शेतकरी साहित्यही पुढे यावे
सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन
नागपूर : दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी चळवळ मोठी केली. शेतकर्यांबाबत त्यांनी प्रचंड लिखाण केले. त्यांचे साहित्य इतके मोठे होते की ते कुठल्याही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले असते. परंतु त्यांच्या लिखाणाला मान्यता दिली नाही हा आमच्या साहित्यिकांचा करंटेपणा होता. मराठी साहित्य दरिद्री राहण्यामागंच खरं कारण म्हणजे खर्या चळवळीशी कधी जुळवूनच घेतलं नाही. महात्मा गांधींशी जुळवून घेतले नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशीही कुठे जुळवून घेतले. दलित चळवळ आणि साहित्य पुढे आले तेव्हा कुठे त्याची दखल घेतल्या गेली. शेतकर्यांचे साहित्यही असे दलित साहित्याप्रमाणे पुढे यावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे दोन दिवसीय दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे हे संमेलनाध्यक्ष होते तर ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर हे प्रमुख अतिथी होते. शेतकरी नेते वामनराव चटप हे स्वागताध्यक्ष होते. शेतकरी साहित्य चळवळीचे अध्यक्ष गंगाधर मुटे, राम नेवले, संध्या राऊत व्यासपीठावर होते. प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, एकीकडे ४0 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, अशी बातमी आहे तर दुसरीकडे देशात प्रचंड गुंतवणूक झाल्याची बातमी आहे. देशात येणार्या या गुंतवणुकीत मरणार्या शेतकर्यांशी काही संबंध आहे की नाही, याचा विचारच होत नाही. कारण आमच्या संवेदनात बोथट झाल्या आहेत. ७५ टक्के लोकं खेड्यात राहतात. परंतु कोणताही पंतप्रधान स्मार्ट खेडी बनवण्याची भाषा बोलत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीला गती दिली. त्यांच्या संमेलनाला ५-५ लाख लोक एकत्र यायचे. जोपर्यंत शेतीच्या मालाला भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती, तेव्हापर्यंत लोकं त्यांच्यासोबत होते. परंतु शेतकर्यांच्या सबलीकरणासाठी त्यांची राजकीय शक्ती उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि राजकीय पक्ष स्थापन केला तेव्हा लोकांना त्यांची जात आठवली.
गरिबांच्या किंवा शेतकर्यांच्या चळवळीत जोपर्यंत लोक आपली जात धर्म विसरून एकत्र येणार नाही, तोपर्यंत या व्यथा अशाच राहतील. अलीकडे शेतकरी साहित्याबद्दल चांगले लिहिले जात आहे. त्यांना बळ द्या, असेही ते म्हणाले. राजीव खांडेकर यांनीसुद्धा दिवंगत शरज जोशी यांच्या विपुल साहित्यावर प्रकाश टाकला. तसेच डॉ. आंबेडकरांचे विचार त्यांच्या अनुयायांनी ज्या प्रमाणे पुढे नेले, त्याच प्रमाणे शेतकरी चळवळ सुद्धा पुढे नेण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. अँड. वामनराव चटप यांनी पत्रकार आणि साहित्यिकांनी शेती व शेतकर्यांच्या व्यथा मांडून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधावे. लोकांच्या संवेदना जागृत व्हाव्यात असे लेखन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी 'कणसातील माणसं', नागपुरी तडका या काव्यसंग्रहासह 'शेतकर्यांचा सूर्य' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. मनिषा रिठे यांनी संचालन केले. तर राम नेवले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
महासत्तेकडे वाटचाल म्हणजे अफूची गोळी देणे - रा.रं. बोराडे
■ ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपला देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, असं म्हणणे म्हणजे जनतेला अफूची गोळी देणे आहे. हे खर मानलं तरी एक प्रश्न उपस्थित होतो. माझा एक नातू हैदराबाद येथील एका इंग्रजी शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा एक नातू माझ्या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. माझ्या शेतकरी भावाचा हा नातू माझ्या नातवाच्या हातात हात घालून महासत्तेकडे जाणार आहे का? नसल्यास महासत्तेच्या अशा फुशारक्या मारण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतीच्या समस्येच्या मुळाचा आपण विचार करण्याची गरज आहे. आता सर्व अल्पभूधारक झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ रस्त्यावर उतरणेच आपल्या हातात आहे. शेतकरी शेतात काम करता करता जगला पाहिजे ही भूमिका घेऊन रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्यांच्या आत्महत्या या फॅशन झाल्याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही यावेळी त्यांनी केला.
