शेतकऱ्यांची सत्यकथा
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा
अन्याय्य दरबारी, कसी सोसाची व्यथा
हाडाचा कास्तकार, मारुती त्याच नाव
वऱ्हाडी वसलेल, रायत त्याच गाव
काबाड कष्ट करे, पोट भराचा राव
शेत माऊली खरे, करायचा निभाव
तिफण भर होती, मालकीची जमीन
खरिप पिक घेती, दिसरात खपून
झडीत मारामारी, पिक गेल वाहून
झाला कर्ज बाजारी, गेला देन राहून
विचारात घेतली, गळा फासी लावून
प्राणज्योत विझली, नाही रायला जीता
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा।।१।।
असाच कास्तकार, होता शामा नावाचा
दोनचार येकर, हिस्सा मालकीचा
पुरोठ्याले काठीच, जोडजाड कराचा
कधी मक्तेदारीच, सावड बटईचा
वावरात पेराचा, कापूस ज्वारी तूर
साथ होता घरचा, रोजचे राबणार
दोन बैल खुट्याशी, गाई गोठ्यात चार
वनवा भडकाशी, जळले जनावर
पिक झाल राखड, जगासाठी ईचारं
नाही भेटे सवड, मेला जहर पेता
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा।।२।।
जानबा कास्तकार, करे वलीत शेती
भाजी पाला घेणार, अडा पाण्या वरती
खोद्ली व्हती विहीर, सोता कर्जा वरती
मोटार पंपावर, बिस्त सरवी होती
पोरगी उजवली, करून अडचन
बिल गेल ठकून, कापली गा लाईन
कर्जाचा हप्तासाठी, देन झाला कठीण
सांगून विघ्नापाठी, विहीर गेली खचून
बोल अडला कंठी, केला ईचार त्यान
फिरला दारोदारी, कसा फिरला माथा
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्याची कथा ।।३।।
सुधाकर रावाची, गोष्ट होती न्यारी
कुटुंबात एकची, चालती कारभारी
खर्चात आडमाप, करण्या कास्तकारी
गाईम्हसीचा व्याप, लागून दरबारी
वावरात टोकून, लावला यंदा ऊस
जेवारीच्या पिकान, निसवल कणीस
झाम्या देल्ला पाण्यान, नुसता बंदा तूस
लाल्या मंग आल्यान, उभावला कापूस
खर्च देता मजूरी, मोजता लागे पिस
काल सांगे शेजारी, केली रेआत्महत्या
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा ।।४।।
घडते गावोगावी, असेच हरसाल
सरकार वानवी, ठोकून तिथी पाल
किती मदत यावी, ह्यो एकच सवाल
चेक लाखाचा दावी, होईन काहो भल
कागद जमविता, होते कितीक येले
भेट घेन्या करता, किती येवून गेले
वेळोवळी पुसता, धनी कायन मेले
नुसता चेक देता, नेत्या स्वागत केले
राजकारणी दंग, टिकवासाठी सत्ता
विधवा बने मंग, हुकूमातला पत्ता
ऐका कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा।।५।।
पिकलेल्या मालाले, नाही भेटत भाव
कर्जबाजारी झाले, असे कितीक गाव
कफल्लक जाहले, शेतकरी ते राव
अन्नदात्या लूटाले, लचके तोडे गाव
घाले रोज आंगात, फाटक्या चिंध्या चिंध्या
जगन उपासात, राहून मिध्या मिध्या
मतासाठी पुसता, गावा गावात बंध्या
आता नाही मराच, कर्जापायी मध्या
लढाच हक्कासाठी, शस्त्र घेवून खांध्या
सरकारी धोरणी, हाणू मिळून लाथा
संपे कर्जबाजारी, शेतकऱ्यांची कथा।।६।।
भालचंद्र डंभे, वर्धा
३१/१२/२०२२