालाही सांगता येत नाही मात्र शब्द वापरत राहतात. मूळ शब्द हा अंधविश्वास आहे. विश्वास डोळस असू शकतो किंवा आंधळा असू शकतो पण त्याला पर्यायी म्हणून अंधश्रद्धा हा शब्द कदापिही योग्य नाही. अंधविश्वास या शब्दाऐवजी ऐवजी अंधश्रद्धा हा शब्द मराठीत केव्हा आला, का आला, कोणी घुसवला हे कळायला काहीही मार्ग नाही. अंधश्रद्धा हा शब्द तयार होऊच शकत नाही. हा शब्द अत्यंत निरर्थक आहे.
“श्रद्धा ही श्रद्धा असते
एकतर असते किंवा नसते
पण ती डोळस किंवा आंधळी
वगैरे कधीही नसते”
श्रद्धेचा उगम शोधणे किंवा श्रद्धेची रेसिपी ठरवणे अशक्य आहे. कृत्रिमपणे श्रद्धा निर्माण होत नाही. कधी ती उपजत असते तर कधी स्वभावाच्या बदलावर आधारित असते. श्रद्धा लवचिक नसते आणि परिवर्तनीय सुद्धा नसते. ज्याची कशावर/कुणावर श्रद्धा असते त्याची प्रगाढ असते, ती डळमळीत करता येत नाही आणि ज्याची कशावर/कुणावर श्रद्धा नसते त्याची अजिबात नसते, ती कोणत्याही मार्गाने जडवता येत नाही. श्रद्धेला हृदय असते, डोळे नसतातच. जिला डोळेच नाही ती डोळस किंवा अंध कशी काय असू शकेल? याउलट विश्वासाचे आहे. आंधळेपणाने विश्वास ठेवायचा कि डोळसपणे विश्वास ठेवायचा हे सहज ठरवता येते. अंधविश्वास सारखा नेमका, तंतोतंत आणि अर्थपूर्ण शब्द उपलब्ध असताना अंधश्रद्धा हा निरर्थक शब्द साहित्यिकांनी एकतर टाळला पाहिजे किंवा त्याच्या अर्थाचा उलगडा तरी केला पाहिजे.
पुरोगामी हा आणखी असाच एक शब्द. त्याची व्याख्या कोणालाच करता आली नाही. व्याख्या करता येत नाही, अर्थ माहित नाही पण तरीही हा शब्द सर्रास वापरला जातो. सर्वसाधारणपणे "जुने ते सर्वच सोने" असे कधीही होऊ शकत नाही. तसेच "जुने ते सर्व नको" हेही अशक्य आहे. "नवे ते सर्व हवे" हे जसे पूर्णपणे खरे नसते तसेच "नवे काहीच नको" हे ही अशक्य असते. त्या त्या काळात, त्या त्या प्रसंगी, जे अनुकूल असेल, कालबाह्य झाले नसेल ते सर्वच्या सर्व माणसाला स्वीकारावेच लागते. त्याला काही पर्याय नसतो. अशा स्थितीत एखादा मनुष्य 'पुरोगामी' आहे म्हणजे नेमके काय आहे याचा कधीही उलगडा होत नाही. मी अनेकांना थेट विचारतो की, "तू पुरोगामी आहेस म्हणजे नेमका काय आहेस?" त्यांच्यात इतरांपेक्षा काय वेगळा गूण आहे, "इत्तरांपेक्षा तुझा दृष्टिकोन कसा वेगळा आहे" तर अशा प्रश्नाचे उत्तर कुणालाही देता येत नाही. जे इतरांना अज्ञानी समजून तर्क विचारतात, कारणमीमांसा मागतात अशा पुरोगाम्यांना तर अजिबातच उत्तरे देता येत नाहीत. स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी, स्वतःत नसलेले स्वतःचे वेगळेपण प्रदर्शित करण्यासाठी अशा शब्दांचा वापर केला जातो, यापलीकडे या शब्दांना काहीही अर्थ नाही. मराठी भाषेची शब्दसंपदेची श्रीमंती समृद्ध असताना असले निरर्थक शब्द वापरण्याचा मोह साहित्यिकांनी तरी टाळला पाहिजे.
