बरं झालं देवाबाप्पा.....!
दोन दिवसापूर्वी मी एका वृत्तपत्राच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे काही अनोळखी राजकीय मंडळी बसली होती. माझ्या छातीवरचा बिल्ला बघून चर्चेला तोंड फुटले. तसा हा नेहमीचाच प्रकार आहे. बिल्ला बघितल्याबरोबर काही विशिष्ट लोकांच्या टाळक्यात प्रसुतीवेदनेच्या कळा उठायला लागतात आणि शेतकरी संघटना व शरद जोशी यांच्याविषयी काहीतरी खोचक वाक्य प्रसवल्याशिवाय त्यांचे मन काही शांत होत नाही. लालबिल्लेवालेसुद्धा शरद जोशी नावाच्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याने तितक्याच ताकदीने त्यांचे वार परतवून लावत असतात. विषय आर्थिक असो की सामाजिक, मुद्दा धोरणात्मक असो की तार्किक, शेतकरी संघटनेच्या पाईकाजवळ शेतीच्या अर्थकारणाची जेवढी खोलवर जाणीव आहे तेवढी क्वचितच कुणाकडे असेल. चार वर्ग शिकलेले शेतकरी संघटनेचे पाईक मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना निरुत्तर करू शकतात, हे जवळजवळ सर्वमान्य झाले आहे.
तर झाले असे की, चर्चेला सुरवात झाली. खरं तर या चर्चेला चर्चेपेक्षा वादविवाद स्पर्धेचे नाव देणे अधिक योग्य राहील. केंद्रसरकारची धोरणं कशी शेतकरी हिताची आहे, कापूस निर्यातबंदीचा निर्णय कसा ग्राहकांच्या हिताचा आहे, हे तो माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्या समर्थनार्थ तो ज्या मुद्द्याचा आधार घेत होता ते मुद्दे एवढे तकलादू होते की माझ्या एकाच उत्तराने तो गारद व्हायचा. त्या उत्तरावर प्रतिप्रश्न करण्यासाठी त्याच्या जवळ काहीच उरत नसल्याने मग तो लगेच दुसरा मुद्दा पुढे रेटायचा. सरतेशेवटी केंद्रसरकारच्या धोरणांची बाजू घेऊन आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर मग चक्क वैयक्तिक पातळीवर घसरणे आणि शरद जोशींवर टीका करणे ही बहुतेकांना सवयच असते तसाच तोही घसरला. पण इथेही त्याचा टिकाव काही लागला नाही. शेवटी युद्धात हार पत्करल्याच्या मानसिकतेने शस्त्र खाली ठेवावीत, अशा हावभावाने त्याने कान पाडले आणि चर्चा संपली.
विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी चर्चा करावयाची असते. चर्चेतून जे सकस, चांगले, अधिक तार्किक असेल ते स्वीकारायचे असते. आपल्या मनातील अर्धवट किंवा कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचलेल्या विचारांना अधिक तर्कसंगत करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी चर्चा हे प्रात्यक्षिकासारखे माध्यम ठरू शकते. वादविवादातून आपण जोपासलेल्या विचारांची खोली पडताळण्याची संधी निर्माण होते. चर्चा ही समुद्रमंथनासारखी असते. प्रचंड समुद्रमंथनानंतर जे काही विष किंवा अमृत निघेल तेव्हा त्यातील काय स्वीकारायचे आणि काय अव्हेरायचे, याचा विवेकाच्या आधाराने सारासार विचार करून मग त्यापुढील निर्णय घ्यायचे असतात.
परंतु, दुर्दैवाने असे फारसे घडताना दिसत नाही. बहुतांश चर्चा एकतर जिंकण्याच्या, फड गाजवण्याच्या किंवा आपापले घोडे दामटण्याच्या उद्देशानेच केल्या जातात. विधानभवन आणि संसदही याला अपवाद नाही. एखाद्या विधेयकावर किंवा धोरणात्मक मसुद्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्या चर्चेला अनुरूप असे धोरण आखले गेले, असेही फारसे घडत नाही. संसदेतील चर्चा रंगणे म्हणजे आखाड्यात दोन पहिलवानांची कुस्ती रंगावी, अशासारखाच प्रकार असतो. सत्ताधारी पक्ष एका बाजूने तर विरोधी पक्ष दुसर्या बाजूने तावातावाने आपापले घोडे दामटत असतात. त्यात विषयाचे मूळ गांभीर्य कुठेच दिसत नाही किंवा उकल करण्याच्या उद्देशाने मुद्देसूद उहापोह होत आहे, असेही दिसत नाही. चर्चेच्या माध्यमातून एखादा जटिल किंवा सर्वसामान्य जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे, असे फारसे कधीच घडत नाही आणि मग,
असे म्हणायची वेळ येते.
त्या दिवशी माझ्यावरही तीच वेळ आली होती. त्यामुळे मी केवळ उत्तरे तेवढे देत होतो. तो निरुत्तर होत असला तरी त्याला मात्र माझे म्हणणे पटवून घ्यायचेच नव्हते. त्याला त्याचे विचार, चर्चेच्या नावाखाली माझ्यावर लादायचे होते. विषय शेती आणि शेतकरी असला तरी शेतीचे बरे किंवा वाईट यापैकी काहीतरी व्हावे हा त्याचा उद्देशच नव्हता, केवळ मला हरवून जिंकायच्या ईर्ष्येनेच तो तावातावाने माझ्यावर तुटून पडत होता.
फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि फळाची अपेक्षा न बाळगता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दोनच कर्मयोग सांगितलेत. पण काही माणसं अशीही असतात की "कुठल्याही स्थितीत फळ मिळताच कामा नये, असा पक्का निर्धार करूनच कर्म करतात" त्याला कोणता कर्मयोग म्हणावे, याचा उलगडा बहुतेक भगवान श्रीकृष्णाला सुद्धा झाला नसावा, म्हणून तर त्याने एवढी मोठी गीता कथन करूनही त्यात अशा कर्मयोग्याबद्दल अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही.
वृत्तपत्राच्या कार्यालयातील माझे काम आटोपून मी जेव्हा बाहेर पडत होतो. तेव्हा त्याने परत एकदा उचल खाल्ली अन म्हणाला, "तू शरद जोशींचा आंधळा समर्थक आहेस." मी मागे वळून पाहिले, स्मित केले, अन पुढे निघून आलो.
शरद जोशींचे शिष्य, बगलबच्चे, पित्तू, चमचे ही विशेषणे संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी कुणी ना कुणी यापूर्वी वापरलेलीच आहेत. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे, हे प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतच असतो. पण आंधळा समर्थक हे विशेषण माझ्यासाठी नवीन होते. शेतकरी संघटनेच्या विचारांवर माझी श्रद्धा आहे, शरद जोशींनी दिलेल्या "शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव" या एककलमी कार्यक्रमाचा मी समर्थक आहे. मात्र डोळस समर्थक की आंधळा समर्थक, याचा मी कधी विचारच केला नव्हता. गावाच्या गरिबीचे शाळेतील गुरुजनांनी सांगितलेले कारण, महाविद्यालयात प्राध्यापकांनी आणि लायब्ररीतील पुस्तकांनी वर्णन केलेले कारण यापेक्षा शरद जोशींनी सांगितलेले कारण हे अधिक प्रामाणिक, तर्कशुद्ध आणि वास्तवाच्या जवळ जाणारे असल्याने ते मला पटले होते. याच कारणाने मी अल्पवयातच शेतकरी संघटनेकडे खेचल्या गेलो, हे मला माहीत होते. तरीही मी आंधळा समर्थक तर नाहीना? या विचाराने मला ग्रासायला सुरुवात केली होती. श्रद्धा की अंधश्रद्धा, आंधळा समर्थक की डोळस समर्थक हे सिद्ध करण्यासाठी काही शास्त्रशुद्ध फूटपट्ट्याही उपलब्ध नाहीत. आपापल्या सोयीनुसार, कुवतीनुसार व आकलनशक्तीनुसार प्रत्येकजण यासंबंधात वेगवेगळ्या फूटपट्ट्या ठरवीत असतो. या फूटपट्ट्यांचे निकषही व्यक्तीसापेक्ष किंवा समूहासापेक्ष असतात. त्यामुळे या अशास्त्रीय फूटपट्ट्यांनी माझ्या गोंधळात आणखीच भर घातली. मग त्या रात्री काही केल्या झोपच येईना.
