Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



१४३० रुपयात मी कोरोना पळवला

|| कोरोना माहात्म्य-१७ ||
१४३० रुपयात मी कोरोना पळवला
 
            कोरोना सारखे जीवघेणे संक्रमण झाल्यावर जीव वाचवण्यासाठी २०-२५ लाख रुपये खर्च करून उपचार घेण्याइतपत माझी आर्थिक कुवत नसली तरी मी इतकाही आर्थिक दुर्बल नाही कि लाख-दोन लाख रु. खर्च करू शकणार नाही पण यावेळेस कोरोनासोबत दोन हात करायचा प्रयोग करण्यासाठी स्वतःलाच वापरायचे असे मी ठरवले आणि त्यानुसार नियोजन केले. खरं तर मला संक्रमण होईल अशी अजिबात अपेक्षा मी केली नव्हती. स्वतःचे घर आणि शेतीतील ४-५ मजूर सहकारी यांच्याशिवाय माझा कुणाशीच थेट संबंध आला नव्हता आणि येणारही नव्हता.

            स्वतःच्या घरात व शेतात नेहमीच संपर्क व वावर असणाऱ्या मोजक्या व्यक्ती असतील तर "चार गज दुरी" व तोंडावर मास्कच्या आधारे संक्रमणापासून बचाव करणे सहज शक्य नसते. संक्रमणालाही हजार वाटा असतातच. त्यामुळे सतत संपर्कात असलेल्या व्यक्तीपासून होणारे संक्रमण थोपवणे सहज शक्य नसते. त्यामुळे आपल्या सततच्या संपर्कातील कुणी व्यक्ती संक्रमित तर झाली नाही ना, यावर सतत बारकाईने लक्ष ठेऊन असणे जास्त महत्वाचे ठरते. पण अनेकांना संक्रमण होऊन ते विषाणू वाहक होतात पण त्यांना अजिबातच लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना ताप वगैरे जाऊ द्या पण अगदी साधी किरकोळ स्वरूपाची सर्दी, खोकला देखील होत नाही. कोरोना संक्रमण सतत वाढण्याचे व त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरण्यामागे अशी अदृश्य कारणे नक्कीच आहेत. मी बाहेर कुठेही गेलो नसताना धडधाकट, निरोगी व तंदुरुस्त दिसणाऱ्या इतरांनीच कोरोना माझ्यापर्यंत मला घरपोच आणून पोचवला. 

दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी आंघोळीनंतर ७ वाजता थंडी वाजून ताप येणार असे जाणवायला लागले. थोड्याच वेळात शरीरात तापाने रंग भरायला सुरुवात केली आणि थंडी वाजून तापाचे आगमन झाले. लगेच पॅरासिटोमॉल गोळी घेतली. ताप ओसरला. परत दुपारी १ गोळी घेतली तरीही सायंकाळी परत थंडी वाजून ताप येणार असल्याचे जाणवायला लागले. 
 
सुरुवातीची मोघम लक्षणे व तपशील :
 
१) हलकी थंडी वाजून तापाची सुरुवात पण साध्या पॅरासिटॅमॉलच्या गोळीने काही काळासाठी थांबला. मला ही लक्षणे हिवतापाची वाटली.
२) हलकी सर्दी, किंचित खोकला, मध्यम अंगदुखी
३) नाकाचा वास व तोंडाची चव मात्र कायम.
४) सरासरी ५८ सेकंद श्वास रोखून धरू शकलो.
 
पहिल्याच दिवशी सायंकाळी डॉक्टर रविपाल भारशंकर यांच्या सल्ल्यानुसार cbc टेस्ट केली. टेस्ट एकदम नॉर्मल आली आणि हिवतापासहित अन्य इन्फेक्शन आढळले नाही. मग प्राथमिक खबरदारी म्हणून सहज कोरोना अँटीजेन टेस्ट केली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोना काळात मी खालीलप्रमाणे काही औषधोपचार डॉक्टरच्या सल्याने तर काही स्वतःच्या मर्जीने उपचार केलेत.

१) २ वेळा तापाची गोळी - ३ दिवस. 
२) २ वेळा अँटिबायोटिक गोळी - ३ दिवस. 
३) २ वेळा ऍसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून गोळी -३ दिवस. 
४) झिंक प्लस मिक्स व्हिटॅमिन गोळ्या - १४ दिवस 
५) सकाळी उपाशीपोटी गुळासोबत कडुलिंबाची ५/१० पाने - १५ दिवस.
६) सकाळ-सायंकाळ मिरे आणि अद्रक शहदासोबत - १० दिवस. 
७) कोरोनील (मात्रेप्रमाणे) - १४ दिवस. 
८) जेवणासोबत कांदा आणि लसूणच्या ४ कळ्या. 
९) वाफारा - गरजेनुसार दिवसातून २-३ वेळा. 
१०) प्राणायाम - सकाळ व सायंकाळ.
११) हळदीचा चहा -  सकाळ व सायंकाळ.
१२) दिवसातून चार-पाच वेळा ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी चेक करणे.
१३) किती काळ श्वास रोखून धरता आला ते मोजणे.
१४) कोमट पाणी पिणे. ताजे अन्न खाणे.
१५) रोज कमीतकमी ८ तास झोप.
१६) डोक्याला ताप येईल किंवा ताण-तणाव येईल असे काहीही वाचले नाही, ऐकले नाही, पाहिले नाही.
१७) चित्त आनंदी व प्रसन्न राहील याची काळजी घेतली. त्यासाठी विनोद, आवडीचे वाचन आणि आवडीचे लेखन केले.
 
झालेला एकूण खर्च : 
१) डॉक्टरची फी दोन वेळेसची - १००/-
२) मेडिसिन औषधे - ३४०/-
३) कोरोनील - ५००/-
४) टेस्टिंग खर्च - ४५०/-
५) इतर - ४०/-
एकूण खर्च : १४३०/- रुपये (ऑक्सिमीटर व तापमापीचा खर्च यात धरला नाही.)
 
माझ्या जमेच्या बाजू : ३१ मार्च २०२१ ला कोविशील्ड पहिला डोज घेतला. १ वर्षांपासून नियमित प्राणायाम 
माझ्या जोखमीच्या बाजू : वय, मधुमेह आणि बीपी 
 
प्रयोग :
पहिले दोन दिवस ताप आला. तिसऱ्या दिवशी ताप आला नाही. तीन दिवस तापाच्या गोळ्या सुरु होत्या. ताप परत येतो किंवा नाही हे जोखण्यासाठी तापाची गोळी आणि सर्व अँटिबायोटिक बंद करून बघायचे ठरवले आणि औषधी गोळ्या बंद केल्यात. गोळ्या घेणे थांबवणे धोक्याचे असून निदान ५ दिवस तरी गोळ्या नियमित सुरु ठेवाव्या असे अनेकांचे मत होते पण डॉक्टरांशी सल्लामसलत करून गोळ्या बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र बारकाईने स्वतःवर लक्ष ठेऊन होतो. 
 
माझे स्पष्ट मत होते कि विषाणूंशी लढणे हे माझे काम नाही. ते काम माझ्या शरीराचे आहे. ३ दिवस मी माझ्या शरीराला विषाणूंशी लढण्यास मदत केली व त्याला रसद पुरवली. आता शरीर स्वतःच्या ताकदीने किती लढते ते बघायला हवे. शरीराची काय तयारी आणि ताकद आहे ते जोखणेही गरजेचे वाटले. उगीच शरीराला अनावश्यक व सक्तीने मदत करून आपणच आपल्या शरीरावर गरज नसताना औषधांचा मारा करणे, संयुक्तिक वाटले नाही. अन्न जीवनाला आवश्यक असूनही गरज नसताना गरजेपेक्षा जास्त व अतिरिक्त अन्न किंवा पिण्याचे पाणी शरीराला जबरदस्तीने दिले तर त्याचे देखील शरीरावर विपरीत परिणाम होतातच. हेच सूत्र औषधांचे बाबतीतही लागू पडत असतेच, हे माझे मत.

नैसर्गिकरित्या आपण जेवण करतो किंवा पाणी पितो तेव्हा त्याचे नियमन स्वतः आपले शरीरच करत असते. तहान लागली कि शरीराच्या प्रेरणा आपल्याला पाणी प्यायला सुचवतात. पाणी गरजेपुरते झाले कि पुन्हा शरीराच्या प्रेरणा आपल्याला आता अधिक नको, बस झाले, आता पाणी पिणे थांबवायचे सुचवतात पण हेच कार्य शरीराला विश्वासात न घेता कृत्रिमरीत्या करायचे ठरवले तर आपल्या शरीराचे आपल्यावर काहीही नियंत्रण नसते. गरजेपेक्षा खूपच जास्त मात्रा शरीरावर लादली तर त्याचे दुष्परिणाम होतात. पोटात थेट नळी टाकून एखाद्याला यंत्राच्या साहाय्याने १५-२० लिटर पाणी पाजले तर तो मनुष्य कदाचित मरुनच जाईल. जिथे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा ओव्हरडोज सुद्धा माणसाला मृत्यूच्या दाढेत लोटू शकतो तिथे औषंधाबद्दल तर विचारच करायला नको. 

 
मिरे आणि अद्रक वनस्पतीजन्य असले तरी गरजेपेक्षा जास्त सेवन झाल्यास शरीरावर विपरीत परिणाम करतात म्हणून दहा दिवसांनंतर मिरे, अद्रक आणि शहद यांचे मिश्रणही बंद केले. फक्त ऍलोपॅथी मेडिसिनमुळेच शरीरावर साईड इफेक्ट होतो, आयुर्वेद, वनस्पती औषधे, जडीबुटीमुळे शरीरावर साईड इफेक्ट होत नाही, हा समज  सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. घरगुती वापरातील नेहमीचे मीठ किंवा मिरचीपावडर एका विशिष्ट प्रमाणातच ठीक असते. ओव्हरडोज घेतला तर मीठ किंवा मिरची पावडर सुद्धा माणसाची रवानगी स्मशानघाटाकडे करू शकतेच. तात्पर्य इतकेच मेडिसिन असो की वनस्पतीऔषधे अनावश्यकरीत्या अति ओव्हरडोज दिल्यास जीवघेणा ठरू शकतो.    
 
जाणवलेली लक्षणे
१) हलकी थंडी वाजून ताप - दोन दिवस - थंडी वाजून ताप येणे हे कोरोनाचे लक्षण असल्याचे नंतर कळले.
२) दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ऑक्सिजन लेवल ९२ पर्यंत खाली घसरली. चवथ्या दिवसापासून सुधारणा व्हायला सुरुवात झाली. नंतर ९५ च्या खाली आली नाही.
३) मध्यम सर्दी व किंचित खोकला - १० दिवस 
४) अशक्तपणा - ५ व्या दिवसापासून नंतर 
५) ६ व्या दिवसापासून १२ व्या दिवसापर्यंत प्राणायाम करताना सुरुवातीचे १० मिनिटे अवघड, नंतर ठीकठाक पण नेहमीसारखी गती, वेग नव्हता. प्राणायाम करण्याची नेहमीची शक्ती कायम नव्हती.
६) ६ व्या दिवसापासून थोडी धाप जाणवली. ती अजूनही किंचितशी कायम आहे.
७) मध्यम अंगदुखी - सर्व दिवस 
८) गळा आतून बाहेरून दुखणे - मधले ३ दिवस 
९) पाचव्या व सहाव्या दिवशी ३ बोटांचे अग्रभागावर सुजन येऊन थोडा टणकपणा, थोडी खाज व दाब दिल्यास वेदना जाणवल्या. हे कोरोनाचेच लक्षण असल्याचे नंतर माहित पडले.
११) पाचव्या व सहाव्या दिवशी शरीरावर काहीही त्रास नसलेले चट्टे आढळले. हे कोरोनाचेच लक्षण असल्याचे नंतर माहित पडले.
१२) १८ दिवसांनंतर अशक्तपणा कायम आहे पण आता अचानक थकवा जाणवतो. थोड्या वेळाने एकदम चांगले वाटते. पुन्हा काही वेळाने थकवा जाणवतो.
१३) पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सकाळी झोपून उठल्यावर अर्धा तास आपण तापाने असल्यासारखे वाटते पण ताप नसतो.
 
काही निष्कर्ष :
१) कोविशील्डचा एक डोज घेतला तरीही संक्रमण होऊ शकते. मी पहिला डोज घेतला नसता तर संक्रमण काळात मला काय त्रास झाला असता आणि घेतल्यामुळे काय फायदा झाला याचा काहीही डाटा माझ्याकडे नसल्याने मी याविषयी काहीही सांगू शकत नाही. व्यापक स्तरावर सर्वे झाला तरच याविषयीचे निष्कर्ष मिळू शकतील.
२) वर्षभर नियमित प्राणायाम केले तरी कोरोना संक्रमण होऊ शकते. मात्र कोरोनाचे सर्व त्रास श्वसनक्रियेशी संबंधित असल्याने प्राणायामांचा फायदा होतो.  प्राणायाम म्हणजे संपूर्ण श्वसनयंत्रणेची सर्व्हिसिंग, रिपेअरिंग, ओव्हरऑईलिंग व मेंटेनन्स असते. प्राणायामामुळे सर्दीवर नियंत्रण मिळवता येते, नाकाच्या दोन्ही पाळ्या बऱ्यापैकी मोकळ्या राखून श्वासोश्वास गती व्यवस्थित सांभाळता येते. ऑक्सिजन पातळी वाढवता येते. कफ निर्माण होऊन छातीत साचणे नियंत्रणात येऊ शकते. हेही शक्य आहे कि न्यूमोनियाच्या स्टेजपर्यंत पोचून कृत्रिम ऑक्सिजन देण्याची गरज टळू शकते.
३) मी सर्वच तऱ्हेचे उपचार घेतल्याने मला नेमका कशामुळे फायदा झाला, याचा थेट निष्कर्ष काढणे अवघड आणि अशक्य आहे. फायदा होणे महत्वाचे... कशामुळे झाला याचा शोध घेत बसण्यासाठी आता पुरेसा अवधी नसल्याने कोरोना काळात हा विचार सोडून देऊन जीव वाचवण्याला प्राधान्य असावे, असे माझे स्पष्ट मत आहे. संशोधनाचे काम संशोधक करत आहेतच.
४) सद्यस्थितीत कोरोनाचे निदान करूनही वेगळे काहीही उपचार उपलब्ध नसल्याने जशी लक्षणे आढळतील त्यावर अजिबात वेळ न दवडता डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार सुरु करावेत. सर्दी, पडसा, ताप व अन्य लक्षणांपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास कोरोना समजूनच पहिल्या ५ दिवसात अत्यंत तत्परतेने उपचार करून घ्यावेत. कोरोना निदान झाले तरी किंवा नाही झाले तरी प्राथमिक स्टेजला उपचार सारखेच आहेत, याची कायम मनात नोंद ठेवावी.
५) प्राथमिक स्टेजला कोणत्याही उपायाने/औषधोपचाराने ताप, सर्दी, सुरळीत श्वासोश्वास व कफ यावर नियंत्रण मिळवता आले तर कोरोनावर सहज नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे माझे मत आहे. कोरोना संशोधनासंदर्भात आधुनिक मेडिकल सुद्धा पहिल्याच पायरीवर असल्याने खरे काय आणि खोटे काय, हे फक्त देवच जाणू शकतो.
६) कमीत कमी ३० ते ५० सेकंड श्वास रोखून धरता आला तर आपली प्राणवायूची पातळी चांगली आहे असे समजायला हरकत नाही पण याविषयी शास्त्रशुद्ध अभ्यास होणे गरजेचे आहे. शक्य असेल तर घरी ऑक्सिमीटर ठेऊन घरातील सर्वांची प्राणवायू पातळी नियमित चेक करत राहणे प्राथमिक अंदाजासाठी फायद्याचे ठरू शकेल.
७) लक्षणे जाणवल्यास कोणत्याही स्थितीत दोन दिवसापेक्षा जास्त वेळ मनाप्रमाणे घरगुती उपचार करण्यात घालवू नये. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 
मी या लेखात मांडलेले मत म्हणजे केवळ माझा अनुभव व अनुभूती आहे. सर्वांना हेच सूत्र लागू होईल, असा दावा करता येत नाही कारण "व्यक्ती तितक्या प्रकृती" हे आरोग्यशास्त्राचे ब्रीदवाक्य आहे. कोरोनासोबतच्या पहिल्या युद्धात कोरोनावर मात करून मी जिंकलेलो आहे. आपणही असेच जिंकावे आणि कोरोनाला धूळमाती चारावी अशी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
(क्रमशः)
=============
११/०५/२०२१
=============
या लेखमालेतील इतर लेख
http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.
==============

Share