Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




हारासी

लेखनविभाग :: 
ललितलेख

उडदाचं खळं कालच झालं, पैशाची तंगी अन सावकारी देणं असल्याने ते मार्केटला लगेच नेण गरजेच होते या साली झडीत तस पाहता चांगल नव्हतंच पण जे आपल्या पदरात ते आपलं म्हणून ‘दा’ न उडीद खामगावच्या मार्केटला न्यायचं ठरवलं.
उडदाचे पैकं मिळाले कि बायकोले आधी एक नवी साडी घेऊ, परकर घेऊ, दोन वरीस झालं आबाले धोतराचा जोड घेतला नाही, मायले बी लुगडं घेतल नाही दोघास्नी बी नवे कपडे घेऊ. पोरगी बी आता मोठी होऊन रायली तरीबी फाटलेली मीडी सुईन शिऊन-शिऊन घालते, पोरांनी कधी आपल्याले कपड्या साठी तरसावलं नाही, पोराचं फाटलेलं दफ्तर अन् त्यातून बाहेर डोकावणारी शाळेची पुस्तकं रोज ‘दा’ च्या नजरेस पडायची त्याले बी दफ्तर घेऊ, थोडं फार कर्ज आहे त्याची बी परतफेड करू गेल्या दोन साला पासून मंदीराचं पैकं उचलेलं आहे त्याचं दिडीनं याज व्हत आहे ते बी फेडू. बहिण या साली दिवळीले आलीच त् आपण एक भाऊ म्हणून ओवाळणीचं ताट खाली न पाठवता तिलेबी साडी-चोळी घेऊ.
असा येगयेगळा इचार ‘दा’ गाडीत मालाच्या थप्पीवर बसून करत होता.
या साऱ्याच्या इचारात तो मात्र कुठेच दिसला नाही.......!
तेवड्यात मालाचं चारसे-सात मार्केटला पोहचलं.
हमालांनी मालाची गाडी खाली करायला घेतली...
एक एक पोतं खाली करत ‘दा’ चा उडीद हमाल खाली काढत होता , आपल्या हातातली हुक पोत्याला लावत हमाल अलगत पोतं पाठीवर घेत तो आडत मध्ये उभी करत होता.
एक एक पोतं खाली येत होतं.
हमालानं पोत्याला लावलेली हुक जणू ‘दा’ च्या काळजाला टोचत होती, पोत्यासोबतच काही पांढऱ्या गोण्या बी होत्या.
हमालानं पांढऱ्या गोण्या खाली करायला घेतल्या, आपल्या हातातली हुक तो त्या गोणीत मधोमध खुपसायचा, कमरेला लचका देत हुकेनं त्यान गोणी पाठीवर घेतली तेवड्यात ‘दा’ च्या काळजात कुणी हुक खुपसावी अन त्याची छाती फाडावी तसा टर्रर... आवाज झाला, गोणी मधोमध फाटली अन उडदाचे दाणे दाणा-दिन झाले.
फाटलेली गोणी हमालानं तशीच खाली टाकत त्यानं दुसर्या गोण्या उचलायला घेतल्या, खाली सांडलेले उडदाचे दाणे, मालाची गोणी तुडवीत त्यो मालाची गाडी खाली करत होता.
हमाल पायाखाली तुडवीत असलेला माल पाहून ‘दा’ ला खळ्यावरची आठवण झाली......!
वावरात खळं सुरु असलं की पोरं मधी आले, अन दाणोडा केला की किती रेखावतो आपण त्यायच्यावर, कधी कधी त मारतो बी....!
इथं हा हमाल सारा माल पायाखाली तुडवतो आहे पण कुणाला ब्र.... बोलायची हिम्मत होत नाही आपल्याकडून.
सारा माल उतरवून झाला.
‘दा’ नं सांडलेला माल गोळा करायले घेतला, आपल्या हातानं तो दाणे सावरू लागला, अडतीतून एक रिकामं पोतं घेऊन त्यान तो माल त्यात भरला. तरी समधा थोडीच जमा होतो काही दाणे तसेच राहिले काही मातीत मिसळले.
हे सारं करतांना ‘दा’ ला खळ्यावरची मातेरं करणारी बायको आठवली......!
घामाच्या धारात भिजणारी घरची लक्ष्मी खळ्यावर जेंव्हा एक एक दाणा वेचत असती तव्हा उन तहान न पाहता एक एक दाणा वेचताना ती काकुळतीला येते मातीत दडलेले दाणे ती मातीसगट गोळा करती दाण्यापेक्ष्या मातीचं वजन जास्त असून बी ते ओझ ती डोक्यावर घेत ओढ्याच्या पाण्यात धुण्यासाठी नेते चाळणीत मातेरं घेऊन हलक्या हातांन माती पाण्यात सोडते तेच ओले दाणे एखाद्या फडक्यावर वाळू घालते अन एवढी खळ्याची रास सोडून त्या मातेर्यावर ती तेव्हढा हक्क गाजवते.
अन् इथं ही चाललेली नासाडी ‘दा’ च्या डोळ्यांना बघवत नव्हती.
मापार्यान दा च्या उडदाचा काटा करायला घेतला.
आपल्या हातांन शीग लाऊन भरून दामन-सुतळीनं शिवलेली मालाची पोती अडतीतले हमाल हातातल्या हुकनं टराटर उसवत होती. एक एक पोत खाली करत तो माल ती आपल्या पोत्यात भरून रिकामी पोती ‘दा’ कड फेकत होती, फेकलेलं एक एक पोत जमा करत दा रिकाम्या थप्पी लावत होता. भरलेल मालाच पोतं तसच अड्तीच्या कोपर्यात तीन लोकंडी पायपाले टांगलेल्या काट्यावर जात होती.
तीन पायपाले मधोमध लटकलेला तो लोखंडी काटा, दोन्ही कडून दोन साखळीचा आधार असणारे भले मोठे पारडे, एका पारड्यात वीस-वीस किलोची पाच मापं, त्याच पारड्याले वर लटकलेल एक रिकामं पोतं........अन पारड्याला खेटून अगदी मधोमध उभा असलेला तो मापारी.
दोन हमालानं दोन्हीकडून पोतं पकडत फरफटत काट्यापाशी आणायचं, पायान जोर देत उचलून ते काट्यावर ठेवायचं, पोतं काट्यावर ठेवताच काटा वजनानं झुकायचा, मग मापार्यानं हातातल्या छोट्या टोपल्यानं त्यातला माल काढायचा अन आपल्या उजव्या हाताशी असलेल्या एका पोत्यात तो रीचवायचा, याच सोबत एक टोपल मालाचं मापाई च्या नावाखाली आपल्या पोत्यात रीचवायचा. हि मापाई हिशोबात कुठेच नसायची. एक-एक क्विंटल मालाचं पोतं मोजत ते आत नेऊन उभ करायचं सारा माल मोजून झाला कि मग हाताशी काढून ठेवलेल्या मालाच बाचकं मोजून व्हायचं.
सारा माल मोजून झाला होता.
मोजलेला माल किती भरला ते ‘दा’ ले अजून कळालं नव्हतं, अन कळून करायचं तरी काय होतं...!
मापारी खोटं थोडीच काही लिहणार आहे.
गोळा केलेल्या रिकाम्या पोत्याची थप्पी मारत ‘दा’ न त्याचा गोल गुंडाला केला. बाजूला पडलेली सुतळी घेऊन त्यानं तो पोत्याचा गट्टा बांधला अन अड्तीच्या कोपर्यातल्या मालाच्या पोत्यावर फेकला.
तेवड्यात मोहरच्या आड्तीत हर्हासी सुरु झाल्याचा आवाज कानावर आला, धान्यांचा लिलाव सुरु झाला होता. तशीच आडत्यांची, दलालांची झुंड ‘दा’ न माल टाकलेल्या वाण्याच्या अड्तीत घुसली.
गोल घोळका करून उभे असलेले ते दलाल, आडते, व्यापारी......., लख लख चमकणार त्यांच्या चेहर्यावरचं तेज, अंगावर घातलेले कडक इस्त्रीचे झाक-पाक कपडे, त्यांच्या चालण्या बोलण्याची भाषा, हातातल्या बोटात चमकणाऱ्या सोनेरी अंगठ्या, शर्टाचं छाती जवळ वरचं उघडं असलेलं बटन अन्, त्यातून स्पष्ट दिसणारा तो गळ्यातील सोन्याचा गोफ, पान खाऊन पिचकारी मारून झाल्यावर ओठांवर दिसणारी ती पानाची लाली, हे सार त्यांच्या श्रीमंती चे दाखले देणार होतं.
अड्तीत उभ्या केलेल्या ‘दा’ च्या उडदाच्या पोत्यापासी हि झुंड पोहचली.
हमालानं एक छोटं टोपलं घेत पोत्यात हात खुपसून तो थोडा थोडा माल टोपल्यात टाकू लागला, साऱ्या पोत्यामधून थोडे थोडे दाणे घेत टोपल भरून त्यान वाण्याच्या हातात दिल.
अडते, दलाल, व्यापारी अंजुळभर, मुठभर दाणे हातावर घेत निरखून पाहत होते. कुणी एका हातातून दुसर्या हातात हे दाणे उपनल्यागत करत होते, कुनी हातातले दाणे हातानं चोळून पाहत होते, हातातले दाणे हातात उधळत दोन चार दाणे तोंडात टाकत दोन्ही दाताच्या मध्ये टचकन दाबत होते. ‘दा’ च्या छातीत खंजीर खुपसावा तशी खुपसनी एका दलालानं उभ्या असलेल्या पोत्याच्या मधोमध खुपसली अन त्यातून बाहेर काढलेले दाणे तो निरखून पाहु लागला.
मालात माती तर नाही ना...? मालात खडा तर नाही ना..? माल डागी तर नाही न..? याची शहानिशा तो करीत होता.
अन मग हर्हासीले सुरवात झाली......!
चलो बोलो शेट आज का भाव.......!
बोलो.... बोलो.....
फटाफट बोलो....
मालमे दम है साब.....
चलो सोना ले लो मिट्टी के दाम मे........
हां.... शेठ बोलो, जरा जल्दी बोलो......... (मधोमध उभा असलेला वाणी सगळ्यांच्या नजरेत नजर घालून बोलत होता.)
पचपनस्स्सो रुपीया.....! (माघून कुणीतरी बोलल)
छप्पनसो........
छप्पनसो........
आठावनसो........
आठावनसो रुपीया.....
उनसाठ पचास ......
उनसाठ पचास ......
उनसाठ पचास ......
छेहजार......
एकसठसो रुपीया
एकसठसो रुपीया (मालपाणी शेट के पुरे एकतीसो)
चलो बोलो शेट आगे बोलो......
काला सोना खारीदो मिट्टी के दाम मे....!
एकसठसो रुपीया ........
एकसठसो रुपीया...........
एकसठसो रुपीया एक.......!
एकसठसो पचास....
एकसठसो पचास एक....
एकसठसो पचास दो....
एकसठसो पचास दो....
एकसठसो नब्बे......
एकसठसो नब्बे एक......
एकसठसो नब्बे दो......
(समोरच्या दलालान वाण्याला अलगत डोळा मारून खुणावलं)
एकसठसो नब्बे एक......
एकसठसो नब्बे दो......
एकसठसो नब्बे तीन, मिट्टी निकालके......!
‘दा’ च्या मालाची हर्हासी करून ती झुंड मोहरं सरकली खरी पण एका शब्दाने दा ला पुन्हा हादरवलं अन तो शब्द होता “मिट्टी निकालके”
हा शब्दच ‘दा’ च्या काळजापर्यंत वार करीत गेला.
याचाच अर्थ आता समध्या उडदाची आता चाळणी होणार होती.
मातीतून माल पिकवायचा म्हणजे माती येणारच, पण व्यापार्यांना ती बी नको असते, आता एवढा सारा माल चाळून, घाळून निघणार होता. मालाची चाळणी म्हणजे सहज बोलण्या इतकं ते सोप्प मुळीच नव्हत. चाळणीतून माती जाणार त्या मातीसोबत छोठे उडदाचे दाणे बी जाणार. चाळण करतांना धान्याची होणारी नासधूस वेगळीच. वरतून अडत्या चाळण घाळण चे पैसे कापणार ते वेगळेच. मग पुन्हा मालाचं वजन होणार. हा विचारच त्रास देणारा होता.
‘दा’ चला जेवायले.......!
सोबत असलेले गावचे कास्तकार ‘दा’ ला बोलले.
आता कसला घास नरड्याच्या खाली उतरतो, पण दोन-दोन घास खाल्ले पाहिजे.
अड्तीच्या बाजूला असलेल्या शेजारच्या हाटीलीत सारे जेवायला गेले, वायरच्या तैलीतून बायकोणं बांधून दिलेला भाकरीचा पालव ‘दा’ न सोडला, त्यात घरच्या ज्वारीची भाकरी त्यावर हिरव्या मिरचीचा ठेसा, अन खाराची फोड.
त्या हाटेलातल्या कोपर्याच्या बाकावर बसून सारे जेवण करू लागले........!
हाटेलात बसायचं म्हणून कुणी मिसळ, वडारस्सा, शेव रस्सा, भजी अस काही काही माघवत होते. पण दा न तसीच अर्धी चोखंड भाकर ठेस्या सोबत खाल्ली अन हात धुतला. हाटेलात ठेवलेल्या राजनीतून पाणी घेत घोटभर पाणी पिलं अन् वाण्याच्या अड्तीकडं आला.
तोवर हमालांनी मालाची चाळणी करायला घेतली होती, चाळणीच्या टपातून मालाचं भारलेल पोत हमाल रीचवायचा, तसेच ते दाणे भराभरा खाली यायचे, त्याच सोबत माती अन् बारके दाणे चाळणीच्या खाली पडायचे. अडत्यानं चाळणी बी मोठ्या भोकाची लावली होती यामूळं बराच चांगला माल बी मातीच्या ढिगात पडत होता.
पोतं भरतानां, चाळणीत माल टाकतानां, काट्यावर नेतांना, मोजतानां मालाची नासाडी होत होती.
यातच मार्केट मध्ये फिरणारी मोकाट जनावरं त्रास द्यायची, याच मार्केट मध्ये फिरणारी बायका-पोरं कवानाकच नजरेला चुकांडा देऊन मालाच्य थैल्या भरायची. अन लक्ष्य ठेवायचं तरी कोणावर, मालाची नासधूस करणाऱ्या हमालांवर, काटा मारणाऱ्या मापार्यावर, मार्केट यार्डातल्या मोकाट गुरा-ढोरांवर की या थैल्या घेऊन फिरणाऱ्या चोरांवर......?
घामाघूम झालेला ‘दा’ हे सार केविलवाण्या नजरेनं पाहत होता....!
दुसरं करणार तरी काय?
मालाची चाळणी झाली, माल पुन्हा काट्यावर आला, मग पुन्हा वजन झालं.
बांधून ठेवलेल्या पोत्याचा गट्टा सोडत ‘दा’ न एक पोत काढलं अन् त्यात तो ते मातेर भरू लागला.....
हे मातेर तो आता घरी नेणार, अन् बायको याच मातेर्यातून मग एक-एक दाणा बाजूला काढणार. तस्सबी ‘दा’ च्या कुणबीकीत बायकोच्या आयुष्याचं मातेरं झालच होत. याच मालासोबत तिची चाळणी-गाळणी रोजचीच होती.
सगळ्यांच्या मालाच्या पट्ट्या अन् पैसे भेटून झाले होते. मातेरं पोत्यात भरुस्तर वाण्यानं ‘दा’ ची पट्टी बी बनून ठेवली.
सालाभरात ‘दा’ न वाण्याकडून घेतलेल्या पैशाचा हिशोब करत त्यानं व्याजासकट पैसे या उडदाच्या पैश्यातून कापून घेतले.
मालाचे रिकामे पोते मांडीवर घेऊन ‘दा’ हिशोबाच्या खोलीत वाण्याच्या समोर बसला, अडत्या हातातलं पैशाच बंडल मोजत होता. मोजलेले पैसे, त्यावर ठेवलेली चिल्लर, अन नुकतीच बनवलेली मालाची पट्टी त्यान ‘दा’ च्या हातात दिली.  दिलेले पैसे न मोजताच ‘दा’ न शर्टाच्या खिशात घातले, अन तो नुसताच अडत्यानं दिलेल्या हातातल्या पट्टीकडं पाहत होता.