नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आभास मीलनाचा..
केव्हा तरी कशाचा हलकेच भास झाला
आभास मीलनाचा पळभर मनास झाला
शून्यात पाहताना हळुवार लाजली ती
दृश्यात मी असावा, माझा कयास झाला
तू लांब दूरदेशी, ना रूप जाणतो मी
मूर्ती मनी तरळली, कलिजा खलास झाला
पाडातल्या फ़ळांना का आस पाखरांची?
येता थवे निवासा, मग मेळ खास झाला
विरहात वृक्षवल्ली निघुनी वसंत जाता
बघता तया विलापा पक्षी उदास झाला
प्रेमा सदा भुकेली अभये सजीव माया
निष्काम ज्या उमाळा तो प्रेमदास झाला
गंगाधर मुटे
..............................
(वृत्त - आनंदकंद )
..................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
...................................................................