नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
चालताना होत गेले पावलांचे कोळसे
पेटलेली वाट होती, पेटले नव्हते ठसे
गाडल्या सिंहासनाची धूळ माथी लेवुनी
चालले क्रांती कराया नामधारी वारसे
आणती अवसान हिरवे... बोडके पाषाणही
मीच नाही फक्त केली पावसाळी साहसे
आजही नव्हतेच पैसे खेळणी आणायला
झोपली होती म्हणा कंटाळलेली पाडसे
पाहतो जल्लोष बाजूला उभा राहून मी
आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे
भाळण्याची मंजुरी मागीतली नाही खरी
पण तरी स्वीकार आता जे जसे आहे तसे
आज जे झाले नकोसे त्याचसाठी एकदा
का करावी लागली होती नको ती धाडसे
या जगाला आपलासा वाटण्यासाठी अता
काय बसवावेत मी डोळ्यांत माझ्या आरसे
म्हण... बदलत्या माणसांना दोष देण्याऐवजी
ही निराळी माणसे अन ती निराळी माणसे
औषधे काळाकडे असतील या रोगावरी
या तुझ्या वाक्यात नव्हते तथ्य काही फारसे
कोण माझ्यासारखा प्रख्यात होता 'बेफिकिर'
मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे
-'बेफिकीर'!
प्रतिक्रिया
अप्रतिम गझल.
चालताना होत गेले पावलांचे कोळसे
पेटलेली वाट होती, पेटले नव्हते ठसे
.
गाडल्या सिंहासनाची धूळ माथी लेवुनी
चालले क्रांती कराया नामधारी वारसे
.
पाहतो जल्लोष बाजूला उभा राहून मी
आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे
हे जास्त आवडलेत.
बाकी गझल फारच सुंदर.
शेतकरी तितुका एक एक!
पाने