"आयुष्याच्या रेशीमवाटा" : भाग ८
शिमगा ही आनंदाची पर्वणीच
कोणताही एक रंग माणसाचे आयुष्य रंगीबिरंगी करू शकत नाही आणि आयुष्य रंगीबिरंगी असल्याखेरीज जगण्यात रंगत येऊ शकत नाही. रंगाचे रंगत्व प्रकाशकिरणांवर अवलंबून असल्याने अंधारात जसे रंगाचे रंग बेरंगी असतात तसेच बेरंगी जीवनही प्रकाशमय असू शकत नाही. इतके प्राथमिक ज्ञान ज्या दिवशी माणसाला झाले असेल त्या दिवसापासून त्याला रंगाचे महत्त्व कळून आले असेल आणि त्या हिशेबाने त्याची पावले पुढे पडत गेली असेल.
परंपरागत रुढी, रीतिरिवाज, चालीरीती आणि उत्सव यांच्याकडे डोळस नजरेने बघितले की मग यामागची शास्त्रीय कारणमीमांसा सहज लक्षात यायला लागते. काळाच्या प्रवाहाच्या ओघात काही रूढी, परंपरा कालबाह्य ठरून जरी कालांतराने जाचक वाटायला लागल्या असतील तरी त्यांच्या निर्मितीमागची प्रेरणा मात्र आनंदाची रेशीमवाट विकसित करणे अशीच असणार हे उघड आहे. भारतीय सण आणि उत्सवांतील विविधता बघितली तर त्यातून ठळकपणे जाणवते की, प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव माणसाला परस्परभिन्न व वेगळा आनंद देऊन जात असतो. या सर्व सणात होळी आणि शिमगा हा सण तर थेट रंग या एका खास विषयाला वाहिलेला सण आहे.
खेळणारे खेळून जितका आनंद मिळवतात तसेच बघणारे बघूनही तितकाच आनंद मिळवत असतात. खेळणाऱ्यांकडे व बघणाऱ्यांकडे वक्रदृष्टीने पाहणारेही काही असतात. असतो तसाही स्वभाव अनेकांचा पण इतरांकडे वक्रदृष्टीने पाहून त्यातून आनंद मिळवण्यात त्यांचे सौख्य सामावलेले असते, हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे. खेळण्यापासून चार हात लांब राहून मी इतरांपेक्षा वेगळा आहे, असे भासवून कुणी आनंद मिळवत असेल तर त्याचाही आपण आदरच केला पाहिजे. रासायनिक रंग शरीराला घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग खेळा असे सल्ले देऊन जागतिक दर्जाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावल्याची भूमिका पार पाडून काही व्यक्ती आनंद मिळवत असतात. जे जे नैसर्गिक असेल ते ते शरीराला घातक नसते, इतके सामान्यविज्ञान कोणी शोधून काढले हे तर सृष्टीच्या निर्मात्यालाही माहीत नसते. काचकुयरी, मिरची अथवा अन्य तत्सम जिन्नस नैसर्गिक असले तरी ते काय शरीराला फारच लाभदायक असतात काय? इतकाही विचार करण्याची सुद्धा त्यांना फुरसत नसते. पण एक मात्र बरे असते की, जसा आनंद ज्ञानात असतो तसाच आनंद अज्ञानातही असतो. त्यामुळे ज्ञान्याला अज्ञानी किंवा अज्ञान्याला ज्ञानी बनवण्याचे निष्कारण अट्टाहास म्हणजे आनंदाचे विरजण घालून निव्वळ डोकेदुखी वाढवून घेणे असते.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भीतीने होळी खेळू नका, असे सल्ले देणारांचे यावर्षी पेवच फुटले होते. पण होळी हा केवळ रंगाची उधळण करून एकमेकांच्या शरीराला चेष्टा-मस्करी करून रंग फासण्याचा सण नसून शाब्दिक थट्टा, मस्करी, चेष्टा, टवाळी करण्याचा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, याचाही सर्वांना विसर पडला गेला. शरीरस्पर्शाने विषाणूचे संक्रमण होईलही पण शाब्दिक खेळाने विषाणू संक्रमण कसे होईल? जनतेच्या स्वातंत्र्यावर बंधने घालण्यापेक्षा नवे पर्याय उपलब्ध करून देणे जास्त संयुक्तिक नाही का? पण... हा पणच जागोजागी आडवा येतो आणि सुरळीत चाललेला चालता गाडा अनावश्यकरीत्या पंक्चर करून टाकतो.
एकमेकांचा उपमर्द, अपमान, अवमान न करणारी किंवा समाजाला जाचक ठरणार नाही अशी कोणतीही सात्त्विक मस्करी, टवाळी म्हणजे आनंदाची पर्वणीच असते आणि त्याचेच नाव असते शिमगा. सादर आहे शिमग्याचा एक नमुना.
मामाच्या पोरीच्या नावाने शिमगा
मामाचा गाव, मामीचा गाव
चांदीची पुतळी, सोन्याचा भाव
ही सोन्याची पुतळी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!
गुणाच्या पोरीचे फुगले गाल
फुगल्या गालावर सोनेरी बाल
सोनेरी बटांत डनरफचे थर
डनरफच्या थरात उवांचे घर
या उवांवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!
कानाच्या खिडकीत रुपेरी मोर
मोराच्या तुऱ्यावर चंद्राची कोर
चंद्राच्या कोरीला मोत्याचे डूल
मोत्याच्या डुलावर कस्तुरी झूल
या झुलीवर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!
डोळ्याच्या खापनीस पापणीचे दार
पापणीच्या दाराला झेंडूचा हार
झेंडूच्या हाराला तागाचे सूत
तागाच्या सुतावर बसलंय भूत
या भुतावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!
लिप्स्टीकच्या मागे दातांची रांग
दातांच्या रांगेवर विलायची भांग
विलायची भांगेला अफूचा संग
अफूच्या साथीला अभयचे रंग
या रंगावर मालकी कुणाची?
माझ्या मामाची पोरगी गुणाची!!
- गंगाधर मुटे आर्वीकर
===============
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ८ - दि. १४ मार्च, २०२० - "शिमगा ही आनंदाची पर्वणीच"
==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========