आणि अचानकच मला एक फूटपट्टी गवसली. आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे सूत्र गवसले.
गेल्या तीस-बत्तीस वर्षातील शेतकरी संघटनेची वाटचाल ही एकखांबी तंबूसारखीच राहिली आहे. शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी आणि शरद जोशींचे विचार म्हणजेच शेतकरी संघटनेचे विचार. जेव्हा जेव्हा शेतकरी संघटनेला राजकीय स्वरूपाचे किंवा अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेने अधिवेशन बोलावून खुलेपणाने चर्चा घडवून आणली. अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात शरद जोशींनी बीजभाषण करायचे आणि मग त्यावर प्रतिनिधींनी चर्चा करायची. शरद जोशींनी केलेले बीजभाषण शेतकरी प्रतिनिधींना खूप रुचायचे, शरद जोशींच्या शब्दामध्ये शेतीची दशा पालटवण्याचे सामर्थ्य दिसायचे आणि मग त्या बीजभाषणाला एवढे समर्थन मिळायचे की शरद जोशींचे वाक्य हेच ब्रह्मवाक्य ठरायचे. शेतकरी संघटनेच्या पहिल्या/दुसर्या फळीतील काही नेते मंडळी वेगळाच किंवा अगदीच उलट सूर काढायचीत पण त्याला अजिबातच समर्थन न मिळाल्याने ते मुद्दे आपोआपच बाजूला पडायचे. विचार शरद जोशींचेच पण त्याला लोकमान्यता मिळाल्याने ते विचार शेतकरी संघटनेचे विचार ठरायचे. महत्त्वाचे निर्णय शरद जोशींचेच असले तरी ते अधिवेशनाच्या माध्यमातून जनमान्यता पावल्याने त्याला लोकशाही प्रक्रियेचे अधिष्ठान प्राप्त व्हायचे आणि म्हणूनच अधिवेशनात घेतलेले सर्व निर्णय शेतकरी संघटनेच्या पाईकांनीच घेतले होते, असे म्हणावे लागेल.
आंधळे की डोळस याचा हमखास निकाल लावून देणारे मला गवसलेले सूत्र असे की, आजपर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या प्रवासात जेवढे काही निर्णय घ्यायची वेळ आली आणि निर्णय घेतले गेले, ते निर्णय जर मला अजिबात चुकीचे वाटत नसेल किंवा योग्यच वाटत असेल तर मला ते योग्यच का वाटतात, याचा शोध घेणे गरजेचे ठरते. ते मला मनोमन पटले म्हणून मी समर्थन केले की केवळ शरद जोशींवर नितांत श्रद्धा आहे म्हणून मी डोळे मिटून समर्थन केले? याचा जर शोध घ्यायचा असेल तर "शरद जोशी ऐवजी जर मी असतो तर काय निर्णय घेतले असते, असा विचार करून शक्यता पडताळून पाहणे" यापेक्षा अधिक चांगला दुसरा मार्ग असू शकत नाही. मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा असे दिसते की, अनेक निर्णय मी तसेच घेतले असते, जसे शरद जोशींनी घेतले आहेत. त्यात मला आजवर कुठलाच विरोधाभास आढळला नाही. मला असा एकही निर्णय दिसत नाही की येथे शरद जोशींचे चुकले, असे मी म्हणू शकेन. मात्र असे काही निर्णय आहेत की, मी अगदी त्याच्या उलट निर्णय घेतले असते, असे मला वाटते. जसे की, जर अभ्यास आणि आकलन शक्तीच्या बळावर निर्णय घ्यायची माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ आली असती तर मी डंकेल प्रस्तावाला, गॅट कराराला, बिटी तंत्रज्ञानाला, मुक्तअर्थव्यवस्थेला कडाडून विरोध केला असता.
