नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माझं मरण
जगाचा पोशिंदा म्हणत्यात मला
मातीमोल माल विकतो आहे
अन् मी ...
सरकारी धोरणांवर जगतो आहे
जे मात्र नाना सोंगं घेते
आश्वासनाचे नुसते फवारे सोडते
अचानक निराशाही दाखवते
जणू मलाच गरज आहे त्याची
शेतात माझा जीव गुरफटतोय
मातीमोल माल विकतो आहे
अन् मी ...
सरकारी धोरणांवर जगतो आहे
दुःख नाही मला मी खपण्याचं
दुःख आहे जे सार्यांनाच आहे
पण—बळी जातो माझाच
बळी जाण्याचं दुःख त्याला नाही
कर्जबाजारी बनून जीव तळपतोय
मातीमोल माल विकतो आहे
अन् मी ...
सरकारी धोरणांवर जगतो आहे
धोरणाच्या फवार्यानं सारं बदलेल
मरणखाईतून मी बाहेर पडेल
पण — ही आशा पेलण्यास
मीच असमर्थ ठरतोय
हा फक्त फुसका फवारा आहे
लगेचच वाळून जाणारा
या फवार्यात मी वाळतोय
मातीमोल माल विकतो आहे
अन् मी ...
सरकारी धोरणांवर जगतो आहे
सौ.वीणा अजित माच्छी ,
पालघर.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!