पुरोगामी या शब्दाची व्याख्या जरी कोणाला करता आली नसली तरी केशवसुतांच्या एका कवितेमध्ये खऱ्या पुरोगामित्वाचे ओझरते दर्शन घडताना आढळून येते. केशवसूत म्हणतात...
“जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी अथवा पुरुनी टाका”
जुने सोडून द्यायचे म्हणजे जे जे जुने आहे ते ते सर्वच सोडून द्यायचे का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो पण त्याचे उत्तरही कवीने नेमकेपणाने कवितेत देऊन ठेवले आहे. कालबाह्य झालेले सोडून देत आणि उद्याच्या उज्वल भवितव्याला पोषक असेल ते सर्व स्वीकारत सतत स्वतःला गतिमान ठेवणे आवश्यक असल्याचे कवीने नेमकेपणाने अधोरेखित केले आहे.
"सडत न एक्या ठायी ठाका"
गतिशीलता थांबून प्रवाह कुंठित होण्याला कवीने 'एकाजागी सडण्याची' समर्पक उपमा दिली आहे. पण पुढे चालत राहणे म्हणजे उगीच दिशाहीन चालून कालापव्यय करत मार्गक्रमण करणे हेही कवीला मान्य नाही.
"सावध! ऐका पुढल्या हाका"
मागील चुकापासून बोध घेत सावध होऊन पुढील भविष्याचा वेध घेत घेत त्या हिशेबाने पावले टाकणे म्हणजे पुढे चालणे. असा स्पस्ट उलगडा कवीने कवितेत समर्पक शब्दात केला आहे.
पण पुढे चालणे, चालत राहणे याने काय साध्य होईल, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोच. जर लक्ष्य गाठण्याची दिशाच स्पष्ट नसेल तर उगीच निष्कारण चालत राहिल्याने काय साध्य होईल? ती तर फुकटची पायपीट ठरेल ना? पण त्याचे उत्तरही कवीने देऊन ठेवले आहे.
"खांद्यास चला खांदा भिडवूनी"
चालायचे म्हणजे स्वतःच स्वतःचा स्वतःपुरता स्वार्थ साधत 'एकला चलो रे' नव्हेच; तर एकमेकांना, समाजाला, सर्व थरातील समूहांना वगैरे सोबत घेऊन चालायचे आहे. त्यासाठी खांद्याला खांदा भिडवायचा आहे. निव्वळ तनेच नव्हे तर मनेही परस्परांशी सांधायची आहेत. एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हायचे आहे. म्हणजे काय तर भारत-इंडिया दरी संपवायची आहे. धर्मधर्मातील भेद संपवायचे आहेत, अशी समाज रचना निर्माण करायची आहे की, जिथे कुणी शोषक नसेल आणि जिथे कुणाचे शोषण होणार नाही. जुन्याचा त्याग करून आधुनिकतेची आस कशी आणि किती व्यापक असावी याचे उत्तर 'तुतारी' फुंकण्याची पात्रता असलेल्या माणसामध्येच सापडू शकते आणि अशी पात्रता व कसब ज्याच्यात असेल त्यालाच पुरोगामी म्हणता येऊ शकेल.
