नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कृषिदिन चिंता आणि चिंतन
डॉ.आदिनाथ ताकटे, मो. ९४०४०३२३८९
मृद पदार्थविज्ञानवेत्ता
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर
उद्याच्या हाती येणाऱ्या उत्पन्नाची कोणतीच शाश्वती देता येत नाही,अशा ही अवस्थेत कष्ट करणाऱ्या शेतकरयांची खरोखरच कमाल असते,म्हणून जगात सगळ्यात धाडशी कोण असेल तर तो साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा.वर्षातील कोणताही महिना असो, महिन्यातील दिवस कोणताही असो, सकाळी उठल्यापासून दिवस मावळेपर्यंत सतत कामात असणाऱ्या बळीराजास कृषि दिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा !
एरव्ही सातवा आयोगासारखा ना त्याला ग्रेड पे, ना सेकंड-फोर्थ,ना विकेंड. शेती म्हणजे जस योद्ध्याच काम, तसच हुशारीच काम.हवामानातील बदलाला केंव्हाच त्याने अंगिकारले आहे.हवामान तज्ञापेक्षा पावसाचा अंदाज त्यांचाच अद्याप खरा ठरत आलाय असच म्हणाव लागेल.आभाळाकडे नुसती नजर टाकली तरी त्याला वरुणराजा केंव्हा बरसणार याचा अंदाज येतो.त्याला हल्लीच्या जमान्यात वापरण्यात येणाऱ्या ईटरनेटची फारशी गरज पडत नसावी.एव्हाना तो या अंदाजावर विश्वासच ठेवायला तयार होत नाही हे सोशल मेडीयाच्या माध्यमातून आपण गेल्या १५- २० दिवसापासून वाचतो आहोत.
गेल्या तीन चार वर्षापासून पावसाने हुलकावणी दिल्याने, गतवर्षी अख्ख्या महाराष्ट्राला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले.यंदाच्या दुष्काळान आयपीएलच पाणी पळवल आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला ते रेल्वेन पुरवल असच म्हणाव लागेल.राज्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या दूरवरून पाण्याच प्रवास झाला असेल. मिरज ते लातूर अंतर पार करून भीषण दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पुरवल गेल.यावरून मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता लक्षात येते.राज्यात नव्हे तर देशात आणि विदेशातही मराठवाड्यातला दुष्काळ बातमीचा विषय होता.१९७२ च्या दुष्काळाची आणि यंदाच्या दुष्काळाची तुलना करताना न भूतो ना भविष्यती ची प्रचिती येते. यंदाच्या वर्षी राज्यातल्या आणि विशेष: मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येन उच्चांक गाठला हे खेदान नमूद करावेसे वाटते.दुष्काळ, नापिकी,कर्जबाजारीपणाला कंटाळून यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
गतवर्षी अवकाळी पाऊस,गारपिटीचा फटका बसलेल्या कांदयाच्या भाववाढीने ग्राहकांना जेरीस आणल होत,परंतु यंदाच्या वर्षी दुष्काळ असूनही कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचा फास अधिक आवळला गेला आणि कांद्याच खत करण्याशिवाय दुसरा पर्याय बळीराजावर उरला नाही.दुष्काळाने साखर कारखानदारीवर संक्रांत आली असच म्हणाव लागेल. गेल्या तीन चार वर्षापासून राज्यातील साखर कारखानदारी तोट्यात चालू आहे.यंदाच्या दुष्काळान शेतकऱ्यांच आणि साखर कारखानदारीच व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांचं कंबरड मोडल.
दुष्काळाने अक्षरशः मेटाकुटीला आलेला शेतकरी पावसासाठी नजर लावून बसला आहे.पावसा पड र बाबा ! अशी आर्त याचना तो वरुणराजाकडे करत आहे.वेळेवर आणि चांगल्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी व्याजाने तसेच उसनवारीने पैशाची जुळवाजुळव करून खत बी-बियाणाचे नियोजन केले आहे.परंतु जून महिना संपत आलाय परंतु काही भागात हवामानखात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरवत पावसाने शेतकऱ्यांना चिंतातूर केले आहे. लांबलेल्या पावसाने शहरी आणि ग्रामीण भागाचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे.राज्यातील सलग तीन वर्षाच्या दुष्काळानंतर सर्वांचे लक्ष पावसाकडे होते.यंदाच्या वर्षी मान्सून वेळेवर दाखल होऊन सरासरी पेक्षा जादा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने व अनेकांनी भाकीत वर्तवले होत,त्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.दुष्काळाच्या प्रचंड तीव्रतेने होरपळलेला शेतकरी थोडा सुखावला होता. मात्र तो आता पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.राज्यातील बहुतांश धरणे अक्षरशः कोरडीठाक पडली आहेत.त्यामुळे तिसरे महायुध्द पाण्यासाठी होईल याची प्रचीती ठायोठायी अनुभवयाला यंदाच्या दुष्काळाने दिली त्यात, पाऊस लांबला तर आणखी वणवा पडण्याची शक्यता आहे.
यंदाचा दुष्काळ कि दुष्काळ सदृश परिस्थिती यावर फक्त चर्चा करता करता अखेर पावसाला काही ठिकाणी सुरुवात झाली.गेल्या दोन वर्षापासून शेतकारी होरपळला.मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच यंदा खरीप चांगला होईल,या आशेने शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून पेरणीसाठी बियाणांची लगभग केली पण एैन खरीपाच्या तोंडावर राज्य बियाणे महामंडळाने( महाबीज) बियाणांच्या किमतीमध्ये मोठी दरवाढ केल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला,त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यानी दर वाढीला स्थगिती देवून वाढीव दराची रक्कम अनुदान स्वरुपात जुलै अखेर पर्यंत बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.तोच काय तो दिलासा यंदाच्या कृषि दिनाच्या निमिताने शेतकरयाना मिळाला अस म्हणाव लागेल. मागील तीन चार वर्षापासून पावसाने दिलेल्या हुलकावणीने आणि यंदाच्या दुष्काळाने बियाणे ऊत्पादनावर विपरीत परिणाम झाला,परिणामी खाजगी कंपन्यांनी किमतीत भरमसाठ वाढ केली.दराबाबत शेतकऱ्यांनी चौकशी केल्यास बियाणे उपलब्ध नाही असे सांगून डावलण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरु झाले आहेत. सध्या शेतकऱ्याला हव त्या पिकाच हव ते बियाणे बाजारात सहजासहजी मिळेनासे झाले आहे. काही शेतकरी मागील वर्षीच बियाणे मध्यस्थामार्फत /दुकांनदारामार्फत विकून आपल्याच शेतकरी बांधवांच्या खिशाला चाट देत आहेत. माणुसकीचा झरा संपत चालल्याच समोर येत आहे.
सलग दोन वर्ष दुष्काळ पडल्याने शेतीची वाट लागली.धान्याची आवक कमी झाल्याने दर वाढले.मागणी आणि पुरवठा साखळीत बिघाड झाल्याने महागाई वाढली आहे,धान्य निर्मितीसाठी लागणाऱ्या निविष्ठाची किंमत प्रचंड वाढल्याने शेतीचा ऊत्पादन खर्च कमालीचा वाढला आहे. शेतमजुरांची मजुरी ,वाहतूक खर्च, साठवण व्यवस्थेचे भाडे यामुळे ऊत्पादन खर्च वाढला, त्याप्रमाणे उत्पादनाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आपला माल साठवून ठेवतो,बाजारात माल आणायला त्याला उत्साह राहत नाही ,त्यामुळे पुरवठा कमी होतो आणि साहजिकच किमती वाढतात.सध्या सर्वत्र महागाईचा वणवा पेटला आहे.सर्वसामान्य माणूस यात भरडला जात आहे.
शेतकऱ्यांसाठी जुलै महिना हा अतिशय महत्वाचा महिना समजला जातो याला आखाडी दिवस असंही म्हटलं जात. पेरणी,निंदणी,कोळपणीची धामधूम या हंगामात असते.आणि हमखास कधी कधी नव्हे आता तर नेहमीच पाऊस कोसळयाचा विसरून जातो आणि मग भयानक दुष्काळ पडतो.त्या दुष्काळाने शेतीवर आधारित सर्व समाजच होरपळून जातो.अशा आपत्तीतून वाचविण्यासाठी राज्यात कृषि क्रांतीची मुहूर्तमेढ राजकारणी लोकांच्या दूरदृष्टीने रोवली गेली.डॉ,. पंजाबराव देशमुख,अण्णासाहेब शिंदे ,यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक यांच्या पासून सुरु झालेली ही कृषि कळवळयांची परंपरा आजही शरद पवार,ना. धो. महानोर,कै.शरद जोशी यांच्या कृतीतून उक्तीतून आपले अस्तिव टिकवून आहे.तुमची शेती तुमच्या एकट्याची नाही देशाची आहे. त्यामुळे शेती मोडून पडली तर देश मोडून पडेल म्हणून शेती वाचविली पाहिजे असे यशवंतरावांचे मत होते. त्यांच्याच मतांचा पाठपुरावा करून वसंतराव नाईकांनी शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना शासकीय पातळीवरून अंमलात आणून शेतीतून उत्पन्न वाढीचा प्रयत्न केला. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा नेहमी विचार केला, शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल.शेती मोडली तर लोकशाही मोडेल असे खणखणीत विचार नाशिक येथे भरलेल्या शिबिरात व्यक्त केले होते. वसंतराव नाईक हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते. वसंतराव नाईक हे मोठे द्रष्टे होते. राज्यातील सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी व समृद्ध व्हावा यासाठी कृषी उत्पादन वाढीला योग्य दिशा व चालना देण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीचा संदेश सर्वदूर नेला.प्रत्येक घराच्या परिसरात किमान एक झाड,तर शेताच्या बांध-बंधाऱ्यावर वृक्षवल्ली लावून महाराष्ट्रातील कणाकणात समृद्धी फुलवा.शेती समृद्ध करण्यासाठी नद्यानाल्यांचे पाणी अडवा व जमीन भिजवा,असा मोलाचा संदेश देऊन त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व किती असते याची जाणीव करून दिली.याचा आधार घेऊन राज्य शासनाने पाणी अडवा,पाणी जिरवा,तुषार योजना,ठिबक सिंचन योजना कार्यारत केली.कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी नदीनाल्यांवर लहान बंधारे बांधण्याची योजना त्यांनी आखली व ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरली आणि हेच बंधारे पुढे वसंत बंधारे म्हणून राज्यात लोकप्रिय झाले.
राज्यात मागील चार वर्षापासून दुष्काळाचे ढग काही केल्या कमी होत नाहीत.याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.पेरणीयुक्त पाऊस पडत नाही, पडला तर पिके व्यवस्थित येत नाहीत,पिके चांगली आली तर धान्याला भाव मिळत नाही. बँकांनी दिलेले कर्ज माघारी देऊ शकत नसल्याने अन्य बँका,पतसंस्था किंवा सावकाराकडून पैसे घ्यावे लागतात.एकूण शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती फारच कठीण होत चालली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केव्हाच बंद केला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज मिळणे कठीण झाले आहे.
गेल्या वीस –पंचवीस वर्षाचा आधुनिक शेतीचा भरभराटीचा काळ गेल्यानंतर पुन्हा काही अस्मानी-सुलतानी संकटाच्या कचाटयात शेतकरी सापडला आहे.शेत मालाच्या भावाचा प्रश्न,ऊत्पादन खर्चाचा प्रश्न,हाती येणाऱ्या उत्पादनाचे वास्तव चित्र या सगळ्यातून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
पाण्याची टंचाई ही आता सर्वादित आहे.पाण्याचा मोजका व नेमका वापर करावाच लागणार आहे.यंदाच्या वर्षीबपाणी टंचाईचा प्रश्न डिसेंबर-जानेवारीपासूनच एैरणीवर आला आणि सारा दोष उस ,केळी या सारख्या भरपूर पाणी पिणाऱ्या पिकांना व साखर कारखानदारीला सर्वच माध्यामानी टीकेचे लक्ष केले.पिकांना ठिबक सिंचनपद्धतीनेच पाणी द्यावे हे आता अनिवार्य करण्याची वेळ आली आहे.त्या दृष्टीने सरकारने ठिबक वापरला चालना दिली गेली पाहिजे तसेच उसाला ठिबक असल्याशिवाय गाळपासाठी घेतला जाणार नाही असा पवित्रा घ्यावाच लागणार आहे.
शेतीमधील मजुरांची चणचण देखील उत्तोरोतर वाढत आहे.परिणामी कामाचे ओझे ओढणारी यंत्रे अधिकाधिक पत्करणे हितावह ठरणार आहे .यांत्रिकीकरणाचा फैलाव झाला कि यंत्रे परवडतील इतपत किमान आकाराची शेतीयंत्रे अधिक गरजेची होईल. तेव्हा यांत्रिकीकरणावर भर द्यावाच लागेल.
मध्यंतरीच्या काळात खेडोपाडी झिरपत गेलेले जागतिकीकरण,नव्या पिढीत आलेला चंगळवादाचा प्रभाव,शैक्षणिक आणि ओेदोगिक क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्नांची नव्याने पुनमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.मागच्या दशकात शेतकऱ्यांच्या ज्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या त्याने हा प्रश्न एैरणीवर आणला आहे.
शहरीकरणाचा वाढता प्रभाव, वाढणाऱ्या शैक्षणिक संस्था ,नोकरदार वर्गाचे सुधारलेले राहणीमान,शहरी जीवनाची ओढ यामुळे व्यापारधंदे यामुळे शेतीच्या बिगरशेतीकरणात शेतीचे प्लॉट पडून मालकांना मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध झाला. यावर इतर जागतिकीकरणाशी निगडीत अनेक बाबींनी जमिनीचे महत्व अपूर्ण पातळीवर वाढले आहे. त्यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षात जमिनीचे भाव कित्येक पटीनी वाढले आहेत.यापुढे ते वाढतच जाणार आहेत .
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाचे आणी शेतीचे प्रश्न वेगवेगळे आहेत.पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ,मराठवाडा,कोकण,खांनदेश या प्रदेशात पीक पद्धतीत फरक आहे.त्यामुळे कोरडवाहू शेतीपेक्षा ,पश्चिम महाराष्ट्रातील उस उत्पादक शेतकऱ्यांची शेती फायद्याची असे या भागातील शेतकरी समजतो.साखर कारखाने, शैक्षणिक संस्था,दुध डेअरी त्यांच्याशी निगडीत पतसंस्था यावरून हे अनुमान काढू शकतो.जागतिकीकरणामुळे खुल्या आर्थिक धोरणांचा थेट परिणाम विदर्भातील लाखो कापूस उत्पादकांवर झाला आणि कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात नवीन पर्यायी पीक पद्धतीचा शोध घेताना शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली.विदर्भ-मराठवाडयाची शेती म्हणजे पडीपसारा आहे असा या भागातील शेतकरी म्हणतात.दिसायला खूप पण उत्पादनात कमी असा त्याचा अर्थ होतो.
सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असून त्याला सरकारने मदत देण्याची गरज आहे पण सरकारच्या तिजोरीच पैसा नसेल तर सरकार तो देऊ शकणार नाही.त्यामुळे सेवाकरात ०.५ टक्के कृषि कल्याण सेसची भर घालण्यात आल्याने तो आता १५ टक्के झाला.या मार्गाने तिजोरीत पाच हजार कोटींची भर पडणार आहे.
दरवर्षी खरीप हंगामाच्या वेळेला सरकारतर्फे बी-बियाणे व खतांचा मुबलक साठा आहे, कोणतीही अडचण येणार नाही असे जाहीर केले जाते.सरकारच्या या वाक्यावर शेतकरी विश्वास ठेवतात व जेव्हा ते प्रत्यक्ष बाजारात जातात, तेंव्हा मात्र बाजारपेठेची गोम लक्षात येते.जे बियाणे शेतकऱ्याला हवे आहे तेच नेमके कसे उपलब्ध नाही हे सांगितले जाते. फारच आग्रह केला तर बाजार भावापेक्षा चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागते,तीच गत खतांची असते.शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारपेठेत खरेदी केला जातो तेंव्हा त्याला अनेक अग्निदिव्यातून जावे लागते मात्र त्याला बियाणे व खते खरेदी करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.शिवाय पदरात पडलेला माल गुणवत्तेचा आहे कि नाही याची खात्री नसते.
खर तर सरकारने शेतकऱ्याला बांधावर खत उपलब्ध करून दिले पाहिजे.पेरणीच्या मोसमात शेतकऱ्याला विवंचना असते ती पैशाची.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठ्या प्रमाणात पतपुरवठा केला तरच शेतकरी तग धरेल अन्यथा शेतकऱ्याला खिंडीत पकडणारी यंत्रणा याहीवर्षी पिळवटून काढेल शेतकऱ्यांच्या या मुलभूत प्रश्नासंबंधी कृषि दिनाच्या निमित्ताने चिंता आणि चिंतन करण्याची आवशकता आहे.
.............................................................................................................................
कार्यालीन पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ,
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर ४१३००२.
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
घरचा पत्ता/पत्रव्यवहारासाठीचा पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
२,अक्षत अपार्टमेंट,गरुड बंगल्यामागे,
रंगभवन-सातरस्ता मार्ग,
सोलापूर -४१३००३
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने