नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
रेंज इथं मिळत नाही...
खूप दूर आहोत सर, नाळ काही जुळत नाही
ऑनलाईन शिक्षणाला, रेंज इथं मिळत नाही...
पाऊस तसा खूप झाला
पीक सुद्धा खळ्यात आले
ओतून थेंब घामाचे
मोबाईलला बोलते केले
भाव त्याचा वाढला तरी, पिकास भाव मिळत नाही...
बाप म्हणतो पोर माझी
हुशार आहे, शिकंल ती
अक्षरांना पेरता पेरता
धसकटांना बोठवल ती
टॉवरचं पण शिक्षणाच्या, तोंड इकडं वळत नाही...
जगा जगा म्हणतात सारे
टेक्निकचे घेऊन बळ
तिथल्या इथल्या जगण्यातल्या
अंतराचा पुन्हा सल
असो-नसो महामारी, काळीज कापणं टळत नाही...
राहून जाईल स्वप्नामधीच
जगणं इथलं ऑनलाईन
पाठ मात्र खुरप्याची
असते सदा ऑफलाईन
नवसाला मोबाईलच्या, टॉवर कारण फळत नाही...
भरेल शाळा, शिकेन मी
तुडवीन रस्ते काट्यांचे
टॉवर होईल मीच माझा
सोडवीन प्रश्न अंतराचे
पाहीन वाट सर मी, जोवर संकट टळत नाही...
रावसाहेब जाधव
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने