नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोना अरिष्टामुळे सध्या झूम मीटिंग व फेसबुक लाइव्ह अशा माध्यमातून सुरू असलेल्या सातव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आज मंगळवार, २३ मार्च २०२१ रोजी चौथे पुष्प "शेतकरी - स्त्री कवी संमेलन" या रूपाने गुंफण्यात आले. सदर कवी संमेलनाला अध्यक्ष म्हणून चंद्रपूरचे मा. प्रदीप देशमुख तर सुत्रसंचालिका म्हणून वर्धेच्या मा. जयश्री कोटगीरवार या लाभल्या होत्या..
नाशिकचे रवींद्र दळवी यांच्या "कालचा बापू आज ऐकत नाही बापाचं, रोज सांगते मले कास्तकार नाही बनायचं." या कवितेने सुरू झालेल्या सदर कवी संमेलनात अध्यक्षांसह ऐकून सोळा कवींनी आपल्या बहारदार रचना सादर करून अक्षरशः श्रोत्यांची मने जिंकली. नरेंद्र गंधारे (हिंगणघाट) यांनी, "जराशे हितगुज तुमच्याशी" ही कविता सादर करून स्त्री विश्व मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर संजय कावरे (मंगरूळपीर) यांनी "माया कायजाची राणी, काहून डोया आलं पाणी", सचिन शिंदे (यवतमाळ) यांनी, "पातीवरल्या बाया तुडवतात रानवाट दुःखाची", निलेश तुर्के (यवतमाळ) यांनी "परतीच्या पावसानं सारं गेलं वाया", अनुपमा जाधव (पालघर) यांनी "रानातलं पीक बघून शेतकरी सुखावला", संगीता घुगे (नांदेड) यांनी, "घन ओथंबून आले". दिलीप भोयर (अमरावती) यांनी "पुढारी कसे झाले हे येडपट, भाव देऊ म्हणे दिडपट", या स्वरूपाच्या अतिशय अशा प्रभावी कविता सादर केल्या. त्यानंतर आलेले रत्नाकर वानखेडे (अमरावती) यांचा ऑडिओ काहीसा क्लिअर ऐकता आला नाही परंतू त्यांनी देखील खूप सुंदर कविता सादर केली. प्रज्योत देशमुख (अकोला) यांची "खरीपात केला लाल, आता रब्बीवर डोया" ही कविता खरंच भाव खाऊन गेली. त्यानंतर आलेले राजेश अंगाईतकर (यवतमाळ) यांनी "कसाई नेतो आहे आमचे बांधून चारही पाय, सांगा मालक आम्ही असं चुकलो तरी काय" ही अतिशय भावुक करून टाकणारी कविता सादर केली. नारायण निखाते (तळेगाव) यांनी "पाणी अडवा पाणी जिरवा", सूत्रसंचालिका जयश्री कोटगीरवार यांनी "मी नव्या जगाची कैवारी", कार्याध्यक्ष गंगाधर मुटे सरांनी, "सच्चे दिन म्हणता म्हणता लुच्चे दिन आले, शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले" ही कविता सादर केली.
सदर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी शेवटी दिलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व सहभागी कवींना अधोरेखित करून त्यांनी सादर केलेल्या रचनांचा सुरेख मागोवा घेतला. तसेच, "होती गोटाळ्याची तरी वाट पांदनीची" व "हजार बंध तोडूनी लखाख दामीनीपरी" या आपल्या बहारदार अशा रचना सादर केल्या व आजच्या या कवी संमेलनाच्या समारोप झाला.
- डॉ. रविपाल भारशंकर
(अंगारमळा मार्च २०२१ मधे प्रकाशित)