मी नक्की असेच केले असते कारण की मी आयुष्यातले १६-१७ वर्ष शाळा-कॉलेजात शिक्षण घेण्यात खर्ची घालवले, अवांतर साहित्याची पुस्तके वाचून डोळेफ़ोड केली, पुढार्यांची भाषणे मन लावून कानात तेल ओतून ऐकलीत; त्याबदल्यात या सर्वांनी मिळून त्यांना ऐदीने जीवन जगता यावे यासाठी शेतीला लुटून आपापले ऐश्वर्य वाढविण्यासाठी त्यांचा एक हस्तक/दलाल म्हणून मला घडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. सरकार हे शेतकर्यांसाठी मायबाप असते व व्यापारी मात्र लुटारू असून ते पावलोपावली शेतकर्यांची लूट करतात, असेच माझ्या मनावर ठसविण्यात या शिक्षणप्रणालीने कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती. शरद जोशी जर भारतात आले नसते आणि या शेतीच्या लुटीच्या रहस्याचा सप्रमाण भेद जर शेतकरी समाजासमोर खुला केला नसता तर आमच्या सारख्या शेतकरीपुत्रांना मुक्तअर्थव्यवस्थेतच शेतकर्यांचे हित आहे हे कधी कळलेच नसते.
शेतकरी संघटनेचा विचार कानात पडला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. हे गमक ज्याक्षणी मला कळले त्याच क्षणी मुखातून शब्द बाहेर पडले होते,
संघटना शेतकर्यांची असली तरी या संघटनेचा विचार केवळ शेतकर्यांचे हित साधण्यापुरताच मर्यादित नाही. शेतकरी संघटनेने देश वाचविण्याचा विचार मांडला आहे. हा विचार म्हणजे अनेक तुकडे एकत्र करून बांधलेल्या गोधड्यांचे गाठोडे नसून एकाच धाग्याने विणलेले महावस्त्र आहे. बेरोजगारी पासून महागाईपर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या विचारसरणीत आहे. संघटनेचा विचार म्हणजे एक मार्ग आहे. ज्याला ज्याला संघटना कळली त्या सर्वांची वाटचाल ह्याच मार्गावरून व्हायला हवी. विचारधारेतच दिशानिर्देशन करायचे सामर्थ्य असेल तर त्या विचाराशी बांधिलकी जोपासणारे एकाच मार्गाने जात आहे, असे म्हणावे लागेल. त्यात कुणी कुणाचे अंधानुकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
१९८० च्या सुमारास संघटना, चळवळ आणि संप-आंदोलनाचे पेवच फुटले होते. शिक्षकांचा संप, कामगारांचा संप, आसामचे आंदोलन, कर्मचार्यांच्या संघटना, हमालांच्या संघटना, उग्रवादी चळवळीमध्ये बोडोलॅन्ड, नागालॅन्ड, काश्मीर, खलिस्तान वगैरे. कुणाच्याच पदरात काहीच न पडताच या सर्व चळवळी संपून गेल्यात. फक्त शेतकरी संघटनाच एवढा प्रचंड काळ टिकून आहे त्याचे कारण विचारांची ताकद हेच आहे. शरद जोशी नावाचा विचार शेतकर्याच्या घराघरात पोहचला आहे. शेतीतील दारिद्र्याचा नायनाट करण्याची क्षमता केवळ शरद जोशींनी दाखविलेल्या मार्गात आहे, याची सर्वांना खात्री पटली आहे.
