औंदाची शेती : रेकॉर्डब्रेक शेती
अपवाद हा अपवादात्मकच असतो म्हणून त्याचे व्यावहारिक महत्वही अपवादत्मकच असले पाहिजे. अपवादानाने घडणार्या अपवादात्मक घटनांचा सर्वसाधारण घटनांशी संबंधसुद्धा अपवादानेच जोडला पाहिजे, अपवादात्मक घटनांचा साध्य आणि सिद्धतेशी सांगड घालण्याचा प्रयत्नही अपवादात्मकच असला पाहिजे, असा धडा मला माझ्या औंदाच्या शेतीने दिला आहे.
होतं काय की बर्याचदा अपवादानेच एखाद्याला ढोबळी मिरचीचे प्रचंड उत्पादन येते. पण या अपवादाला एखादा "उंटावरचा शेतकरी" स्वत:ची यशस्विता समजून घेतो आणि रस्त्याने जो मिळेल त्याला "यशोगाथा" सांगत सुटतो. एखाद्याला एखादे वर्षी मक्यासारख्या पिकाला चांगला भाव मिळतो, तोही अपवादानेच. पण तरी सुद्धा तो शेतकरी जर "उंटावरचा" असेल तर स्वत:च्याच तोंडाने स्वत:चेच पोवाडे गात सुटतो. यावर कुणी असेही म्हणेल की "आम्हाला अपवादाने नव्हे तर बुद्धीचातुर्याने यश मिळाले आहे". त्यावर सरळसोपे उत्तर असे की त्याने निदान सलग चार वर्षाचा त्याच्या शेतीचा बिल-पावत्यासह ताळेबंद सादर करून दाखवावा. जर चारही वर्ष समान गुणोत्तर आढळले तर मी माझी सारी लेखनगाथा आपल्या विचारधारेसह समुद्रात नेऊन विसर्जित करायला तयार आहे.
पण आव्हान कोणी स्विकारायला तयार नसते कारण वास्तव तसे नसतेच. एखाद्या वर्षी चांगले उत्पादन येते हे खरे; परंतू अनेक वर्ष शेतीतला तोटा भरून काढताना शेतकर्याला त्याच्या बायकोच्या अंगावरील मंगळसूत्र विकावे लागते, हे शेतीमधले शाश्वत सत्य झाले आहे, हे कोण नाकारू शकेल? अनेक "कृषिनिष्ठ" शेतकर्यांना बॅंकेतून कर्ज काढल्याशिवाय स्वत:च्या बायकोला वस्त्र आणि अंतर्वस्त्र घेताच येत नाही, हे मी पुराव्यासहीत केव्हाही सिद्ध करून दाखवायला तयार आहे. तद्वतच या "यशोगाथा"वाल्यांचा मागील फ़क्त दहा वर्षाचा इतिहास तपासावा, त्याचे पोट शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायावर अवलंबून नसेल, त्याला चोर्या करण्याची सवय नसेल, व्याज-बट्ट्याची गावठी सावकारी नसेल आणि फ़क्त शेती हेच जर त्याच्या उपजिविकेचे साधन राहिले असेल तर त्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी आढळून येणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.
मी १९८५ साली शेती सुरू केली. तेव्हापासून नाना तर्हेचे प्रयोग करून झाले. उभा महाराष्ट्र पालथा घालून झाला. देशाच्या कानाकोपर्यातली शेती आणि शेतीची पद्धत न्याहाळून झाली. मिशीला पीळ देत मोठमोठ्या बढाया मारणार्या पाटलाचे माजघर पाहून झाले आणि अशा पाटलाच्या माजघरात शिरल्यावर त्याच्या गळलेल्या मिशाही पाहून झाले. विदर्भातील शेतकर्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला द्राक्ष, उस उत्पादक शेतकरी दहापट जास्त कर्जबाजारी आहे, हेही पाहून झाले.
हे सांगायचे औचित्य असे की, यावर्षी सार्वत्रिक नापिकी आहे. यंदा शेतीव्यवसायात सर्वत्र हाहाकार माजला असताना व दुष्काळाने शेतीउत्पादनात प्रचंड घट आली असताना माझी औंदाची शेती मात्र याला अपवाद ठरली आहे. यावर्षी मला विक्रमी उत्पादन झाले व माझ्या स्वत:च्याच शेतीतील उत्पादनाचे ३० वर्षाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. पण मागील वर्षी कमी उत्पादन होऊनही घरात जेवढा पैसा आला तेवढाही पैसा यावर्षी घरात आलेला नाही कारण तूर वगळता अन्य पिकाचे बाजारभाव मागील वर्षी पेक्षा यावर्षी कमी आहेत.
अधिक उत्पादन घेतल्याने अधिक फ़ायदा होतो, असे फ़क्त कागदीतज्ज्ञच म्हणू शकतात. प्रत्यक्ष शेती करून शेती उत्पन्नावरच जगून पाहिल्याशिवाय किंवा दुसर्याच्या शेतीच्या जमाखर्चाचा गणीतीय ताळेबंद मांडल्याशिवाय कुणालाच (अगदी ब्रह्मदेवालासुद्धा) शेतीचे अर्थशास्त्र कळू शकत नाही, हे माझे मत पुन्हा एकदा अधिक ठाम झाले आहे.
तसा हा विषय व गणीत साधे, सोपे आणि सरळ आहे. पण शेतीविषयात हात घालू इच्छिणारांमध्ये एक अनुवंशीय खोट आलेली असते. ती खोट अशी की शेतकर्याला गाढव गृहीत धरणे व जेवढी अक्कल मला आहे तेवढी अक्कल शेतकर्याला नसते, अशी स्वत:ची ठाम समजूत करून घेणे. त्यामुळेच शेतीव्यवसायाच्या उत्थानासाठी "शेतीमालाच्या भावाला" बगल देऊन अन्य गृहितके "उंटावरच्या शहाण्यांकडून" मांडली जातात.
मला यावर्षी रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले यामागे माझे नियोजन, परिश्रम, आर्थिक गुंतवणूक वगैरे बाबींचा अंतर्भाव नक्कीच आहे, याबाबत दुमत नाही; पण एवढे मी यापूर्वीही केलेले आहे, करत आलेलो आहेच. मग एवढे उत्पादन या पूर्वी का झाले नाही? याचे उत्तरही तसे फ़ार सोपे आहे. शेतीचा संबंध थेट निसर्गाशी आहे आणि निसर्ग विविधतेने नटलेला आहे. एकवर्ष दुसर्या वर्षासारखे कधीच नसते, पाऊसमान प्रत्येकवर्षी समान असू शकत नाही. दर चार वर्षातून एकदातरी ओला अथवा कोरडा दुष्काळ नक्कीच पडणार, चारवर्षातून एकदा तरी गारपीठाचा वर्षावही हमखास होणार. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन घेण्यासाठी खर्च सारखाच केला तरी दरवर्षी उत्पादनाचा आकडा सारखाच राहील हे कदापीही शक्य नाही. त्यामुळे शेतीमध्ये चार वर्षाच्या उत्पादनाची गोळाबेरीज करून त्याला चारने भागूनच वार्षिक उत्पादनाची सरासरी काढली गेली पाहिजे आणि हेच यावरचे एकमेव उत्तर आहे.
शेतीत सधनता आणणे अजिबात कठीण नाही पण शेतीत सुबत्ता यावी, हीच अनेकांची आंतरिक इच्छा नसते. त्यामुळे "शेतीमालाचा भाव" हा प्रमुख मुद्दा सोडून अन्य पर्याय सुचविण्याचे व तेच अधिक ताकदीने मांडण्याचे कार्य अनेकांकडून अव्याहतपणे मांडले जाते. त्यामागे मूळ मुद्द्यावरील लक्ष दुसरीकडे वळवणे, हा छुपा डाव असतो. शेतकरी पुत्रांनी हा डाव ओळखला पाहिजे. शेतकरीविरोधी धोरणांच्या पुरस्कर्त्यांच्या सापळ्यात अलगद फ़सण्यापासून स्वत:ला वाचविले पाहिजे.
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------
यंदाची सुरुवातच खतरनाक झाली. मातीत बियाणं पडलं आणि वरुणराजा दिर्घ रजेवर गेला.
*********************************
तुषार सिंचन - दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार
*********************************
पाऊस येईल तेव्हा येईल.. त्यासाठी पेरणी थांबवणे शक्य नसते.
*********************************
पेरते व्हा! पेरते व्हा!!
*********************************
पावसाची शाश्वती नसतानाही आपले सर्वस्व मातीच्या स्वाधीन करण्याची कणखरता फ़क्त शेतकर्याकडेच असते.
*********************************
भुईला दिली ओल नाही ढगाने
कसे अंकुरावे अता हे बियाणे?
*********************************
मात्र तणाला फ़ारच जोर
*********************************
*********************************
*********************************
वादळवार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट आली.
*********************************
नवे तंत्रज्ञान वापरायचे?
(शेतमजुरांचे काय होईल, असा प्रश्न कुणालाच पडत नाही)
*********************************