खरं पाहता कुणी पुरोगामी नसतो आणि कुणी सनातनी नसतो, कुणी धार्मिक नसतो आणि कुणी निधार्मिक नसतो, कुणी आस्तिक नसतो आणि कुणी नास्तिक नसतो, कुणी विद्वान नसतो आणि कुणी ढब्बू नसतो, कुणी ज्ञानी नसतो आणि कुणी अज्ञानी नसतो. आचार-विचाराच्या बाबतीत प्रत्येकात केवळ थोडेफार अंतर असते. एकदमच वर्गविग्रह करून टाकावा, असे कुणाचेच आचरण नसते. ही सृष्टीची विविधता आहे की या सृष्टीने प्रत्येक जीवजंतूला वेगळेपण व अननन्यसाधारणत्व दिलेलं आहे. निसर्गाची प्रत्येक कृती विविधतेने नटलेली असल्याने प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती सुद्धा अनन्यसाधारण आहे. पहिला दुसऱ्यासारखा नाही तर दुसरा तिसऱ्यासारखा नाही. जगाच्या पाठीवर करोडो लोक आहेत पण एकाचा चेहरा दुसऱ्याशी मिळत नाही, एकाचा आवाज दुसऱ्याशी मेळ खात नाही, एवढेच काय तर प्रत्येकाच्या चालण्याची ढब सुद्धा परस्परभिन्न असते. मनुष्य जसा चेहऱ्यावरून आणि आवाजावरून ओळखता येतो तसाच चालण्यावरून देखील ओळखता येतो, इतके प्रत्येक व्यक्तीमत्व एकमेवाद्वितीय - अद्वितीय असते आणि हेच स्वतःचे वेगळेपण कृत्रिमपणे बटबटीतपणे अधोरेखित करण्यासाठी मनुष्य स्वतःला नानाविध उपाध्यामध्ये बांधून स्वतःला सादर करून चारचौघात मिरवण्याचा अट्टाहास करत असतो.
सृष्टीने कुठेही असमानता ठेवलेली नाही. प्रत्येकाला काही दुर्बलता तर काही बलस्थाने दिली आहेत. प्रत्येकाच्या ठायी कौशल्य आहे. मोदींना देश चालवता येतो, सोनियांना पक्ष चालवता येतो पण माझ्या शेतातल्या व्यक्तीला जितकी तरबेजपणे गाडी आणि सराईतपणे कुऱ्हाड चालवता येते तशी गाडी व कुऱ्हाड ना मोदींना चालवता येणार, ना सोनियांना चालवता येणार. कलेक्टर आयएएस असला तरी त्याला फक्त प्रशासन चालवता येते; माजघरातल्या स्वयंपाक्याइतके स्वादिष्ट भोजन तयार नाही करता येणार. याचा अन्वयार्थ इतकाच की प्रत्येक जीव हा अनन्यसाधारण आहे आणि स्वतःची अद्वितीय कौशल्य-ओळख ठेवून आहे. मात्र सृष्टीने कुठेही भेदभाव केला नसला तरी बेरक्या माणसाला नेमके इतकेच काम अद्वितीयपणे करता आले आहे. कलेक्टरच्या कौशल्याला श्रेष्ठत्व आणि खानसाम्याच्या कौशल्याला हीनत्व ही व्यवस्था दुष्ट मानवी स्वभावातून निर्माण झाली आहे. "जिसकी लाठी उसकी भैस" आणि "ज्याची सत्ता त्याची मालमत्ता" ही असली समीकरणे म्हणजे माणसाच्या बेरकी, दुष्ट, कपटी व कारस्थानी स्वभावाने समाजावर लादलेली कृत्रिम व्यवस्था आहे. सृष्टीच्या निकषावर पडताळा घेतला तर सतरा वर्ग शिकल्याने आणि अठरा पुस्तके वाचल्याने कुणी ज्ञानी होतो हे जसे सिद्ध होत नाही तसेच शाळेचे तोंड न पाहण्याने आणि पुस्तकाला हात न लावल्याने मनुष्य अज्ञानी राहतो हेही सिद्ध करता येत नाही. ज्याने सृष्टीची निर्मिती केली त्याच्याकडे कुठलीही डिग्री नव्हती आणि ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला सृष्टीची निर्मिती करता येत नाही. ज्यांच्याजवळ डिग्री नव्हती असे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, तुकडोजी यांनी ज्या रचना केल्या तशा रचना डिग्रीधारकांना कधीही करता आल्या नाहीत, इतकेच नव्हे तर त्यांच्या साहित्याचे अन्वयार्थ लावण्याचे काम सुद्धा त्यांना आजवर झेपलेले नाही. धाडसाने विधान करायचे ठरवले तर असेही म्हणता येईल की, काही अपवाद वगळले तर जी काही साहित्यनिर्मिती झाली त्या साहित्यात अशिक्षितांनी समाजाला संस्कार, प्रेरणा, चैतन्य आणि दिशा देण्याचे काम केले आहे तर सुशिक्षितांनी केवळ समाजाचे मनोरंजन करण्याचे काम केले आहे. कधी कधी तर हीन-दीनांचे अश्रू पुसून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्याऐवजी तेच अश्रू विकून गल्लाभरू बाजारू साहित्य निर्मितीत धन्यता मानली आहे. कदाचित माझे निरीक्षण, अवलोकन चुकीचे असू शकेल, चुकीचे असेल तर आनंदच आहे, साहित्यविषयक माझे अवलोकन चुकीचे ठरावे, अशी माझीही मनोमन इच्छा आहे पण जर दुर्दैवाने हे खरे असेल तर...?
सृष्टीचा खेळ तर फार अजब-गजब आहेच पण सृष्टीच्या नियमांना कलाटणी देऊन स्वहिताची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी बेरकी माणसांनी निर्माण केलेला खेळ त्याहीपेक्षा अजब-गजब आहे. या मानवनिर्मित अजब-गजब खेळात निदान साहित्यिकांनी तरी स्वतःला गुरफटवणे थांबवले पाहिजे. एकदा हा नैसर्गिक व कृत्रिम अजब-गजब खेळ समजून घेतला तर अस्सल अभिजात कल्पना प्रसवण्याचे दरवाजे आपोआपच उघडायला लागून अभिव्यक्ती मानवनिर्मित क्षितिजे लांघून अनंताशी ऋणानुबंध स्थापित करू शकेल. साहित्यिकांचे आयुष्य, जीवनचर्या आणि आचार-विचाराची व्याप्ती डबकांतल्या बेडकासारखी असू शकेल, जर ती अपरिहार्यता असेल तर त्यात काही गैर आहे असेही नाही पण; निदान कल्पना व प्रतिभेला तरी डबक्याच्या सीमात न गुंतवता त्यांना आसमंताच्या पल्याड झेपावण्यासाठी मुक्त ठेवले पाहिजे. जात, धर्म, पक्ष, पंथ, ज्ञान, अज्ञान, शिक्षित, अशिक्षित, आस्तिक, नास्तिक, सनातनी, पुरोगामी वगैरे भेदाभेदांच्या कक्षा साहित्यिकांना ओलांडता आल्या नाही तरी चालतील पण स्वतःच्या प्रतिभेला यात अडकवणे म्हणजे प्रतिभेची नसबंदी करून टाकण्यासारखे आहे.
मित्रांनो, जितकी दृष्टी तितकेच मनुष्याचे क्षितिज असते पण कल्पना आणि प्रतिभेचे क्षितिज चराचर सृष्टीच्या पल्याड असू शकते, इतके सृजकांनी सदैव लक्षात ठेवावे, इतकाच मला याप्रसंगी आग्रह करायचा होता आणि तो करून झाला आहे त्यामुळे भाषण इथेच थांबायला हवे पण; साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जर कवी असेल तर अध्यक्षीय भाषणात अध्यक्षांनी निदान एक तरी कविता सादर केली पाहिजे असा एक प्रघात आहे. त्यामुळे एक कविता मी आपल्यासमोर ठेवतो आहे पण आज जी कविता मी घेणार आहे त्या कवितेची कहाणी मोठी विचित्र आहे. एका विशिष्ट मनःस्थितीत आणि भावनेच्या ओघात ती कविता लिहिली गेली. पण लिहून झाल्यानंतर त्या कवितेचे मी सादरीकरण करू शकेन असे कधी वाटले नव्हते आणि तशी अपेक्षा नव्हती कारण त्या कवितेत जो एक असांसदीय शब्द आलेला आहे त्या शब्दाने माझीच गोची करून ठेवली आहे. असा शब्द किंवा तसे वाक्य मी माझ्या व्यक्तिगत जीवनात किंवा सार्वजनिक आयुष्यात कधीही वापरले नाही, उच्चारले नाही त्यामुळे ही कविता पुस्तकातच बंदिस्त होऊन पुस्तकाचीच फक्त शोभा वाढवेल असा माझा स्वतःचा कयास होता.