मुक्तअर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी जेव्हा या देशातले मोठमोठे उद्योगपती, नामवंत अर्थशास्त्रज्ञ, अर्थशास्त्राचे प्राध्यापक जेव्हा कचखाऊ वृत्ती बाळगून आहे, तेव्हा या देशातला अनपढ-अनाडी शेतकरी मात्र मुक्तअर्थव्यवस्थेच्या बाजूने खंबीरपणे उभा ठाकला आहे. जे भल्याभल्यांना समजत नाही ते अर्थशास्त्र शेतकर्यांना कळलेले आहे आणि हा चमत्कार शरद जोशी नावाच्या वादळाने घडवून आणला आहे.
अडीच तपा एवढा प्रदीर्घ काळ कोटी कोटी शेतकर्यांच्या हृदयात अनभिषिक्त अधिराज्य गाजवणारे वादळ ३ सप्टेंबरला वयाचे ७६ टप्पे पूर्ण करून ७७ व्या टप्प्यात पदार्पण करीत आहे, त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभावे म्हणून समस्त शेतकरी बांधवातर्फे माझ्या त्यांना लाखलाख शुभेच्छा...!
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
मा. शरद जोशी यांना बळीराजा डॉट कॉम सदस्य परिवारातर्फे
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !!!!!!!!
—
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
शरद जोशी यांना मी मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
—
******************
राज दरबार...
http://shop.mimarathi.net/
प्रदीर्घ व निरोगी जीवन लाभावे ही प्रार्थना.
अगदी प्रामाणिक कथन आहे.
शरद जोशींबाबत एक वेगळेच आकर्षण मनात आहे. विखुरलेल्या, पराभुत मनोवृत्ती पिढ्यानुपिढ्या ज्यांच्या अंगी रुजली होती अशा शेतकर्यांना एकत्र आणुन त्यांची केडरबेस्ड संघटना बांधण्याचे त्यांचे कार्य तर उत्तुंग आहेच पण त्यांची सोप्या भाषेत विविध जटील गोष्टी समजावुन सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
जोशींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते जे कार्य करीत आहेत ते सुरु ठेवण्यासाठी त्यांना प्रदीर्घ व निरोगी जीवन लाभावे ही प्रार्थना.
—
---
प्रसन्न केसकर
उदंड आयुष्य लाभावे
शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना उदंड आयुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा.
जय गुरूदेव
वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा.
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
शरद जोशी यांना बळीराजा डॉट कॉम सदस्य परिवारातर्फे वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
उदंड आयुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना उदंड आयुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आदरणीय साहेब,
आदरणीय साहेब,
आज आपला वाढदिवस!!
तिमिरातून प्रकाशाची वाट आपण दाखवली,
म्हणूनच आमचे जगणे सुसह्य झाले,
घामाचे दाम घेण्याचे आपण शिकवले,
आदरणीय साहेब,
दयाधन परमेश्वर आपणास निरामय उदंड आयुष्य देवो....!!!!!!!!
प्रशांत कराळे
देवळाली प्रवरा
वाढदिवसाच्या शुभेच्छा......
किसान महात्मा, पितृतुल्य माननीय खासदार शरद जोशी साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!!
सुधाकर कराळे आणि परिवार,
तालुका-राहुरी, जिल्हा - अहमदनगर
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!!
सन्माननिय शरद जोशी साहेब,
आपणास आपल्या जन्मदिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ....
सिद्धार्थ संभाजीराव कदम
मु.पो.- देवळाली प्रवरा,
ता.- राहुरी, जि. -अहमदनगर.
मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण मा. शरद जोशी यांना वाढदिवसाच्या अंतकरणपूर्वक शुभेच्छा
संदिप संधान
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण