दहावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, गुरुकुंज मोझरी
दिनांक : शनिवार २१, रविवार २२ जानेवारी २०२३
स्थळ : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम, गुरुकुंज (मोझरी) ता. तिवसा जि. अमरावती
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी गुरुकुंज (मोझरी) ता. तिवसा जि. अमरावती सेवाश्रमाच्या पावनभूमीत दोन दिवशीय १० वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शेती साहित्य क्षेत्रातील क्रियाशील सृजन लक्षात घेऊन त्यांच्याप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदाचे १० वे संमेलन गुरुकुंज सेवाश्रमाच्या पावनभूमीची निवड करण्यात आलेली असून संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक मा. डॉ. किशोर सानप यांची संमेलनाध्यक्षपदी तर अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमचे सरचिटणीस मा. जनार्दनपंत बोथे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणारे नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे संस्थापक मा. विलास शिंदे संमेलनाचे उदघाटन करणार असून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष मा. डॉ. रवींद्र शोभणे तसेच वऱ्हाडी कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य मा. पुष्पराज गावंडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या आयोजनाकरिता अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष मा. गंगाधर मुटे आणि संयोजक मा. श्री दिलीप भोयर यांनी कार्यभार स्विकारला असून संमेलनाच्या यशस्वीतेकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. आयोजन समितीमध्ये श्री. दिलीप भोयर, श्री. माधवराव गावंडे, श्री जगदीशनांना बोंडे, श्री. विजय विल्हेकर, श्री. श्रीकांत पाटील पुजदेकर,श्री. सुधाकर थेटे, श्री. संदीप अवघड, श्री. दत्ता राऊत, श्री. सारंग दरणे, श्री. गणेश मुटे, श्री. मुकेश धाडवे, श्री. भाऊराव उमाटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी धारण केलेले विक्राळरूप, अतिवृष्टीने निर्माण झालेल्या ओला दुष्काळ सदृश्य संकटामुळे उत्पादनात येणारी प्रचंड घट, शेतमालाच्या पडत्या बाजारभावामुळे व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, कधी चक्रभुंगा तर कधी बोंडसड, कधी कपाशीवर बोंडअळी तर कधी तुरीवर मर रोग यामुळे शेतीतील उत्पन्नासोबतच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे, विजेचे बिल देखील भरण्याची शेतकऱ्यांची ऐपत उरलेली नाही. अशा बिकट स्थितीतही “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे त्यामुळे प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी सक्तीने व बळाचा वापर करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीमगर्जना केल्या जात आहेत.
समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले नाही. शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे, २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे, २०१९ मध्ये ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण (औरंगाबाद) येथे, २०२० मध्ये ६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग (रायगड) येथे तर कोरोना आपत्तीमुळे २०२१ साली ७ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने, २०२२ मध्ये ८ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरी (यवतमाळ) येथे आणि सप्टेंबर २०२२ मध्ये ९ वे ऑनलाईन संमेलन आयोजित करून पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते, लिहिते व वाचते करण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण वास्तवचित्र आक्रमक आणि सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे.
१० व्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत .या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत.
------------
बातम्यांच्या लिंक :
१) लोकसत्ता
२) लोकस्पर्श
३) ETVbharat
४) RCN DIGITAL
५) शेतकऱ्यांची चावडी
******
गुरुकुंजला कसे पोचावे?
गुरुकुंजला पोचण्याचे अंतर
१) अमरावती - गुरुकुंज मोझरी : ३८ किमी.
२) बडनेरा रेल्वे स्टेशन - गुरुकुंज मोझरी : ४५ किमी.
३) चांदुर रेल्वे स्टेशन - गुरुकुंज मोझरी : ४० किमी.
४) नागपूर - गुरुकुंज मोझरी : १२० किमी.
५) वर्धा - गुरुकुंज मोझरी : ९८ किमी.
प्रतिक्रिया
*महत्वाचे निवेदन*
*महत्वाचे निवेदन*
१) नोंदणी केलेल्या प्रतिनिधींची नोंद घेऊन त्यांना *नोंदणी क्रमांक* पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उद्या रात्रीपर्यंत सर्वांना नोंदणी क्रमांक पोचतील. न पोचल्यास संपर्क करावा.
२) काही विशेष कारणाने कुणाची नोंदणी करायची राहून गेली असल्यास ते उशिरात उशिरा उद्या दुपारपर्यंत नोंदणी करू शकतात.
आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे!
आपलाच सहकारी
*गंगाधर मुटे*
====
शेतकरी तितुका एक एक!