~~~~~~~~~~~
22/02/2016
~~~~~~~~~~~
शेतकर्यांसाठी शरद जोशींचा मार्शल प्लॅन लागू करा
श्रीनिवास खांदेवाले : दुसर्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप
नागपूर : भारतात तीन लाखांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा देश आणि राज्याच्या राजकारण व अर्थकारणावर परिणाम झाला नाही. दबाव वाढले तेव्हा पॅकेज जाहीर करून वेळ निभावून नेली. शेतकर्यांचे दु:ख, दारिद्रय़ संपविण्यासाठी सरकारला ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था विकसित करणे गरजेचे आहे. परंतु सरकारजवळ नियोजनाचा आराखडाच नाही. ज्या देशात ६0 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्याला प्राधान्यक्रमच नाही. त्यामुळे आत्महत्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. शेतकर्यांच्या दारिद्रय़मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मार्शल प्लॅन तयार केला होता. शेतकर्यांसाठी हा मार्शल प्लॅन लागू करणे गरजेचे आहे, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ संघटनेतर्फे दोन दिवसीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संमेलनाचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून खांदेवाले यांनी शेतकर्यांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील, माजी आमदार सरोजताई काशीकर, ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार रावसाहेब बोराडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित होते. या संमेलनात सर्वानुमते शरद जोशी यांना 'युगात्मा'ही लोकउपाधी देण्यात आली. याप्रसंगी सरोज काशीकर म्हणाल्या की, शेतकरी विकासाच्या नावावर लुटल्या गेला आहे. सरकारने कायद्याचे निर्बंध घालून त्याला बेड्या घातल्या आहे. शेतकर्यांची सर्व बाजूने कोंडी झाली आहे. शरद जोशी यांच्या मार्शल प्लॅननुसार शेतमालाच्या आयातीवर बंधने घालून निर्यातीला प्रोत्साहन द्या, निर्यातीसाठी ३0 टक्के सूट द्या, शेतीला उद्योगाचा दर्जा द्या तरच खर्या अर्थाने भारताचा विकास होईल.
याप्रसंगी गुणवंतराव पाटील म्हणाले की, शरद जोशी यांनी १९९३ मध्ये लेखाजोखा आंदोलन पुकारले होते. यात सरकारने शेतकर्यांना कशा पद्धतीने लुटले, हे शरद जोशी यांनी सरकारपुढे मांडले होते. शेतकरी सरकारचा कुठलाही देणेदार नाही. त्याच्यावरचे सरसकट कर्ज काढून टाकले पाहिजे. त्याला आधुनिक तंत्रज्ञान पुरविले पाहिजे. सातव्या वेतन आयोगाला शेतकर्यांनी पुढे येऊन विरोध केला पाहिजे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन जगदीश भगत यांनी केले. (प्रतिनिधी)
कवितेतून मांडले शेतकर्यांच्या दु:ख, वेदनेचे प्रतिबिंब
दु:ख, आक्रोश, वेदना आणि मन हेलावून सोडणारे शब्दांचे बाण कविसंमेलनात शेतकर्यांच्या अवस्थेची जाणीव करून देत होते. ही जाणीव करून देताना सरकार आणि राजकीय नेत्यांवरील संताप व्यक्त होतानाही दिसत होता. शेतकर्यांच्या आत्महत्येवरील एका कवितेत राजकारणाचा समाचार घेताना कवी म्हणाला, कोणी म्हणतो हिरवा, कोणी म्हणतो भगवा, अबे शेतकरी मरून रायला, पहिले त्याले जगवा. शहरे स्मार्ट होत असताना, गाव भकास होत आहे. जगाचा पोशिंदा आत्महत्येकडे वळल्यामुळे, ग्रामीण भागात उदासी पसरली आहे. या वातावरणावर लक्ष वेधताना कवी विजय विलेकर यांच्या कवितेतून ही भीती व्यक्त होताना दिसते. ते म्हणतात, 'आत्महत्येची किंचाळी पडते दुरून, अरे व्हारे बाबा जागे हाती मशाल घेऊन..' कवी रवींद्र कामठे हे सुद्धा सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करताना म्हणतात, 'कोपलेल्या निसर्गावर मात करण्याचे धाडस होते, मातलेल्या सरकारचे डोके कुठे होते..' कवी रविपाल शेतकर्यांची वेदना मांडताना म्हणाले, 'अस्तित्वाने जाहीरनामा कालच प्रसिद्ध केला, जी वस्तू दान केल्या जाते, तिचा निर्माता मेला.' यासारख्या एकाहून एक मनाला झोंबणार्या कविता दुसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात सादर करण्यात आल्या. कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्ञानेश वाकुडकर यांनी भूषविले. संमेलनात दिलीप भोयर, नवनाथ पवार, प्रा. मनीषा रिठे, धीरज ताकसांडे, डॉ. विशाल इंगोले, श्रीकांत धोटे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील, दामोदर जराहे, सुमती वानखेडे, रामकृष्ण रोगे, सांडोभाई शेख, सुरेश बेलसरे, मोरेश्वर झाडे, राजेश जवंजाळ या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.