पण २०१६ मध्ये नागपूरला दुसरे शेतकरी साहित्य संमेलन झाले आणि त्या साहित्य संमेलनात एबीपी माझाचे मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने तीच कविता वाचून दाखवली; एवढेच नव्हे तर शेतीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर अशाच अस्सल कविता लिहिल्या पाहिजेत अशी भावनाही व्यक्त केली. पुढे हीच कविता पूर्ण मराठी भाषिक प्रदेशात गाजली, लोकप्रिय झाली, युट्युबवर लाखो लोकांनी बघितली-ऐकली. एबीपी माझाच्या एका विशेष कार्यक्रमात आग्रहाखातर तीच कविता मी सादर केली आणि तिचे जगभर प्रसारणही झाले परंतु एकट-दुकट अपवाद वगळता ही कविता सादर करण्याचे मी कधी धाडस केले नाही. आज मी जे बोललो त्याच विषयाला न्याय मिळावा म्हणून मी हीच कविता घेतो आहे. कवितेचे नाव आहे स्वदेशीचे ढोंगधतुरे. ही कविता सादर केल्यानंतर पुन्हा सर्वांचे आभार मानण्याची औपचारिकता पूर्ण करण्याच्या मनस्थितीत मी असेन किंवा नसेन हे सांगता येत नाही. त्यामुळे आधीच माझे बोबडेबोल व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आणि आपण ऐकून घेतले याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या बोबड्याबोलांना आराम देऊन आपल्यासमोर कविता ठेवतो.
कवितेविषयी सांगायचं झालं तर हा "नागपुरी तडका" आहे. “नागपुरी तडका” हा एक नवीन आणि स्वतंत्र काव्यप्रकार आहे. नागपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांत जी मराठी भाषा बोलली जाते ती भाषा आणि भाषेचा लहजा, वऱ्हाडी किंवा झाडी बोलीभाषेपेक्षा पूर्णत: भिन्न आहे. त्यामुळे या बोलीभाषेतील रचनेला मी “नागपुरी तडका” असे स्वतंत्र नांव दिले आहे. पण या प्रकारात मी पूर्णत: निर्भेळ नागपुरी भाषेचा वापर करीत नाही. फ़क्त लहजा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द यांचाच सीमित वापर करतोय. या काव्यप्रकाराचा आशय व उद्देश, न रुचणाऱ्या रूढी-परंपरा-चालीरीती, न रुचणारी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धोरणे यांचेवर टीकाटिप्पणीसह घणाघाती घाव घालणे हा उद्देश असल्याने या प्रकारास मी जाणीवपूर्वक “नागपुरी तडका” असे नांव दिले आहे. या पद्यलेखनामध्ये मी “अभय” हे टोपणनाव/उपनांव, तखल्लुस/मक्ता म्हणून वापरले आहे.
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल
खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल
शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?
आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल
छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल
धन्यवाद!
जय जवान! जय किसान!!
गंगाधर मुटे
मु. पो. आर्वी (छोटी) - ४४२३०७
ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिक्रिया
वांझ साहित्य निर्माण होण्याऐवजी निर्माणच न होणे काय वाईट
आपण अध्यक्षीय मनोगतात,साहित्य निर्मिती,सध्यस्थिती, साहित्यातील अनाकलनीय शब्दांची निर्मिती त्याचा पुर्नवापर , शेतिमातिचे वास्तव ,द्या सर्व मुद्द्यावर अतिशय मार्मिक भाष्य केलेत सर. मन:पूर्वक शुभेच्छा
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
मनपूर्वक आभार सर
मनपूर्वक आभार सर
पाने