Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




शेतकरी गझल मुशायरा वृत्तांत : ११ वे अभाशेसा संमेलन

अकरावे अ. भा.मराठी साहित्य संमेलन
शेतकरी गझल मुशायरा वृत्तांत

११वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन मोहाडी, नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. सह्याद्री फॉर्मचा परिसर हिरव्यागार द्राक्षवेलींनी व टोमॅटो शेतींनी व्यापलेला. प्रशस्त व गगनचुंबी इमारती हे येथील विशेष. संमेलनाचा भव्य हॉल, निवासी व्यवस्था सर्व काही हायक्लास दर्जाचे. शेतकऱ्यासाठी हे दिवास्वप्नच म्हणावे अशी व्यवस्था सह्याद्री फॉर्म व शेतकरी साहित्य संमेलनाने अथक प्रयत्नाने केली होती.
 
सह्याद्री फॉर्मच्या भव्य हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदघाटक नाम फाउंडेशनचे संस्थापक व सिनेअभिनेते नाना पाटेकर, स्वागताध्यक्ष सह्याद्री फॉर्मचे संचालक विलास शिंदे, संमेलनाध्यक्ष भानु काळे, प्रमुख अतिथी वामनराव चटप, पुष्पराज गावंडे, कार्याध्यक्ष गंगाधरजी मुटे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
 
कवी कुसुमाग्रज यांच्या नगरीमध्ये असा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित झाला होता. सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्याच्या समस्येवर व हमीभावावर परखडपणे टीका करत प्रत्येकाचे दु:ख किती मोठे असते अन आपले दु:ख कणभरही नाही. हे मार्मिकपणे सांगितले. सह्याद्री फॉर्मचे संचालक विलास शिंदे यांचे कौतुक करत शेतकरी साहित्य संमेलनाला अनुदानही जाहीर केले.
 
गुरुकुंज मोझरी येथील दहाव्या अखिल भारतीय मराठी संमेलनापासून मी प्रत्यक्ष शेतकरी साहित्य संमेलनाशी जुळलो. पहिल्या साहित्य संमेलनापासून अकराव्या साहित्य संमेलनापर्यंत अनेक वैशिष्ट्यांनी संपन्न ही शेतकरी साहित्य चळवळ. यातील महत्त्वाच्या केंद्रस्थानी व आकर्षणाचे मानबिंदू ठरलेला रसिकांचा आवडता कार्यक्रम गझल मुशायरा.
 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील गझल मुशायऱ्यामध्ये सहभागी गझलकारांमध्ये अतुल देशपांडे, नंदकिशोर ठोंबरे, सुनील बावणे, सतीशसिंग मालवे, अजित सपकाळ, जयश्री वाघ, आकाश कंकाळ, हिरालाल बागुल, गंगाधर मुटे, मारुती मानेमोड, दिवाकर जोशी इत्यादी होते. आदरणीय गंगाधर मुटे सरांनी सातत्याने साहित्य संमेलनामध्ये सर्वप्रथम गझलला सन्मानाचे स्थान देत गझल मुशायऱ्याचा समावेश केला. याबद्दल मराठी गझल सदैव ऋणात राहील.
 
आदरणीय मुटे सरांच्या माध्यमातून शेतकरी साहित्य संमेलनाच्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये गझलेला स्थान दिले जात आहे. अकराव्या अखिल मराठी भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या गझल मुशार्‍याचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार आदरणीय वीरेंद्र बेडसे होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मुशायऱ्यामध्ये अतुल देशपांडे, किशोर ठोंबरे, सुनील बावणे, सतीशिंग मालवे, अजित सपकाळ, जयश्री वाघ, आकाश कंकाळ, हिरालाल बागुल, गंगाधर मुटे, मारोती मानेमोड, दिवाकर जोशी यांचा सहभाग होता.
 
या सदाबहार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर जोशी व मारुती मानेमोड यांनी (ड्युयट) युगलपध्दतीने सूत्रसंचालन केले. संपूर्ण मुशायराच्या केंद्रस्थानी शेतीशी निगडित विषय होते. गझलकारांनी दमदारपणे शेती साहित्याविषयी गझला सादर केल्या. शेतकऱ्याच्या जीवनाला कलाटणी देणारा पण नेहमीच त्याच्या डोळ्यांमध्ये वेदना देणारा भोवताल, शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती, सरकारी अनास्था या विषयांवर अधिकांश शेर सादर करण्यात आले.
 
ठेवला बापापुढे मी शेर बापावर असा
आसवे दोघात आम्ही वाटली मग शेवटी
 
अतुल देशपांडे यांनी बाप लेकाच्या नात्यावर भावनिक भाष्य करून मुशायऱ्याची बहारदार सुरुवात केली. नंतर सुरेल आवाजात एक तरन्नुम गझलेतून आजकाल देशभक्ती सोयीनुसार केल्या जाते. हे सांगणारा सुंदर शेर सुनील बावणे यांनी सादर केला.

सोयीनुसार येथे अंगात देशभक्ती
आहे इथे कुणाच्या रक्तात देशभक्ती
 
नंतर नंदकिशोर ठोंबरे यांचा शेतकऱ्याच्या जीवनातील पाणी व झाडाचे महत्त्व यावर भाष्य करणारा हा शेर बरेच काही सांगून गेला.

पाण्यासाठी गाव रिकामा झाला सगळा
मी माळावर एक रोपटे जगवत गेलो...
 
सतिशसिंह मालवे यांनी जबरदस्त गझल सादर करत संकुचितपणावर, दुंतोडीपणावर प्रहार केला.
 
विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला
मी संकुचित कधीही केला विचार नाही
 
अजित सपकाळ यांनी शेतकऱ्यावर अप्रतिम रचना सादर केली. हे मनुष्या तू चारित्र्य सोडू नकोस आणि गरजेनुसार परिस्थितीनुसार स्वत:ला बदलू नकोस....

चारित्र्य मानवा तू सोडू नकोस आता
गरजेनुसार निष्ठा बदलू नकोस आता
शोधू कुठे अताशा चालाख भामट्यांना
पाण्यात पाहणारे जोडू नकोस आता
 
नाशिकच्या गझलकारा जयश्री वाघ यांनी स्त्री विषयक जाणिवा जपणारी सुंदर गझल सादर करत रसिकांचे लक्ष वेधले
 
आवडो वा नावडो कोणास माझे चालणे
पावलांचा धर्म हा मंजूर नाही थांबणे
लाख घाला बांध किंवा लाख घाला बंधने
कोणत्या सांगा नदीने सोडलेले वाहणे
 
आकाश कंकाळ यांनी शेतकऱ्याबरोबरच अखिल मानव जातीची भूक किती भयंकर असते हे आपल्या शेरातून सांगितले. ज्यामुळे दिवसभर जगरहाटीची धावपळ मानवाला करावी लागते. कधीकधी उपाशीपोटी जीव झोपतात तेव्हा विठ्ठलाला, भूक न लागण्याची त्यांनी विनंती केलेली आहे.

विठ्ठला रे कुणी भीक मागू नये
एक वरदान दे भूक लागू नये
झोपतो देह हा अर्धपोटी जरी
वाटते पण भीती पोट मागू नये
 
हिरालाल बागुल यांनी काळीज स्पर्श करणारा शेर सांगत प्रेक्षकांना अंतर्मुख केले.

कुणाला जन्म देणारी हवी आहे
कुणाला वाटते गर्भात मारावी
यामुळे लेकीस मी कवटाळतो
ऊब मिळते मायेच्या गर्भातली
 
गंगाधर मुटे यांनी सुटे शेर ऐवजी मुटे शेर ऐकवीत दर्जेदार व वास्तविकतेची चुणूक रसिकांना दाखवली. प्रखरतेने प्रहार केला. प्रत्येकजण रस्त्यावर चालत असताना आपल्याच ऐटीत चालत असतो. नेमका आजूबाजूंच्या काट्यांकडे कधीही बघत नाही. त्या काट्या मागून चालणाऱ्याकरीता इतस्ततः पसरविले जातात. मागून चालणाऱ्याकरीता ते सोडून दिले जातात. तात्पर्य बदलती सरकारे धोरणे यामुळे बळीराजाचे हाल होत आहेत.
 
मस्तीत चाललो मी, तुडवीत कूपकाट्या
करतील आमरस्ता, मागून चालणारे
 
कोरा कागद कविता संग्रह कविवर्य तथा गझलकार संजय गोरडे यांनी दमदार सुरुवात करत काही गहन शेर ऐकविले. सौभद्र हे टोपण नावाने ते स्वत:ला संबोधित करत गझलेच्या पालखीचा मामुली भोई समजताना म्हणतात

कवी सौभद्र नावाचा इथे कोणीतरी आहे
गझलची पालखी ह्या मामुली खांद्यावारी आहे
 
शेतीमातीचे पाईक आणि बळीवंशाकडून रक्तामांसाचे नातेवाईक आपण असून सुद्धा शेतकरी आपल्यासाठी कधी लढत नसल्याची खंत त्यांनी या शेरातून व्यक्त केली.

रक्तामांसाचे जरी गणगोत आपण
आपल्यासाठी कधी लढलोत आपण
 
त्यानंतर मारुती मानेमोड यांनी सुंदर गझल मर्मस्पर्शी रचना सादर करत रसिकांचे मन जिंकले.
 
दुर्भाग्यतेचा, गरिबीचा आणि असहायतेचा शिक्का शेतकऱ्याच्या कपाळावर मिरवत नशीब फसवते. म्हणून इच्छा वांझ म्हणून मला जेणेकरून जीवनात कोणतीच इच्छा राहणार नाही. असे ते उद्विग्नतेने म्हणतात

छोटी द्यावी किंवा थोडी मोठी द्यावी
भाळावरती एक तरी रेघोटी द्यावी
पुनर्जन्म इच्छेचा होतो भाेगानंतर
मजला अंतिम इच्छा तू वांझोटी द्यावी
 
बहारदार रचनांनी संमेलन छान उंचीवर गेले. वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी सगळीकडे उल्हास असतो. त्यामुळे शेतकरी सुद्धा अत्यंत आनंदी असताे. मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोल जाणत नाही. त्यावेळी वसंत अशी परिस्थिती अचानक पालटे नेमके हे दुःख दिवाकर जोशी यांनी पुढील शेरांमधून मांडले.

गर्द हिरव्या पालवीचा देठ काळा होत आहे
शेवटी माझ्या वसंताचा उन्हाळा होत आहे
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले वीरेंद्र बेडसे हे नामांकित गझलकार असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांच्या गझलेचा समावेश झालेला आहे. आत्मनिर्भरता आणि देह यांतील सहसंबध अगदी सटीक या शेरात त्यांनी मांडले.

देह हा पाण्यावरी ठेवायचा तरता किती
बुडबुडा मी त्यात माझी आत्मनिर्भरता किती
टाळलेस तू मागे बघणे वळता वळता वळता
की नजरेची भेट राहिली घडता घडता
हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना
दिसली त्याला प्रिया असावी पळता पळता
 
अशा शेरांमधून त्यांनी मैफिलीत रंगत आणली.
 
आदरणीय विरेंद्र बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या गझल मुशायऱ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होता आले.. हे अहोभाग्यच. कार्यक्रमाकरिता अथक परिश्रम घेणारे आदरणीय गंगाधर मुटे व त्यांच्या सर्व टीमचा मी मनपूर्वक आभारी आहे. शेतकऱ्याचे अध्वर्यू शरद जोशी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी हे संमेलन निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास वाटतो.

आता सुजाण व्हावे शिकण्यास लेखणीने
चतुरंग वित्तशेती, रूजण्यास लेखणीने
नवज्ञान निर्मितीला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा, भिजण्यास लेखणीने
 
अजित सपकाळ
अकोट जि. अकोला
मो ९७६६२०१५३९
Share