शरद जोशींचे स्मारक : आजचा संकल्प
वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छांचा वर्षाव करून आपण माझे अभिष्टचिंतन केलेत त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आज एकोणसाठी पूर्ण करून साठीत पदार्पण करताना आनंद व्हावा असे काहीही नसले तरी दुःख मानावे असेही काही कारण दिसत नाही. मात्र यानंतरचे उर्वरित आयुष्य दर क्षणाला वृद्धत्वाकडे वाटचाल करणारे व शारीरिक हतबलता वाढवणारे असेल इतकी जाणीव करून देणारे व आत्मभान जागवणारे नक्कीच आहे.
आता यानंतरच्या उर्वरित छोट्याशा आयुष्याचा पुरेपूर उपयोग सत्कर्मी खर्ची घालायचा असेल तर आयुष्यातील अतृप्त आकांक्षांना मूर्तरूप देण्यासाठी वेळेचा वापर काटकसरीने करण्याची नितांत आवश्यकता जाणवत आहे. त्याच अनुषंगाने एखादा संकल्प करून तो पूर्णत्वास नेण्याची भावना आजच्या दिवशी प्रखरतेने जाणवायला लागली आहे.
बरोबर ७ वर्षांपूर्वी म्हणजे २७ फेब्रुवारी २०१४ रोजी मी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला होता. आणि पाहता पाहता ६ संमेलने यशस्वीपणे पार पडून सातव्या संमेलनाच्या उंबरठ्यावर शेतकरी साहित्य चळवळ उभी आहे. शेतकरी साहित्य ही संकल्पना रुजवण्यात शेतकरी साहित्य चळवळ शतप्रतिशत यशस्वी झाली आहे, याचे समाधान शब्दातीत आहे. या कार्यात आपण दिलेले सहकार्य आणि योगदानही शब्दातीतच आहे. त्या बद्दल मी आपला सर्वांचा शतशः ऋणी आहे.
वयाची साठी नव्या संकल्पासाठी :
आजच्या या शुभदिनी युगात्मा शरद जोशींचे स्मारक विदर्भात उभारण्याचा मी आणखी एक नवा संकल्प करतो आहे. कार्य अत्यंत अवघड असले तरी अशक्य कोटीतील अजिबातच नाही. मी साधारण जीव असलो तरी आपले सहकार्य साधारण नाही त्यामुळे एकमेकांचा हात हातात घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवणे मुळीच अवघड नाही.
हातात हात घालुनी चालूत मित्र हो
माझ्यात तू तुझ्यात मी पाहूत मित्र हो
युगात्मा जोशींचे स्मारक म्हणजे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल असेल. स्मारकाचे स्वरूप, रूपरेषा, आराखडा व नियोजन एप्रिल २०२१ मध्ये सादर केले जाईल. चला तर आज आपण सर्व मिळून संकल्प करूयात की आपल्याला एक वर्षाच्या आत आपण युगात्मा शरद जोशींच्या स्मारकाची पायाभरणी करावयाची आहे.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत!
- गंगाधर मुटे
२७/०२/२०२१