३ तास रसिकांना खिळवून ठेवणारे शेतकरी कवीसंमेलन
शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय एड्रावकर शिक्षण व उद्योग जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे अ.भा .मराठी शेतकरी साहित्य संमेलन जयसिंगपूर येथे संपन्न झाले. शनिवार दि.८ व रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ असे दोन दिवसीय सत्र आयोजित करण्यात आले होते.
लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबून शेतकऱ्याचे आयुष्य सुखाचे व्हावे व सन्मानाचे दिवस परत यावेत म्हणून शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करणे हेच या संमेलनाचे औचित्य होते.
युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर येथील भव्य एसी हॉल, कुंजवन उदगाव जैन मंदिर परिसरातील शांत व आध्यात्मिक वातावरणातील निवासी व्यवस्था, शुद्ध सात्त्विक जेवणाची व्यवस्था व संमेलन स्थळापर्यंत साहित्यिकांना पोहचण्यासाठी बसची विशेष व्यवस्था हे सर्वकाही अप्रतिम दर्जाचे होते. यामध्ये कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व त्यांच्या टीमचे शिस्तबद्ध नियोजन पदोपदी दिसून पडत होते.
शेतकऱ्यांसाठी पार पडलेले बारावे शेतकरी साहित्य संमेलन हे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच पार पडत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरीतील शरद कृषी महाविद्यालय व एड्रावकर शिक्षण व उद्योग समूहाला हा मान मिळाला होता. अन त्यांनीही हा शिवधनुष्य लीलया सांभाळला व यशस्वीपणे पूर्णही केला. संमेलनाचे हे तपपुर्ती वर्ष होते .
आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने जयसिंगपूरला पोहोचलो तेव्हा रेल्वे स्टेशन बाहेर संमेलनाची बस आमची प्रतिक्षाच करत होती. आम्ही फ्रेश झाल्यावर लगेच संमेलनस्थळ गाठले, तेव्हा नुकतेच उदघाटन सत्राला सुरुवात झाली होती. कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष मा. सौ सरोजताई काशीकर ( माजी आमदार ज्येष्ठ शेतकरी नेत्या तथा लेखिका), उदघाटक म्हणून मा. एडवोकेट वामनराव चटप (माजी आमदार संसद पटू तथा शेतकरी ज्येष्ठ शेतकरी नेते), स्वागताध्यक्ष, माननीय आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर (विधानसभा सदस्य), कार्याध्यक्ष मा. श्री गंगाधर मुटे (संस्थापक अध्यक्ष शेतकरी साहित्य चळवळ), संयोजक मा. श्री एडवोकेट सतीश बोरुळकर (मुंबई हायकोर्ट) व अन्य मान्यवर उपस्थित होते. मनीषा रिठे (उपाध्यक्ष शेतकरी साहित्य चळवळ) यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
"नमो मायभाषा जयोस्तु मराठी" हे मराठी मायभाषा गौरव गीत व शेतकरी नमनगीत "अविरत अवनीवर जो घाम गाळतो, त्या देवाला मी नमन करीतो" या नमनगीताने मा. गणेश मुटे व संच यांनी वीररसाने परिपूर्ण असे गीत गायले.
दुपारच्या सत्रात परिसंवादानंतर शेतकरी कवी संमेलनाच्या बहारदार सत्राला सुरुवात झाली. ज्याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्याकडे होती तसेच दुसरे सूत्रसंचालक बीडमधील अनंत मुंडे सर हे होते. या कवीसंमेलनाचे अध्यक्ष तपपूर्ती सोहळ्यानिमित्त कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी आदरणीय गंगाधरजी मुटे (कार्याध्यक्ष शेतकरी साहित्य चळवळ ) होते.
आपल्या भावभावना व्यक्त करण्याचे सशक्त माध्यम म्हणजे कविता. त्याचप्रमाणे सत्य व वास्तवतेचा जागर करत लेखणीच्या माध्यमातून कुठाराघात करत हेच कार्य महात्मा फुले, युगात्मा शरद जोशी, डॉ. पंजाबराव देशमुख, विठ्ठल वाघ, ना.धो. महानोर यांनी केले. या कवी संमेलनाचा आगाज ना.धो. महानोर यांच्या पुढील ओळींनी करण्यात आला.
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्य अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
या कवीसंमेलनामध्ये एकूण ४८ कवी-कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवला. त्यात नीलम माणगावे, अविनाश सगरे, राकेश मायगोंडा पाटील, राजेंद्र कुचकर, विजयकुमार बेळंके (कोल्हापूर), संजय कावरे, प्राची लाहोळकर-मोहोड, सागर लाहोळकर, निलेश देवकर (अकोला), खुशाल गुल्हाने, विनायक अंगाईतकर, सुधाकर थेटे, शुभांगी निंबोळे (अमरावती), वैष्णवी निर्मळ (अहिल्यानगर), राजेंद्र फंड (अहिल्यानगर ), एम. ए. रहीम बंदी (चंद्रपूर ), लक्ष्मीकांत कोतकर (धुळे ), संगीता घुगे, साईनाथ रहाटकर (नांदेड), लीलाधर दवंडे, सुरेखा बोरकर, उपेंद्र महात्मे (नागपूर), रावसाहेब जाधव, सुभाष उमरकर, विशाल औताडे, रवींद्र दळवी (नाशिक), किशोर देशमुख, माधव जाधव (परभणी), किशोरी पाटील (पालघर ), संजय आघाव, सिद्धेश्वर इंगोले, बालाजी कांबळे, दत्ता वालेकर (बीड), राजेश अंगाईतकर, महेश कोंबे (यवतमाळ ), संगीता थोरात (रायगड), रंगनाथ तालवटकर, भालचंद्र डंभे (वर्धा), युवराज टोपले (वाशिम), कृष्णा जावळे, किसन पिसे, नीतिन वरणकर (बुलढाणा ), सचिन शिंदे (यवतमाळ ), प्रकाश पाटील (जळगाव), सायरा बानू चौगुले (रायगड), लक्ष्मण हेंबाडे (सोलापूर ), मिलिंद कुलकर्णी, अनिता खेबूडकर इत्यादी.
यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून आलेल्या कवी-कवयित्रींनी शेतीमातीचे गहन वास्तव, पोशिंद्याचे जगणे कवितेतून मांडले. शेतकऱ्यांच्या नशीबी आलेले विदारक सत्य राजेंद्र फंड आपल्या कवितेतून अशाप्रकारे मांडतात...
धनुष्य ताणले, कमळही फुलले
घड्याळ टिकटिक करत हाय
आमचा शेतकरी मात्र हाय
तिथच हाय
तसेच शेतकऱ्यांच्या वेदनेला स्पर्श करत एम. ए .रहीम बंदी (चंद्रपूर ) यांनी विठुराया ही कविता सादर करत शेतकऱ्याला विठूरायाची उपमा देत रसिकांची मने जिंकली.
दिनरात चालतो हा पंढरीचा वारकरी
दिनदु:खितांचा वाली, कष्टकरी शेतकरी
लीलाधर दवंडे यांनी "शेतकऱ्यास" नावाची कविता सादर केली. त्यात लूट करणारी अर्थव्यवस्था, फोफावलेला भ्रष्टाचार यावर जळजळीत प्रकाश टाकण्यात आला.
लुटणारे पळून गेलेत राजा, कित्येक देशाबाहेर
मग तुलाच का मिळावा, सांग विषाचा रे आहेर
साईनाथ रहाटकर यांनी "बाप माझा शेतकरी" ही हृदयस्पर्शी रचना सादर करत जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बाप यांची उद्विग्नता मांडली. भालचंद्र डंभे यांनी "एका कर्जबाजारी शेतक-याची व्यथा" आपल्या कवितेतून मांडली. सुरेखा बोरकर यांनी पोशिंदा नावाच्या कवितेत "नाही कुणा कळवळा | येथे नाही कुणी वाली||" या ओळीतून कृषी प्रधान देशाची शोकांतिका मांडण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण हेंबाडे यांनी "कुळव" कवितेतून पाण्याचे महत्त्व विशद केले, "रान कुळवून झाला, तन करपून गेलं, पाण्यापायी व्याकुळला डोळा आभाळा न्याहाळला|| रंगनाथ तालवटकर यांनी "कधी जागेल सरकार" या कवितेतून व्यवस्थेवर घणाघात केला. किशोरी पाटील यांनी "शेतकरी बाप " नावाच्या कवितेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जिणे मांडले .
बाप आतून खचला, सारा प्रवास संपला||
केला मनाचा निर्धार विष घेऊन झोपला,
रोगर आत्महत्येवर प्रहार केला||
किशोर देशमुख यांनी "कुणबी" कवितेतून बारा बलुतेदारी व शेतकरी जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आमचे मित्र व वऱ्हाडी कवी रवींद्र दळवी यांनी वऱ्हाडी रचनेतून "कास्तकार नाही बनाचं . " यात ज्या मातीने पोसलं त्यालाच विसरत नैसर्गिक आपत्ती व न भेटणाऱ्या हमीभावामुळे दुःखी होऊन वैफल्यग्रस्त शेतकऱ्याची व्यथा त्यांनी मांडली.
गंगाधर मूटे हे चतुरंग व्यक्तिमत्त्व छंदोबद्ध कविता, गझल वृत्त, तंत्र यांची चपखल जाण असणारे तसेच मराठी भाषेत रूढ असलेले शब्द तसेच बोलीभाषा वाक्प्रचार म्हणी यांचा खुबीने वापर करत "माझी गझल निराळी" या गजलसंग्रहाचे लेखक तसेच मराठी भाषेत शेतीच्या विषयासाठी समर्पित लेखन करणाऱ्या लेखकांच्या कवीच्या यादी गंगाधरजी मुटे यांचे नाव अग्रणीय आहे. रानमेवा, वांगे अमर रहे, नागपुरी तडका इत्यादी संग्रह, बळीराजा डॉट कॉम, ॲग्रोवन मासिक व अन्य वृत्तपत्रातून सातत्याने लेखन करणारे, शेतकरी साहित्य संमेलनाची धुरा सांभाळणारे, " ब्लॉग माझा" वर लेखन करणारे, अनेक संकेतस्थळाची निर्मिती करून "अभय" या टोपण नावाने लेखन करत बळीराजाचे दु:ख, आक्रोश यांना स्थान देणारे. असे हे व्यक्तिमत्त्व. त्यांचाच एक शेर
लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे बत्तीस तारखेला
ही बत्तीस तारीख शेतकऱ्यांच्या जीवनात कधीच आली नाही, कल्याणकारी आश्वासनाची खैरात करणारा लबाडपंथी पॅकेज दिवस जगातच कधीच उजाडलाच नाही.
कवी संमेलनाचे अध्यक्ष गंगाधरजी मुटे (कार्याध्यक्ष शेतकरी साहित्य चळवळ) यांचे स्वागत मजरूह सुलतानपुरी यांच्या काही ओळींनी करण्यात आले.
मै अकेला ही चला था जनाबे मंजिल मगर
लोग आते गये और कारवा बनता गया
या ओळींनी करण्यात आले. गंगाधरजी मुटे यांचे स्वागत विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख राजेंद्र फंड यांनी केले. कवी संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची विदारक परिस्थिती मांडली.
वरूण देवाने फालतू त्याची जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा आग लागू नये
यातून त्यांनी शेतीमातीशी जुळलेल्या शेतकऱ्याचे भयाण वास्तव मांडले व सरकारला दुःखाची मलमपट्टी करून, पॅकेज देऊन हे भागणार नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अजित सपकाळ यांनी "पाणी" या वऱ्हाडी कवितेतून पाण्याचे दुर्भिक्ष मांडत जलसंधारणाचे महत्व विशद केले.
पाण्याविना पिके कशी करपून गेली
सुगीची माह्या अशी वाताहात झाली
काटकसर कर राजा पाण्याचा हा थेंब
जीवनाचं सार आहे पाणी पाणी...
शाहीर अनंत मुंडे यांनी आपली सुंदर शेतीमातीशी निगडित कविता सादर केली, जवळपास ३ तास रसिकांना खिळवून ठेवत हा बहारदार कार्यक्रम चालला होता.
दिवंगत गझलकार सतीश दराडे गुरुजी यांच्या शेराने कवीसंमेलनाचा समारोप झाला.
आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया
कविते उभी रहा तू मागे स्मरण कराया
अजित सपकाळ
अकोट जि.अकोला
बारावे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जयसिंगपूर
दिनांक : शनिवार, दि. ८ व रविवार, दि. ९ फेब्रुवारी, २०२५
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव
पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर