![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राख होऊन मेला
हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला
हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ….॥१॥
पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ….॥२॥
महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला
मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला
सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली?
हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली
हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला? ….॥३॥
श्याम्या म्हणे उशिर कारन, मेली माही बायकू
सायेब म्हने, तुह्या बाह्यना, मी कायले आयकू?
माय मरन, पोट्टं मरन, उद्या मरन तुहा भाऊ
आमी किती दिवस मंग असे, हप्त्याबिना राहू?
एकटा मीच खात नाय, वर्तून आडर आला ….॥४॥
“पोट्टं मरन” म्हनल्यावर, झकापकी झाली
तळपायाची आग मंग, मस्तकात गेली
गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागला
अध्धर उचलून सायबाले, भट्टीमंधी फ़ेकला
कोनी अभय ह्यो देस, भलतीकडं नेला?
हप्ता गेला भाडमंधी, भट्टीमंधी मेला ….॥५॥
गंगाधर मुटे
————————————————————————–
भाड = भट्टी, लोहाराचा भाता
पेट्या = दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी
बाह्यना = बहाणा, खोटी सबब
अध्धर = हवेत अधांतरी
————————————————————————–
@ ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
————————————————————————–