नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
उंदरांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
डॉ. युवराज शिंदे (Ph.D. कृषी कीटकशास्त्र )
शेतातील उभ्या पिकाबरोबरच उंदीर खळ्यावरील तसेच साठविलेल्या धान्याचे नुकसान करतात. गहू पिकाच्या बाबतीत विशेषतः पीक ओंब्यावर आल्यावर रात्री उंदीर ओंब्या कुरतडून नासाडी करतात. उंदरांचे मूत्र, विष्ठा व गळालेले केस यामुळे बरेचसे धान्य मानवी खाण्यासाठी अयोग्य होते. धान्याच्या नासाडीबरोबरच उंदीर कावीळ, ऍमिबिओसिस, प्लेग या मानवी रोगांचा प्रसार करतात.
उंदरांचे नियंत्रण -
1) उंदीर हा अतिशय चपळ व चाणाक्ष प्राणी आहे. तेव्हा त्याचा बंदोबस्तही सावधगिरी बाळगूनच केला पाहिजे. प्रथम शेतातील सर्व बिळांची पाहणी करावी. बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करावीत.
2) दुसऱ्या दिवशी यापैकी जी बिळे उघडी दिसतील त्यात उंदरांचे अस्तित्व आहे असे समजावे. या उंदरांना आकर्षित करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा व त्यात थोडेसे गोडेतेल मिसळून विष न मिसळता थोडे थोडे मिश्रण आमिष म्हणून एक/दोन दिवस बिळामध्ये टाकावे. यामुळे उंदरांना या आमिषाची चटक लागेल.
3) तिसऱ्या दिवशी सायंकाळी बिळांमध्ये मात्र झिंक फॉस्फराइड या विषारी आमिषाचा वापर करावा.
4) विषारी आमिष तयार करण्यासाठी कोणत्याही धान्याच्या जाडाभरडाच्या 50 भागात एक भाग झिंक फॉस्फाइड मिसळावे. (उदा. 500 ग्रॅम भरड्यामध्ये 10 ग्रॅम झिंक फॉस्फाइड मिसळावे) यामध्ये थोडेसे गोडेतेल टाकून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या साहाय्याने खोलवर टाकावे व बिळे पालापाचोळा किंवा गवत टाकून झाकून घेतल्यानंतर बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत.
5) सामुदायिकरीत्या याप्रमाणे जर उंदीर संहाराची मोहीम हाती घेतली तर त्याचा अधिक फायदा होतो.
विषारी आमिषाचा वापर केल्यामुळे दुसऱ्या दिवशी शेतात मेलेले जे उंदीर सापडतील ते गोळा करून खड्ड्यात पुरून टाकावेत.
6) विषारी आमिषाचा पुन्हा लगेच वापर न करता 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये जाऊ द्यावा व नंतर विषारी आमिषाचा वापर करावा. अशा प्रकारे संपूर्ण उंदरांचा उपद्रव नष्ट होईपर्यंत ही उपाययोजना करावी.
7) झिंक फॉस्फाइड हे उंदरांप्रमाणेच इतर प्राण्यांसाठी घातक असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करावा.