समान मजुरी हा स्त्रीचा अधिकारच!
शेतमजूर स्त्रियांच्या परिप्रेक्ष्यातून
शेती हा व्यवसाय अनेकांना सामावून घेणारा आहे आणि शेतकरी हा दातृत्वशील आहे. परंतु सद्यस्थितीत शेती व्यवसायाची दारुण अवस्था आणि शेती व शेतकऱ्यांची दूरावस्था या बाबी पाहता त्यांच्याबद्दलची चिंता व चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खेडे म्हणजे जमीन, खेडणे म्हणजे जमीन कसणे, खेडूत म्हणजे शेतकरी आणि खेडूतांची वस्ती म्हणजे खेडे होय असे त्रिं. ना. अत्रे म्हणतात. ज्या खेड्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार शेती हा आहे. ग्रामीण भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यास तुकडोजी महाराज ग्रामनाथ असे म्हणतात. ज्याचा स्वामी, दाता, पोशिंदा, मालक असाही अर्थभाव होतो. ग्रामसंस्कृती ही अनेकांना सामावून घेणारी, सर्वच घटकांना जे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदारांना उदरनिर्वाहाचे साधन किंवा अवकाश देणारी संस्कृती आहे. जसे- सुतार, लोहार, कुंभार..वगैरे
अशा संस्कृतीत बहुजनांचा समावेश व परस्परावलंबन हेच ग्रामसंस्कृतीचे, कृषी संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. शेती व्यवसायाला अधिक माणसांची मनुष्यबळाची गरज असते. शेती कसण्यासाठी जेवढी माणसं असतील तेवढी कमीच मानली जातात. म्हणून शेतीवर अनेकांची उपजीविका भागत असते. पण त्यास निसर्गाची अनुकुलता, शासनाची, व्यापाऱ्यांची पोषकता हवी असते. जेणेकरून शेतकऱ्याला, शेती व्यवसायाला गतिशील ठेवता येईल.
भारतीय समाजात सर्वत्र सामाजिक स्तरीकरण आढळते. जसे: जात, वर्ग वगैरे तसेच ग्रामीण भागातही जातीय विषमता आणि स्तरीकरण आढळते. ग्रामीण भागातही ज्या जाती श्रेष्ठ, वरच्या स्तरातील आहेत. त्यांच्याकडे जमीन, संपत्ती, अधिकार अधिक असतात. इजारदार, जमीनदार अशा उपाध्या त्यांना मिळालेल्या असतात. परंतु याच ग्रामांमध्ये अल्पभूधारक किंवा भूमिहिनांची संख्याही दखल घेण्याजोगी आढळते आणि यामध्ये भारतीय जाती व्यवस्थेने ज्यांना उपेक्षित, वंचित, शोषित ठेवले त्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्याच वर्गातील भूमिहीन, अल्पभूधारक स्त्री-पुरुष, शेतमजूर म्हणून काम करतात. पूर्वी तर अनेक पुरुष ‘सालदार’ म्हणून राहत असत. त्यांचे कुटुंबही सोबत असे. आजमितिला यांत्रिकीकरणाचा वापर, पीक पद्धतीतील बदल आणि खर्चिक शेती व तोट्यात जात असलेला शेती व्यवसाय यामुळे सालदार ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शेतमजुरी ही रोजंदारीनेच सुरू असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी आढळते. मजुरी कामाच्या स्वरूपानुसार दिली जाते. शेती व्यवसायात महिलांना मिळणारी मजुरी ही पुरुषांच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्याने कमी असते. हे विषमतेचे चित्र असंघटित क्षेत्रात देखील आढळते. जसे- बांधकाम क्षेत्र. पुरुषाला ४५०/- रुपये दर दिवसाला मजुरी असेल तर स्त्रियांना केवळ ३००/- रु. दिले जातात. पुरुष शिलाईदाराला ४००/- रुपये दर दिवसाला मिळत असेल तर स्त्रियांना केवळ २००/- रुपये दिले जातात. शेतमजूर पुरुषाला जर ४५०/- रुपये मजुरी असेल तर स्त्रियांना २००/- रुपये मजुरी दिली जाते. समान कामाला असमान वेतन दिले जाते. हा लिंगभेद वागणूक किंवा मिळणारा मोबदला लिंग आधारित दिला जातो. कामाचे तास, स्वरूप सारखे असले, तरी अशी विषमता का? असा प्रश्न अनेक शेतमजूर स्त्रियांच्या मनात येतो. तर अनेकजणींना असे वाटते, की आपल्यात पुरुषाएवढी ताकद नाही म्हणून आपल्याला मजुरी कमी मिळते. हा न्यूनगंड, असमान मूल्य ह्या बाबी समाजमनात असलेल्या लिंग आधारित भेदभावामुळे घडून येतात. असे स्पष्ट दिसून येते.
समाजातील लिंग भेदभाव दूर करण्यासाठी आणि कष्टकरी महिलांना पुरुषांसमान कामाचा दाम मिळण्यासाठी शासनयंत्रणा, स्वयंसेवी संस्था, राज्यकर्ते, शेतकरी वर्ग, ठेकेदार या सर्वांनी लिंगसमभावाचे तत्व अंगीकारून स्त्री-पुरुष समानता राखली पाहिजे. ‘समान कामास समान मजुरी’ (दाम मूल्य) दिले पाहिजे. सोबतच शेती व्यवसाय आणि शेतकरी यांना प्रगतशील ठेवण्यासाठी राज्यकर्ते आणि शासन यंत्रणा यांनी महत्त्वाची भूमिका वठवावी. जेणेकरून आमचा पोशिंदा समृद्ध राहील व त्याची दातृत्वाची भावना दृढ करायला आणि लिंगसमभावाची मनोवृत्ती विकसित करायला बळ मिळेल.
ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेत तुकडोजी महाराज शेतकऱ्यांस गौरवितांना म्हणतात.
सर्व ग्राम सुखी करावे,
अन्न वस्त्र पात्रादी द्यावे,
परी स्वतः दुःखची भोगावे,
भूषण तुझे ग्रामनाथा!
धनी समृद्ध राहिला तर आम्हाला सढळ हाताने देईल.
आम्हा बायकांना आणि माणसांना सारखी मजुरी असावी. आम्ही पण शेतात माणसां एवढेच काम करतो. तेवढेच तास राबतो. शासनाने हमीभाव तर द्यावाच पण समाजमनाने आमच्या कामाला व मिळणाऱ्या दामाला समान मानून ‘समानता हा आमचा हक्क’ समजावा व समान मजुरी द्यावी. अशी या महिला वर्गाची मागणी आहे. ती समाजमनाने व शासन यंत्रणेने पूर्ण करावी, एवढीच अपेक्षा.
प्रा. डॉ. सीमा शेटे, नवलाखे
समाजशास्त्र विभाग प्रमुख
सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ.