
  नमस्कार !  ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे.  | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दिशा विचारांची –जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी
डॉ.आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
मो.9404032389
आज जागतिक तापमान वाढ,वातावरणातील अतुलनीय बदल,ऋतुचक्रातील बदल,नैसर्गिक अवस्था,अनियमित तापमानातील वाढ,पर्जन्यमान,गारपीट,दुष्काळ,प्रदूषण,अतिवृष्टी या सर्व नैसर्गिक बाबी असल्या तरी त्याला त्या भागातील मनुष्य प्राणी सुद्धा जबाबदार आहे.ही परिस्थिती का निर्माण झाली या विषयी प्रस्तुत लेखात उहापोह केला आहे.
पाच जून हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.    ५ जुन १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॅाकहोम येथे पहिले विचार मंथन करण्यात आले, म्हणून त्या दिवसापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हुणून  साजरा केला जातोय.या दिवशी बदलत्या हवामानाविषयी भविष्यात पर्यावरणाचे-प्रदुषणाचे प्रश्न कमी व्हावेत याकरिता  संपूर्ण जग एकत्र येऊन ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त करू लागले.म्हणजेच बदलत्या हवामानामुळे मानवी जीवन व निसर्गाचा होणारा ऱ्हास याने वसुंधरेला धोका पोहचणार नाही ही बाब ४४ वर्षापूर्वी लक्षात आली. आज मागील ४५ वर्षाचे सिंहावलोकन केल्यानंतर मानवाने केलेली वैज्ञानिक,इलेक्ट्रिक किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रगती जरी चित्तथरारक असली तरी ४५ वर्षापूर्वी ज्या हवामान बदलाविषयी गंभीर रीतीने चर्चा झाली होती ती चर्चा फक्त आजही चालू आहे.
जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) ही जगातील सर्वात मोठी समस्या होऊन बसली आहे. २० व्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांत औदोगिक क्रांती झाली आणि तीव्र औदोगिक विकासाच्या भुकेने माणसाला इतके स्वार्थी बनविले की, त्याने निसर्ग व पर्यावरणाची परवा केली नाही.या अर्धशतकात हवामानात बदल, वाढते प्रदूषण,पर्यावरणाचा व वन्यजीवांचा ऱ्हास अशा विविध बाबींवर धोरणात्मक निर्णय आणि चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृती केली असती तर आज ग्लोबल वार्मिगचा महाराक्षस आपल्या समोर राहिला नसता.आजही त्यांची ही भूक अविरतपणे चालूच आहे.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लड,फ्रांस ,इटली,अमेरिका,रशिया,कॅनडा इत्यादी पाश्चिमात्य देश पूर्णतः औदोगिक स्वरुपात परावर्तीत झालेले होते.पुढे भारत,चीन,जपान ,इंडोनेशिया,सिंगापूर,मलेशिया,कोरिया इत्यादी आशियाई देशही या औदोगिकरणाच्या स्पर्धेत उतरले, १९८० च्या दशकात या स्पर्धेत आणखी इतर काही देशांनी उडी घेतली.सध्या हे सर्व देश ग्लोबल वार्मिंगला जबाबदार हरितगृहवायूचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करण्यात व पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात पुढे आहेत.२०१२ च्या अहवालानुसार कार्बन उत्सर्जनातील आघाडीवरील  देशात चीन २९%, अमेरिका १६%, युरोपीय संघ ११%, भारत ६% यांचा क्रमांक लागतो.या औदोगिक विकासाच्या प्रक्रियेतून वातावरणात कार्बन डायऑकसाईड, मिथेन, नायट्रस ऑकसाईड, कार्बन मोनाक्साईड, ल्क्लोरोफ्लोरो कार्बन इत्यादी वायू सोडले जातात.ज्यामुळे तापमान वाढीला मदत होते.पॅरिस परिषदेत महत्वाचा मुद्दा कार्बन उत्सर्जन चर्चिला गेला,मात्र ही चर्चा अतिशय वरवरची आहे अस म्हणन्याला  वाव आहे.याबाबत दोन वेळा अंतरिक्षात प्रवास करून आलेल्या सुनिता विल्यम्सच्या विधानाचा आधार घ्यावा लागेल.अवकाशातील  पहिल्या प्रवासाच्या वेळी पृथ्वी जेवढी सुंदर दिसली तेवढी दुसऱ्यावेळी दिसली नाही,अस तीन स्पष्ट सांगितल आहे.आताची पृथ्वी आपला निळसर रंग हरवून बसली आहे,हा धुरान भरलेला एखादा ग्रह  वाटतोय.हे तीच विधान संपूर्ण मानवजातीला विचार करण्यास भाग पाडणार आहे.सुनीताला अंतरिक्षातून समोर कोणता देश आहे,तो देश गरीब कि श्रीमंत हे दिसत नव्हत,तिला दिसत होती ती  प्रदुषणान वेढलेली पृथ्वी.
औदोगिकरणानंतर वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. २००१ ते २०१० हे दशक सर्वाधिक उष्ण ठरले तर २०१५-१६ हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष  ठरले आहे. राष्ट्रीय वनधोरण १९८८ नुसार मैदानी भागात २३% तर पर्वतीय भागत  ६७% वनप्रदेश असणे आवशक आहे. मात्र सद्यस्थिती पाहता भारतातील केवळ २३% भाग  वनव्याप्त आहे. अर्थात औदोगिक विकासाच्या नावखाली प्रचंड वृक्षतोड केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास  तर झालाच शिवाय कृषि योग्य जमिनीत घटही झाली. २०१४ मध्ये प्रसिध्द झालेल्या वैज्ञानिक अहवालानुसार २० व्या शतकात जागतिक सरासरी तापमान ०.६ अंश सेंल्सिअस ने वाढले.अशाच प्रकारे तापमान वाढ होत राहिली तर २१ व्या शतकाच्या अंतापर्यंत पृथ्वीचे तपमान ६ अंश सें.ने वाढलेले असेल तर समुद्र जलाची पातळी जवळ जवळ ०.८८ मि. पासून ३ मि.पर्यंत वाढली जाईल.अशावेळी सागरातील बेटे पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही शिवाय ग्लोबल वार्मिंग मुळे जीवजंतू व वनस्पतीच्या भविष्यात ४० % प्रजाती नष्ट होण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. झाडांची बेसुमार तोड करून पक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.नदी,नाले समुद्रात बेसुमार सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे अनेक जलचर प्राणी,प्रजाती नष्ट झाल्या आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. या वर्षीच तापमान ४६ अंश से.पर्यंत पोहचल आहे.नजीकाच्या काळात दिल्लीच तापमान ४९ अंशापर्यंत पोहचेल,नागपूर तेलंगणामधील तापमान ५४ ते ५७ अंश से.पर्यंत पोहचेल असा तज्ञांचा कयास आहे.तापमान ५० अंशाच्या वर गेल्यास माणूस फार काळ जगू शकत नाही,याचाच अर्थ आपण ऱ्हासाच्या  दिशेने वाटचाल करत आहोत.तापमनवाढीमुळे  अनेक जीवजाती नष्ट झाल्या आणि काही नष्ट होऊ घातल्या आहेत.
ग्लोबल वार्मिंगमुळे शेती उत्पादनावर अनिष्ट परिणाम होत आहे.जागतिक पातळीवर अन्नधान्याची टंचाई निर्माण होत आहे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेती,शेती उत्पादने यावर विपरीत परिणाम होत आहे.
राष्ट्रीय पातळीवर पडजमीन विकास संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील एकूण ३०७.५८ लाख हे. क्षेत्रापैकी  एकूण १४४ लाख(४७%) हे जमीन निकृष्ट दर्जाची झाली आहे.यामध्ये २८.४ लाख हे(९%) वनजमीन व इतर १५५.५ लाख (३८ %) ,जमिनी पैकी ५.३ लाख हे (२%) ही खार व अल्कधर्मी तर ११०.२ लाख हे (३६%) ही धूप होऊन निकृष्ट बनलेली आहे. राज्यातील ३०७.५८ लाख हे. क्षेत्रापैकी १७७.३२ लाख हे.क्षेत्र लागवडीखाली आहे. मध्यवर्ती जल व मृदसंधारण प्रशिक्षण संस्था डेहरादून येथे केलेल्या प्रयोगावरून असे दिसून आले की सर्वसाधरणपणे आपल्या देशात दरवर्षी प्रती हेक्टरी सरासरी १६ टन मातीची धूप होते. नैसर्गिकरित्या मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी साधारण ४०० वर्षापेक्षाही जास्त कालावधी लागतो ही बाब समजून घेणे अत्यंत आवशक आहे. जमिनीवरील मातीच्या थराला जमिनीचे फुल असे ही म्हणतात.जमिनीचे फुल चालवी जगाची चूल ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या म्हणीतच मातीच्या थराचे महत्व सामावलेले आहे.
