
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वृत्त - शुभगंगा
मात्रा - ८/८/६
*अकाल पडेल*
संपच झाला यदा कदाचित दाण्याचा
या धरतीवर अकाल पडेल खाण्याचा
मोल भाव का करता मेथी चवळीचा ?
भाव वाढला असून तुमच्या नाण्याचा
शेतकऱ्यांच्या डोळ्यामधुनी गळण्याला
उरला नाही आज भरवसा पाण्याचा
उभ्या पिकांची किंमत असते कवडीची
भाव वधरतो हात लागता वाण्याचा
कुडव पायली गोणा पोते कणग्यांचा
काळ परतुनी यावा अदल्या आण्याचा
कधीच नाही चुकला रस्ता शेतकरी
सराव तळव्याला शेतावर जाण्याचा
शेतकऱ्यांचे दुखणे मांडत नसेल तर
काय फायदा गझला कविता गाण्याचा
✍️
सुनील बावणे - निल
वायगांव (तु.) भद्रावती