कष्टकरी जनतेचा राजा बळीराजा
पावसाने रिमझिम बरसावे, पीकाने नृत्य करीत शेतशिवाराला उधाण यावे, स्वागताला इंद्रधनूने तोरणे बांधावीत आणि ओठावरची बळीराजाची गाणी काळजाला भिडावी; ही दृश्य आणि सृजनं याच मातीतली आहेत. ते बळीराजाच्या नावानं फुलून येणारे आसमंत कायमच हुरूप देणार वाटत त्यामुळेच म्हटलं जातं की, "इडा पिडा टळो अन बळीचे राज्य येवो..!" हे वाक्य कायमच सामान्यजनांच्या मुखातून ऐकायला मिळते. का एवढं चिरपरिचित असं असावं हे वाक्य? का मानत असावेत या वाक्याला एवढं खरंखुरं? तर इतिहासातील अन पुराणांतील काही मौखिक व लिखित परंपरेच्या आधारावर या बाबी उमजून येतात. श्रद्धा-अंधश्रद्धा या बाबी जशा प्रकारे एकमेकांस समोरासमोर येतात तशाच पध्दतीने विश्वास-अविश्वास या बाबी एकमेकांस सामोरे येतात. इतिहासात कुणीतरी बळी नावाचा राजा होऊन गेला त्याची कीर्ती दूर दिगंतात आजही ऐकायला मिळते त्यावरून तो किती श्रेष्ठ असेल याची कल्पना येते.
समाजमनाची गरज आणि समाजातील प्रत्येक घटकाला शक्य होईल तेवढं न्याय्य तत्वाने जो राजा देऊ शकला ते इतिहासाच्या पानावर आणि लोकांच्या मनावर आजही राज्य करून आहेत. त्यांच्या नावाचा डँका चोहोबाजूंनी ऐकायला मिळतो. यात काही राजे उजागर झालेत तर काही काळाच्या पटलावर उजागर होण्यास काहीएक कारणांमुळे असमर्थ ठरले. कुण्या एकाच गुणामुळे एखादा राजा इतिहासात महान ठरला नाही त्यासाठी त्या त्या राजाला सर्वगुणसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागली आणि प्रजा आपली असल्यासारखी सांभाळावी लागली. "यथा राजा तथा प्रजा" म्हणजे जसा राजा तशी प्रजा हे तत्व बऱ्याच इतिहासकालीन राज्यांतून ऐकायला, वाचायला मिळते. हे कितपत खर कितपत खोटं असेल हे ठरवणे हा ज्याचा त्याचा सद्सद्विवेक; जो की काही संदर्भ चाळून काहीसाच लक्षात येऊ शकतो.
हरि तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहू कठीण नव्हे ते करिसी आन | कवणें नाही केले ते ||१||
बळी सर्वस्वे 'उदार' । जेणे उभारिला कर । करूनी काहार । तो पातळी घातला || २ ||
"हे हरी, तू निष्ठुर आहेस. तुझ्यामध्ये प्रेम नाही. तू दगडाप्रमाणे कठीण आहेस. अरे दुसऱ्या कुणीही केलं नाही, अस निर्दयीपणाच काम तू करतोस. तस पाहिल तर बळी सगळ्याच बाबतीत उदार होता. त्याने तुला जमीन दान देण्यासाठी वर हात उचलला होता. पण तू कहर करून त्याला पाताळात घातल." पुराणांतील काही आधार घेऊन तुकोबाराय वामनाने केलेल्या कपटी नीतीचा समाचार घेतानाच बळी नावाचा राजा किती उदार होता याची स्तुती करतात. तुकोबांनी कायमच त्यांनी त्यांच्या सद्सद्विवेकाच्या आधाराने मांडणी केली.
पुराणांचा आधार घेऊन लक्षात येते की, असाही एक राजा होता जो की शेतकरी-कष्टकरी जनतेच्या बाजूने सर्वार्थाने उभा राहिला आणि त्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शक्य होईल ते सकारात्मक पाऊले उचलली ज्यामुळे आजही त्या राजाची घरोघरी आयाबहिनी सणावाराला नाव घेत असतात. काय केलं असेल या राजाने म्हणजे एवढं नाव आजही घ्यायला आणि त्या राजाच राज्य परत यावं यासाठी लोक मनोमन प्रार्थना करत असतात. तर म्हणतात त्या राजाने त्याच्या राज्याची घडी अशी बसवली होती की, सामान्य जणांची विशेषतः शेतकरी वर्गाची (वैश्यांची) हितोपकारक अशी योजना राबविल्या होत्या. न भूतो न भविष्यती असा राजा होणे नाही असं म्हटलंय काही तत्ववेत्यांनी. काळाच्या पटलावर शिवाजी राजा नावाचा अजून दुसरा पराक्रमी राजाही असाच कर्तृत्ववान होता असे आपल्याला माहीतच आहे पण तरीही बळीच राज्य येवो ही संकल्पनाच काहीतरी उमदी आहे. कैक राजे होऊन गेलेत मात्र काहीच लक्षात राहिलेत ते त्यांच्या राज्यकारभार आणि प्रजेच्या हितैशी धोरणामुळेच. याच आधाराने म्हणतात की आजही बळीराजा हा शेतकऱ्यांसाठी राजाच आहे. काही माणसं असतातच अशी की ज्यांच्या नावाने आजही स्कारात्मकतेचा सूर आळवावा वाटतो. त्याच आशावादावर थोडे चैतन्य भरून वाटते.
- कृष्णा अशोक जावळे
( 7028563001)