पुराण काळात एक राजा होऊन गेला, त्याचे नाव “ बळीराजा ” त्या काळात शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल होते, समृद्धी होती,सुरक्षा होती,शेतकरी आनंदी ,समाधानी व सुखी होता त्याचा बटू वामनाने बलीप्रतीपदेला कपटाने घात केला, त्याला पाताळात गाढले अशी पुराणात कथा आहे .या बटू वामनालाच विष्णूचा ‘वामनावतार’ ग्रामीण भागातील स्त्रिया आजही बलीप्रतीपदेला स्मरण करतात , ‘‘ईडा पिडा टळू दे ,बळीचे राज्य येऊ दे .’’
शेतीचा शोध लागणे आणि शेतमालाची लुट होणे हा प्रवास सोबतच चालला ,फक्त बटू वामनाचे कालप्रवाहात स्वरूप बदलले,सुरवातीला चोर ,लुटारू ,नंतर दरोडेखोर नंतर राजे आणि आता तथकथित स्वातंत्र्यानंतर धोरण राबविणारे प्रशासन,लोकप्रतिनिधी,मंत्रिमंडळ अर्थात लोकशाहीतील राज्यकर्ते त्यासोबत काही महापुरुषांनी शेतीच्या शोषणाविरुद्ध विचार मांडले,लढा दिला,संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यात शेतकऱ्यांचा राजा “छ.शिवाजी महाराज”, शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे “म.ज्योतीराव फुले”,शेतकऱ्यासाठी ग्रामगीता लिहून त्यांना अर्पण करणारे “वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”,स्वातंत्र्यानंतर “जय जवान जय किसान” नारा देणारे दुसरे पंतप्रधान “स्व.लालबहाद्दूर शास्त्री”,त्यानंतर शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळणे हा त्यांचा श्रमसिद्ध हक्क आहे. हे सांगणारे,शेतकऱ्यांमध्ये चेतना निर्माण करून त्यांच्यासाठी आयुष्य अर्पण करणारे “युगात्मा शरद जोशी”.हा शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेणाऱ्या महापुरुषांचा प्रवास आहे.
या संपूर्ण प्रवासात शेतमालावर प्रक्रिया करणारे यंत्र येण्यापूर्वी महात्मा जोतीबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात लिहिल्यानुसार धर्म व कुप्रथेच्या माधमातून शेतीची लुट होत होती.त्यानंतर वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितल्यानुसार –
कच्चा माल मातीच्या भावे,पक्का होताची चौपटीने घ्यावे |
मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन,पिकवोनिया उपाशी || ग्रामगीता ||
इंग्रज आमदानीत भारतीय शेतकऱ्यांचा माल कापूस,ज्यूट इ. लंडन, माचेस्टरला नेतो व तेथून कापड तयार करून चौपट भावाने येथे विकतो,आपल्या देशाला वसाहत म्हणून वापरतो म्हणून स्वदेशी ची चळवळ सुरु झाली.या लढ्यात बाबू गेनू सारख्या तरुणाने मालाने भरलेल्या ट्रक खाली स्वतःला चिरडून घेतले.
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले.शेतकर्यांना न्याय मिळेल हि अपेक्षा होती.कारण स्वतंत्र्याच्या चळवळीत शेतीचा शोषणाचे प्रश्न होते उदा. कापूस, जूट, मीठ ,निळी ई. प्रश्न घेऊनच स्वातंत्र्याची लढाई लढल्या गेली होती.शेत मालाच्या व्यापारातून व प्रक्रियेतून इंग्रज शेतकर्यांना लुटतो,देशाला लुटतो .भारतीय शेतकरी म्हणजे देश.शेतीवरच सर्व अर्थव्यवस्था अवलंबून होती. पण पुन्हा राज्यकत्यांनी देशांतर्गत वसाहत वादी धोरण कायम ठेवले.कारण औद्योगिकरणाचा विकास करायचा होता त्यासाठी कारखान्याला लागणारा माल स्वस्त व कामगारांना खायला स्वस्त धान्य पुरवायचे होते. ‘ आयजीचा उरावर, बायजी उदार’ हे धोरण राबविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ राज्य घटनेत केवळ ८ परिशिष्टे होती.त्यात १९५१ मध्ये घटना दुरुस्तीचा नावावर परिशिष्ट ९ जोडण्यात आले. त्यात २८४ कलमा लिहिण्यात आल्या त्यापैकी २५७ कलमा शेती विरोधी लिहून पुन्हा शेतकऱ्याला शोषणाच्या खाईत ढकलण्यात आले.
१) जीवनावश्यक वस्तूचा कायदा (१९५५)
२) शेतमाल वाहतूक कायदा
३) जमिन धारणा नियंत्रण कायदा
४) शेतमाल उद्योग प्रक्रिया कायदा (१९५१)
५) देशातील बाजार पेठेवर राज सत्तेचा अधिकार
६) या नियंत्रणामुळे शेतीमाल व विविष्टावर ७२% कर लावून शेती क्षेत्राची लुट ई.
परिमाणत: राज सत्तेचा आर्थिक व्यवहाराशी झालेला संगम , नियोजन मंडळ हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरले.राजकारण पैसा कमावण्याचा धंदा बनला. याचे मूळच त्यात दडले आहे.कारण उद्योगासाठी परवाना ,परमिट ,कोटा पद्धत सुरु झाली.अनुउत्पादक नोकरशाही शिरजोर झाली.उद्योजक अडचणीत - भ्रष्टाचार बोकाळला ,नव ग्रामीण औद्योगिकरणाचा मार्ग कायम बंद झाला.
या घटना दुरुस्ती बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेतील आपल्या भाषणात “ गलिच्छ ’’ व “ राक्षसी ’’ म्हटले होते.
१९७० च्या दशकात डॉ.स्वामिनाथन यांच्या नेतृत्वात हरितक्रांती आली.हायब्रीड संकरित वाणामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले,अन्नधान्याची समृद्धी वाढली,धान्य टंचाईचा प्रश्न सुटला पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही.कारण शेतमालाचे भाव खालच्या पातळीवर ठेवणारा परिशिष्ठ ९ मधील जीवनाशक कायदा (१९५५) त्याकरिता समाजवादाच्या नावाखाली प्रक्रियाबंदी,झोनबंदी,जिल्हाबंदी,प्रांतबंदी शेतमालाची आयात,शेतमालाची स्वस्त दराने जबरदस्तीने बाजारभावाच्या निम्मे दराने शासकीय खरेदी (लेव्ही वसूल करणे ) करणे अशाप्रकारे देशी राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी “लुटारुंच्या फौजा” ठरल्या .परंतु १९८० च्या दशकात शेतकऱ्यांना याची जाणीव होऊ लागली हे सर्व देशभक्तीच्या नावावर, कायदा व नियमाच्या नावाखाली शेतकरी सहन करत गेला.
त्याचवेळी शेतकऱ्यासाठी एक अत्यंत उच्चविद्या विभूषित प्रतिभावंत स्वातंत्र्यसुर्य उगवला “युगात्मा शरद जोशी.” त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून स्वत: नेतृत्व केले. शेतीविरीधी कायदे शिथिल व्हावे,नष्ट व्हावे यासाठी आंदोलने सुरु झाली,टोकाचा संघर्ष झाला,मोठ्या प्रमाणात मंथन सुरु झाले. शेतकरी,महिला,तरुण रस्त्यावर येऊन लाखोच्या संखेने आदोलनात सहभागी झाले .परंतु सरकारच्या धोरणात,त्यांच्या नीतीत बदल झाला नाही.१९९४ मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.शेतकरी संघटनेने मा.शरद जोशींच्या नेतृत्वात त्याचे स्वागत केले.केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापार व जकात करारावर (gatt) सही केली. १४० देश या करारात सभासद झाले.मा.शरद जोशींना अपेक्षा एवढीच होती की,देशी राज्यकर्ते शेतकऱ्यांना न्याय देत नाही तर खुल्या व्यापारातून तरी शेतमालाला न्याय मिळेल.
आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराच्या निमित्ताने भारतीय शेतकऱ्यांची लुट जगापुढे आली.ती भारतीय शेतकऱ्यांना (- उणे) अनुदानाच्या रूपाने कळली. एवढाच फक्त त्यापासून फायदा झाला. या करारानुसार सभासद राष्ट्रांनी उत्पादन खर्च + 10 % नफा इतके संरक्षण त्या देशातील सर्वच क्षेत्रातील उत्पादकांना,शेतीला सुद्धा द्यावे. असे ठरले होते.
परंतु भारतीय राज्यकर्त्यांनी जुनीच नीती कायम ठेवली उलट शेतीक्षेत्रातील नवीन जगभरात मान्यता असलेल्या संशोधनावर व तंत्रज्ञानाच्या वापरावर बंदी घातली. ती आजही सुरूच आहे. स्वातंत्र्यानंतर समाजवादाच्या नावाखाली शेतीमालावर बंधने लावून व खुल्या व्यवस्थेत करार तोडून शेतमालाची आयात व निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना लुटण्याचाच शासनाने धंदा सुरु केला..समाजवादी व्यवस्था (कायद्याचे राज्य )व मुक्त व्यापार व्यवस्था या दोन्ही व्यवस्थेत राज्य कर्ते शेतकऱ्याला बेईमान ठरले.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक सन्मान धोक्यात आला.भांडवल विकून तो जगू लागला शेती उत्पादनाची एकूण भांडवली व्यवस्था (खटला )कोसळली व कर्ज बाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करू लागला.आज रोजच्या शेतकरी आत्महत्या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात.आज पर्यंत त्याकरिता अनेक शोध सामित्या शासनाने नेमल्या.त्या सर्वच समित्यांचा अहवाल जवळ पास असा की, शेत मालाचा उत्पादन खर्च निघत नाही, म्हातारपण, आजारपण, कौटूबिक खर्च, शिक्षण ,लग्न प्रसंग ,शेती उत्पादनाच्या साधनांचे वाढलेले खर्च ,त्यामुळे आलेल्या कर्ज बाजारी पणा मुळे तो आत्महत्या करतो.त्याला संरक्षणाची व मदतीची गरज आहे. तरीही राज्य कर्त्याच्या नीतीत काहीही फरक पडत नाही.आज शेतकरी शेतीत हतबल आहे ,शेतकर्याची मुलं शेती सोडून जात आहे, छोट्या - मोठ्या नोकरीत त्यांना शेती पेक्षा अधिक सुरक्षितता दिसते.ग्रामीण भागातिक शोषीत ,भणंग स्थिती मुळे शेतकऱ्याचा मुलाला कोणीही मुलगी द्यायला तयार नाही हि सामाजिक स्थिती आहे.शेतकर्यांनी कंटाळून शेती सोडावी व ती मोठमोठ्या उद्योगाच्या ताब्यात द्यावी व त्यांचे कडून खंडण्या वसूलत राहाव्या. अशी सर्वच पक्षांच्या राज्य कर्ताची धोरणे दिसतात.
