बळीराजा ते फुले - जोशी
शेती आणि शेतकरी या दोहोंचाही एकंदरीत इतिहास तसा फार काही चांगला नाही. इतिहासात कितीही मागे जाऊन पाहिले तरी कोणत्याही कालखंडात शेती आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सन्मानाचे जिने आल्याचीही नोंद आढळत नाही. शेतकऱ्यांचा राजा तर कधी झालाच नाही. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा राजा म्हणजे बळीराजा पण बळीराजा सुद्धा काही निखळ शेतकरी राजा नव्हता. तो आम जनतेचा राजा होता. इतिहासाच्या पानावर बळीराजानंतर शेतकऱ्यांचा राजा म्हणून जे दुसरं आणि शेवटलं नाव येतं ते शिवाजी महाराजांचं; पण शिवाजी महाराज सुद्धा निखळ शेतकर्यांचे राजे नव्हतेच. ते रयतेचे राजे होते. त्यांची धोरणे शेतीला न्याय देणारी होती, शेतकऱ्यांच्या हिताची जतन करणारी होती, इतक्यावरच समाधान मानावे लागते.
शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून जसे राजे दोनच तसेच शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढणारे शेतकऱ्यांचे नेतेही दोनच. पहिले महात्मा फुले आणि दुसरे युगात्मा जोशी. शेतकऱ्यांच्या आयुष्यात केवळ दोन राजे आणि दोन नेते, त्यापलीकडे काही नाही. त्याआधी काही नाही आणि नंतरही काही नाही. शेतकऱ्यांच्या आयुष्यात थोर महामानवांचा दुष्काळ असूनही शेतकरी इतका बेपर्वा की त्याने कधीही आपल्या हितचिंतक राजाची अथवा नेत्यांच्या स्मृतींची जपणूक केली नाही. ऐतिहासिक दस्तावेज सुद्धा जतन केला नाही. त्याचा परिणाम असा की आज बळीराजा, शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शेती विषयक कर्तृत्वाचा दस्तावेज आज फारसा काही उपलब्ध नाही.
युगात्मा शरद जोशींचा उल्लेख शेतकरी नेते असा जरी होत असला तरी ते केवळ शेतकरी नेते नव्हते, राजकीय नेते तर नव्हतेच नव्हते; याउलट ते महान शेतीतज्ज्ञ व अर्थतज्ज्ञ होते. साम्यवाद, समाजवाद आणि गांधीवादानंतर शेतीच्या स्वातंत्र्यवादाची अर्थशास्त्रीय तर्कशुद्ध विचारधारा मांडणारे ते युगपुरुष होते. त्यांनी मांडलेला विचार साम्यवाद आणि समाजवादाला पार ध्वस्त करून गेला. यु, जोशींवर टीका करणारे चिक्कार आहेत पण या टीकाकारांच्या गर्दीत त्यांनी मांडलेला विचार तर्कशास्त्राच्या आधारावर सप्रमाण खोडून काढणारा आजवर कुणीही जन्माला आलेला नाही. त्यांनी मांडलेला विचार आतापर्यंत कोणालाही खोडून काढता आलेला नाही. त्यांनी मांडलेला शेतीविचार इतका तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध आणि एका धाग्यात गुंफलेल्या महावस्त्रासारखा आहे की आज सर्वमान्य होऊन सर्व राजकीय नेत्यांनाही तीच री ओढावी लागत आहे.
बळीराजा, शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या बाबतीत झाले ते निदान शरद जोशी यांच्या बाबतीत तरी होऊ नये असे माझे जे कायम मत राहिले आहे. शरद जोशींनी मांडलेले अर्थशास्त्र खोडून नवे अर्थशास्त्र मांडणारा शेतकरी नेता भविष्यात कोणत्या कालखंडात जन्माला येईल हे सांगणे आज तरी अवघड असल्याने निदान तोपर्यंत तरी शरद जोशींच्या स्मृतींची, विचारांची आणि दस्तावेजांची जपणूक होऊन त्यांच्या स्वप्नांचा भारत उभारण्यासाठी आपण आपल्यापरीने तरी प्रयत्न केले पाहिजेत.
एक वर्षापेक्षा जास्त काळ सलगपणे ज्यांना शरद जोशींच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली अशा एका हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या नशीबवान व्यक्तीच्या यादीत माझा नंबर लागतो. या सहवासामुळे त्यांना जवळून न्याहाळता आले, त्यांना जवळून वाचता आले आणि अवलोकनही करता आले. ते ना माझ्या रक्ताचे, ना रक्ताच्या नात्याचे, ना जातीचे, ना पंथाचे, ना माझ्या पक्षाचे, ना माझ्या विरोधी पक्षाचे. अर्थात कोणतेही परंपरागत ऋणानुबंध नसल्याने व कोणत्याच स्वरूपातील हितसंबंध गुंतलेले नसल्याने मला त्यांच्या कार्याकडे त्रयस्थपणे व तटस्थपणे बघता आले. त्यामुळे शेतीमध्ये सन्मानाचे दिवस आणायचे असतील तर यु. शरद जोशींच्या अर्थवादाशिवाय दुसरा पर्याय नाही असे मला वाटत असेल तर त्याचे मूल्य आगळेवेगळे व नक्कीच मोठे ठरते.
हाच एकंदरीत सारासार विचार करून पुढील आयुष्य यु. शरद जोशी यांचे यांच्या स्मृतींची जपणूक, विचारांचा प्रसार आणि त्यांच्या स्वप्नातील भारत उभारणीसाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य ठरते.
- गंगाधर मुटे आर्वीकर
=-=-=-=
प्रतिक्रिया
लेखन छान आहे.
लेखन छान आहे.
पाने