महाराष्ट्रातील राज्यातील एकूण पाऊसमानाचा  विचार केला असता असे आढळले की, कोकण विभागात २००० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, तर सोलापूर, अहमदनगर भागामध्ये ५०० ते  ७०० मिलीमीटर पाऊस पडतो.कोरडवाहू भागात पडणारा पाऊस कमी, अनिश्चित,लहरी आणि  प्रतिकूल विभागणी असणारा असून पडणाऱ्या पावसाची तीव्रता जास्त असते.कोरडवाहू भागात पाऊसमान कमी  असले तरी,हवेची गती अधिक असल्याने जेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्तीचा आहे. पाणी व हवा येथे अधिक सक्रीय असल्याने जमिनीच्या मातीची धूप फार मोठ्या प्रमाणावर होते.त्यामुळे कोरडवाहू शेतीत  माती व पाणी यांचे शक्य तेवढे संधारण करणे  गरजेचे आहे.कारण जुलै व सप्टेंबर या महिन्यात पडणाऱ्या पावसाची तीव्रता खूप असते.एकंदर पडणाऱ्या पावसापैकी १० ते  १५ टक्के पाणी पिकास मिळते,१५ ते २० टक्के पाणी जमिनीवरून वाहून जाते तर ७५ ते ८० % पाणी बाष्पीभवनाद्वारे जमिनीच्या पृष्ठभागावरून निघून जाते.कधी कधी पावसाचा पाण्यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण एक हेक्टरमधून ४० टनापर्यंत जाते. पण नैसर्गिकरित्या १ से.मी. जाडीचा मातीचा थर तयार होण्यासाठी जवळ जवळ १०० ते ४०० वर्षाचा कालावधी लागतो.सततच्या होणाऱ्या धुपीमुळे जमिनीची खोली कमी होते.तसेच जमिनीची सुपिकता कमी होऊन उत्पादनात घट येते.याकरिता वाया जाणारे पाणी जमिनीत साठवून कोरडवाहू शेती शाश्वत ठेवणे आवशक आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन जमिनीची होणारी धुप  कमी होते. वाहून जाणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते.त्याच प्रमाणे जमिनीत ओलावा वाढून उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते असे संशोधनातून  दिसून आले आहे.
उपलब्ध जलसंपतीची साठवण, संवर्धन,व्यवस्थापन व योग्य वापर हा एक चर्चेचा व रोजच्या जीवनाशी निगडीत ज्वलंत प्रश्न आहे. जंगलांची बेसुमार तोड,उपलब्ध पाण्याचा बेहिशोबी व अमर्याद वापर ,जमिनीचा पोत न लक्षात घेता पिकांची लागवड या बाबींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे येत्या सहश्रकात अमुल्य अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास थांबवून पर्यावरणाचा समतोल  राखणे,भूगर्भातील पातळी वाढविणे,वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्याकरिता  आणि ग्रामीण भागात संपन्नता आणण्याकरिता कृषि उत्पादनात वाढ करून सात्यत राखणे,तसेच ग्रामीण व शहरी भागाचा समतोल विकास साधण्यासाठी गावातील जनतेला त्यांच्या उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे ही आपल्यापुढील  प्रमुख आव्हने असून ती समर्थपणे पेलन्याकरिता कोरडवाहू क्षेत्रात मातीच्या जपवणूकीसाठी मृद व जलसंधारण ही काळाची गरज असल्याचे आजपर्यंतच्या विविध मुल्य मापनावरुन आढळून आले आहे.
	 मागील पाच वर्षाचे तापमान बघितले तर २०१३-१४ चा अपवाद वगळता चार वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.१९७२-७३ मध्ये फक्त २४ % पाऊस कमी पडला होता. म्हणजे ७६ टक्के पाऊस पडला होता.म्हणून या वर्षीचा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक आहे.१८७१ ते २०१४ पर्यंत २५ मोठे दुष्काळ पडले  त्यापैकी  ६ दुष्काळ भयानक होते,परंतु  २०१५-१६ या वर्षीचा दुष्काळ सर्वात जास्त भयानक होता. कारण मागील दुष्काळात फक्त अन्न्धान्न्य कमी होते, आता अन्नधान्य भरपूर आहे,परंतु पाणी नाही,पाणी नसल्यामुळे सुक्ष्मजीव,वन्यजीवांवर आणि निसर्गातील अन्य दुर्मिळ वनस्पतींवर त्याचा  परिणाम होऊन पर्यावरणास धोका पोहचत आहे.
पर्जन्यमानाबरोबरच, हवामानातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तापमान.देशामध्ये दरवर्षी ०.१८ से.ने तापमान वाढ होत आहे.२० व्या शतकाच्या मध्यात खरीपात २.५ से. ने. व रब्बी हंगामात ४ से. ने. वाढ झाली आहे. ही तापमान वाढ ७.५ से. पर्यंत झाल्यास त्याचे जीवसृष्टीवर फार भयानक परिणाम होतील.मुख्यतःहरितगृह वायू,जंगल तोड आणि सततचे पीक नियोजन या गोष्टीमुळे वातवरणात बदल होत आहेत.१९७० मध्ये कार्बेन उत्सर्जन ८०० डीसेबन होते  तर २०११ मध्ये २००० डीसेबन एवढे अडीच पट वाढले आहे. कार्बेन उत्सर्जनाचा वेग  वाढल्यामुळे अवेळी पाऊस, गारपीट  या सारख्या पर्यावरण समतोल बिघडविनाऱ्या घटना घडत आहेत. वातावरणातील बदलला सामोरे जाण्यासाठी पिकांची फेरपालट,जमीन लवकर आच्छादित करून टाकणाऱ्या पिकांची लागवड, आंतरपीक पद्धती,बहूपिक पद्धती,एकात्मिक शेती पद्धती ,संवर्धित शेती,मुलस्थानी मृद व जल संधारण,वृक्ष संवर्धन,पिकांच्या व पशुधनाच्या प्रतिकारक्षम जाती, कर्बवायू व्यवस्थापन,कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, लवकर पक्व होणाऱ्या, कीड व रोगास प्रतिकारक्षम  जाती निवडाव्यात. शाश्वत विकास व पर्यावरण रक्षण   हे सूत्र सांभाळताना रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड देणे आवशक आहे. राज्यात मोठी वृक्ष लागवड  व रक्षण करावे लागेल. झाड पाऊस झेलतात आणि जमिनीत पाणी मुरवत जमिनीची धूप रोखतात.भूजल पातळीत त्यामुळे वाढ होते.पाणी वाहत राहिले तर ते शुद्ध होते, अशुद्ध हवा स्वच्छ करण्यासाठी झाडांची गरज आहे.
हवामान बदलामुळे होणारी तापमान वाढ व ओझोन थरात झालेल्या घटीमुळे जमिनीवर पडणाऱ्या अतिनील किरणांमुळे जमिनीचे तापमान वाढते.जमिनीचे तापमान वाढल्याने  जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचा  विघटनाचा वेग वाढतो,परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊन सुपिकता कमी होते तर विघटन प्रक्रियेतून उत्सर्जित झालेले कार्बन  डायऑकसाईड व मिथेन वायू वातावरणातील तापमान वाढ करण्यास कारणीभूत ठरतात.हवामान बदलामुळे वारंवार पडणारा दुष्काळ ,पर्जन्यमान कमी होऊन त्या मध्ये दीर्घ कालावधीचा खंड पडणे यामुळे पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन  उत्पादनात घट येते.दुष्काळी परिस्थितीतीत  पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जमिनीतील पिकांच्या मुळांची वाढ खुंटते त्यामुळे पिकांच्या मुळांद्वारे जमिनीस मिळणाऱ्या या सेंद्रिय पदार्थांच्या वस्तुमानात  घट होते.जमिनीत असणाऱ्या कर्बाचे  सक्रीय कर्ब, हुमिक कर्ब व निष्क्रीय कर्ब असे उपप्रकार पडतात. सक्रीय कर्ब पिकांच्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी व सुक्ष्म  जीवाणूंच्या वाढीसाठी हुमिक कर्ब जमिनीचे भैातिक  गुणधर्म सुधारण्यासाठी तर निष्क्रीय कर्ब जमिनीचे तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असतात.हवामान बदलामुळे सक्रीय कर्ब विघटनाचा वेग वाढून त्याचे प्रमाण कमी होईल व कालांतराने त्यापासून बनणाऱ्या हुमिक कर्बाचे  प्रमाणही कमी होईल तर निष्क्रीय कर्बाच्या प्रमाणात वाढ होईल.सेंद्रीय कर्बाच्या जमिनीतील अस्तित्वामुळे ,सुक्ष्म्जन्तु,आणि जीवाणूंच्या जननक्रियेस गती प्राप्त होऊन जैविक संख्येत वाढ होते .सेंद्रिय कर्बाच्या  मूळ स्रोतावर सुक्ष्म जीवजंतूंच्या च्या वाढीची संख्या अवलंबून असते.जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनणूना सेंद्रिय पदार्थाद्वारे  उर्जा पुरवली जाते.त्यामुळे त्यांची कार्य क्षमता  चांगली होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविली जाते .जमिनीत असणारे सुक्ष्म जीवाणू जमिनीतील अन्न्द्र्वयाचे  जैवरासायनिक बदल व अन्न्द्र्वांचे श्रमिकरणास  कारणीभूत असतात.तापमान वाढीमुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे व अनिश्चित पर्जन्यमानामुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पिकांसाठी आवशक्य असणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांवरही अनिष्ट परिणाम होतात.
बदलत्या हवामान परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचे संवर्धन करण्यासाठी कमीत कमी नांगरट,जमिनीची धूप बंदिस्तीद्वारे कमी करावी.पिकांच्या अवशेषांचे आच्छादन म्हणून वापर करावा.(उदा. खोडवा पिकात उसात पाचटाचे नियोजन,अवर्षणप्रवण भागात ज्वारी पिकत तूरकाठ्या,बाजरीचे सरमाडाचे  आच्छादन.) जमिनीची पूर्व मशागत करताना कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर शिफारस प्रमाणे सेंद्रिय पदार्थ/कंपोस्टचा  वापर करावा.जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी कमीत कमी तीन वर्षातून एकदा तग ,धैचा यासारखी पिके  घेवून पीक ५०% फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावीत.जैविक खतांचा बीजप्रक्रियेद्वारे  तसेच शेणखतात मिसळून वापर करावा.पिकांच्या फेरपालटीत  कडधान्यवर्गीय पीक आलटून पालटून घ्यावीत.एकात्मिक अन्नंद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा.खतांची मात्रा संतुलित, योग्य वेळी,योग्य प्रकारे द्यावी.गायराने व कुरणाचा चराईसाठी वापर केल्याने गवताचे वर्षभर आच्छादन राहील.त्यामुळे जमिनीच्या तापमानावर नियंत्रण राहील. सेंद्रिय पदार्थंचे प्रमाण वाढेल.तसेच धुपीस आला बसेल.
मानवाच्या २५० वर्षातील  कर्तृत्वामुळे आज अवघी जीवसुष्टी धोक्यात आहे. पृथ्वी जीवनासाठी आहे, जीवनशैलीसाठी नाही. आता तरी भौतिक विकासाचा हा हव्यास थांबव्यास हवा आणि  मानसिक विकासाकडे लक्ष द्यायला हवे. सर्व देशांनी आधुनिक शेती नव्हे  तर शाश्वत शेती, नैसर्गिक शेती कडे वळावयास हव.पर्यावरणाचा ऱ्हास थांबावयास हवा. अन्यथा पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात जाईल.पर्यावरणाचे संतुलन योग्य राखणे याशिवाय जीवसुष्टीच्या अस्तित्वासाठी आता दुसरा पर्याय उरलेला नाही.आपण जी जीवसुष्टी   पाहतो ती या पट्टयावर उत्क्रांत होण्यासाठी कित्येक  कोटी वर्ष लोटली  आहेत. निसर्गान हे जे निर्माण केल आहे त्याचा नाश करून स्वतःही नष्ट होण्याचा अधिकार कुणालाही नाही.पर्यावरण रक्षण म्हणजे माणसान स्वत:च केलेले स्वत:च रक्षण होय.
यंदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर १  जुलै ते ३१ जुलै,२०१८  या काळात जवळपास १३  कोटी वृक्षलागवडीचे नियोजन केले जाणार आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सामुहिक जबाबदारी आहे.लोकशाहीतील हक्क मागण्यासाठी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून काम केले  तरच निसर्ग आपल्याला जगू देईल,नाहीतर ...कल्पनाही करवत नाही.पाणी-बाणी निर्माण होईल लोकसहभाग,पर्यावरण याचा विचार केल्यास आपल्या पुढील पिढीला भविष्यकाळ असेल.
-------------------------------------------------------------------------------------
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
 
शेतकरी तितुका एक एक!
पाने