म्हणून या देशातील बळीराजा हा बळी देण्यासाठीच जन्माला येतो की काय? असे वाटायला लागते.
‘‘ त्याच्या वेदना त्यातच गुदमरल्या
अन मरत जगण्यापेक्षा
त्यानं आपलं रोजच मरण पत्करलं
त्याचा मरणाचं सत्य शोधन सुरु झालं
सत्य कळूनही मरण नालायक ठरवल्या गेलं
अन त्याचा आकांताच्या वेदना
पुन्हा इथेच गुदमरल्या
इथेच गुदमरल्या...... ’’ ( ‘‘ गुदमरलेल्या वेदना ’’ या कवितेतून )
काळ कितीही वाईट असो , इतिहास असा सांगतो कि, हुकुमशाही राजवटीत रयतेने बंड केले , जुल्मी राजसत्ता हाणून पाडली .रयतेने न्यायाचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला व ते यशस्वी झाले.या उलट समाज जर सहनशील ,अन्याय सहन करणारा असला ,आत्महत्या करेल पण आवाज काढणार नाही ,लढणार नाही.असा षंढ मानसिकतेचा समाज लोकशाहीत सुद्धा ( लोकांनी ,लोकाकडून ,लोकांकरिता स्थापन केलेले राज्य )गुलामीत जाऊन शोषीत –पिडीत जीवन जगतो.
ही अवस्था आपण आज जगत आहोत.बळीराज्याला सावध करण्यासाठी दैत्य गुरु शुक्राचार्य आले पण ,दातृत्वाच्या नशेत ,पूर्वजांच्या दातृत्वाच्या बटू वामनाने केलेल्या स्तुती पाठात आमचा बळीराजा वाहून गेला. त्यावेळी सावध झाला नाही व तो बटू वामनाचा तिसऱ्या पावलाने पाताळात गाडला गेला.आपल्याला सुद्धा १९८० मध्ये युगात्मा शरद जोशी ने सावध केले.त्यांनी आपल्यासाठी सर्व सुखाचा ,सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य अर्पण केले.परंतु त्यांचेवर विश्वास न ठेवता आम्ही शेतकरी जाती -धर्मात वाहून गेलो व आमचे लोक प्रतिनिधी आमचा साठी देव चिमण्या ठरल्या .
पोशिंदा ,अन्नपूर्णा ,अन्नदाता नामाभिधान देतो आम्ही , करा हाडाचि काडं ,पिकवा तुम्ही ,
विकावे कुठें ? कसें ? तें ठरऊ आम्ही , सीमेवरती पोलीस बसवूं ,तरि तुम्हासच बडवूं
असे आजच्या बटू वामनाचे स्वरूप आहे .हा बटू वामन ‘अन्न सुरक्षा कायदा’ करतो पण ‘अन्न उत्पादक सुरक्षेचा ’ विचार त्याच्या डोक्यात कधीच येत नाही.
आतातरी आम्ही या बटू वामनाला ओळखून सावध होऊन विशेषतःतरुण शेतकऱ्यांनी संघटीत पणे युगात्मा शरद जोशींनी दिलेल्या चतुरंग शेतीचा वापर करून पुढील वाटचाल केली पाहिजे . आज आपल्याला सह्यांद्री अग्रो प्रो.कंपनी चे संचालक आदरणीय विलासजी शिंदे सारखे अनेक आदर्श व दिशा दर्शक आहेत.तसेच ‘एक हाथ रुमण्यावर तर दुसरी नजर दिल्लीच्या धोरणावर’ ठेऊन लढा देऊया.तरुणांनी यासाठी नवीन तंत्रज्ञाचा वापर करून प्रशिक्षित व्हावे, पुढे यावे त्यासाठी स्वताला झोकून द्यावे. उद्याचा सूर्योदय तुमचा आहे .
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.
पाने