समकालीन गझलेत वेगळेपण दाखविणारी गझल
"माझी गझल निराळी" हे अगदी तंतोतंत पटावे असेच शीर्षक आहे. खरोखर आपली गझल निराळी आहे. तिच्यात संवेदने सोबतच सामूहिक वेदना आहेत आणि त्यांचे स्वरूप पराकोटीचे प्रामाणिक आणि कळकळीचे आहे.
सूर्य, चंद्र, चांदण्या, बहरलेली फुले, उमलता पारिजात, नदी, तलाव, रंगीत शहर इत्यादी बहुप्रसवं विषय ती सर्वश्रुत पद्धतीने न मांडता खरेखुरे ८० टक्के लोकांचे दैन्यघटीत जीवन अभिव्यक्त करते. हाडाचा शेतकरी ( दोन्हीही अर्थाने ) जेव्हा एक कवीही असतो तेव्हाच तो फुलांचं दुःख शब्दातून सांडू शकतो. कळ्यांची काळजी अर्थातुं वाहू शकतो.
गझलेला कुठलाही आशय-विषय अमान्य नाही. नसावाही...... निर्मिती अवस्थेत कुठलीही गोष्ट (कलासुद्धा) अपरिपक्व आणि संस्कारप्रतिक्षच असते--सातत्यपूर्ण प्रयोगशीलता व अभ्यासू संस्कार पुढे स्थिरमान्यता आणते. मला वाटतं गझल हे मुळातl काव्य आहे, पण ते तंत्रबद्ध असल्यानेच ती विधा आहे. तंत्रमागणीच्या निकषावर पूर्ण उतरली आणि आशयाची संपुर्क्तता--प्रासादिकता--गरजेनुरूप चमकृती या व इतर सर्व आंतरिक मागण्यासह जर ती अभिव्यक्त होत असेल तर तिला गझल मानायला हरकत नसावीच. विषयाचे तर बंधन नाहीतच. अगदी अरब-इराण-फारसी -रेख्ता-उर्दू-असा प्रवास करताना गझलेचा हा आशय, विषय आणि अभिव्यक्तीबदलाचा प्रवास सतत चालूच राहिला, पुढेही राहीलच. शेवटी सृजनशीलता आणि साहित्य विषयक सर्जनाला परिमाणlचा परिणाम लागू होत नसतो. "अजं जनाना गुफ़्तन" या स्त्रीयांशी बोलणे, या अर्थाचाही पुढे स्त्रियांविषयी बोलणे हा बदल झालाच. आता त्या एकल्या प्रेमाची जागा जागतिक प्रेमव्याप्तीत बदलली. अहमद फ़राज़ म्हणतात,
"ग़में दुनियामे ग़मेयार भी शामिल कर लो;
नश्शा बढ़ता है शराबे जो शराबो में मिले
"तात्पर्य, जर संपूर्ण जग कवेत घेणारी विधा उपलब्ध असेल तर तिच्यावर आशय-विषयाचे बंधने लादण्याचा कोतकरंटेपणा आम्ही का करावा? आणि कशासाठी...... परंतु कलेसाठी कला, जीवनासाठी कला की जगवण्यासाठी कला.... हा त्या कलावंताच्या चिंतनाचा विषय असतो. तुमच्यासाठी तो जगणे आणि जगवणे असा असावा.... मला तो खचितच वास्तववादी वाटतो.
आशावादी; स्फूर्तिकाव्य गैर नाहीच; मात्र वास्तव - निराशा याकडे डोळेझाक करणे कसे शक्य आहे? इत्यादी बाबत विचार करिता आपली गझल, आपले काव्य, आपले लेख निराळे आहेतच. तुमच्यातला सोशल कवी अलाहिदा म्हणायला तयार नाही आणि कार्यकर्ता तर डोळेझाक का करावी? हा प्रश्न नेहमीच स्व:ताला विचारताना दिसतो. डोळेझाक करूच नये हे उत्तर तो कवीला देऊन तसं करण्यास बाध्यच करीत असावा.
शेती; शेती समस्या; त्यावर काय व्हावं त्यासाठी चिंतन प्रपंच या करिता जळणारा आणि लेखनी जाळणारा कवी कदाचित तुमच्या शेतकरी चळवळीचे फलित असावा. रूढार्थाने आणि काव्यार्थाने वेगळी वाट जोखणारा हा कवी; गझलकार निष्ठुर शासन, शासकीय धोरण आणि यंत्रणेसोबतच कृषिप्रधान देशातच होणारी शेतकऱ्याची कुचंबणा ( अमानवीय मुस्कटदाबी) इत्यादीवर धाडसी भाष्य करतो.
"कांदा मुळा भाजी.... " म्हणणारी सश्रद्ध संत कविता तत्कालीन समृद्धी बयाण करते तर तुमची धाडसी गझल शासकीय अनिच्छेने आलेली बकाली कथन करते. अश्या अर्थाने ती परंपरा नाते विशद करीत जाते. मानवी मनाची सूक्ष्मातिसूक्ष्म मनोचिकित्सा न करिता मानवी समूहाच्या दुःखाची सूक्ष्म चिकित्सा तिला अधिक जरूरीची वाटते हे समकालीन काव्याहून तिचे (गझलेचे) वेगळेपण होय.
अशी ही आगळीवेगळी "माझी गझल निराळी" निश्चितच निराळी आहे. जी समकालीन कवितेत/गझलेत वेगळेपण दाखवते. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने "माझी गझल निराळी" ला माझ्या अनंत शुभेच्छा आणि आपले मनाच्या गाभाऱ्यातून मनपूर्वक अभिनंदन......!
आपला गझलकार स्नेही
अनंत नांदुरकर "खलिश"
------------------------------------------------------------------------------------------------------------