नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अनुभवकथन
पावसाचा एक दुःखद अनुभव
१९९१ च्या जुलै महिन्यातली गोष्ट आहे. या महिन्यात एकसारखं पाणी सुरू होतं. एक दोन दिवसाची उघाड झाली का आणखी पाऊस. या मयन्यात पाण्यानं खूपच जोर धरला होता.मयन्याच्या शेवटच्या हप्त्यात तं या पावसानं कहरच केला. हप्ता झाला नुसती झळ सुरू होती. मया घराची मागची भित पडली. दिवसरातच्या पाण्यानं घरावरचे कौलं पाझराले लागले. घरभर गयाले लागलं. बसापुरती जागा पाहुन तिथच बसल्या बसल्या कशी मटकन् झोप लागाची थेबी समजाचं नाही. डोये तरी किती सहीन करणार होते. रोजच दिवसरात धो धो पाऊस पडत होता. नदी नाले वाहत होते.पेटवाचं इंधन पावसानं गारठलं होतं.थे पेटता पेटाचं नाही.लाकडयवर घासलेट ओतू ओतू पेटवा लागे. तीन चार दिवसापासून लाकडाची धुनी तशीच पेटती ठेवली होतीे. हाताले काम नसल्यानं घरात जे चटणी भाकर असन तेच्यावरच भागवाची वेय आली होती. माणसं कसंतरी ओलं कोरडं खाऊन सांज भागवत होते. पाऊस तर एवढा सततधार होता का बहिर परसाकडे जाणं मुश्कील झालं होतं. मातीच्या भितीयले ओल सुटून भिती पडाले लागल्या, घरं धडाधड पडत होते. वावरातले पीकं पुरात गेले. वावरयमधी पाणीच पाणी होतं. माणसं जनावरं पुरात वाहून गेले होते. मुसयधार पाण्याच्या धाकानं माणसं घरातल्या घरात दिवस काढत होते पण मुक्या जनवारायचं अवघड हून बसलं होतं.
मह्या घरी गाई होत्या. घरचा शिल्लक कडबा पाच -सात दिवसात सरला. आता गईले टाकासाठी घरात चारा नव्हता. बहिरतं मुसयधार पाणी पडत होतं. गई कोठ्यात जोरजोऱ्यानं हंबरत होत्या. तेयच्या आवाजानं जीव कयवयत होता पण उपाय रायला नव्हता. गाईच्या पोटात काहीतरी पडल्याशिवाय तेयचं हंबरन थांबणार नव्हतं.गई चाराले पाठवण म्हणून बाबा घराकडे आलाच नव्हता. थो फरकाड्याच्या कोठ्यातच झोपत होता. कोठा असला तरी इटा सिमेंटचा होता. आईनं मले सांगतलं, "जाय बाबाले बलावून आण.तेयले मन गई चाराले जा म्हणून. घरात चारा नाही असा म्हयावाला निरोप तेयले सांग"..म्या आईचा निरोप बाबाले सांगतला पण गई चाराले न्यासाठी बाबानं नकार देल्ला. "एवढया पाण्यात कुठं नेऊ मी गई चाराले?",बाबा बोलले, बाबाचं काही चुकलं नव्हतं. बाबा एका हातानं व पायानं अपंग होते. अडचण हेच होती का घरच्या जनावरयले टाकासाठी गवताची काडीही शिल्लक नव्हती. गई, वासरयच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. बाबा गई चाराले जाणार नाही. असा बाबाचा निरोप म्या आईले सांगतला. आई चवताळली, तिचे डोये रागानं लाल झाले, थे बाबाले शिव्याशाप द्याले लागली. "इकडे गई खुट्याले मरून रायल्या अन् ह्या दुसरेयच्या कोकात जऊन धसते". तिच्या जीवाची अंगार झाली होती.थे कपायावर हात आपटत आक्रोश करत होती. नशीबाले दोष देत होती.
आईचा नाईलाज झाला. आई मले जवळ घेऊन बोलली, "लक्षा तू जाय बेटा गई घिऊन. इथच्या इथं अमरईत नयीतं बळलीवर तरी गईले फिरवुन आण. मह्या 'सोन्या' हे घे पोत्याची घोंगसी डोक्शावर." घोंगाशी आंगावर अन् हाती इवाची काडी घेऊन मी गई मागं निघालो. अभायातून सरसर सरी बरसत होत्या. कायाकुट्ट अभायानं धरणी मायले झाकुन टाकलं होतं. दिवसाच्या पायरीच अंधार पडल्यासारखं वाटत होतं. चर्रर्र धारा बरसत असतांनी म्या गई चाराले नेल्या खरं पण गई काही एका जागी ठयरत नव्हत्या. अभायातून एकसारख्या पडणाऱ्या धारयनं गई पिसायल्या होत्या.थ्या चौपांड्या पयाले लागल्या.मी तेयच्या मागं पयत होतो. गईमागं धावण्याच्या नादात मह्या आंगावरची घोंगडी पडली, तरी मी जीवाच्या आकांतानं तेयच्या मागं पयत होतो. मह्या डोक्शात एवढच होतं का गई कुठं निघून जाऊ नये. मह्या पायात कईच नव्हतं, कवा खसकन् काटा टोचाचा तर कवा गारगोटी वा खडा, पण कायचाच इचार न करता मी तेयच्या मागं धावत होतो. तेयच्यावर दगडं मारून फेकत होतो पण थ्या कई मले अपटत नव्हत्या.
गई वावरातुन, नाल्याच्या पाण्यातून, धारणाच्या काठावरून, धारणातुन पयत होत्या.मी तेयच्या मागं धावत होतो पण तेच्यातली एकबी गाय मह्या हाती लागली नाही. तेच्यातलं एक कमजोर कारोड तिथच पडलं. काटे-गोटे रूतुन महे पाय रक्ताळले होते. पायाची आग होत होती. मी लंगडत अन रडत रडत घरी आलो. आईनं माही अवस्था पायली. हे काय झालं रे माह्या 'सोन्या'? तिनं मले छातीशी धरुन महे पटापट मुके घेतले.घडलेली हकीकत मी आईले सांगतली.आईच्या डोयात टचकन पाणी आलं. तिनं मह्या भोवतीची मिठी आणखीनच घट्ट केली. माह्य आंग थरथर कापत होतं. तिनं माहे कान फुकले.आंग पुसाले कपडा देल्ला. आई बोलाले लागली, ''आपला वनवास कवा सरन? बाप झयचा थो देव आपल्यासाठी कुठ लपुन बसला काय माहीत! त्याले आपले हाल कसे दिसत नसन.तेच्यात हे पाणी असं मरुन रायलं. हया पाण्याचाबी मुरदा नाही निघत. काय गरीबयले घिऊन जा साठी आलं काय, काय महीत".
आईनं पोतेयच्या दोन घोंगशा केल्या एक मह्या डोक्शावर देलली अन् दुसरी तिनं घेतली. चर पाण्यात आम्ही मायलेकं कारोडीच्या दिशेनं निघालो. घोंगशी आंगावर असली तरी आमी भिजल्यातच जमा होतो. एकदाचं आमी कारोड असल्या ठिकाणी पोचलो. आमाले पाहुन वासरू हबराले लागलं.आईन त्याच्या अंगावर हात फिरवला तसं थे उठासाठी धडपडाले लागलं. आईनं मग घरून आणलं होतं थे पीठ कारोडीले चारलं. थोडया वेयानं मोठ्या जीवावर कारोड उठली. आम्ही त्याले गतीगती घरी घेऊन आलो. वरतुन पावसाच्या धारा सुरुच होत्या. बाकीच्या गई संध्याकई घरी आल्या.रात्री पावसानं आणखीनच जोर धरला. इजा चमकत होत्या, ढगांचा गडगडाट वाढला होता. आई देवाचा धावा करत होती. "अरे बापा देवा, तुच आहे राजा, कई नको दाखवू " तिनं आपला निंदाचा ईया घरावर ठिवला व आम्ही झोपलो.
३० जुलै१९९१ ची थे रात होती. दुसरा दिवस निघाला तो वाईट बातमी घेऊनच.एकसारख्या मुसयधार पावसानं नदी नालेयले पूर आला होता.तेच्यात मोवाळ गावच्या वरचं धारण अर्ध्या रातीच फुटलं. गावात महापुराचं पाणी घुसलं त्यामुळं नागपूर जिल्हयातलं मोवाळ हे गाव पाण्यात बुडालं. गावतल्या लोकयले जलसमाधी मिळाली. लहान, तरुण,म्हतारे सारे पाण्यात बुडले.घडीत होत्याचनोतं झालं. कोणाले कोणाचा जीव वाचवता आला नाही. अशी थे काळरात्र होती.घरादारांची राखरांगोळी झाली. गावाचं मशान झालं. या बातमीनं सारं गाव हळहळलं. खरच हा पाऊस सर्वांना यातना देणाराच ठरला.
लक्ष्मण लाड
परळी वै जि.बीड
मो.९८५०५६९१३२
प्रतिक्रिया
छान
छान अनुभव मांडला आहे.
मुक्तविहारी
खूप खूप धन्यवाद मुक्तविहारीजी
खूप खूप धन्यवाद मुक्तविहारीजी
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने